• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

ती सध्या काय करते?

- पुस्तकांच्या पानांतून

टीम मार्मिक by टीम मार्मिक
April 14, 2022
in पुस्तकाचं पान
0

अभिजित पेंढारकर यांनी लिहिलेल्या `वाकड्यात शिरलेल्या कथा` या लघुकथा संग्रहाचे प्रकाशन येत्या १६ एप्रिलला पुण्यातील पत्रकार भवनात लेखिका मंगला गोडबोले आणि संगीतकार कौशल इनामदार यांच्या हस्ते होणार आहे. मन्मिष प्रकाशनातर्पेâ हे पुस्तक प्रकाशित होत आहे.
– – –

“हॅलो, ओळखलंस का?“
एखाद दिवशी अचानक शाळा किंवा
कॉलेजमधल्या मैत्रिणीचा फोन येतो…
ती आपल्या शहरात आलेली असते.
फोनवरून पलीकडून `ओळखलंस का?` असा एखाद्या मुलीचा आवाज ऐकल्यानंतर नक्की काय झालं असावं, याबद्दल काळजात धस्स होण्याचं आपलं वय अजून सरलेलं नसतं.
बरं, `ओळखलंस का` हा एवढा धोकादायक प्रश्न असतो, की त्यावर हो म्हटलं तरी पंचाईत आणि नाही म्हटलं तरी पंचाईत असते.
थोडक्यात, वाघ म्हटलं तरी खातो आणि वाघ्या म्हटलं तरी खातो, अशी अवस्था.
आपण तिचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करतो.
मग ती एकदमच लाडात येऊन `काय करतोस, कुठे असतोस, भेटलाच नैस किती वर्षांत!’ असं अगदी अघळपघळ बोलायला लागते, की जागीच विरघळायला होतं. कॉलेजमध्ये असताना `कुठे गेला होता राधासुता, तुझा धर्म?’ असं त्याच णी तिला बाणेदारपणे विचारावसं वाटतं, पण एवढ्या वर्षांनी शब्द ओठांतल्या ओठांत राहून जातात.
“विसरलास का मला?“ तिच्या स्वरांतून मध सांडतो आणि चुकून आपली जीभ घसरू नये, म्हणून बायको घरात असल्याचं आपणच आपल्या मनाला पुन्हापुन्हा बजावत राहतो.
“आता मी तुझ्या शहरात आलेय, आता तरी भेटणारेस का?“ असं म्हणून ती लडिवाळ हट्ट करते, जो टाळल्यानं ब्रह्महत्येचं पातक लागेल, याची आपल्याला खात्री असते.
आपण भेटीची वेळ, काळ ठरवतो, बायकोपासून जेवढं लपवता येईल, तेवढं लपवतो.
“तिथे नको, तिथे खूप गर्दी असते,“ असं सांगून कुणी ओळखीचं भेटणार नाही, याची
खबरदारी घेऊन वेगळंच ठिकाण ठरवतो.
–  –  –
पहिल्यांदा इंटरव्ह्यूला जावं, तशी लगबग उडालेली असते. शर्ट कुठला घालावा, परफ्यूम कुठला लावावा, दाढी करायला हवी, मिशीला कट केला तर चांगला दिसेल का? अशी सगळी उजळणी करतो. अगदी मोबाईलचं कव्हर आणि स्क्रीन खराब तर झालेला नाही ना, याचीही खात्री करतो.
`गेल्याच आठवड्यात डाय केलाय, पण आज पुन्हा केला असता तरी चाललं असतं यार!` असं बाहेर पडताना वाटतं आणि आपण स्वतःवरच चरफडतो.
प्रवासात मनातली धाकधूक आणखी वाढत असते.
कॉलेजमधली तिची पहिली भेट, तिच्याबरोबर केलेली (सिलॅबसमधली!)
प्रॅक्टिकल्स, उगाचच अभ्यासासाठी म्हणून तिच्या वह्या मागून घेणं, तासंतास त्या छातीशी धरून बसणं, तिला जर्नल्स पूर्ण करायला केलेली मदत, त्यासाठी स्वतःचा अभ्यास मागे राहिल्याबद्दल खाल्लेला ओरडा, तिनं छत्री हरवली तरी `असू दे गं,` असं म्हणून घरच्यांची बोलणी खाणं, वर आपल्याकडूनच हरवली गेली असं सांगून आपल्या पॉकेटमनीमधून स्वाभिमानानं वडिलांना पैसे काढून देणं, `साडी डे`च्या दिवशी तिला पहिल्यांदाच साडीत बघून आपलं घायाळ होणं, सगळं सगळं आठवत राहतं.
ती ठरलेल्या ठिकाणी, ठरलेल्या वेळी आधीच आलेली असते.
`मी पोचलेय!` असा तिचा मेसेज येतो आणि आपला जीव आणखी कासावीस होतो. (खरंतर ‘मी पण पोचलेलाच (माणूस) आहे!’ असा रिप्लाय तिला करण्याची उबळ येते, पण तिचा ‘शेण्स
ऑफ हूमर’ आठवतो आणि काळजाचा थरकाप उडतो.)
आपण आपल्या उशिराचं खापर
ट्रॅफिकवर, लोकांच्या बेशिस्तीवर आणि गाडीवर फोडतो.
तिला लांबून बघूनच हृदयाची धडधड आणखी वाढीला लागते.
ती प्रत्यक्षात समोर येते, तेव्हा मात्र चेहरा मिस्टर बीनसारखा भंजाळलेला दिसू लागतो. आपण गल्ली चुकलो तर नाही ना, असं वाटून जातं. तिचे ते बदामी डोळे, नाजुक कांती, गालावरची खळी, सगळं सगळं लोप पावलेलं असतं.
कॉलेजमध्ये चवळीची शेंग असलेली ती आता दोनचार पोरांची आई वाटायला लागलेली असते. खरं तर, असतेच!
आपल्या डोळ्यांत साठवलेल्या तिच्या कॉलेजमधल्या रूपाचा पार चक्काचूर झालेला असतो आणि तो चुराही वेचण्याच्या पलीकडच्या अवस्थेत असतो.
आपण हसायचं म्हणून हसतो.
खायचं म्हणून खातो.
बोलायचं म्हणून बोलतो आणि घरी येतो.
घरी आल्यावर आरशासमोर उभं राहतो.
…आणि मग आपण स्वतःच्या रूपाकडे बघतो!

Previous Post

लोभाची विषारी फळे

Next Post

भविष्यवाणी (१६ एप्रिल)

Next Post

भविष्यवाणी (१६ एप्रिल)

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.