शेतीप्रधान देशातल्या पुरोगामी महाराष्ट्रात बळीराजाचे जगणे आज असह्य झाले आहे. त्यामुळे तो एकतर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतो नाहीतर स्वत: जगण्यासाठी व कुटुंबाला जगवण्यासाठी कर्जफेडीसाठी स्वत:चे अवयव विक्रीस काढतो, त्याची बोली लावतो. ‘९० हजारात किडनी, ७५ हजारात लिव्हर आणि २५ हजारात डोळे’ गहाण ठेवण्याचा टोकाचा निर्णय हवालदिल झालेल्या मराठवाड्यातील शेतकर्यांनी घेतला.
महाराष्ट्रातील शेतकर्यांची पीके सध्या दुष्काळ आणि अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झाली आहेत. तेव्हा कर्जफेड करण्यासाठी हिंगोली-नांदेड-वाशिम जिल्ह्यातील काही शेतकर्यांनी अवयव विकायला काढले. महाराष्ट्र सरकार फक्त पंचनाम्याचा खेळ करतेय आणि शेतकर्यांच्या जिवाशी खेळतेय. शेतकर्यांच्या बाबतीत असंवेदनशील असलेल्या या सरकारला शेतकर्यांकडे बघण्यास वेळ नाही. जेव्हा शेतकर्यांनी अवयव विकण्यास काढले होते तेव्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री डझनभर मंत्र्यांसह राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गुंतले होते. अखेर त्रस्त शेतकरी आधारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीस ‘मातोश्री’ येथे आले.
सरकारने शेतकर्यांना वार्यावर सोडले असले तरी शिवसेना नेते मात्र मदतीसाठी शेतकर्यांच्या बांधावर गेले. शिवसेना पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते व खासदार विनायक राऊत, खा. संजय राऊत, शेतकरी सेनेचे नेते लक्ष्मण वडले, उपनेते नितिन बानगुडे आदींनी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी, प्रश्न जाणून घेण्यासाठी बांधावर जाऊन पाहणी केली. शिवसेना हे प्रथमच करत आहे असे नाही; सत्तेत असो अथवा नसो ती शेतकर्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असताना शेतकर्यांची दोन लाखांपर्यंत कर्जमुक्ती केली होती. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची त्वरित भरपाई मिळावी म्हणून जिल्हाधिकार्यांना जाब विचारा, विमा योजनेतील पैसे शेतकर्यांच्या खिशात न जाता ते कुठे जातात, असा संतप्त सवाल पक्षप्रमुखांनी केला. शेतकर्यांच्या प्रश्नासाठी शिवसेना जागरूक आहे आणि पक्षप्रमुख संवेदनशील आहेत. तरीही ‘शहरात राहणार्या उद्धव ठाकरे यांना शेतीतील काय कळते?’ असे विचारले जाते तेव्हा प्रश्नकर्त्यांची कीव करावीशी वाटते.
उद्धव ठाकरे २००२ साली शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या अडचणी समजून घेतल्या. आत्महत्या करू नये असे शेतकर्यांना आवाहन केले. आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या कुटुंबाला मदतीचा हात दिला. तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली होती की ‘उद्धव ठाकरे हे शहरी नेते आहेत. त्यांना शेतीतील काय कळते. भुईमूग कुठे उगवते हे त्यांना माहित नाही.’ तेव्हा उद्धव यांनी उत्तर दिले की मला शेतीसंबंधी काही कळत नाही. परंतु मला शेतकर्यांचे दु:ख मला कळते, वेदना कळतात. म्हणून दुष्काळग्रस्त शेतकर्यांचे अश्रू पुसण्यासाठी मी आलो आहे. शेतकर्यांना ‘कर्जमाफी’ हे म्हटलेले त्यांना आवडत नसे. शेतकरी काही गुन्हेगार नाहीत तर त्यांना ‘माफी’ हवी. कर्जमाफी न म्हणता शेतकर्यांना कर्जमुक्त करू या असा निश्चय त्यांनी केला. शेतकरी कर्जमुक्त व्हावा म्हणून आंदोलने केली. मुख्यमंत्री झाल्यावर शेतकर्यांवरील कर्ज बर्याच अंशी माफ केले. अर्थसहाय्य दिले. शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून शेतकर्यांच्या हिताला नेहमी प्राधान्य दिले. आज महाराष्ट्रात काही ठिकाणी शेतकर्यांच्या आत्महत्या कमी होत आहेत. याचे श्रेय उद्धवजींनी आखलेल्या शेतकरी धोरणाला आणि घेतलेल्या निर्णयाला द्यावे लागेल. भुईमूग कुठे उगवतो हे तरी माहीत आहे का? चहापुरता साखरेशी संबंध असणार्या नेत्याला उस उत्पादकांचे प्रश्न कसे समजणार? उसतोड कामगारांचे हाल कसे कळणार? अशी विरोधक त्यांच्यावर टीका करीत राहिले. तरी शेतकर्यांच्या प्रश्नांवर ते लढले. आक्रमकता दाखविली आणि अजूनही लढत आहे.
कापसाला हमीभाव मिळावा म्हणून शिवसेनेने विदर्भामध्ये २०१३ साली कापूसदिंडी काढली. ऊस उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन केले. फळीफोड मोर्चा, कांदाफेक आंदोलन व चालते व्हा आंदोलनामुळे पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी उद्धव यांच्याकडे आशेने पाहायला लागला. त्यांनी शिवसेनेच्या विदर्भातील कापूस दिंडीचे नेतृत्व केले. शेतकर्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या संसाराला आधार दिला.
पाच-सहा वर्षापूर्वी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कोकणातील शेतकर्यांना तत्परतेने मदत पोहोचवून त्यांनी दिलासा दिला. अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीस धावून जाणारी शिवसेनाच होती! इतर नेतेमंडळी केवळ आरोप-प्रत्यारोपात गुंतली असताना शिवसेनेने शेतकर्यांचे अश्रू पुसले. महाविनाशकारी नाणार प्रकल्प हाणून पाडत शेतकर्यांच्या जमिनी वाचवल्या. आंबा, काजू, भात उत्पादकांच्या तसेच मच्छिमारांच्या हिताचे रक्षण केले.
महाराष्ट्रातील विशेषत: विदर्भातील शेतकर्यांच्या आत्महत्येचा प्रश्न जेव्हा गंभीर झाला होता तेव्हा शिवसेनेच्या वतीने १३ ते १८ नोव्हेंबर २००७ दरम्यान गुरुकुंज, मोझरी (जि. अमरावती) येथून नागपूर विधिमंडळ अधिवेशनकाळात कर्जमुक्ती दिंडी काढण्याचे ठरवले. त्याप्रमाणे शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्या नेतृत्वाखाली संत तुकडोजी महाराजांना वंदन करीत टाळ मृदुंगाच्या गजरात, हरिनामाचा गजर करत दिंडीची सुरूवात झाली. २ डिसेंबर २००७ रोजी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांचा भव्य मेळावा नागपूरच्या कस्तुरचंद पार्क येथे झाला. या मेळाव्यात ‘देता का जाता’ असा सवाल सरकारला विचारण्यात आला, तर कर्जमुक्ती हाच शेतकर्यांना जगवण्याचा एकमेव उपाय आहे. ही ठाम भूमिका शिवसेनेने मांडली.
त्या आधी २००५मध्ये नाशिक जिल्ह्यात शेतकर्यांच्या प्रश्नांवर शिवसेनेतर्फे ऊग्र निदर्शने करण्यात आली. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांना सुलभपणे खतपुरवठा व्हावा तसेच कांद्याला किमान ८०० रुपये हमीभाव मिळावा या प्रमुख मागण्यांसह शेतकर्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात शिवसेनेच्या वतीने ३० मे २००५ रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड निदर्शने करण्यात आली. २००९ साली धुळे येथे शिवसेनेचा शेतकरी महामेळावा झाला. ‘राज्यात जवळपास पाच हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्या असताना या निर्लज्ज सरकारला झोप तरी कशी येते? शेतकर्यांचा ‘सात-बारा कोरा करा नाहीतर याद राखा!’ असा खणखणीत इशारा उद्धव ठाकरे यांनी या महामेळाव्यात दिला होता.
२०१४-१५ साली पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे अक्षरश: कोलमडून गेला होता. शेती, जनावरांची अतोनात हानी झाली. या अशा संकटसमयी त्यांना पीक विम्याच्या रक्कमेतून दिलासा देण्याची गरज होती. परंतु विमा कंपन्या नियमावर बोट ठेवून मदत देण्यास टाळाटाळ करीत होत्या. केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली. परंतु या योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित राहात होता. विमा कंपन्यांची तिजोरी मात्र भरली जात होती. पीक विमा योजना नक्की कोणाच्या फायद्यासाठी, असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी संघर्षाची भूमिका घेतली. मुजोर विमा कंपन्यांना ताळ्यावर आणण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील बीकेसीमध्ये असलेल्या विमा कंपनीच्या कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या दणक्यानंतर विमा कंपन्यांनी शेतकर्यांना भरपाई देण्यास सुरुवात केली. केंद्र व राज्यात सत्तेत सहभागी असतानाही त्यांनी रस्त्यावर उतरत शेतकर्यांची गार्हाणी मांडली. या मोर्चावर टीकाकारांनी टीकाही केली. परंतु या मोर्चामुळेच विमा कंपन्या ताळ्यावर आल्या आणि शेतकर्यांना न्याय मिळाला.
पर्यावरणाचा नाश करणार्या नाणार प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक जनतेने आंदोलन सुरू केले, त्यास शिवसेनेने पाठिंबा दिला. ‘नाणार नाही म्हणजे नाही’ असा नारा देत या प्रकल्पासाठी काढलेली भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यास राज्य सरकारला भाग पाडले. कोकणातील फळबागायदारांना, मच्छिमारांना, तसेच शेतकर्यांना यामुळे दिलासा मिळाला.
२०१९च्या नोव्हेंबर महिन्यात उद्धव ठाकरे यांनी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागास भेट दिली. शेतकर्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. शिवसेना कायमच तुमच्यामागे आहे. फक्त आत्महत्या करण्याचा विचार करू नका अशी भावनिक सादही त्यांनी घातली. कोकणातील शेतीलाही अतिवृष्टीचा फटका बसला. उद्धव यांच्या सूचनेनुसार आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, सचिन अहिर आदींनी कोकणातील अतिवृष्टीग्रस्त भागास भेट देऊन शेतकर्यांच्या अडीअडचणी जाणून घेत शिवसेनेकडून शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न केला.
मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी जिल्ह्यांचा दौरा केला. दुष्काळाने मराठवाड्याचे वाळवंट केले आहे. डोळ्यादेखत शेत शिवाराचे स्मशान झाल्याचे पाहून शेतकरी घायकुतीला आला आहे. परिस्थिती भयंकर आहे. सगळेच काम करत आहेत. सरकारही आपल्या परीने जबाबदारी पार पाडत आहे. शेतकर्यांना आधार म्हणून सरकारने व्याजमाफी दिली. आभाळच फाटले आहे. कुठे कुठे ठिगळ लावणार? नुसत्या व्याजमाफीने कसे भागेल? सरकारने आता शेतकर्यांना संपूर्ण कर्जमुक्तच करावे, अशी मागणी त्यांनी केली.
मे २०१६च्या दौर्यात दुष्काळाच्या वणव्यामुळे मराठवाड्याचे होणारे हाल शिवसेना कोरडेपणाने पहाणार नाही. शिवसेनेचा माणुसकीचा झरा आटलेला नाही. तो नुसताच जिवंत नसून खळाळून वाहतो आहे. माणुसकीचा झरा हेच आमचे हिंदुत्व आहे. असे सांगतानाच, संकटाच्या प्रत्येक क्षणात शिवसेना तुमच्या सोबतीला असेल, असा शब्द उद्धव यांनी शेतकर्यांना दिला. संभाजीनगर येथे ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजने’अंतर्गत शेतकर्यांच्या २४४ मुलींचे शाही कन्यादान करण्यात आले. दुष्काळग्रस्त जनतेसाठी पाण्याच्या टँकर टाक्यांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. शिवसेनेच्या वतीने मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त भागात ‘शिवजलक्रांती योजने’ अंतर्गत ठिकठिकाणी शेततळी, नदीनाल्यांचे रूंदीकरण-खोलीकरण, तलावातील गाळ काढणे आदी कामांचा धडाका सुरू केला.
बरीच वर्षे मराठवाडा दुष्काळी परिस्थितीचा सामना करतो आहे. शेतशिवाराला अवकळा आली. पाण्याचे झरे आटले. धरणे, तलाव कोरडेठाक पडले. शेतकर्यांची अन्नान्नदशा झाली. जनावरे खुंट्यालाच आचके देऊ लागली. जगायचे कसे, म्हणून मरणाच्या दारात जाणार्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी, दुष्काळग्रस्तांचे दु:ख हलके करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी लातूर, धाराशीव, तसेच बीड जिल्ह्यांचा दौरा केला. रणरणत्या उन्हात उद्धव यांनी ‘शिवजलक्रांती’च्या माध्यमातून शिवसैनिकांनी केलेल्या कामांची पहाणी केली आणि शेतकर्यांशी संवादही साधला. लातूर जिल्ह्यातील नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या कुटुंबाला उद्धव यांच्या उपस्थितीत आर्थिक मदत देण्यात आली.
जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातील शेतकरी संकटात असतो. तेव्हा तो आधारासाठी ‘मंत्रालया’ऐवजी ‘मातोश्री’कडे एका अपेक्षेने येतो. कारण त्याला शिवसेनाच शेतकर्यांची खरी कैवारी वाटते आणि संवेदनाशील शिवसेना पक्षप्रमुखांचा आधार वाटतो.