मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील अतिपराक्रमी आमदार, नेते आणि मंत्री यांचे अभ्यासवर्ग घेतल्यानंतर त्या अतिउत्साही दिग्गजांमध्ये खूपच बदल झाल्याची चर्चा होती. ते खरे होते की खोटे हे जाणून घेण्यासाठी माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्याने त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्याच आपल्या माहितीसाठी…
संजय गायकवाड : माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आमचे कान टोचले ते योग्यच होतं. मला माझ्या त्या कृत्याचा आता पश्चात्ताप होतोय. किती क्रूरपणे वागलो मी त्या कँटीन बॉयशी. ती डाळही आंबलेली नव्हती. तरीही मी देशातला नंबर वन बॉक्सर आहे हे जगाला दाखवण्यासाठी त्या दुबळ्या पोरावर बॉक्सिंगचं प्रात्यक्षिक करून दाखवलं याचा मला आता पश्चात्ताप होतोय. मी त्या मुलाची क्षमाही मागितली. सध्या मी प्रायश्चित्त म्हणून श्रावणातले उपास करतोय. इतर दिवशीही तेलकट, तिखट, ऊर्जायुक्त अन्न खात नाही. मांसाहार तर मुळीच नाही. पहाटे ध्यानधारणेला बसतो. त्यानंतर अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या श्रीशिंदे स्तोत्राचं पठण करतो. बारा सूर्यनमस्कार आणि शंभर दंडबैठका मनातल्या मनात घालतो. दुपारी जेवणात फक्त दहीभात आणि शेपूची भाजी खातो. नंतर शहाळ्याचं पाणी पिऊन शिंदेंचं नाव घेत दीर्घ ढेकर देतो. दुपारी वामकुक्षी झाल्यावर विश्वगुरू नरेंद्रजी मोदी महाराज रचित ‘मन की बातें’ या विश्वात्मक ग्रंथाचं निरुपण करतो. त्याला आमदार निवासातील सर्व कर्मचारी उपस्थित असतात. आता वजनसुद्धा आटोक्यात आलंय. चेहर्यावर दिव्य तेज दिसत असल्याचं काहीजण म्हणतात. शेवटी जे काही होतं ते चांगल्यासाठी असं मला वाटतं.
संजय शिरसाट : गर्वाचं घर कधीतरी खाली होतं हे पटलंय मला. त्या दिवशी फडणवीस साहेबांनी आमची शाळा घेतल्यावर कधी नव्हे तो मी अंतर्मुख झालोय. विचार केला, आखिर क्या है ये पैसा? इज्जत पैसे से खरीदी नहीं जाती शिंदेजी, दिल से खरीदी जाती है। आखिर सिंपल रहने में बुरा क्या है? पैशाच्या राशीत लोळून शेवटी लाज पिता येत नाही कोळून. मी बाहत्तराव्या मजल्यावर राहिलो काय आणि पंचाहत्तराव्या मजल्यावर राहिलो काय काहीच फरक पडत नाही माझ्या शत्रूंना आणि मित्रांना. घरात त्या बॅगेतले पैसे मोजताना कधी नव्हे तो मी भावुक झालो होतो. सीएम साहेबांनी पिना टोचल्यावर तर हे सगळं वैभव असून नसल्यागत वाटत होतं. तेव्हाच ठरवलं, आता श्रीमंतीचा तोरा दाखवण्याच्या मोहात नाही पडायचं आणि मनाला वाटेल ते नाही बरळायचं. शेवटी तो वरून दिल्लीतून बघतो आहे याची शिंदे साहेबांसारखी जाण ठेवायची. खूप हळवा झालोय मी आता. खूप कमी बोलतो आणि देवाकडे मन शांत ठेवण्याची बुद्धी दे अशी प्रार्थना करतो. बघू, काय फळं मिळतात ती.
रामदास कदम : माफ करा माझ्या डान्स बारबालांनो, माफ करा. गेल्या जन्मात असं काय पाप केलं होतं की या जन्मात माझ्यावर डान्स बारवर पोट भरायची पाळी आली! तेही गृह राज्यमंत्री या प्रतिष्ठेच्या आणि समाजातील गुन्हेगारांचे अड्डे नष्ट करण्याच्या सिंहासनावर बसलेल्या माझ्या लाडक्या पुत्राच्या डोळ्यासमोर. मी आयुष्यात कधीच दारूच्या थेंबाला स्पर्श केला नाही. समोर असलेला पाण्याचा ग्लास मात्र घटाघटा प्यायचो. माझ्या सावली बारमध्ये त्या शेट्टीने डान्सबार कधी सुरू केला ते मला कळलंच नाही. पण आता माझ्यावर जळणार्या त्या परबांनी सावलीमध्ये बारबाला गिर्हाईकांसाठी डान्स करतात आणि मग पुढे काय काय घडतं याचं केलेलं वर्णन ऐकून मला धक्काच बसला. माझ्या सावलीवर छापा टाकण्याचा कट कोणी आणि कशासाठी केला हे समजण्याइतका मी वेडा नाही. पण झालं ते झालं. यापुढे माझ्या सावली बारमध्ये ना बारबाला असणार ना डान्स. फक्त शिंदेसाहेबांना आवडणारी भावगीतं लावली जातील. गिर्हाईकांनी फर्माईश केली तर भक्तीगीतंही लावली जातील. पण बारबाला नाचवल्या जाणार नाहीत. शेवटी, बारबाला हीसुद्धा एक स्त्री असते. तिलासुद्धा इज्जत असते. केवळ पोटासाठी तिला हे सारं करावं लागतं. अशा बारबालांना वाईट धंदे न करता जगता यावं यासाठी मी काही घरगुती प्रकल्प उभारणार आहे. मुंबई आणि मुंबईच्या बाहेर असणार्या डान्सबारवर बंदी आणण्यासाठी मोठं आंदोलन उभारणार आहे. प्रत्येक बारबाला सन्मानाने जगली पाहिजे, तिला तिचा आत्मसन्मान मिळाला पाहिजे यासाठी त्यांच्यामध्ये आध्यात्मिक विचार रुजवण्याच्या हेतूने पनवेल आणि गुहागरला आश्रमशाळा काढणार आहे. आठवड्यातून एक दिवस मी त्यांना माझ्या सानुल्या बोबड्या बोलांनी थोर विचारवंतांची शिकवण देईन. सीएम फडणवीसांनी दोन शब्द सुनावल्यावर आणि शिंदेसाहेबांनी पाठीवर थोपटून सांत्वन केल्यावर माझ्यात झालेला बदल तुम्हाला जाणवलाच असेल. देखा है पहली बार लोगों की आंखों में प्यार. तुमचं प्रेम असंच राहू द्या.
धनंजय मुंडे : खरंच मला काही नको. नको मंत्रीपद, नको संत्रीपद, नको दुहेरी पतीपद, नको बंगला, नको गाडी. फक्त लोकहो, तुमचे आशीर्वाद हवे. जीवन चलने का नाम. आजपर्यंत जे जे समोर आलं त्याला भिडत गेलो. काहींनी फायदा घेतला, काहींनी फसवलं तर काहींनी जागेवर बसवलं. पण माझी आतली शक्ती मला सांगत होती की तू चुकीचं काही केलं नाहीस, मग कशाला घाबरतोस? म्हणूनच उजळ माथ्यानं गेलो पâडणवीस साहेबांकडे. कुठेतरी आशा होती की मिळेल त्या कोकाटेंचं खातं मला. पण नव्हतं नशिबात ते. आता बंगला खाली करा असा झक्कू लावलाय. दंडही केलाय चाळीस लाखांवर. तरीही मी मनाची शांती ढळू दिलेली नाही. विपश्यनेला जाऊन आल्यापासून शांत डोक्याने विचार करायची सवय लागलीय. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही.
माणिकराव कोकाटे : लोकांना पुरते व्यसनी बनवणार्या रमीच्या घातक खेळावर कायद्याने बंदी आणण्याची मागणी करणार आहे मी!