माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्याने स्वत: फडणवीसजी यांची टेप केलेली एक्सक्लुजिव्ह मुलाखत मला मोबाईलवरून ऐकवली तेव्हा मी उडालोच. तीच मुलाखत मी जशीच्या तशी तुम्हाला ऐकवत आहे.
– नमस्कार अमृताजी बाई. अभिनंदन. प्रथमच उपमुख्यमंत्रीपदाचा मुकूट फडणवीसांना मिळाल्याबद्दल.
– मला म्हणजे त्यांना तो नकोच होता. त्यांना नाही आवडत अशी दुय्यम नोकरासारखी पदं. गेले महिनाभर मात्र त्यांचं नेमकं काय चाललं होतं तेच कळत नव्हतं.
– म्हणजे नेमकं काय करत होते?
– महिन्यापूर्वी त्यांनी काळबादेवीच्या नाटक मंडळींना वेगवेगळे ड्रेस पुरवणार्या मगन ड्रेसवाल्याकडून गॉगल्स, पिस्तुलं, बंदुका, गमबुट, बुरखे, रबराचे मुखवटे असं बरंच काही सामान आणलं तेव्हा मी त्यांना विचारलं की, पक्षातर्फे नाटक वगैरे बसवायचा विचार आहे का? मलाही एखादी भूमिका द्या ना. त्यात गाणं असलं तर मलाही इंप्रेशन मारता येईल. तर म्हणाले, हो. नाटकच करायचंय, पण ते मला एकट्याला आणि एकपात्री. ते रोज मध्यरात्र झाल्यावर. शेवटचा शो संपल्यानंतर. मुख्यमंत्र्याची पत्नी म्हणून मिरवायचंय ना. मग तोंडावर ताबा ठेव आणि मला प्रत्येक मध्यरात्री कुठे जाता? म्हणून विचारू नकोस.
– पण थोडी तरी हिंट लागली असेल ना!
– मुळीच नाही. दर दिवशी मध्यरात्री ते त्या पेटार्यातले वेगवेगळे ड्रेस घालून बाहेर जात. एकदा तर त्यांनी सरदारजीचा वेश करून तयार फेटाही डोक्यावर चढवला. गॉगल लावला. हातात सिगारेट शिलगावली आणि गाडीतून निघूनही गेले. एका मध्यरात्री तर स्त्रियांचा पंजाबी ड्रेस घातला. गळ्यात ओढणी घातली. ओठांना लिपस्टीक लावली. मेकअप केला. इतके छान दिसत होते की माझ्या जागी आमच्या पक्षातील कोणीही असता तर यांना आलिंगन देऊन त्यांच्यापुढे लोटांगणच घातलं असतं. स्त्री वेशात ते कित्ती छान दिसतात. गोबरे गाल, लालचुटूक ओठ, हातात कोपरापर्यंत बांगड्या… खरंच कुणीही प्रेमात पडलं असतं यांच्या.. त्यांच्या डोक्यावरचा बॉबकट केलेला केसांचा टोप मी नीट बसवला आणि त्यांना त्यांना निरोप दिला. त्यानंतर दर दिवशी कुणाला भेटायला जातात याचा पत्ताच नव्हता. एकदा तर कुल्फीवाल्याकडून कुल्फीचं सामान भाड्याने घेऊन कुल्फीवाल्याचा ड्रेस करून, डोक्यावर तो कुल्फी सामानाचा मोठा करंडा घेऊन निघाले. म्हणाले, दाढीवाला खूश होगा. तरीही मला हिंट मिळाली नाही. टॅक्सीतून ते गेले आणि मला मोबाईल केला की, बोलणी लांबल्यामुळे मला आता दाढीमिशा, धोतर, सदरा घालून यावं लागेल. आता दिवसा उजेडी इथून लपूनछपून बाहेर पडताना मला फारच काळजी घ्यावी लागतेय. तरी मी अर्ध्या तासात येतो. त्याप्रमाणे ते आले. स्नानसंध्या नाश्तापाणी करून झाल्यावर स्वत:शीच बडबडत होते. त्या बहिर्जी नाईकलाही इतकी वेशांतरे करावी लागली नसतील. पण पक्षासाठी आणि मुख्यमंत्रीपदासाठी हे सारं करतोय मी. दोन महिन्यांत अशी फिल्डींग लावतो की आपल्या जगातल्या मोदीभक्तांनी आपल्याला ट्विट करून दाद दिली पाहिजे. देवेंद्रजी, आहात कुठे?… आणि गडगडाटी हास्य करून पुन्हा विचारात पडले. दरम्यान तीन-चार दिवसांत त्यांच्या गुजरातला दोन फेर्या झाल्या. मला म्हणाले, अमितजींशी दीर्घ बोलणी झाली. सगळा प्लान त्यांनी समजावून सांगितला. गौहाती आणि गोव्याची हॉटेल्स बुक केलीत. गुजरातला काहीच प्रॉब्लेम येणार नाही असं म्हणाले. केंद्रीय सुरक्षा दलाच्या फौजा तिन्ही राज्यात तैनात करण्याचं आश्वासन दिलं. किती मागाल तेवढी रक्कम प्रत्येक वेळी ट्रान्सफर केली जाईल असं म्हणाले. कामाला लागा. मात्र सुरुवात सार्यांना घेऊन गुजरातपासून करा. आवजो…
नंतर त्यांना फोन यायचे ते एकाच माणसाचे. बहुतेक दाढीवाल्याचे असावे. कारण एकदा तर त्यांचा आलेला व्हिडीओ कॉल मी पाहिला आणि ओळखलंच की हे तर ठाण्याचे सेनेचे दाढीवाले मंत्री. मग मात्र मी यांना अगदी खोदून खोदून विचारलं तेव्हा ते म्हणाले, माझं मुख्यमंत्रीपद गेल्यापासून आणि आपला पक्ष सत्तेपासून वंचित झाल्यानंतर माझ्याबद्दल फक्त एकाच माणसाला सहानुभूती वाटत होती. त्यांनी ते माझ्याजवळ बोलूनही दाखवलं. तेव्हाच मी ठरवलं की या माणसाला आपण भाजपच्या कोपच्यात आज ना उद्या घ्यायचाच. हे सरकार कोसळायचं असेल तर यालाच हाताशी धरले पाहिजे. पहिलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरुद्ध यांचे कान भरूया आणि नंतर एकेकाला कोपच्यात घेऊन त्यांचा अंदाज घेऊया. मग आपल्या काही कामधंदा नसलेल्या किरीटाला हाताशी धरून त्यातल्या कुणाकुणाला इडी लावता येईल याची यादी तयार केली. त्यांच्या संपत्तीची माहिती गोळा केली. भाजपात या आणि पावन व्हा अशी तंबीही त्यांना दिली. पहिला प्रताप सरनाईकांसारखा मोहरा हाती लागला. त्यांचं एवढं ब्रेनवॉशिंग आमच्या इडीवाल्यांनी केलं की त्यांनी डायरेक्ट उद्धवजींनाच भाजपाशी शिवसेनेने जमवून घ्यावं अशी विनवणी काकुळतीने केली. सर्व मनासारखं पार पडत असताना मग मात्र आम्ही दिल्लीच्या मार्गदर्शनाखाली शेवटची निर्णायक मुव्ह सुरू केली. दाढीवाल्यांना घेऊन गुजरातला गेलो. अमितजींची गाठ घालून दिली. सगळा प्लान समजावून सांगितला. पुन्हा वेगवेगळे मुंबईला आलो. पुढचं सगळं सगळ्यांना माहीत आहे. गुजरात, गौहाती, गोवा ही टूर, तिथे मुंबईहून लपूनछपून येणार्यांची लगबग मला मुंबई आणि गुजरातला राहून त्यांचे मिळणारे रिपोर्ट हे सारं काही आमच्या प्लानप्रमाणे होत होतं. मात्र उद्धवजींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणं हे आम्हाला अपेक्षितच होतं. त्याचीच तर मी वाट पाहात होतो. अमृता, तुला सांगतो, ज्या दिवशी तिघांचं सरकार कोसळलं त्या दिवशी माझं स्वप्न साकार होणार याचे शुभसंकेत मिळत असतानाच दिल्लीहून नड्डांचा फोन आला आणि उपमुख्यमंत्री व्हा, असा त्यांचा आदेश आल्यावर माझ्या पायाखालची वाळूच सरकली. पुढचं तुला सगळं माहीत आहे. येतो मी. काहीतरी गडबड दिसतेय बंडखोरांमध्ये. पाहून येतो. फडणवीस निघून गेले.
– ते एवढ्या घाईत का गेले?
– पोक्याभाऊ काय सांगू? तो पहा त्यांचा फोन येतोय. हॅलो, देवेंद्रजी, काय झालं? तुमचा आवाज असा रडका का येतोय? मला ही चिन्हं चांगली वाटत नाहीत. ते बघा, मांजरही आडवं गेलं. तुम्ही जपून राहा. लाल मुंग्यांची रांग बघा परत वारूळात जातेय असं दिसतंय. तुम्ही डोकं शांत ठेवा. काहीही घडलं तरी मी पुन्हा येईन हे शब्दही उच्चारू नका. मी फोन ठेवते.
मी हसत हसत त्यांचा निरोप घेतला.