सिनेमा ही कला आहे की व्यवसाय आहे की सिनेमा कला व्यवसाय आहे, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. व्यवसायाच्या दृष्टीने एखादी कलाकृती निर्माण करायला चार कोटी रुपये खर्च येणार असेल, तर ज्याने हे पैसे घातले आहेत त्याला त्या गुंतवणुकीवर फायदा झाला पाहिजे. किमानपक्षी त्याने गुंतवलेली रक्कम तरी परत मिळायला हवी. मागील शंभर वर्षांचा इतिहास उघडून बघितला तर सिनेमाचे अभिनेते दोन तीन चार दशके काम करत असतात, दिग्दर्शकांची इनिंग्जही खूप मोठी असते. परंतु, काही मोजक्या निर्मितीसंस्था वगळता निर्माते बदलत राहतात. मराठीत तर वर्षाला १०० मराठी सिनेमे प्रदर्शित होतात, त्यातील केवळ पाच किंवा सहा निर्मातेच पुन्हा पुन्हा सिनेमा बनवतात आणि बाकीचे ९५ निर्माते पुन्हा कधीही सिनेइंडस्ट्रीचं तोंड वळून पाहत नाहीत. सिनेमानिर्मितीत गुंतवलेले पैसे परत मिळण्याचं नशीब फारच थोड्या निर्मात्याच्या वाट्याला येतं. हे असं का होतं? निर्मात्यांचं नक्की काय चुकतं आणि काय करायला हवं?
दादासाहेब फाळके यांनी सिनेमाचं बीज लावलं होतं, त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. वर्षाला साधारण दीड ते दोन हजार सिनेमे भारतात तयार होतात. पूर्ण सिनेमा उद्योगाची उलाढाल २० हजार कोटी रुपये आहे. निर्माता म्हणजे निर्माण करणारा. भारतात सिनेमाची सुरुवात झाल्यावर ज्यांना साहित्य, सिनेमाची जाण होती, त्यांनी सिनेजगतात निर्माता म्हणून प्रवेश केला. या मंडळींचा सिनेमाच्या कथावाचनापासून कलाकारांची निवड करण्यापर्यंत सगळ्या गोष्टींत सक्रिय सहभाग असायचा. कोहिनूर फिल्म कंपनीचे द्वारकादास संपत, बॉम्बे टॉकीजचे हिमांशू राय, देविकाराणी आणि मराठीत दामले-फत्तेलाल यांची प्रभात यांनी सिनेनिर्मितीत मोठा वाटा उचलला. काही वर्षांनी भगवान दादा, राज कपूर, देव आनंद यांच्यासारखे अनेक कलाकार निर्माते बनले आणि त्यांनी त्यांच्या स्वप्नातील सिनेनिर्मिती सुरू केली. व्ही. शांताराम, बी. आर. चोप्रा, यश चोप्रा यांच्यापासून आशुतोष गोवारीकर, राजू हिराणी यांच्यापर्यंत अनेक दिग्दर्शकांनी मनासारखा सिनेमा घडवायला निर्मितीत उतरण्याचा निर्णय घेतला. सिनेमाधंद्यातील ग्लॅमर आणि फायदा पाहून नैतिक/अनैतिक व्यवसायातील व्यापारी मंडळीदेखील वेळोवेळी या व्यवसायात सहभागी झाली. त्यामुळे सिनेमा तयार करण्यासाठी पैसा पुरवणारा माणूस (हा खरंतर फायनॅन्सर असतो, त्याचा निर्मितीशी संबंध नसतो) म्हणजे निर्माता अशी आज ओळख बनली आहे. अशा निर्मात्यांना साहित्य, कलाक्षेत्रात रुची असेलच असे नाही. बर्याच वेळा आली लहर केला कहर अशी गोष्ट अनेक नव सिनेनिर्मात्यांमधे पाहायला मिळते. आपापल्या क्षेत्रात माहीर असलेले, पै पै चा हिशेब मांडणारे उद्योजक चित्रपट व्यवसायात गटांगळ्या खाताना दिसतात. याचं प्रमुख कारण म्हणजे सिनेनिर्मितीत उडी मारण्याआधी या क्षेत्राचा अभ्यास ते करत नाहीत.
तुम्ही सिने निर्माते का झालात असा प्रश्न अनेक मराठी निर्मात्यांना विचारला, तेव्हा या क्षेत्रात असलेलं ग्लॅमर आणि गुंतवणुकीच्या तुलनेत प्रचंड फायदा मिळेल (असं ऐकलं आहे किंवा आश्वासन दिलं गेलं) ही दोन मुख्य कारणं त्यांनी सांगितली. एरवी ज्या गोष्टी आपण फक्त स्वप्नातच पाहू शकतो, त्या प्रेक्षकाला सिनेमागृहात मोठ्या पडद्यावर दिसतात. चार गुंडांना लोळवणारा हिरो किंवा अप्सरेसारखी दिसणारी हिरोईन याबद्दल बालपणापासून आकर्षण निर्माण होतं. थोडे पैसे गाठीशी असले आणि एखाद्या होतकरू दिग्दर्शकाने आपल्याकडे खूप भारी स्टोरी आहे असं म्हटलं तर अनेक व्यावसायिक या सिनेक्षेत्रात मागचा पुढचा विचार न करता उडी मारतात. कलेसाठी काहीतरी करावसं वाटलं म्हणून मी निर्माता झालो, असं अनेकजण मुलाखतीत सांगतात, पण निर्माता बनण्याची खरी कारणे वेगळीच असू शकतात. अगदी, सई ताम्हणकरसोबत फोटो काढायचा होता, सिनेमा बनवणारा दिग्दर्शक माझा मित्र होता, माझ्या मुलाला सिनेमात हिरो बनवायचं होतं किंवा जमीन विकल्याने (गुंठा मंत्री) भरपूर पैसे हातात आले त्याचं काय करायचं ते कळत नव्हतं, अशी कोणतीही कारण निर्माता बनण्याच्या मुळाशी असू शकतात. सिनेमा हे माध्यम लवकर प्रसिद्धी देतं. त्याशिवाय सिनेमा हिट झाला तर पैसे मिळतातच, शिवाय लोकाश्रय आणि राजाश्रय बोनसमध्ये मिळतो. राजकारणी आणि सरकारी अधिकारी मंडळींसोबत उठबस वाढते, संधीचे अनेक दरवाजे उघडे होतात. या ओळखीचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा निर्मात्याच्या मूळ व्यवसायात होऊ शकतो.
एका अशाच हौशी निर्मात्याची गोष्ट. राजू नावाचा हॉटेल व्यवसायिक हौशी कवीदेखील होता. त्याने आई नावाची कविता लिहिली होती. एके दिवशी त्याला एक सिनेदिग्दर्शक भेटला आणि म्हणाला या तुमच्या ‘आई’ कवितेवर खूप छान गाणं तयार होईल किंवा आपण आई या संकल्पनेवर सिनेमा काढूया. तुम्हीच एक कथा लिहा, राजूने एक कथा लिहून काढली. त्याला एक कोटी रुपये बजेट सागितलं गेलं. इथे राजूतील हुशार व्यावसायिक जागा झाला. त्याने पैसे गुंतवायला नकार दिला. दिग्दर्शकाने चेहर्याची घडी न विस्कटता नवीन पुडी सोडली. सगळी गाणी तुम्ही लिहा. आपण सिनेमाची गाणी रेकॉर्ड करू.
‘आशिकी’ सिनेमाचे उदाहरण घ्या. महेश भटने गाणी ऐकली आणि गाण्यांना सेंटर पॉइंट ठरवून सिनेमा बनवला. त्या कमी बजेटच्या सिनेमाने पैसे किती कमावले हे पाहा. आपण लिहिणार असलेल्या गाण्यांमुळे एका सुपरहिट सिनेमाची निर्मिती होणार या कल्पनेने राजू हुरळून गेले. नामवंत गायक-गायिका आणि संगीतकार यांना घेऊन पाच लाखांत गाणी रेकॉर्ड झाली. गाणी तयार होती, पण सिनेमा काढायला कुणी निर्माता मिळाला नाही. मग तुम्ही वीस लाख टाका आपण अर्धा सिनेमा शूट करू, ती रिळं पाहून आपल्याला फायनान्सर मिळेल असं सांगितलं गेलं. पाच लाख वसूल करायला राजूने अजून वीस लाख गुंतवले… सिनेमाची रिळं घेऊन राजू रोज वेगवेगळ्या सिने फायनान्सर आणि निर्मात्यांना भेटायला लागला. या धावपळीत हॉटेलकडे दुर्लक्ष झालं. याचा फायदा नोकर मंडळींनी उचलला. सिनेमा पूर्ण करण्यासाठी सहा महिने वणवण करून देखील एकही जण राजूच्या सिनेमात पैसे टाकायला मिळाला नाही. घातलेले वीस लाख परत मिळविण्यासाठी राजूने तीस लाख कर्ज काढलं. दोन मित्रांना भागीदार घेऊन पन्नास लाख खर्च केलं. एक कोटी खर्च केल्यावर सिनेमा पूर्ण झाला, पण सिनेमा प्रदर्शित करण्यापूर्वी सिनेमाची प्रसिद्धी, जाहिरात करायला हातात पैसे नव्हते. एक वितरक शोधून आणखी पाच लाख खर्च करून नावाला चार ठिकाणी चित्रपट प्रदर्शित केला. सिनेमा बॉक्स ऑफिस कलेक्शन पाच लाखसुद्धा झालं नाही. नाववाले कलाकार नसल्याने टीव्ही चॅनलने सिनेमा खरेदी केला नाही. राजूचे एक कोटी तर बुडालेच, शिवाय दोन वर्षं सिनेमाच्या मागे धावल्यामुळे मूळ हॉटेल व्यवसायात नुकसान झालं. हे उदाहरण आहे पूर्ण होऊन प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचं. अर्धवट बंद पडलेल्या सिनेमांची संख्या खूप मोठी आहे, पण हा आकडा कधी बाहेर येत नाही. पूर्वी गाजावाजा करून सिनेमांचे मुहूर्त केले जायचे, त्यामुळे अशा बंद झालेल्या सिनेमांची नावे कळायची; आता मात्र ती कळत नाहीत. सिनेमाशी संबंधित प्रत्येक घटकाला ठरलेल्या पैशांपैकी काहीतरी पैसे मिळतात, पण सिनेमा चालला नाही तर आर्थिक नुकसान फक्त निर्मात्याचं होतं.
सिनेनिर्मितीत काय चुकतंय आणि काय करायला हवं, यासाठी सर्वप्रथम या क्षेत्राची किमान ढोबळ माहिती मिळवण्यापासून सुरूवात करावी. सिनेमा पाच भागात बनतो.
१) प्री प्रॉडक्शन : यात सिनेमाची कथा, पटकथा, संवाद यावर काम होतं. ज्या गोष्टीवर सिनेमाचा डोलारा उभा राहणार आहे, ते सिनेमाचं लेखन उत्तम असायला हवं. आपण घातलेले पैसे परत मिळवायचे असतील तर प्रेक्षक तिकीट काढून मनोरंजनासाठी थिएटरमध्ये येतात याची जाणीव निर्मात्याला हवी. दु:ख कितीही कलात्मक असलं, तरीही ते पाहायला प्रेक्षक (एखाद दुसरा अपवाद वगळता) सिनेमागृहाकडे फिरकत नाहीत, हा इतिहास आहे. पण मनोरंजन म्हणजे थिल्लरपणा नाही. मराठीत जे विनोद ‘हास्यजत्रा’, ‘चला हवा येऊ द्या’मधून रोज टीव्हीवर आणि हातातील मोबाईलवर फुकट पाहायला मिळतात, ते पाहायला प्रेक्षक वेळ आणि पैसा खर्च करून थिएटरला का येतील?
२) दिग्दर्शक : चित्रपट हे माध्यम दिग्दर्शकाचं आहे. आपल्याला पडद्यावर दिसण्याच्या खूप आधी दिग्दर्शकाला सिनेमा मनात दिसत असतो. छायाचित्रकार, कलादिग्दर्शक, कलाकार, रंगभूषाकार, वेशभूषाकार, संगीतकार अशी भली मोठी टीम घेऊन दिग्दर्शक तो सिनेमा कसा पूर्णत्वाला नेतो यावर सिनेमाचे यश अवलंबून असतं. म्हणूनच दिग्दर्शकाला चित्रपटाचा ‘कॅप्टन ऑफ द शिप’ म्हणतात. पण हा कॅप्टन सिनेमाचे जहाज बुडवणारा नसावा तर सिनेमाला पैलतीरावर नेणारा असावा. काही दिग्दर्शक म्हणतात की मी माझ्या स्वप्नातील सिनेमा बनवतो, मला व्यवसाय कळत नाही फक्त कला समजते; सिनेमा विकायचं काम निर्मात्याचं आहे. हे वाक्य ऐकायला छान वाटत असलं तरी व्यावहारिक दृष्टीनं पाहिलं तर दिग्दर्शक म्हणून तुम्ही कॅनव्हासवर चित्र काढत नाही, जे विकलं गेलं नाही तर घरी ठेवता येऊ शकतं. सिनेमा बनवायला दोन-चार कोटी रुपये खर्च येतो. निर्मात्याने खर्च केलेले पैसे त्याला मिळायला हवेत याची जाणीव असणारा दिग्दर्शक असायला हवा.
३) निर्माता : शंभर चित्रपटांपैकी नव्वद चित्रपटांचे निर्माते पहिलटकर असतात. नवोदित दिग्दर्शक त्यांच्याकडे वेगवेगळ्या मार्गाने पोहोचतो. एखादा दिग्दर्शक सिनेमा धंद्यात किती पैसे कमावू शकता हे पटवून देण्यासाठी सुपरहिट झालेल्या सिनेमांची नावं सांगतो तेव्हा ते चित्रपट सुपरहिट का झाले याचा विचार करायला हवा. आपण ‘सैराट’चं उदाहरण घेऊ. कारण २०१६नंतर अनेक होतकरू दिग्दर्शकांनी नवीन निर्मात्यांना सैराट सिनेमानं कमावलेले १०० कोटी दाखवून आपल्या ‘स्वप्नातील’ सिनेमांवर पैसे लावायला सांगितले होते. आज आठ वर्षांनीही काही दिग्दर्शक माझा नवीन चित्रपट ‘सैराट’पेक्षा भारी आहे असं बोलताना मी ऐकलं आहे. चार कोटी रुपयांत बनलेल्या ‘सैराट’ने शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली, ही गोष्ट खरी आहे, पण हा सिनेमा लिहिण्याची सुरुवात नागराज मंजुळे यांनी २००९ केली होती. ‘पिस्तुल्या’ लघुपट आणि ‘फॅन्ड्री’ सिनेमाच्या निर्मितीतून त्यांना ‘सैराट’ कसा बनवता येईल याची उकल होऊ लागली. सिनेमाचं चित्रीकरण सुरू होण्याआधी वर्षभर प्रमुख कलाकारांच्या संपर्कात राहणे, त्यांना आपल्या घरी राहायला आणून त्यांची तालीम घेणं, अशा याआधी कधीही न घडलेल्या गोष्टी नागराज यांनी केल्या. यामुळे कधीही कॅमेर्यासमोर न आलेले रिंकू राजगुरू, आकाश ठोसर यांचा नवखेपणा सिनेमात दिसला नाही. निखिल साने, नितीन केणी यांच्यासारखे अनुभवी निर्माते या सिनेमाचा भाग झाले. अजय अतुल यांचं संगीत हा तर ‘सैराट’चा सर्वात मोठा प्लस पॉइंट ठरला. सिनेमा पूर्ण झाल्यावर तो प्रदर्शित करण्याची पुढील सूत्रे झी टॉकीजने हातात घेतली. नंतर काय इतिहास घडला हे सगळ्यांना माहीत आहे. ही गाथा पुन्हा सांगण्याचं प्रयोजन हेच की एखादा दिग्दर्शक जेव्हा सिनेनिर्मितीसाठी निर्मात्याला दोन कोटी रुपये लावायला सांगतो, तेव्हा त्याने त्या सिनेमासाठी काय तयारी केली आहे, त्याला सिनेमाधंद्यातील खाचखळगे माहीत आहेत का आणि मी घालतोय ते पैसे रिकव्हर कसे होणार, हे निर्मात्याने विचारायला हवं.
४) कलाकारांची निवड : नाव कमावलेले हीरो चित्रपटात असतील तर तो चालण्याचे आणि टीव्ही चॅनलला विकला जाण्याचे चान्सेस वाढतात. हिंदी चित्रपटात शाहरुख, सलमान, ऋतिक रोशन, अजय देवगण यांना सिनेमात घेतलं तर चित्रीकरणाला सुरुवात करण्याआधी टेबलवरच चित्रपट विकले जातात. या सिनेमाचे टीव्ही (सॅटेलाइट) आणि ओटीटी हक्क आधीच विकले जातात. इथेच सिनेमाची अर्ध्याहून अधिक रक्कम मिळून जाते. याशिवाय हिंदी चित्रपट पाहणारा प्रेक्षक भारत आणि जगभरात आहे, त्यामुळे पहिल्या तीन दिवसांत शंभर कोटीहून अधिक गल्ला जमवला जाईल, अशी खात्री निर्मात्यांना असते.
दुर्दैवाने हे स्टारडम मराठी चित्रपटसृष्टीत नाही. दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, अलका कुबल यांच्यानंतर प्रदीर्घ काळ बॉक्स ऑफिसवर खणखणीत नाणं वाजवणारा कलावंत झाला नाही. ‘श्वास’नंतर मराठी चित्रपटांची संख्या वाढली. तेव्हा भरत जाधव, मकरंद अनासपुरे, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, सुबोध भावे हे स्टार उदयाला आले आणि त्यांच्या काही सिनेमांनी भरघोस यश मिळवलं, पण या यशात सातत्य नव्हतं. आज मराठी सिनेइंडस्ट्रीत असा एकही अभिनेता नाही जो माझा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दहा कोटी रुपये कमावेल, याची खात्री देऊ शकेल. बॉक्स ऑफिसची गॅरंटी नसली तरी या हीरोंच्या चित्रपटांना टीव्ही कंपन्यांकडून चांगली मागणी असते. सिनेनिर्मितीची पंचवीस टक्के रक्कम यातून निघू शकते आणि या कलाकारांचा चेहरा प्रेक्षक ओळखत असल्याने सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी याचा फायदा होतो. पण जितका नामवंत कलाकार तितकी त्याची फी आणि इतर खर्च (ओ.बी. व्हॅन, उच्च राहणीमान) जास्त हे गणित निर्मात्याला लक्षात ठेवावं लागतं. नवीन कलाकार घेतले तर कमी बजेटमध्ये सिनेमा तयार करता येतो.
५) प्रोडक्शन : सिनेमाचे चित्रीकरण करण्यापूर्वी आखणी करायला लागते. बजेटच्या दृष्टीनं तीस दिवसांच्या आत मराठी चित्रपटाचे चित्रीकरण संपायला हवं असं मानलं जातं. काही सुपरफास्ट दिग्दर्शकांना फक्त आठ पंधरा दिवसही पुरतात, पण प्रेक्षकांना अशांचा सिनेमा टीव्ही मालिकेसारखा दिसायला लागला, तर प्रेक्षक अशा सिनेमांना का जातील? छायाचित्रकार आणि इतर तंत्रज्ञ मंडळींनी आधी काय काम केलं आहे हे पाहून त्यांची निवड करावी लागते.
सिनेमाची गाणी आधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. आताच्या काळात इंस्टाग्रामवर गाणी ट्रेण्डिंग झाली तर सिनेमा अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे संगीतकार आणि गीतकार चांगला असावा लागतो. सगळेच जण हौशी असतील तर सिनेमा फसण्याची शक्यता वाढते. निर्मात्याने चित्रीकरणाची जागा, संपूर्ण युनिटचा निवास आणि जेवण कमीत कमी खर्चात कसं करता येईल याचं नियोजन केलं, तर वाचलेले पैसे प्रसिद्धी आणि जाहिरात करायला उपयोगी पडतात.
चित्रीकरण संपले की एडिटिंग, डबिंग, मिक्सिंग, असे अनेक सोपस्कार पार करत सिनेमा प्रदर्शनासाठी तयार होतो. नवीन निर्मात्याला वाटतं की आता बस… जिंकलो. पण इथेच त्याची गल्लत होते. मराठीतही सिनेमाची जाहिरात, प्रसिद्धीसाठी आजघडीला कमीत कमी एक ते दीड कोटी रुपये गाठीशी हवेत. टीव्हीवर, मोबाइलवर घरबसल्या फुकट मनोरंजन मिळणार्या प्रेक्षकांना ट्रॅफिकमधून वाट काढत, खिशातील पैसे खर्च करून थिएटरपर्यंत आणायचं काम आता सोपं राहिलेलं नाही. अगदी शाहरूख सलमान यांना देखील हिंदीसोबतच मराठी टेलिव्हिजन कार्यक्रमात सिनेमाचे प्रमोशन करायला यावं लागतं. ज्या शहरांची नावंदेखील कधी ऐकली नसतील, अशा छोट्या शहरातील छोट्या
मॉलमध्ये जाऊन डान्स करावा लागतो. इतक्या मोठ्या कलाकारांना इतकी प्रसिद्धी करावी लागते म्हणजे पाहा. मराठीत मुंबई पुण्यात दोन इव्हेंट करणे, एफ.एम. रेडिओ, टीव्हीवर मुलाखती देणे, सोशल मीडियावर चार पोस्ट टाकणं अशी प्रसिद्धी पाहायला मिळते, पण ती पुरेशी नाही. सिनेमा नवीन असेल तर प्रसिद्धी आणि जाहिरातींच्या कल्पना देखील नव्या असाव्या लागतात. मालिका आणि चित्रपटात काम करणार्या कलाकारांना पाहायला गर्दी जमते, सोशल मीडियावर हिट्स मिळतात. त्यामुळे कलावंतांनी प्रमोशन करावे, याची काळजी निर्मात्याने घ्यावी लागते.
मागील पंचवीस वर्षातील मराठी चित्रपट पाहिले तर ज्याला कलाकारांनी वेळ दिला, ते बहुतांश चित्रपट सुपरहिट झाले आहेत. नागराज मंजुळे ‘सैराट’ची टीम घेऊन महाराष्टात फिरत होते, ‘लय भारी’, ‘वेड’ सिनेमांच्या प्रमोशनसाठी रितेश देशमुख आजवर कोणताही मराठी कलाकार गेला नसेल अशा ग्रामीण भागातील सिनेमागृहात फिरत होते. ‘बाईपण भारी देवा’, ‘झिम्मा-२’चे कलाकारही सिनेमाच्या मध्यंतरात प्रेक्षकांना भेटायला जात होते.
सिनेमाची जाहिरात करताना चित्रपटाचा जॉनर कोणता आहे, गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रातील कोणत्या भागात या जॉनरचे चित्रपट चालले आहेत का, याचा अभ्यास करून निर्मात्याने त्या भागात जास्त जाहिरात करावी लागते. हाच अभ्यास चित्रपट प्रदर्शनासाठी सिनेमागृह निवडतानाही उपयोगी पडतो.
पूर्वी मोठ्या शहरात सिनेमा प्रदर्शित झाल्यावर तो गावातील छोट्या सेंटर्सकडे वळायचा. ‘टुरिंग टॉकीज’, जत्रेतील तंबूत सिनेमा अशा मार्गांनी प्रदर्शित झाल्यावर अनेक वर्षे तो री-रनमध्ये चालायचा, निर्मात्याला अनेक वर्षे पैसे कमावून द्यायचा. आज सिनेमाचा मुख्य धंदा फक्त तीन दिवसांचा झाला आहे. सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये सिनेमा प्रदर्शित करायला एका आठवड्याचं भाडं तीस हजार ते दीड लाख रुपये इतकं आहे. सिनेमा बनवणे आणि त्याची प्रसिद्धी करणे यातच मराठी चित्रपट निर्मात्यांचं कंबरडं मोडून पडतं. त्यामुळे सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये सिनेमा लावून अजून रिस्क घेण्याची निर्मात्यांची तयारी नसते. म्हणूनच ‘सिनेमांना स्क्रीन मिळत नाहीत’ अशी ओरड होते, त्यात प्रामुख्याने मल्टिप्लेक्स स्क्रीन असतात. सिंगल स्क्रीनप्रमाणे इथे अॅडवान्स भाडे घेतले जात नाही, तर सिनेमाच्या होणार्या तिकीट विक्रीतून ६०-४० या रेशोमध्ये निर्मात्याला पैसे दिले जातात. मल्टिप्लेक्समधील तिकीटांचे दर जास्त असतात. त्यामुळे इथे सिनेमा चालला तर पैसे जास्त मिळतात. याच कारणांमुळे मराठी, हिंदी, साऊथ, इंग्रजी अशा सर्व भाषेतील सिनेमांना मल्टिप्लेक्समधील जास्तीत जास्त स्क्रीन हव्या असतात. नवीन निर्मात्यांनी चांगली मल्टिप्लेक्स आणि प्राइम टाइम स्क्रीन मिळविण्यासाठी अनुभवी वितरक शोधावा लागतो. मोठ्या हिंदी मराठी चित्रपटांसोबत टक्कर टाळून आपला सिनेमा प्रदर्शित करावा लागतो.
पहिल्या दिवशी, शुक्रवारी प्रेक्षक आले नाहीत तर मल्टिप्लेक्स चालक दुसर्या दिवशी तो स्क्रीन टाइम ‘चालणार्या’ सिनेमाला देऊन टाकतात. त्यामुळे पहिल्या दोन दिवसांत गर्दी जमवण्यासाठी सिनेमाची काही तिकीटे फ्री वाटण्याची किंवा एका तिकिटावर एक तिकीट फ्री देण्याची स्कीम सध्या जोरात आहे. सिनेमा हिट झाला तरच टीव्ही चॅनल तो जास्त पैसे देऊन विकत घेतात.
आपला सिनेमा नॅशनल अवॉर्ड मिळवेल असं सांगणारा दिग्दर्शक अनेकदा निर्मात्यांना हतोत्साह करून जातात, अवॉर्ड शो केसमध्ये ठेवतात, तिजोरीत नाही. सैराट, बाई पण भारी देवा अशा सिनेमाचं यश दाखवणारे दिग्दर्शक भेटले तर सिनेमाचे प्रायोजक झी टॉकीज किंवा जियो सिनेमा असतील याची खात्री करून दे, असे निर्मात्याला म्हणावे लागते. या सिनेमांत कथानक अभिनय उत्तम असले तरी मोठे प्रेझेंटर पाठीशी होते म्हणूनच या दोन चित्रपटांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचता आलं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात ते यशस्वी झाले.
सिनेमांमध्ये अनेक लाटा येत असतात. नव्वदीच्या दशकात मेलडी साँग्ज असलेल्या सिनेमांची चलती होती. रामसे बंधूंनी आयुष्याभर भयपट बनवले आणि चांगले पैसे कमावले. हिंदीत मनमोहन देसाई, राजकुमार हिरानी यांनी आणि मराठीत दादा कोंडके, महेश कोठारे यांनी एकाच धाटणीचे सिनेमे बनवून सलग चांगलं यश मिळवलं. ‘सैराट’च्या यशानंतर ‘सैराट’सारखे १०० चित्रपट बनले, पण त्यात नागराज अण्णा टच नव्हता. पुरेशी पूर्वतयारी नव्हती.
काही निर्माते मराठी चित्रपटाला अनुदान दिलं जातं म्हणूनही सिनेमा बनवतात. नियमित निर्माता जगावा व चांगला मराठी चित्रपट उभा राहावा, या विचाराने करपरती योजनेची सुरुवात १९७६ साली झाली. पण सिनेमा चालला तरच सरकारला कर आणि निर्मात्याला करवापसी मिळायची आणि ती मिळवतानाही नवीन निर्मात्यांना सरकार दरबारी अडचणी येऊ लागल्या. युती शासनाच्या काळात या योजनेत बदल झाला. ती आता करपरतीची योजना न राहता अनुदान योजना झाली. प्रत्येक मराठी चित्रपटाला सरसकट करमणूक कर माफ केला गेला. अनुदान कोणत्या चित्रपटांना द्यायचं हे ठरवायला एक समिती नेमली गेली.
गेल्या वर्षी शंभरपेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित झाले त्यापैकी फक्त पंचवीस चित्रपटांना अनुदान प्राप्त झालं. ‘अ’ दर्जाचे १२ चित्रपट (प्रत्येकी ३९ लाख) ‘ब’ दर्जाचे १३ चित्रपट (प्रत्येकी २९ लाख) म्हणजेच प्रदर्शित होणार्या प्रत्येक चित्रपटाला सरकारी अनुदान मिळतेच असं नाही, ही बाब नवीन निर्मात्यांनी लक्षात ठेवायला हवी. सिनेमातली कला जिवंत ठेवण्यासाठी निर्मात्याला आधी सिनेमाचा व्यवसाय जाणून घ्यावा लागतो. चार दोन सिनेमात माफक नफा झाला की एखादा दर्जेदार प्रयोग अवश्य करणं हिताचं ठरतं. अखेर काय तर शेअर मार्केट, म्युच्युअल फंडसप्रमाणेच सिनेनिर्मितीतील निवेश (गुंतवणूक) ही जोखीम आहे, पूर्ण माहिती घेऊनच गुंतवणूक करा.