गेला आठवडा देशभरात ‘साप्ताहिक मार्मिक’च्या एका अलीकडच्याच मुखपृष्ठाने गाजवला. त्याचा विषय होते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘माय फ्रेंड डोलांड’!
या गृहस्थांनी भारतावर कसला राग काढायला घेतला आहे, कोण जाणे! त्यांच्या याआधीच्या निवडणुकीत, तेही मुस्लिमांचा द्वेष करतात म्हणजे ते ‘आपले’ आहेत, असा र्हस्वदृष्टीचा, कोता विचार मोदी यांनी केला होता. सगळे राजनैतिक संकेत बाजूला ठेवून, भारताचे १०० कोटी रुपये पाण्यात घालून मोदींनी त्यांचा उघड प्रचार केला होता. त्याचा भारताला तेव्हा काही खास फायदा झाला नाही. दुसर्या सत्ताकाळात तर ट्रम्प यांनी भारताचा पाणउतारा करण्याचा एककलमी कार्यक्रमच चालवला आहे. अमेरिकेतल्या भारतीय घुसखोरांना बेड्या घालून पाठवण्यापासून भारतावर जास्तीत जास्त टॅरिफ लावण्याची धमकी देण्यापर्यंत नाना प्रकार ट्रम्प यांनी केले. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांची हत्या केल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. ते आपणच थांबवले असा दावा ट्रम्प यांनी केला. तो दावा भारताने अतिसौम्य भाषेत आणि त्यांचं नावही न घेता झुगारल्यानंतर भारतावर ५० टक्के टॅरिफ लावण्याचा आततायी निर्णय घेऊन ट्रम्प यांनी त्याची अंमलबजावणीही करून टाकली.
या पार्श्वभूमीवर ‘साप्ताहिक मार्मिक’चं हे मुखपृष्ठ चर्चेत आलं आणि व्हायरल झालं. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या सगळ्या समाजमाध्यमांमध्ये लाखो लोकांनी ते पाहिलं. ‘मार्मिक’चे तरुण मुखपृष्ठकार गौरव सर्जेराव यांच्या व्यक्तिगत सोशल मीडियावरून ते १५ लाख लोकांपर्यंत पोहोचलं, ६५ हजार लोकांनी ते शेअर केलं आणि त्यावर तीन हजारांहून अधिक कमेंट्स आल्या. सर्जेराव यांनी या चित्राचं अॅनिमेशन करून त्यात संवाद आणि आवाज टाकल्यामुळे त्याची खुमारी आणखी वाढली होती…
…काय होतं या व्यंगचित्रात?
…बाँब लावलेल्या तारेवर ऐटीत बसलेला डोनाल्ड पक्षी शिटतो आहे आणि ती घाण अंगावर पडत असतानाही त्यांचे स्वघोषित भारतीय परममित्र काही ‘माय फ्रेंड डोलांड’चा जयघोष थांबवत नाहीयेत…
…ही आपल्या देशातली आजची ज्वलंत जनभावना आहे…
डोनाल्ड ट्रम्प भारताचा इतका अपमान करत असताना आपले छप्पन्न इंची पंतप्रधान त्यांच्याकडे आँखे लाल करून का पाहात नाहीत, त्यांना खणखणीत इशारा का देत नाहीत, असा प्रश्न अजून थोडीबहुत बुद्धी शाबूत असलेल्या मोदीभक्तांनाही पडलेला आहे. चीनसारखा बलाढ्य देश अमेरिकेला जशास तसे उत्तर देऊ शकतो, भारताची तेवढी हिंमत असू शकत नाही, कारण भारताची तेवढी आर्थिक ताकद नाही. पण, युक्रेनसारख्या छोट्या, युद्धग्रस्त नेत्याने दाखवला, तेवढाही बाणेदारपणा आपल्या विश्वगुरू वगैरे म्हणवून घेणार्या सर्वोच्च नेत्यांनी दाखवू नये?
असं का झालं? अमेरिकेने एवढ्या मोठ्या देशाला दामटावं आणि यांनी ऐकून घ्यावं, असं यांचं नेमकं अमेरिकेत अडकलेलं तरी काय आहे?
देशवासीयांना हे आणि असे अनेक प्रश्न पडतात. ते कोणत्याही प्रसारमाध्यमांमध्ये दिसत नाहीत, कोणत्याही न्यूज चॅनेलवर उमटत नाहीत. तिथे सरकारची आरती ओवाळण्याचा कार्यक्रम सुरू असतो. राहुल गांधी पुराव्यांसह निवडणूक आयोगाच्या मतचोरीचा पर्दाफाश करतात आणि मिंध्या माध्यमांमध्ये हेडलाइन असते ती शेतकर्यांसाठी व्यक्तिगत त्याग करण्याचे नक्राश्रू ढाळणार्या मोदी यांची.
असल्या घुसमटलेल्या काळात लोकांच्या मनातल्या भावनांना वाट करून देण्याचं काम एक व्यंगचित्र करतं, म्हणूनच तर ते, शब्दांच्या, भाषेच्या मर्यादा ओलांडून अख्ख्या देशात पोहोचतं. हे व्यंगचित्र केरळमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या एका नेत्याने शेअर केलं आणि त्याचवेळी मध्य प्रदेशातही एका आमदाराने हे व्यंगचित्र शेअर केलं.
ही आहे व्यंगचित्राची ताकद.
कितीही व्हॉट्सअप विद्यापीठं काढा, कितीही अपप्रचार करा, कितीही खोटे दावे करा, कितीही प्रसारमाध्यमं टाचेखाली घेऊन अंकित करा, ईडी-सीबीआय-निवडणूक आयोग दारात बांधा… एक व्यंगचित्र या सगळ्या अभेद्य वाटणार्या गडांना सुरुंग लावतं, लोकांच्या मनात भावनांचा स्फोट घडवून आणतं…
ही व्यंगचित्रांची ताकद ६५ वर्षांपूर्वी ओळखली होती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. त्यांनी ती महाराष्ट्रालाही दाखवून दिली आणि मार्मिक हे मराठी माणसाचा बुलंद आवाज बनलेलं साप्ताहिक सुरू केलं होतं. हजारो शब्द जो सांगू शकत नाहीत, असा स्फोटक आशय बाळासाहेबांनी बारुदासारखा एकेका चित्रात भरला… देशातली अस्वस्थता, महाराष्ट्रातलं मराठी माणसाचं दुय्यम स्थान, मराठीची गळचेपी या सगळ्याला त्यांनी ‘मार्मिक’मधून वाचा फोडली आणि त्यातूनच शिवसेनेचा जन्म झाला, हा इतिहास सर्वज्ञात आहे.
जगात सगळीकडे आधी संघटना असते, पक्ष असतो आणि मग त्याचं मुखपत्र निघतं. बाळासाहेबांनी आधी मार्मिक काढला, त्याने सहा वर्षे मराठी मनांमधला असंतोष जागवला, धुमसत ठेवला आणि योग्य वेळी त्याला वाट करून दिली, मराठी माणसांची एकी दाखवून देणारी शिस्तबद्ध संघटना उभी करून दाखवली… एका व्यंगचित्रकाराने, पत्रकाराने घडवलेला हा चमत्कारच होता.
गेल्या ६५ वर्षांत ‘मार्मिक’ने घेतलेला वसा निष्ठेने सांभाळला. मार्मिकच्या आधीपासून लोकप्रिय असलेली आणि मार्मिकच्या नंतर जन्माला आलेली अनेक नियतकालिकं वेगवेगळ्या कारणांनी अस्तंगत झाली. कधी आर्थिक गणित फिसकटलं, कधी वाचकांचा प्रतिसाद घटला, नियतकालिकांचा काळच सरला, अशी अनेक कारणं त्यासाठी दिली गेली. जी प्रसारमाध्यमं जेमतेम टिकून आहेत त्यांनी गेल्या १० वर्षांत पाठीचा कणा मुडपून बाजूला ठेवून दिला आहे. सत्तेची चाटुकारिता केली नाही, तर ईडी-सीबीआय आणि काय काय मागे लागेल, याची त्यांना कल्पना आहे. पण जो चमत्कार घडवण्यासाठीच जन्माला आला होता, तो मार्मिक मात्र अजूनही या सगळ्या संकटांवर, अडचणींवर, विपरीत परिस्थितीवर मात करून ताठ कण्याने, सत्तेपुढे न झुकता दिमाखात सुरू आहे आणि सुरू राहील.
महाराष्ट्राचं खाऊन, महाराष्ट्रात राहून, महाराष्ट्रावरच तंगड्या वर करणारे नतद्रष्ट लोक ६५ वर्षांपूर्वीही होते, आजही त्यांनी उचल खाल्लेली आहे… तेव्हाही त्यांना मार्मिक पाणी पाजत होता आणि आजही त्यांचे कुटील मनसुबे उधळून लावण्यात मार्मिक अग्रेसर असेलच…
…लावा ताकद!