• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

जेथें भेटेल तेथें ठोका ।।

- किरण माने (शुद्ध बुद्ध काया... तुकोबाराया! (भाग:१३))

Nitin Phanse by Nitin Phanse
August 13, 2025
in धर्म-कर्म
0

– किरण माने

परवा ‘द केरला स्टोरी’ या अतिरंजित आणि धर्मांधतेला बढावा देणार्‍या सिनेमाला दोन नॅशनल अ‍ॅवॉर्ड मिळाली. खरंतर ती एक कलाकृती नसून ते एक अत्यंत हिडीस खोटे नरेटिव्ह होते… ज्याचा उद्देश फक्त एका विशिष्ट धर्माची बदनामी करणे हा होता. असो. हल्ली कलाक्षेत्रात असा धर्मद्वेष्टा, जातीयवादी प्रचार करणार्‍या दांभिकांची चलती आहे… पण या निमित्तानं मला त्या सिनेमाच्या वेळची एक घटना आठवली. ‘केरला स्टोरी’ बघून आल्यावर एक इसम सोशल मीडियावर येऊन ढसाढसा रडायला लागला. त्या समाजानं आपल्या धर्मातल्या मुलींवर केलेल्या अत्याचाराबद्दल हृदय पिळवटणारी पोस्ट त्याने रडत रडतच केली. ती वाचून माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. मी स्वत:ला चार वेळा चिमटा काढून बघितला. म्हटलं हा दगडाच्या काळजाचा नराधम अचानक मगरीचे अश्रू का ढाळायला लागलाय? हा अन्याय, अत्याचाराबद्दल इतका कसा ‘संवेदनशील’ वगैरे झाला?
होय ! ‘नराधम’ म्हणावं असंच वागणं होतं त्याचं. अहो, लोक तडफडून मरत असताना खदाखदा हसताना त्याला बघितलं होतं मी. एकदा दोनदा नाही, खूप वेळा. आजही बघतो. हाच टवाळखोर माणूस मणिपूरमध्ये नग्न करून धिंड काढलेल्या भगिनींवर हसला होता. शेतकरी आत्महत्यांची टर उडवून म्हणाला होता, ‘माज आलाय या शेतकर्‍यांना. टॅक्स-बिक्स काही भरायला नको, आयती कर्जमाफी पाहिजे यांना. सवय लागलीय फुकटात घ्यायची. मरू द्या.’
नोटबंदीनंतर बँकांपुढे भर उन्हात रांगा लागल्या… अनेक वयोवृद्ध, आजारी लोक टेन्शन आणि शारिरीक थकव्यानं मरायला लागले… जेव्हा बळींचा १६० हा अधिकृत आकडा जाहीर झाला, तेव्हा त्यानं हसत-हसत कुत्सितपणे पोस्ट टाकली होती, ‘तिकडे सीमेवर जवान उन्हातान्हात उभे असतात. शहीद होतात. मग इथे देशातला काळा पैसा यावा म्हणून शे-दीडशे लोक मेले तर काय बिघडलं? तुम्हाला देशासाठी एवढंही सहन करता येत नाही?’
पुलवामामध्ये झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात ४४ जवान शहिद झाले. ते आरडीएक्स कुठून आलं? एवढी सुरक्षा भेदून अतिरेकी कसे घुसले? वगैरेंचा अजूनही पत्ता नाही. त्यावर तो अजूनही बोलणं टाळतो. पहलगामला सव्वीस निरपराध भारतीय लोक त्यांच्या घरातल्या महिलांसमोर मारले गेले… त्याबद्दल सुरक्षाव्यवस्थेला जाब विचारणार्‍या एका पोस्टवर याच माणसानं हेटाळणी करत हसत, ‘गेल्या सत्तर वर्षात आधीच्या सरकारच्या काळात तरी कुठं आपण सुरक्षित होतो?’ वगैरे वेगळाच विषय काढत विषय भरकटवला होता. दिल्लीच्या किसान आंदोलनात ७५० शेतकरी शहीद झाले, तेव्हा त्यांना ‘देशद्रोही’, ‘खलिस्तानी’ म्हणून खिदळत टर उडवताना मी बघितलंय.
कोरोना काळातला गलथानपणा असो, उत्तर प्रदेशात हलगर्जीपणामुळे झालेले बालमृत्यू असो, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेशसारख्या विचारवंतांच्या, समाजसुधारकांच्या हत्या असोत, मी या माणसाला कधी कुणावरच्या अन्यायामुळे, अत्याचारामुळे, मरणामुळे व्यथित झालेलं, व्याकूळ झालेलं बघितलं नाही. पण याच माणसानं ‘केरला स्टोरी’सारखा तद्दन प्रोपोगंडा सिनेमा बघून मात्र तब्बल आठवडाभर अश्रुभरले डोळे दाखवत हंबरडा फोडला होता!
हे भिकार लोक ज्या राजकारण्यांचे अंधभक्त असतात, ते नेतेही असेच सोयीनं हुकमी खोटे अश्रू ढाळणारे असतात. इलेक्शनच्या वेळी मतांवर डोळा ठेवून दिलेली मोठमोठी आश्वासनं सत्तेवर येताच हे लोक सोयीनं विसरतात. सर्वसामान्यांची, गोरगरीबांची काडीचीही फिकीर नसल्यासारखे मग्रूर वागतात. पण दर सहा महिन्यांतून एकदा सहानुभूती मिळवण्यासाठी गळे काढून रडण्याचा मात्र कार्यक्रम फिक्स ठरलेला असतो.
तुम्ही म्हणाल, नमनालाच एवढे घडाभर तेल जाळलेत, पण या सगळ्या गोष्टींचा तुकोबारायांशी काय संबंध? तर आधी एक लक्षात घ्या माझ्या भावाबहिणींनो, की तुकोबांशी संबंध नाही अशी भवतालची एकही गोष्ट नाही. मी आजकालच्या खोटे हुकमी अश्रू ढाळून लोकांना बहकावणार्‍या कावेबाज लोकांची उदाहरणं दिली, अशा ड्रामेबाज लोकांना ‘रडतराव’ म्हणतात. स्वत: रिकाम्या डोक्याचे, पण दुसर्‍यांच्या हितासाठी रडण्याचं नाटक करणार! असल्या नाटक्यांचं काय करावं, याविषयीसुद्धा तुकोबारायांनी उपाय सांगितलाय… ऐका.
‘स्वयें आपण चि रिता ।
रडे पुढिलांच्या हिता ।।
सेकीं हें ना तेंसें जालें ।
बोलणें तितुकें वांयां गेलें ।।
सुखसागरीं नेघें वस्ती ।
अंगीं ज्ञानपणाची मस्ती ।।
तुका म्हणे गाढव लेखा ।
जेथें भेटेल तेथें ठोका ।।’
…आपण स्वतः नाकर्ता, रिता, रिकामा पण दुसर्‍याच्या हिताची खोटी चिंता करत ढसाढसा रडणार.
…असल्या खोटारड्यांची शेवटी धड इकडं ना तिकडं अशी अवस्था होते. कुत्रं हाल खात नाही. सगळी आश्वासनं-सगळं बोलणं वाया जातं. हवेत विरून जातं.
…सुखाच्या सागरात रहात असूनही हे आनंदी नसतात. कारण ‘आपण खूप ज्ञानी आहोत’ अशी अंगातली मस्ती यांना स्वस्थ बसू देत नाही.
…शेवटी तुका म्हणे, असलं गाढव लग्गेच ओळखा आणि जिथं भेटेल तिथं ठोकून काढा.
आणखी काय सांगू?? समजून घ्या. तुकोबा तुम्हाला पदोपदी दिशा दाखवत असतो. सावध करत असतो. आपलं लक्ष त्याच्याकडे पाहिजे! मी पुन:पुन्हा सांगतो, ‘तुकाराम गाथा’ देव्हार्‍यात पुजायला घरात ठेवायची नसती. ती शेल्फमध्ये असावी. शेल्फमधली इतर पुस्तकं वाचता-वाचता दोन मिनिटं वेळ काढून गाथेतला एक तरी अभंग अनुभवावा. भवताली घडणार्‍या अनेक घटनांवर आपल्याला पडणारे प्रश्न चुटकीसरशी सुटतात.
आपण बघतो की आजकालचे दुटप्पी भुरटे नेते सार्वजनिक ठिकाणीही तारतम्यानं वागत नाहीत. परवा एका आमदारानं एका वेटरला भर आमदार निवासाच्या कँटिनमध्ये फाईट मारली. विधानभवनात रमी खेळणार्‍या एका मंत्र्यानं माजोरडेपणानं उत्तर दिलं, ‘राजीनामा का देऊ? मी विनयभंग थोडीच केलाय?’ एका बड्या नेत्यानं तर काश्मीरला आपले निष्पाप नागरीक मारले गेल्यावर तिकडे न जाता थेट प्रचारसभेत जाऊन भाषण ठोकण्याचा मुजोरपणा केला होता. सगळा देश दु:खसागरात बुडालेला असताना हा नेता जणू ‘मेले तर मरूदेत’ अशा थाटात स्टेजवर इतर नेत्यांसोबत टाळ्या देत हसत-खिदळत होता. हे लोक एकीकडे गोरगरीबांपुढे, सर्वसामान्य जनतेपुढे खच्चून छाती फुगवतात, वरच्या पट्टीत माजात बोलतात. न्यायासाठी झगडणार्‍या सर्वसामान्यांना ‘आंदोलनजीवी’ म्हणत हिणवतात. लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या महिला खेळाडूंवर लाठीचार्ज करतात. पण हेच लोक दुसरीकडे धनदांडग्या उद्योगपतींपुढे मात्र शेपूट हलवतात! त्यांच्यासाठी पायघड्या अंथरतात, थुंकीही झेलायला तयार असतात!
गरीब गांजलेल्या शेतकर्‍यांनी कर्जात साधी सवलत मागितली तरी हे हाडतुड करतात, अश्रूधुराची नळकांडी फोडून पळवून लावतात. पण शंभर पिढ्यांना पुरून उरेल एवढा पैसा असणार्‍यांची, हजारो कोटींची कर्ज माफ करतात. असले दुतोंडी आणि रंगबदलू लोक तुकोबारायांच्या काळातही होते बरं का ! तुकोबारायांनी अशांची निर्दयपणे पोलखोल केली आहे. ते म्हणतात,
‘नागलें देखोनि चांगलें बोले ।
आपुलें वेचूनि त्यापुढें खुले ।।
अधमाचे ओंगळ गुण ।
उचित नेणे तो धर्म कोण ।।
आर्तभूतां न घाली पाण्याची चुळ ।
न मागे त्यासी घाली साखरगुळ ।।
एकासी धड न बोले वाचा ।
एकासी म्हणे मी तुझ्या बांदीचा ।।
एका देखोनि लपवी भाकरी ।
एकासी आड पडूनी होकरी ।।
तुका म्हणे ते गाढवपशू ।
लाभेंविण केला आयुष्यनाशु ।।’
…एखाद्या धनदांडग्याशी हे खूप चांगलं बोलतात. अगदी आपल्या खिशातून पैसे वेचून त्याच्यापुढे मिरवतात!
…हे अधमांचे ओंगळ-हिडीस गुण असतात. त्यांना उचित धर्म कोणता ते कळत नाही.
…हे लोक तहानलेल्याला चूळभर पाणी देणार नाहीत, पण एखाद्या धनवानानं न मागूनही त्यांना जबरदस्तीनं साखरगूळ, गोडधोड खायला घालतात!
…एकाशी धड नीट बोलणारही नाहीत, पण दुसर्‍याला म्हणणार मी तुझा सेवक आहे.
…एकाला बघून भाकरी लपवणार, पण एकाला अगदी आडवा पडून-पडून खायचा आग्रह करणार!
…शेवटी तुका म्हणे, ही असली माणसं केवळ ‘गाढव’ आहेत. कुठल्याही लाभाशिवाय आयुष्याचा नाश करून घेतात.
तुकोबानं अजून किती शहाणं करायचं आपल्याला? आपण थोडं तरी शिकूया. असले भुरटे ओळखूया आणि लाथा घालून यांना हाकलूया. वाघाची कातडी पांघरलेली गाढवं आहेत ही… त्यांचा मुखवटा फाडून खरं रूप जगापुढे आणूया, तरच तुकोबाचं विचारधन सार्थकी लागेल.
तुकारामांनी गाथा का लिहिली आहे हे समजून घ्या. बहुजनांनी आपल्या हिताच्या चार गोष्टी समजून घेऊन आपलं आणि आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांचं भलं करावं यासाठी त्यानं ठेवलेली अनमोल अशी ‘प्रॉपर्टी’ आहे ती! एकेका अभंगात लाखमोलाचं विचारधन आहे. वाचा, अंगीकारा आणि सगळ्यांना वाटा… आपण खरं तर खूप भाग्यवान आहोत. असली श्रीमंती ऐर्‍यागैर्‍यांना नाही मिळत, जी दान केल्यानं वाढते!

Previous Post

प्रबोधनी विचारांचं प्रवेशद्वार

Next Post

निवडणूक चोरणारी टोळी उघडी पडली

Next Post

निवडणूक चोरणारी टोळी उघडी पडली

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.