संतोषराव, आमच्या शाळेत एक जोडी आहे गणा आणि गणपाची. मास्तरांनी गणाची खरडपट्टी काढली की तो काही बोलायच्या आत गणपा उठतो आणि गणाची बाजू मांडायला लागतो. असं तो का करत असेल बरं?
– श्रद्धा पांचाळ, रत्नागिरी
त्यांच्यातलं नातं तपासा… नाही… नाही… आधार कार्ड, रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड यातून तुम्हाला काही कळणार नाही, मतदारयादी तपासा. त्यातून त्यांचं खरं नातं काय ते कळेल. आता ‘ते’ असं का करत असतील? या प्रश्नाच्या उत्तरावर एकच वाटतंय, ‘अशा’ नात्यांची सवय लागलेले… ‘तशा’ नात्याला सांभाळण्यासाठी वाटेल ते करतील… जास्त विस्कटून सांगायला लावू नका… मतदारयादीतून नाव शोधून त्यांचं नातं तपासण्याएवढा वेळ आणि तशी टीम आमच्याकडे नाहीये.
कबुतरांना दाणे घालून शहरात श्वसनाचे विकार वाढवणे आणि माणसांना हानी पोहोचवणे यातून कसली भूतदया साधत असेल?
– समीर दांडेकर, दादर
तुम्ही अर्धसत्य बोलताय.. भूतदया करणारे कबुतरांना दाणे घालतात, पण आपल्या माणसांना हानी पोहचू नये म्हणून, आपल्या घरांना आणि मंदिरांना जाळ्या लावतात, हे सत्य तुम्ही लपवताय. आता परक्या माणसांना हानी पोहचते असं बोलू नका, ते अर्धसत्यच होईल, कबुतरांना दाणे घालणारे आपल्या माणसांना तरी माणसं समजतात, हे सत्य विसरू नका. माणसावर माया करण्यापेक्षा प्राण्यांवर भूतदया करणे स्वस्त आहे… माणसांना खाणे दिले की पिणे द्यावे लागते. कबुतरांना चणे दिले तरी भागते. माणसांना हानी पोहचवल्याची पापं मन ‘खात’ असतात. त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी पक्षांना ‘खायला’ घातलं जातं… हे स्वीकारा.
भरदिवसा चाकूसुरे घेऊन महापालिकेने केलेली व्यवस्था उद्ध्वस्त करणार्या दंगेखोरांच्या घरावर लगेच बुलडोझरही चालत नाहीत आणि त्यांना कोणी अर्बन नक्षलवादीही म्हणत नाही… हा काय चमत्कार?
– मुग्धा विचारे, पोलादपूर
आपलेच ओठ आपल्याच दाताखाली आले तर दात त्यांना चावतात का? दात कोण? ओठ कोण? याचा विचार तुम्हीच करा विचारे ताई, उगाच तुमच्या प्रश्नाला आम्ही उत्तर द्यायचो आणि प्रश्न विचारणार्यांसारखे, उत्तर देणारे नक्षलवादी ठरायचो. अर्बन एरियात राहतो म्हणून भीती वाटते. हा फुटकळ विनोद आहे म्हणूनच तो करण्याचं धाडस केलं. कारण बोचरा विनोद सुद्धा अर्बन नक्षलच्या व्याख्येत येतो असं काही व्याख्याते सांगतात… ते ऐकूनच तुम्हाला सांगितलं.
कोणत्याही सजीवाची हत्या पाप आहे असं मानणारे लोक लस का घेतात साथीच्या आजाराची? त्या विषाणूलाही जगण्याचा आणि तुमचा जीव घेण्याचा हक्क नाही का?
– बाळकृष्ण पवार, लासलगाव
स्वतःचं पोट भरल्यावर उरलेल्यातलं दुसर्याला खाऊ घालणारे, स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसर्या जीवाला वाचवतील असं वाटतं तुम्हाला पवार साहेब? तुम्ही म्हणताय तशा मानवांचं एक उघड गुपित आहे. त्यांच्या दृष्टीने पाप हे ढुंगणासारखं असतं, स्वतःचं दिसत नाही, दुसर्याचंच दिसतं. त्यामुळे दुसर्याला पापी म्हणून त्याचा जीव घेण्याचा त्यांना अधिकार असतो आणि आपण दुसर्याला कसंबसं जगायला देतोय तेच त्यांच्या दृष्टीने पुण्य असतं.
रमी खेळणार्यांना क्रीडामंत्रीपद मिळत असेल, तर मटक्याचा आकडा लावणार्याला अर्थमंत्रीपद द्यायला काय हरकत आहे? ‘गुण’वत्ता तीच नाही का?
– मोहम्मद अत्तार, सातारा
मोहम्मद मिया, तुम ऐसा बोलते, तो फिर क्या हायवेपर ‘क्रीडा’ करनेवाले कू क्रीडामंत्री करने का क्या मियाँ? आन तुम्हारे बोलणेप्रमाणे मटका खेलनेवालेकु अर्थमंत्री करे तो, जो भाईजान अर्थमंत्री है उन्हे क्या मटका खेलने का क्या? आन रमी खेलनेवाले फक्त रमीच खेळते थे ना, रमी के बरोबर रम आन रमा न्हवत्या ना? आन रमी खेलते टाईम रम आन रमा भी रहती तो उनको क्या सांस्कृतिक मंत्री करणे मंगता क्या? तुम सहज सवाल पुचकु जायेंगे… पण लेने वाले इसमे से नेमकी आयडिया लेंगे अन वैसाइच करेंगे. फिर… तुम्हारे पास हात चोळते बैठने सिवाय कुछ भी नही रहेगा… उसके पेक्षा अभीच हात चोळते बैठो. आन जो हो रहा है वो गप गुमान देखो ना मियाँ…