माझा `ईडी’तला मित्र कावळ्या परवा घरी आल्यावर पेयपान करताना एकच ओळ सारखी गुणगुणत होता… किरिटा येशील कधी परतून?ऽऽऽ… त्याचा आवाज तसा चांगला आहे. शाळेत असताना प्रत्येक शिक्षकावर आणि शिक्षिकेवर तो लोकप्रिय गाण्याच्या चालीवर त्यांचा स्वभावविशेष दाखवणारे गाणे त्यांच्या पाठीमागे म्हणत असे. माझा मानलेला परममित्र पोक्याही त्याला बाकावर ताल धरून म्युझिक देत असे. शाळेतून बाहेर पडल्यावर त्याने एक वाद्यवृंदही काढला होता. पुढे कॉलेज आणि नोकरी पाठी लागल्यावर त्याचे गाणे गायब झाले ते बर्याच वर्षांनी आज ऐकायला मिळत होते. मी म्हटलं, कावळ्या अरे हे काय नवीन! `परिटा येशीrल कधी परतून’ हे आचार्य अत्र्यांचं विडंबन गीत मला माहीत आहे. पण `किरिटा’चं काय? तो कुठे गायब झालाय? त्यावर कावळ्या म्हणाला, गेले चार दिवस तो गायब आहे. सारखं बोलून बोलून म्हणजे बोंबलून बोंबलून त्याचा घसा बसलाय. त्यामुळे बोलतीही बंद झाली होती. त्यात दिल्लीवरूनही काही महत्वाचे फोन आल्यामुळे त्याचा चेहराही पडला होता. कुणाच्या तरी भीतीने तो कुठेतरी गायब झाला आहे. कदाचित तो `विक्रांत’ युद्धनौकेच्या तळाशी जाऊन लपला असावा. त्याच्या आवडत्या `मै हूँ सच्चा xx भेलपुरीवाला’च्या त्याच्या आवडत्या मित्राच्या भेळपुरीच्या दुकानाच्या तळघरातील गोदामात त्याचे विश्रांतीस्थान असते हे मला माहीत आहे. कुठेही असला तरी सुुखरुप असू दे एवढीच प्रार्थना.
तुला सांगतो टोक्या, कुणाला सांगू नको. `विक्रांत’ हा शब्द कुणी उच्चारला की त्याचा चेहरा फेफरे भरल्यासारखा होतो. ते विचित्र हातवारे करायला लागतात. आपलीच `ईडी’ची चौकशी सुरु असल्याचा त्यांना भास होतो आणि ते गयावया करत बोलू लागतात, मी फक्त रिकाम्या पिशव्या घेऊन फिरत होतो. माझ्या चेहर्याकडे बघून एकानेही त्या पिशवीत एक रुपयाही टाकला नाही; मग नोटांच्या बंडलांची गोष्टच सोडा. फक्त त्या पिशव्या शिवण्याचे आणि त्यावरील छपाईचे कॉन्ट्रॅक्ट मात्र पक्षातल्या एका मित्राला दिलं होतं. त्या पिशव्यांचाही घोटाळा झाला. काहींनी त्या जमा झालेल्या पैशासकट लांबवल्या तर काहींनी विक्रांत स्मृती म्हणून विकल्या सुद्धा. मला त्यातील एक छदामही मिळाला नाही… मी विचारले, किरीटजी मग एवढे जमा झालेले कोट्यवधी रुपये गेले कुठे? तुम्ही तर म्हणाला होता, त्यावेळी आम्ही भाजपच्या अनेक धनाढ्य पाठीराख्याची आणि बक्कळ बेहिशेबी पैसा असलेल्या मुंबईतल्या घाटकोपरसारख्या उपनगरापासून कुलाब्यापर्यंत राहणार्या गब्बर धनवंतांच्या घरापर्यंत कारची चाकपीट केली. नुसते ते पैसे मोजायलाच दोन दिवस लागले. त्या दोन दिवसात धड आंघोळही केली नाही आणि नास्ता-जेवणही घेतलं नाही. माझ्या घरातच चालू होती मोजणी. पूर्वी मतदानयंत्रं नव्हती तेव्हा कागदी मतपत्रिका मोजून त्याची कशी बंडलं बांधतात ते बघायचो आम्ही. तसंच मतदान केंद्रासारखं दृश्य होतं. नंतर त्या पिशव्यांना कसे पाय फुटले आणि त्या कुठे गायब झाल्या हे मलाही खरंच माहीत नाही हो. कारण नेमकी ती रक्कम मोजताना माझा डोळा कधी लागला आणि बरोबरचे सोबती कुठे गायब झाले याचा पत्ताच लागला नाही आजपर्यंत.
मला वाटलं सगळं विसरुन गेले असतील आतापर्यंत, पण नाही हो, परवा तो बॉम्बस्फोट झाला आणि माझी तंतरली की हो. काय उत्तर द्यावं हे मला सुचेना. खरं सांगावं तरी पंचाईत आणि न सांगावं तरी पंचाईत. कोश्यारींना फोन करून विचारलं, तुमच्याकडे मागे विक्रांतच्या पिशव्या आल्या होत्या का? तर ते म्हणाले, कोण विक्रांत? त्याला मी ओळखतही नाही आणि त्या पिशव्यात माझ्यासाठी होतं तरी काय? धोतरजोड्या होत्या की कुडते होते? मी फोन ठेवला आणि मला काही आठवेनासेच झाले. तेव्हापासून हा विस्मृतीचा नवा आजार जडल्याचा संशय आहे आतासुद्धा डोक्यात आरोपांचा इतका गुंता आहे की ती गुंतावळ सुटता सुटत नाही. आरोप करायला कुणाच्या बापाचे काय जाते! दिल्लीच्या त्या दोन महान व्यक्तींचा वरदहस्त असल्यावर आपण कुणाच्या बापालाही भीत नाय. पण परवा गंमत झाली. अमितजी शहाजींचा फोन आला होता तोही दम दिल्याच्या टोनमध्ये. म्हणाले, नरेंद्रजी मोदीजी तुम्हें फोन करके विक्रांत फंड के बारे में पूछनेवाले हैं। आपने `गोलमाल, पिक्चर देखा है? शहाजींचे शब्द ऐकूनच माझे अवसान गळले आहे. त्यामुळे सध्या मी गायब आहे. आता मोदी काय तासंपट्टी करतात ते निमूटपणे सहन करायचे. त्यांच्यापुढे तोंडातून एक शब्द काढायची माझी टाप नाही. कुठली अवदसा सुचली आणि `ईडी’चा खबर्या म्हणून सामील व्हायची ऑफर स्वीकारली. पण त्यामुळेच आज महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभर प्रसिद्ध झालो. त्या `पेकिंग टाइम्स’मध्ये तर माझी मुलाखत छापून आलीय. रशियातून मेजवानीची आमंत्रण येताहेत. होतो कुठे आणि या `ईडी’मुळे पोचलो कुठे? तरीही जोपर्यंत हे `विक्रांत’साठी जमा केलेल्या कोट्यवधी रुपयांचे काय झाले, हे मला आठवत नाही तोपर्यंत माझे काही खरे नाही. एकदा वाटते आकाशात जावे आणि पुन्हा खाली येऊ नये. एकदा वाटते पाताळात जावे आणि पुन्हा वर येऊच नये. कधी तरी आपलेच लोक मला हा प्रश्न विचारतील की त्या पैशांचे झालेय तरी काय? तुमच्या नाकात दोन पाय असे तर मी बोलूच शकत नाही. तरीही कधीतरी लोकांना या प्रश्नाचे उत्तर द्यावेच लागेल. एकतर निवडणुका जवळ येताहेत. अशावेळी पक्षाकडे कितीही पैसा असला तरी तो कमीच पडतो. कुणाच्या टाळूवरचे लोणी किती आणि कसे खायचे हे तुम्ही मला विचारून घ्या. पण या `विक्रांत’ घोटाळ्यापासून स्वत:ला कसे दूर ठेवावे या विचारात माझी स्मृतीच हळूहळू धूसर बनत चाललीय. त्यामुळे काही काळ गायब होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. एक दिवस मी कार्यालयात `मी काही वर्षांसाठी गायब होत असून मला शोधण्याच्या कुणी मुळीच प्रयत्न करू नये, अशी चिठ्ठी ठेवून हरवणार आहे… तेव्हापासून किरिटजी गायब आहेत. आणि ते सापडेपर्यंत मी अस्वस्थ आहे. फक्त त्यांची आठवण काढीत पिणे आणि गाणे एवढेच हाती आहे. म्हणूनच म्हणतो, किरिटा येशील कधी परतून…