महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री हे असंवैधानिक मुख्यमंत्री असल्याचे निष्पन्न झाले आहे. तरी मी त्यांना गुन्हेगार म्हटले नसते. त्यांनी शिवसेना पक्ष सोडला असता व दुसर्याशी घरोबा केला असता तरी मी त्यांना गुन्हेगार म्हटले नसते.
स्वत:ची ईडीतून सुटका करून घेण्यासाठी भाजपाची मिंधेगिरी केली तरी मी त्यांना गुन्हेगार म्हटले नसते.
स्वत:ला धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा स्वयंघोषित पट्टशिष्य असल्याचा बनाव रचला तरी मी त्यांना गुन्हेगार म्हटले नसते.
एकनाथ शिंदे हे रिक्षाचालक होते, हे तेच सांगतात. मग अशा रिक्षाचालकाला नगरसेवक, महापालिकेत सभागृह नेतापद दिले, आमदारकी दिली, मंत्रीपदं दिली, मुलाला दोनवेळा खासदारकी दिली त्याच शिवसेनेशी गद्दारी करून पक्षद्रोह केला, हा त्यांचा पहिला गुन्हा!
स्वत: शिवसेना सोडली. सोबत शिवसेनच्या आमदार-खासदारांना ईडी, आयटी व सीबीआयचा धाक दाखवून शिवसेनेशी द्रोह करण्यास भाग पाडले हा दुसरा गुन्हा!
‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ या चित्रपटातून स्वत:चे अनावश्यक व अवाजवी उदात्तीकरण करताना धर्मवीर आनंद दिघेंचे अवमूल्यन केले, त्यांच्या मृत्यूबाबत २१ वर्षांनंतर संशय निर्माण केला, हा तिसरा गुन्हा!
ठाण्यातील ‘आनंद आश्रम’चे पावित्र्य नष्ट करून त्याला कॉर्पोरेट लुक दिला, यात भर म्हणून बाह्यदर्शनी असलेल्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या खाणाखुणा नष्ट केल्या. आश्रमाच्या जागेचे रूपांतर गद्दारांच्या कार्यालयात करून तेथे शिवसेना संपविण्याची कारस्थानं शिजविण्याचा अड्डा बनविणे हा चौथा गंभीर गुन्हा!
ज्या राजन विचारेने शिंदे हे पुत्रवियोगाच्या दु:खात असताना त्यातून सावरण्यासाठी दिघे साहेबांच्या एका शब्दावर सभागृह नेतेपद सोडले व स्वत:च्या गाडीत बसवून सभागृह नेतेपदाच्या खुर्चीत बसवण्याचा उदात्तपणा दाखवला, त्याच राजन विचारे यांना विविध मार्गाने त्रास देणे, हा कृतघ्नपणाचा पाचवा गुन्हा!
मातोश्रीने सर्व पदं, सत्तास्थानं व ऐश्वर्य दिले त्याच मातोश्री विरोधात भाजपाशी संधान साधून मातोश्रीशी हाडवैर पत्करणे हा सहावा गुन्हा!
निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेविरोधात भूमिका घेऊन शिवसेना हा पक्ष, पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह स्वत:साठी हिरावून घेण्यासाठी केलेला घातपात, हा सर्वात मोठा सातवा गुन्हा!
त्यांच्यात दम असता तर त्यांनी राज ठाकरेंप्रमाणे स्वत:चा पक्ष काढला असता. त्याऐवजी शिवसेना संपवून मुंबईवर कब्जा मिळवण्याची मनीषा बाळगणार्या कपटी भाजपाशी संगनमत करणे, हा त्यांचा आठवा गुन्हा!
सत्ता येताच माज दाखवत निष्ठावंत शिवसैनिक व आमदारांवर दबावतंत्राचा वापर करून स्वत:च्या गद्दारांच्या गटा(रा)त सामिल करून घेतले. काही निष्ठावंत शिवसैनिकांवर तडीपारीची कारवाई केली हा नववा गुन्हा!
एकेकाळचा निष्ठावंत एकनाथ शिंदे जो ‘यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही’ असे सांगून बाणेदारपणे राजीनाम्याची तयारी दाखवणारा एकनाथ शिंदे, भाजपाच्या हातातील बाहुलं झाला, हा दहावा गुन्हा!
ज्या पक्षाने पंख दिले उडण्याचे व लढण्याचे बळ दिले त्याच पक्षावर तुम्ही गुरगुरता व त्यांच्याशीत लढण्याची भाषा करता? ज्या मातोश्रीने तुम्हाला अनेक विजयांचे मानकरी बनवले त्याचा मातोश्रीवर दुगाण्या झाडत मातोश्रीला पराभूत करण्याची वल्गना करता? हा किती मोठा अपराध आहे.
असे शेकडो गुन्हे एकनाथ शिंदे नावाच्या स्वार्थांध व्यक्तीने केले आहेत. परंतु एकनाथ शिंदे यांच्या या गुन्ह्याला माफी नाही. गेली ४०-५० वर्षे गुण्यागोविंदाने व भावाबहिणीचे नाते जुळलेल्या शिवसैनिकांत मनभेदाची दरी निर्माण केली. एकमेकाशी प्रेम-जिव्हाळ्याचे नाते असलेल्या शिवसैनिकांत वैरभावना निर्माण केली. एकमेकांच्या घरातील मंगलकार्यात व दु:खद प्रसंगी ते जाऊ शकत नाहीत, इतका दुरावा एकनाथ शिंदे यांच्या एका आत्मकेंद्रित व स्वार्थी निर्णयाने निर्माण केला. हा गुन्हा इतका मोठा आहे की एकाच वेळी लाखो घरांत दरी निर्माण केली. त्यांच्यात दरी निर्माण करून वैरभावाला खतपाणी घातले. त्यातून राजन विचारे व केदार दिघेही सुटले नाहीत. आम्ही अनेक जिवाभावाचे मित्र गमावले, याला कारणीभूत फक्त एकनाथ शिंदेच आहेत. यापेक्षा मोठा गुन्हाच असू शकत नाही.
याचसाठी मी ठामपणे सांगतो की, एकनाथ शिंदे, यू आर गिल्टी! तुमच्यापेक्षा मोठा गुन्हेगार असूच शकत नाही. याचा न्यायनिवाडा मानवी न्यायालयात होऊच शकत नाही. याचा हिशेब परमेश्वराच्या न्यायालयातच होईल.