आर. के. लक्ष्मण आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एकेकाळचे सहकारी, देशातील सर्वश्रेष्ठ समकालीन व्यंगचित्रकार. आरकेंचा कॉमन मॅन हा सामान्य माणसांचा प्रतिनिधी म्हणून खूप गाजला. तो टाइम्स ऑफ इंडियामध्ये रोज पॉकेट कार्टूनमध्ये दिसायचा. त्याचा चेहरा सशाचा भास करून देणारा, खासकरून कान तर तसेच. बाळासाहेबांचा कॉमन मॅन काकाजी हा बहुतेक वेळा रविवारची जत्रामध्ये दिसायचा. तत्कालीन सामाजिक राजकीय घडामोडींचे परिणाम सामान्य माणसावर कसे होणार आहेत, हे दाखवण्यासाठी जत्रेत समारोपाचे किंवा भरतवाक्याचे चित्र काकाजींचे असायचे. हाही धोतरकोट या तत्कालीन सामान्य माणसाच्या वेषातला, जाड मिशांचा, गांजलेल्या चेहर्याचा वृद्ध माणूसच असायचा. रेल्वेच्या तिकीटदरांमध्ये वाढ झाली तेव्हा सर्वसामान्य माणसावर लहान मुलांच्या तीनचाकी सायकलीने फिरण्याची वेळ येणार का, हे दाखविणारे चित्र बाळासाहेबांनी रेखाटले आणि काकाजी चक्क मुखपृष्ठावर आला… आज पेट्रोल सव्वाशेच्या घरात आणि सीएनजी हे सर्वात स्वस्त इंधन २०१४ सालातल्या पेट्रोलच्या दरांपेक्षा महाग झालेले असताना तेव्हा बाळासाहेबांनी विचारलेला प्रश्न पुन्हा विचारावासा वाटतो… शेवटी हीच वेळ येणार का?