सर्वसामान्य माणसांना राजकारणाविषयी नफरत का असते? चांगली माणसं राजकारणात उतरली नाहीत, तर राजकारण सुधारणार कसे?
– यशवंत मोरचे, लासलगाव
आपण असे राजकारणी मिळण्याच्याच योग्यतेचे आहोत.
घाशीराम कोतवाल नाटकातला नाना फडणवीस तुम्ही झोकात कराल, असं तुमचं व्यक्तिमत्त्व पाहून वाटतं… अभिनयकौशल्याबद्दल तर वादच नाही… तशी कल्पना कुणाच्या डोक्यात कशी आली नाही? तुम्हाला आवडेल का नाना साकारायला?
– तन्मय चिंचणकर, बोपोडी
नक्कीच. माझा नाना वेगळा असेल. पण खूपजणांनी खूपदा करून झालाय तो.
सुधीर फडके, विश्वनाथ मोरे, राम कदम, हृदयनाथ मंगेशकर, अनिल अरूण यांच्या काळातल्या मराठी गाण्यांची मोहिनी अजूनही अबाधित आहे… पण, अलीकडे ‘तुझा साथ हवा’ अशा शब्दकळेची गाणी येतात, ती मराठीही वाटत नाहीत, आवडतही नाहीत… आमचं वय झालं की गाणी बिघडली? का बिघडली?
– मंदा बोरसे, धुळे
सगळंच बिघडलं आहे. अभिरुचीही. चांगलं काय असतं हे कळत नाही लोकांना. सगळ्याचं पाश्चात्यीकरण झाल्याने रुचीच बदलून गेलेय.
पु. ल. देशपांडे यांच्या अफाट साहित्यसंपदेतलं कोणतं पुस्तक तुमचं सगळ्यात आवडतं आहे? त्यांचं कोणतं नाटक आवडतं? आणि व्यक्ती आणि वल्लीमधली कोणती व्यक्तिरेखा साकारायला आवडलं असतं?
– माधवी देशपांडे, विलेपारले
‘तुझं आहे तुझपाशी’. अंतू बर्वा साकारतोच, पण चितळे मास्तर आवडेल.
माझं लवकरच लग्न होणार आहे. मला एक फर्मास उखाणा सांगा ना! तुमच्याकडे काहीतरी हटके उखाणा असणार, याची खात्री आहे.
– सोनिया पाध्ये, बेलापूर
नवर्याचं नाव कळलं असतं तर मला सोपं गेलं असतं…
तुमचा सगळ्यात आवडता सण कोणता? आणि का?
– प्रभाकर मोरे, सावंतवाडी
हॅपी न्यू इयर.
तुम्ही आत्मचरित्र लिहिलंत तर त्याचं नाव काय असेल?
– फणींद्र सोनटक्के, वर्धा
वैभवाचे दिवस.
पावसाच्या खूप आठवणी आहेत, असं मागे या सदरात म्हणाला होतात, एखादी सांगा की!
– रोनाल्ड कुटिन्हो, सांतिनेझ, पणजी
८-८ दिवस न थांबणारा पाऊस पाहिलाय मी.
शाळेत आवडलेली मुलगी आता समोर उभी राहिली आणि तेव्हा तूही मला आवडायचास, असं म्हणाली, तर काय उत्तर द्याल?
– रोशनी आरावकर, हिंगोली
पुढचे दिवस सुखाचे जातील.
तुमचा आवडता कवी कोण? त्यांची कोणती कविता आवडते?
– राधा गवारी, चंद्रपूर
मला कविता फारशी आवडत नाही. मी रुळत नाही तिथे.
अफाट प्रसिद्धी आणि अफाट पैसा यापैकी एकच काहीतरी मिळेल, असं सांगितलं तर तुम्ही काय निवडाल?
– पैगंबर खान, लातूर
पैसे. खूप पैसे मिळवून मी प्रसिद्ध होऊच शकतो.
एकेकाळी मध्यमवर्ग हा देशाचा ताठ, प्रामाणिक कणा होता, गोरगरीबांचा उद्धारकर्ता होता, सुधारकी बाण्याचा होता. आता तो अप्पलपोटा, मागासबुद्धी आणि हावरा का होऊन बसला आहे?
– राजाभाऊ नेने, रत्नागिरी
स्वार्थ, क्षणिक स्वार्थ साधण्यासाठी लागलेली भांडवलशाही चढाओढ.
शहरात आलेली माणसं सारखी गावाच्या आठवणी काढतात… पण शहरातच राहतात, गावी काही परत जात नाहीत… असं का?
– रूपाली शेट्ये, सातारा
ते रोगट, कुपोषित वातावरण कुणाला हवं असेल.
काय नाटक, काय प्रयोग, काय प्रतिसाद… सगळं एकदम ओक्केमधी आहे… असं तुम्हाला कोणत्या नाटकाविषयी वाटतं?
– हेमा पाटील, जुन्नर
अलबत्या गलबत्या.