मध्यमवयीन स्त्रियांना गाडीचा बॅलन्स करायला शिकवणं हे सर्वात प्रमुख काम असतं. बहुतांश बायकांनी सायकलही चालवलेली नसते किंवा ती चालवून अनेक वर्षे लोटलेली असतात. सायकल येत असेल तर स्कुटी बॅलन्स करणं सोपं जात. सराव झाल्यावर स्कुटी मुख्य रस्त्यावर ट्रॅफिकमधे चालवताना, मागील सीटवर बसून माझे त्या स्त्रीला धीर देणे, तिचा कॉन्फिडन्स वाढवणे हे सुरु असतं.
– – –
दादरमधील एका इमारतीमधून शंभर नंबरला फोन जातो… आमच्या गल्लीत एक मुलगी स्कूटर चालवायला शिकवतेय, कोणाचाही अॅक्सिडंट होऊ शकतो, असं एक माणूस सांगतो… पाचच मिनिटात एक पोलीस व्हॅन तिथं पोहोचते, कॉलेजमध्ये शिकणार्या एकवीस वर्षांच्या अमृताला पोलीस व्हॅनमधे बसवलं जातं… आयुष्यात असा प्रसंग पहिल्यांदाच आल्यामुळे आणि सर्वसामान्यांना वाटते तशी पोलिसांबद्दल भीती मनात असल्यामुळे अमृता लगेच काही बोलत नाही, स्कूटी चालवायला शिकवणं हा गुन्हा असू शकतो का, असा प्रश्न तिला पडतो… काही वेळाने कम्प्लेंटचे स्वरूप सांगून, इथून पुन्हा कंप्लेंट येता कामा नये अशी पोलिसी भाषेत समज दिली जाते… एका क्षणी तिला वाटतं की चांगल्या घरात वाढल्यावर, आपली काहीही चूक नसताना, पोलीस येऊन चौकशी करतील असं काम आपण का करतोय? ताबडतोब महिलानां स्कुटी चालवायला शिकवणं बंद करावं का?… पण आता हा व्यवसाय बंद केला तर आपल्याकडे शिकत असलेल्या अनेक महिलांचे नुकसान होईल आणि ज्या काकांनी केवळ एक मुलगी स्कुटी चालवायला शिकवतेय म्हणून अपघात होईल, अशी पोलीस कंप्लेंट केलीय त्यांचा पुरुषी अहंकार सुखावेल… हा विचार अमृताला मागे हटू देत नाही… व्यवसाय सुरूच राहतो… ते काका कंट्रोल रूमला फोन करत राहतात… पोलीस कारवाई करून समज देत राहतात… दिवसेंदिवस अमृताचं नाव आणि व्यवसाय वाढत जातो आणि एक दिवस कंप्लेंट करणार्या त्याच काकांचा अमृताला फोन येतो… त्यांच्या सुनेला स्कुटी चालवायला शिकायची असते!… नियती कोणालाच सोडत नाही म्हणतात… कंप्लेंट प्रकरणाबद्दल काहीही न बोलता अमृता काकांच्या सुनेला स्कुटी चालवायला शिकवते… अनेक मुली, हाऊसवाइफ ते सिनेअभिनेत्री अमृता खानविलकर अशा अनेकींना बुलेट चालवायला शिकवणार्या अमृता माने या मराठी मुलीचा हा बाईकवरील रोमांचकारी प्रवास…
..अमृताचं शालेय शिक्षण लोअर परळ येथील होली क्रॉस शाळेत झालं. डॉक्टर व्हावं अशी तिची इच्छा होती, त्यासाठी रुपारेल महविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश देखील घेतला परंतु काही मार्क्सनी तिचा मेडिकल प्रवेश हुकला. मग केमिस्ट्री विषयात बीएससीचा अभ्यास सुरू केला. याच काळात ‘उडान’ या कॉलेज फेस्टिवलमध्ये तिने स्वतः डिझाईन केलेल्या वस्तूंचा स्टॉल लावला. अमृता सांगते, माझ्या वडिलांचे भाजीविक्रीचे दुकान आहे, त्यामुळे वस्तूविक्रीचं बाळकडू मला लहानपणीच मिळालं होतं. ‘बोलतो त्याची माती विकली जाते आणि बोलत नाही त्याचं सोनं मातीमोलाच होतं‘ या उक्तीचा वापर करून स्टॉलवरील सर्व वस्तू मी दोनच दिवसांत विकल्या. त्या फेस्टिवलमध्ये सर्वात जास्त बिझनेस करणारा स्टॉल हे बक्षीस आणि थोडा पॉकेटमनी गाठीशी बांधला.
कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना अनेक प्लेसमेंट इंटरव्ह्यू दिले. पण मुलाखतीत उत्तरे देताना, रोज एकाच ठिकाणी नऊ ते पाच या वेळेत काम करायला आपल्याला जमेल का हा प्रश्न नेहमी मनात यायचा. त्यामुळे इंटरव्ह्यूमधे त्यांच्यापेक्षा जास्त प्रश्न मीच त्यांना विचारत असे. एके दिवशी एका जॉबच्या इंटरव्ह्यूची तयारी करत असताना मला शेजारी राहणारी रश्मी भेटायला आली, रश्मीचं नवर्यासोबत जोरदार भांडण झालं होतं. सकाळी तिला मुलीला ट्यूशनला सोडून कामावर जायचं होतं. बसचा पत्ता नव्हता आणि सकाळची लगबगीची वेळ असल्याने टॅक्सीदेखील मिळत नव्हती. रश्मीने नवर्याला फोन लावला, तोही ऑफिसच्या गडबडीत होता. ‘काय ही रोजची कटकट आहे, तुला इतकी लहान जबाबदारीही पेलता येत नाही का, मला कामधंदे आहेत की नाही? हे हवंय सांगा नवर्याला, ते हवंय पाठवा नवर्याला… अरे नवरा आहे की ड्रायव्हर?‘ असं म्हणून त्याने युद्धाला तोंड फोडलं. इकडे रश्मीने ती उचलत असलेली संसाराची बाजू दाखवून त्याच्या चार पिढ्यांचा उद्धार केला. युद्धाचा निकाल काही लागत नव्हता. मग सामना अनिर्णित घोषित करून नवर्याने मुलीला ट्यूशनला आणि रश्मीला मुख्य बसस्टॉपवर सोडलं. संध्याकाळी कामावरुन परतल्यावर रश्मी माझ्याकडे आली होती, मला स्कुटी चालवायला शिकव अशी गळ घालण्यासाठी. रश्मीने टू व्हीलर शिकण्याचा याआधीही अनेकदा प्रयत्न केला होता. पण गाडी शिकताना रश्मी तोल जाऊन पडली, तेव्हा तिचा नवरा अंगावर ओरडला होता. तेव्हापासून रश्मीने गाडी चालवायची धास्ती घेतली होती. पण आता तिला काहीही करून स्कुटी चालवायला शिकायचंच होतं. माझ्याकडे रश्मी सहा दिवसांत स्कुटी चालवायला शिकली. त्या दिवसापासून तिच्यात आमूलाग्र बदल झाला. आता आईबाबांची आठवण आली की ती त्यांना भेटू शकत होती. मुलीला वेळेत ट्यूशनला सोडू शकत होती आणि बसमधून पुरूषांचे ‘धक्के’ न खाता स्कुटीने ऑफिसला जाऊ शकत होती. या प्रसंगातून मला कळलं की आजच्या युगातील स्त्रियांचा स्वयंपूर्ण होण्याचा महामार्ग गाडी शिकल्यावरच खुला होतो.
अमृताची टीवायची परीक्षा उत्तमरित्या पार पडली. वेलिंगकर कॉलेजमध्ये एमबीए करायचं तिने ठरवलं, पण कॉलेज सुरू व्हायला अजून अवकाश होता. रश्मीला स्कुटी चालवायला शिकविल्यानंतर काही ओळखीतील महिलांनी, आम्हालाही तूच शिकव अशी अमृताला गळ घातली. तेव्हा अमृताने आलेल्या संधीचा सदुपयोग करायचं ठरवलं. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर एक पोस्ट टाकली, त्या पोस्टला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला, नावनोंदणी सुरु झाली. दोन दिवसांनी येणार्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर २०१८ साली ‘वुमन ऑन व्हील्स‘ या महिला बाइक ट्रेंनिग स्कूलला सुरुवात झाली.
हाच व्यवसाय का निवडला या प्रश्नावर अमृता म्हणाली, ‘या व्यवसायात स्त्रिया फारशा दिसत नाहीत. मला हा स्टीरिओटाइप मोडून काढायचा होता. मुलींना बाइक चालवता येत नाही, त्या रस्त्यात कधीही गाडीला ब्रेक मारतात, राइट सिग्नल देऊन लेफ्टला वळतात, अशा कमेंट्स पुरुष आजही पास करतात. मला त्यांना विचारायचंय की मुली अंतराळयान, रेल्वे, ट्रक चालवू शकतात, तर बाइक का चालवू शकत नाहीत? मला वाटतं माणसाचं ड्रायव्हिंग चांगलं किंवा वाईट असतं, योग्य प्रशिक्षण मिळालेली व्यक्ती चांगलं ड्रायव्हिंग करू शकते, यात जेंडरचा काही संबंध नाही.
मी मोटार ट्रेनिंग सेंटर सुरू केल्यावर पहिला प्रश्न उभा राहिला, गाडी चालवायला शिकवायची कुठे? खेळांच्या मैदानात एकवेळ सायकल चालवायला परवानगी मिळेल, परंतु बाइकला तिथे मज्जाव असतो. नवख्या ड्रायव्हरला शिकवताना रस्ता निर्मनुष्य हवा, तिथं गाड्यांची रहदारी नको; पण मुंबईत असा रस्ता मिळणं कठीण आहे. मग त्यातल्या त्यात कमी रहदारी असलेली गल्ली निवडली. तिथेही काही स्थानिक रहिवाशांनी विरोध केला. खरं तर गाडी शिकणार्या प्रत्येक व्यक्तीला या अडचणींचा सामना करावा लागलेला असतो, पण जे काही शिकवाल ते आमच्या गल्लीत नको, असाच सगळ्यांचा पवित्रा असतो. मग यातून मार्ग काढत, कुणालाही त्रास न देता, आम्ही आमचं काम काळजीपूर्वक सुरु ठेवलं. त्यामुळे एखादा अपवाद वगळता स्थानिक लोकांचा विरोधही हळूहळू मावळला.
मध्यमवयीन स्त्रियांना गाडीचा बॅलन्स करायला शिकवणं हे सर्वात प्रमुख काम असतं. बहुतांश बायकांनी सायकलही चालवलेली नसते किंवा ती चालवून अनेक वर्षे लोटलेली असतात. अशावेळी दोन्ही पाय जमिनीवर टेकवत हळूहळू एक्सिलेटर देणे ही त्यांची स्कुटी शिकण्याची पहिली पायरी असते. सायकल येत असेल तर स्कुटी बॅलन्स करणं सोपं जातं. सराव झाल्यावर स्कुटी मुख्य रस्त्यावर ट्रॅफिकमधे चालवताना, मागील सीटवर बसून माझे त्या स्त्रीला धीर देणे, तिचा कॉन्फिडन्स वाढवणे हे सुरु असतं. तसेच बाइकवरून कुणी बाजूने कट मारून गेल्यावर काय करायचं, गाडीसमोर अचानक कुणी येऊन थांबलं की ब्रेक कसा मारायचा हेही आम्ही शिकवतो.
बाइक आणि बुलेट शिकवताना बॅलन्स आणि गिअर यांचा सुवर्णमध्य कसा साधायचा, ट्रॅफिकमधे गाडी बंद पडू न देता कशी सुरू ठेवायची, जड गाडी फार जोर न लावता टेक्निक वापरून मेन स्टँडवर कशी उभी करायची याचं लाइव्ह प्रॅक्टिकल नॉलेज आम्ही देत असतो.
आमच्याकडे शिकत असलेल्या मुलीने कितीही वेळा चुका केल्या तरीही शांत डोक्याने तिला समजून घेणे, एखादी गोष्ट तिला एका पद्धतीने समजत नसेल, अमलात आणता येत नसेल तर मुलीच्या कलाने घेत शिकवण्याची पद्धत बदलणे, तिचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न करणे हे आमच्या यशाचं एक कारण आहे. पण हे सर्व तर एखादा पुरुष ट्रेनरही करू शकतो मग तरीही स्त्रिया त्यांच्याकडे शिकण्याचे का टाळतात? यातलं एक कारण म्हणजे मागील सीटवर बसून बाइक शिकवताना पुरुष ट्रेनरचा शिकणार्या व्यक्तीला ओझरता का होईना स्पर्श होतोच. सगळेच पुरुष काही वाईट नसतात. पण, अनेक महिला केवळ या कारणामुळे स्कुटी शिकत नाहीत (हे थोडंसं प्रसूतीसाठी स्त्री गायनॅकच हवी असं म्हणण्यासारखं आहे). त्यामुळेच एक उत्तम बाइक चालवणारी मुलगी आम्हाला शिकवणार आहे ही बातमी महिलांपर्यंत पोहचली तेव्हा माझ्याकडे ग्राहक अधिक प्रमाणात वाढू लागले. शिकायला येणारी प्रत्येक महिला माझ्या अनुभवविश्वात भर घालते. हीच ज्ञानाची शिदोरी मला नवीन मुलींना शिकवताना कामी येते.
अनेक मराठी मुली माझ्याकडे शिकल्या, त्यातील काहींना मी बाइक इन्स्ट्रक्टरचा जॉब द्यायला सुरुवात केली. मे व्हेकेशनमधे सुरु केलेला हा व्यवसाय पुढे जाऊन इतकं विशाल रूप धारण करेल असं वाटलं नव्हतं. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत गेला, तशी मी एक एक गाडी विकत घेऊ लागले. डाऊन पेमेंट बाबा करायचे, नंतर बँकेचे हप्ते मी भरायचे. आई आणि मोठ्या भावानेही नेहमीच साथ दिला. यामुळेच व्यवसायाची प्रगती जलद गतीने होत गेली.
स्त्रीला खरं स्वातंत्र मिळवून देणारा हा मार्ग अमृताला इयत्ता आठवीत असतानाच गवसला होता. ती सांगते, ‘उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी सातार्याला गेले होते. घरात चुलत भावाची स्प्लेंडर होती. मी शाळेत असल्यापासून जिम्नॅस्टिक्स आणि इतर स्पोर्ट्समधे उत्तम कामगिरी करत असल्याने लहान वयातच उंची चांगली वाढली होती. त्यामुळे अंगणातल्या भावाच्या बाइकवर बसल्यावर पाय जमिनीवर पोहचले. लगेचच मी त्या बाइकवरून पायानेच अंगणात राऊंड मारायला लागले, काही वेळानं भावाचं लक्ष गेलं, त्याने विचारलं, बाइक शिकायची आहे का? मी हो म्हटलं. याआधी कधी स्कुटीही चालवली नव्हती, त्यामुळे डायरेक्ट गिअर बाइक चालवताना आधी बॅलन्स सांभाळू की गिअर टाकू अशी माझी धांदल उडाली. सुरुवातीला बाइक सारखी बंद पडत होती. त्या दिवशी भावाचा खूप ओरडा खाल्ला पण जिद्द हरली नाही. चार दिवसांनी, बाइक चालवणं थोडं थोडं जमू लागलं होतं. अजून थोडा सराव हवा होता, पण सुट्टी संपली. गावाहून मुंबईला परतताना आजोबांनी बांधून दिलेल्या खाऊबरोबर बाईक चालवणंही सोबत आलं. मुंबईला आल्यावर बाबांना सांगितलं, मी गावी बाइक शिकून आले आहे. मला बाइक घेऊन द्या! घरी मी सोडून कुणालाच बाइक येत नव्हती. त्यामुळे, आईला शिकता येईल अशी स्कुटी घ्यायचं ठरलं, म्हणजे एकच गाडी आम्ही दोघी चालवू. एका आठवड्यात घरी अॅक्टिव्हा आली. आई कधी गाडी शिकलीच नाही. त्यामुळे अॅक्टिव्हा शेवटी माझीच झाली.
कॉलेजमध्ये मी अॅक्टिव्हावरुन जायचे आणि सगळ्या मैत्रिणी ट्रेनने यायच्या. मी मुद्दाम हेल्मेट क्लासमध्ये घेऊन जायचे… शायनिंग मारायला.
गावावरून शिकून आल्यावर बरेच वर्षे गिअर बाइक चालवली नव्हती. बर्याच मित्रांकडे मागायचे, पण कोणी दिली नाही. कारण, मुलगी बाइक नीट चालवेल की नाही याची त्यांना खात्री नव्हती. एक दिवस काकांना रिक्वेस्ट करून त्यांची बाइक घेऊन क्लासला निघाले. रस्त्यावर फुल ट्रॅफिक. त्यात माझी बाइक सारखी बंद पडत होती. माझ्या मागील गाड्या हॉर्न वाजवत होत्या, लोक नावं ठेवत माझ्या बाजूनं जात होते. कसंतरी देवाचं नाव घेत क्लासला पोहोचले. क्लास संपवून निघाले तेव्हा संध्याकाळचे सात वाजले होते. उलट बाजूचा प्रवास होता त्यामुळे फार ट्रॅफिक लागलं नाही. पण एका पुलावर माझी गाडी परत सारखी बंद पडू लागली. ‘येत नाही तर बाइक चालवतातच कशाला या मुली‘ अशा कॅमेंट्स कानावर पडत होत्या. बाइक हाताने ढकलत रस्त्याच्या कडेला घेतली. एक देवमाणूस भेटला. त्याने सल्ला दिला, ‘ट्रॅफिकमधे बाइक रस्त्यात थांबवली की ती पहिल्या गिअरमध्ये ठेवायची.’ मी हा सल्ला पाळला, त्यानंतर मात्र गाडी बंद पडली नाही. त्यावेळी ठरवलं की आता बाइक चालवणे सोडायचं नाही. तेव्हापासून आजतागायत बाइकला कधी अंतर दिलं नाही.
‘सैराट’मधल्या आर्चीला पाहून सगळ्या मुलींना बुलेट चालवायची स्वप्नं पडायला लागली होती, मीही त्याला अपवाद नव्हते. एका भावाकडे रॉयल एनफिल्ड क्लासिक-३५० होती. त्याला रिक्वेस्ट केली. माझी प्रबळ इच्छा पाहून तोही शिकवायला तयार झाला. स्कुटी, बाईकसोबत आता माझ्या खात्यात बुलेट ही दाखल झाली.
अवघ्या दोनच वर्षात सात महिला ट्रेनर, पाच स्कुटी, एक बाइक आणि एक रॉयल एनफिल्ड माझ्या परिवाराचा भाग झाले. आम्ही शिकवत असलेल्या चांगल्या ट्रेनिंग टेक्निकमुळे ट्रेनिंग स्कूलचा नावलौकिक वाढू लागला, माऊथ टू माऊथ पब्लिसिटीमुळे अनेक ठिकाणाहून फ्रेंचायझीसाठी फोन येऊ लागले होते. पण… नेमकी कोविडची लाट आली आणि सगळंच बंद पडलं… माझ्या सात ‘इन्स्ट्रक्टर’ मुली आम्ही दुसरा जॉब शोधू का? अशी विचारणा करू लागल्या. त्यांना काय उत्तर देऊ हे कळत नव्हतं. इतका चांगला स्टाफ पुन्हा मिळाला नसता आणि ट्रेनिंग सेंटर बंद असताना पूर्ण पगार देणं मला परवडण्यासारखं नव्हतं. एक दिवस अशी एक घटना घडली की लॉकडाऊनमधील निराशेच्या गर्तेत मला एक आशेचा किरण दिसला. आमच्या शेजारच्या संस्कृती या लहान मुलीचा वाढदिवस होता. तिच्या घरच्यांनी केकशॉपमध्ये ऑर्डर दिली, परंतु तो दुकानदार डिलिव्हरी करायला नाही म्हणाला. लॉकडाऊनमुळे कुणीही खाली जायला तयार नव्हतं. तेव्हा मी एका रायडर मुलीला सांगून केक आणून दिला. मी नको म्हणत असतानाही संस्कृतीच्या आजोबांनी खुश होऊन मला शंभर रुपये बक्षीस दिले. आमच्या दादर-शिवाजी पार्क भागात, परदेशी सेटल झालेल्या अनेक मुलांचे वयोवृद्ध पालक राहतात. त्यांना लॉकडाऊनमधे अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. रस्त्यावर चिटपाखरू नसलेल्या काळात, वस्तू डिलिव्हरी करण्यासाठी येणार्या अनोळखी माणसावर विश्वास ठेवणं त्यांच्यासाठी फारच अवघड होतं. त्यातून फक्त महिलांकडून केली जाणारी डिलिव्हरी सर्व्हिस सुरु करण्याची आयडिया मला सुचला. यातूनच ‘वॉव डिलीव्हरीज’चा (वॉव : वुमन ऑन व्हील्स) जन्म झाला. हा धंदा जन्मापासूनच धावायला लागला. सकाळी सात वाजल्यापासून, माझ्या सातही सहकारी औषध, किराणा, केक अशा वस्तू माफक दर आकारून घरपोच करू लागल्या. इतकंच काय, बँकांची पासबुकं अपडेट करणं, बाळंतिणीला तिच्या आईच्या हातचे डिंकाचे लाडू पोहचवणे अशी या काळात माणसांना जोडणारी विविध कामे आम्ही केली. लॉकडाऊन शिथिल झाल्यावर या कामाचा ओघ कमी झाला, तेव्हा पुन्हा एकदा वेगळी वाट शोधावी लागली. फूड डिलिव्हरी क्षेत्रात पदार्पण करताना शिवसेना भवनसमोरील आस्वाद हॉटेलसोबत टायअप केलं. त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला, अनेक महिला तर ऑर्डर वॉव डिलीव्हरीसोबतच पाठवा असा आग्रह धरू लागल्या होत्या. आस्वादसारखा मोठा ब्रँड सोबत आल्यावर इतर अनेक केकशॉप्स, हॉटेल्स यांचे काम आम्हाला मिळाले.
लॉकडाऊन उठल्यावर स्विगीसारख्या मोठ्या डिलिव्हरी सर्व्हिसेसकडून कॉम्पिटिशन निर्माण झाली, तेव्हा या धंद्याचा गिअर बदलून दोन नामांकित महिला बचतगटांसोबत टायअप करून, वॉव डिलिव्हरीजचा यापुढील प्रवास निर्धोक होईल याची काळजी घेतली. हे सर्व सुरु असताना वुमन ऑन व्हील्सला पुन्हा चांगला प्रतिसाद मिळायला लागला होता.
वेलिंगकरमधे एमबीए करताना अभ्यासासाठी मी माझ्याच व्यवसायाची केस स्टडी घेतली, या धंद्यातील चढउतार, नफातोटा याविषयी शिक्षकांसोबत चर्चा करताना अनेक मुद्दे समोर येत गेले, यातूनच आपला ब्रँड मोठा करणं, नावीन्यपूर्ण इव्हेंट करून आपलं काम सतत चर्चेत ठेवणं, या मार्केटिंगच्या अनेक बाबी लक्षात आल्या, त्यातूनच आठ मार्च २०१९ या जागतिक महिला दिनी आम्ही वुमन्स रॅली काढली. पहिल्याच प्रयत्नात ३०० महिला आम्हाला सपोर्ट करायला आल्या होत्या. रस्त्यावर गाडी शिकवत असताना मुंबई पोलिसांनी कधी आम्हाला त्रास दिला नाही, उलट कोणी त्रास दिला तर आम्हाला सांगा असं बोलून ते पाठिंबा देतात. आज अनेक महिला पोलिसांना पण बाइक चालवता येत नाही असं मला काही पोलिसांशी बोलून कळलं. शासनाकडून काही प्रपोजल आलं तर आम्ही पुढाकार घ्यायला तयार आहोत. गाडी चालवायला शिकताना आणि शिकवताना काय अडचणी येतात, त्यातून मार्ग कसा काढावा याबाबतीत आम्ही आता एक्स्पर्ट झालो आहोत. यापुढे वुमन ऑन व्हील्स या ब्रँडच्या यशाची गुरुकिल्ली फक्त मुंबईतच न वापरता, प्रँâचायझी मॉडेलद्वारे महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यात नेण्याचा आमचा विचार आहे.‘
हा सर्व प्रवास पाहिल्यावर एक मराठी मुलगी, कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना, चांगल्या रीतीने व्यवसायाची उभारणी करू शकते हे दिसतं. मराठी मुलींनी अमृताच्या पावलावर पाऊल ठेऊन व्यवसायात उतरायला ह. एक स्कुटी, थोडी मेहनत, आणि थोडा पेशन्स असेल तर तुम्ही हा बिनभांडवली व्यवसाय कधीही करू शकता. महाराष्ट्रात अनेक महिन्यांपासून एसटीचा संप सुरू असल्याने, ग्रामीण भागात शिक्षण घेत असलेल्या मुलींचे, वृद्धांचे खूप हाल होत आहेत. अशावेळी स्कुटी चालवायला शिकवून स्त्रीला बॅकसीटवरून फ्रंटसीटवर आणणारा हा व्यवसाय समाजाला दिशा देणारा ठरू शकतो.