(पंतोजीचा सुन्नवारवाडा. महालात गादीवर पालथं पडून उत्तरेच्या मोहिमेतील मिळालेल्या संपत्तीची मोजदाद चालू. चिंताग्रस्त कारभारी एक बोटभर यादी खिशातून काढून पालथ्या पंतोजींना खाल मानेनं देऊन दोन पावलं मागं सरकून उभे राहतात.)
पंतोजी : (यादीची गुंडाळी करत) कारभारी, आम्ही फार खुश आहोत!
कारभारी : जी!
पंतोजी : अहो, आम्ही खुश आहोत म्हणालेलो! आमचं इष्ट-मित्र परिवारातील कुणी निधन पावलेलं नाहीय! तुम्ही इतक्या सुतकी चेहर्याने यावं असं घडलंय काय?
कारभारी : जी! असं खचित काही घडलं नाही!
पंतोजी : मग हसत चला! आमच्या उत्तर दिग्विजयाचा आनंद दिसू दे की!
कारभारी : (कृत्रिम हसू चेहर्यावर आणत) जी!
पंतोजी : नुसतं जी? अजूनही तोफ दिल्या गेल्या नाहीत! कुठे…
(पंतोजींचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत कारभारी टाळी वाजवतात, एक सेवक लगबगीनं आत येतो. कारभारी त्याला काही सांगतात, तो कक्षातून बाहेर जातो. इशारा होतो. पाठोपाठ सुन्नवारवाड्यात कुत्र्यांचं भुंकणं घुमतं.)
पंतोजी : (आश्चर्याने) हे काय? कुत्रे का भुंकताय? तोफांचे आवाज कानी येणं अपेक्षित होतं कारभारी!!!
कारभारी : माफी असावी! पण मागेच आपल्या खास ओतीव तोफा विकून तुम्ही उन्हीं पैसों से कुछ ‘चंद’ कुत्ते खरीदे थे…
पंतोजी : (कळवळून) अहो, मराठीत बोला हो!
कारभारी : (कान पकडत) माफी असावी! पण धातूच्या तोफेंपेक्षा ही कुत्रीच कर्तव्य‘परायण’ नि खर्या मुलूखमैदानी तोफा आहेत. असं तुम्ही म्हणालेला…
पंतोजी : तेही ठीक! निदान सनई-चौघडे तरी वाजवायचेत स्वागताला…?
कारभारी : सनया मोडून त्याच्या नळ्या चूल फुंकण्यासाठी वापरायचा आदेश मामीसाहेबांनी काढलाय…!
पंतोजी : चौघडे असतील की…..?
कारभारी : चौघड्यांचे चामडे काढून त्याचे टोपले करून मैला वाहण्यासाठी वापरावयास सांगितलं आहे…
पंतोजी : (वैतागून) बरे! बरे!! किमान राणीसरकारांनी आमच्या स्वागताला महाद्वारात यावयास हवं होतं… तुम्ही निरोप दिलेला दिसत नाही?
कारभारी : (तत्परतेने) आम्ही तुम्ही येत असल्याची खबर घेऊन एक सेवक तातडीने धाडला होता…?
पंतोजी : होता म्हणजे…?
कारभारी : तो मामीसाहेबांच्या कक्षात गेल्याचं शेवट पाहण्यात आलेलं, तेव्हा मामीसाहेब गात होत्या… त्यानंतर त्या सेवकाचा पत्ता नाही.
पंतोजी : (विषय बदलत, गुंडाळी कानात घालत) आम्ही उत्तरेतून जी अपार धनदौलत मिळवली, ती आणावयास हजारेक खेचरं, शेकड्याने उंट, गाढवं नि घोडे लावावे लागले असतील ना?
कारभारी : (चमकून बघतात.) अँ?
पंतोजी : (स्वस्तुतीत मग्न) हां, इतकं अलौकिक यश मिळवणारे पहिल्या बाजीरावांनंतर आम्हीच असू… काय?
कारभारी : अँ?
पंतोजी : (चिडून) केव्हाचं ‘अँ-अँ’ काय चालुय तुमचं? जी आम्ही दौलत उत्तर मोहिमेत मिळवली त्याच्या वस्तूनिहाय याद्या बनवल्या असतील ना? आम्ही तुम्हाकडे त्या मागविल्या होत्या! आपणाला त्या सर्व संपत्तीची मोजदाद करावयाची आहे, त्यासाठीच तुम्हाला बोलावणं धाडलेलं होतं आम्ही! विसरलात?
कारभारी : जी! आम्हास याद आहे!
पंतोजी : मग कुठंय हजारेक खेचरावर लादून आणलेली…?
कारभारी : तेच सांगावयास आलोय आम्ही! पण…?
पंतोजी : पण काय? खेचरांस चारापाण्याची ददात पडली का?
कारभारी : नाही! आपली केवळ चाळीसेक खेचरं जायबंदी होऊन परतलीत. बाकीची उत्तरेतच परागंदा झालीत…!
पंतोजी : (काही आठवत) ती पन्नास पन्नास होनांची खुराक लावलेली म्हणताय का?
कारभारी : नाही! ती गाढवं! ती चहेन्चहा नौरंगजेबांच्या उष्टावळ्या उचलायला पाठवलीत.
पंतोजी : (मूळ विषयावर येत) आणि जातिवंत अरबी घोडी…?
कारभारी : आपल्या सोबतची मोहिमेत गमवावी लागली. फक्त त्या दरम्यान इथे दख्खनेत काही नवी ३०-३५ खरेदी केलीत…
पंतोजी : फक्त मोहिमेचं बोला हो!
कारभारी : (मान हलवत) जी!!
पंतोजी : (दुसर्या हाताने शेंडी पिळत) म्हणजे आम्ही राजपुताना ते मावळ, ग्वाल्हेर ते बुंदेलखंडपर्यंत धडक दिली. आणि आमच्या हाती काही लागलंच नाही?
कारभारी : अगदी तसंही नाही! काही वस्तू मिळाल्यात…
पंतोजी : (निराश चेहर्यावर पुन्हा चमक येते.) अहो, कारभारी लवकर कळू देत की जरा? कुठेय त्याची यादी? नेमकं जिंकलंय काय आम्ही? नि किती?
कारभारी : जी! आम्ही ती इथे येताच आपणाकडे सुपूर्द केलीय.
पंतोजी : (गोंधळून) कुठेय ती यादी? आम्हास तर आठवत नाही.
कारभारी : (बोटाने खुणावत) आपल्या हातात गुंडाळी केलेला कागद तोच होय.
पंतोजी : (गुंडाळी निरखत) हा एवढाच कागद? (घडी काढत) आम्हास मोठ्या यादीची अपेक्षा होती कारभारी! हे इतकं…
कारभारी : क्षमा असावी. आम्ही एकूणएक चीजवस्तू यात नोंदवलीय…
पंतोजी : (आश्चर्याने यादी पहात) हे काय? फक्त तीन वस्तू?
कारभारी : जी! कदाचित तिथल्या ऐश्वर्याचं सार यात असावं!
पंतोजी : (पहिलं नाव वाचत) रेशमी वस्त्रांचे गाठोडे! कुठेय ते? काय आहे त्यात? कुठल्या मोहिमेत मिळालंय ते आम्हांस?
कारभारी : (इशार्याची टाळी वाजवतात, त्यासरशी चार सेवक एक मोठ्ठं गाठोडं घेऊन आत येतात.) हे ऐश्वर्य आपणांस बुंदेलखंडात मिळालंय. आपल्या आज्ञेविना ते उघडलं गेलं नाही!
पंतोजी : (आकार, वजन नि रेशमी वस्त्र न्याहाळत) यात नक्कीच हिरे-मोत्यांचे हार, कंठे वा रत्नजडित कलाकुसर वा उंची वस्त्रं असायला हवीत! (अधीरतेने) सोडा ती गाठ! (कारभार्यांच्या इशार्याने सेवक गाठ सोडतो. गाठ सोडताच आतील शेणाच्या गोवर्या घरंगळतात.) काय हे कारभारी? गोवर्या?
कारभारी : (तितक्याच थंडपणे) जी! तिथल्या मागील परसत्तेच्या सुभेदाराने सरकारी आदेशाने देशी वाणांच्या गाईंचे शेण खरेदी केले होते. बहुतेक सारा खजिना ह्या गोवर्यांचाच असावा!
पंतोजी : (चक्रावून) पण हे तिथलं ऐश्वर्य…?
कारभारी : नक्कीच! हा गोमातेचा प्रसादच म्हणायला हवा! तिथल्या लोकांच्या उद्यमतेचं हे प्रतीकचं म्हंटलं पाहिजे! हे ऐश्वर्य लाखों होनांपेक्षा किंमती किंबहुना अमूल्यच आहे!
पंतोजी : (किंचित नाराजीने) ठीक आहे. याची नोंद करून खजिन्यात जमा करा! (पुन्हा यादी बघत) तांबे धातूचे सुबक नि मोठे पेटारे! (कारभारी पुन: टाळी वाजवतात, त्याबरोबर दोन सेवक पेटारे घेऊन येतात. ते येताच उत्सुकतेने पंतोजी पलंगावर उठून बसतात.) यात नक्कीच हिरे-माणकं, जडजवाहीर, सोने/चांदीच्या मोहरा असायला हव्यात. उघडा ते पेटारे! (कारभारी इशारा करतात. तसे पेटारे उघडले जाते.) हे काय आहे कारभारी? (प्रचंड धक्क्याने) राख?
कारभारी : (वाकून चाचपून बघतात.) राख नव्हे भस्म असावा हा! राजपुतान्याहुन हा पेटारा आणला गेलाय…
पंतोजी : म्हणून राजपुतान्यात भस्म…?
कारभारी : हो, त्यांनी सभ्यतेची, संस्कृतीची राख… (जीभ चावत) भस्म केलाय, जपलाय. त्यास आपली मागील सत्ता नि हरवलेल्या परसत्तेच्या सुभेदाराची कर्तबगारी दोन्ही जबाबदार आहेत. हा भस्म म्हणजे शिवाचा प्रसादच म्हणावयाचा! मौल्यवान उपहार…
पंतोजी : (कारभार्यांचं बोलणं तोडत) आता पुढील वस्तू काय असावी? (यादी पुन: बघतो.) पंचवीस पिंप? मावळात इतकी संपत्ती? त्या पिंपांमध्ये काय आहे?
कारभारी : जी! ती पिंप फार मोठी आहेत. एकएक बैलगाडीत केवळ एक पिंप आणता आलाय. मला वाटतं त्यात द्रव्य अर्थात सोन्याच्या मोहरा वगैरे काही असायला हवं…!
पंतोजी : (अत्यानंदाने) तर तर! मावळ प्रांती केवळ आपलीच सत्ता आहे. आपण मागील अडीच-तीन दशकं सर्व आक्रमणे यशस्वी परतवलीत. इतक्या संपन्न प्रदेशात तितकाच बहुमूल्य नजराणा मिळणं अपेक्षित आहे… ताबडतोब एक पिंप फोडावयास सांगा!
कारभारी : (टाळी पिटतात. सेवक आत येतो.) जा. पिंप फोडा. आणि जे द्रव्य मिळेल ते दाखवण्यास घेऊन या. (सेवक माघारी जातो. आणि काही क्षणांत एक तांब्याचा हंडा घेऊन येतो.)
पंतोजी : (हंडा न्याहाळत निराशेने) म्हणजे यातही मोहरा-नाणी वगैरे काही नाहीत. किमान तेल-तूप काय आहे काय यात?
सेवक : मी उत्तरेत असताना तिथल्या सैन्याला लढाईआधी हे पिताना बघितलंय. हे पिल्यानंतर सैनिक अधिक त्वेषाने लढतात.
कारभारी : हो, हो! मावळ प्रांत अपराजित राहण्यात हेच पेय कारणीभूत असावं!
पंतोजी : (शंकेने) ही मदिरा तर नाही ना?
सेवक : याच्यानं बी झिंग येते, पण दारू न्हाईही!
पंतोजी : दारू नसून नशा येते? असा कुठला पदार्थ आहे हा?
कारभारी : (वास घेत) गोमूत्र आहे हे! शुद्ध देशी वाणाच्या गोमातेचं! तीर्थच की!
पंतोजी : गोमूत्राचं आम्ही काय करावं?
कारभारी : आपल्याला सत्ता राखायची असेल तर काही होनांच्या बदल्यात लोकांत हे गोमूत्र वाटून द्या. यामुळे लोकं अवर्षण, नापिकी, बेरोजगारी, भाववाढ, भ्रष्टाचार वगैरे फुटकळ प्रश्न विसरून आपल्याला साथ देतील!
पंतोजी : ठीक आहे, याची सरकारी दफ्तरातून विक्री सुरू करा. पण त्याने ब्यादश्या नौरंगजेब आम्हांस सुभेदारी देतील?
कारभारी : कठीण आहे! विजयी तिन्ही प्रांतात मागील सुभेदारांना संधी नाकारली जाईल असं दिल्ली दरबारातून कळतंय.
पंतोजी : ह्यावेळी इकमाल खान सुभेदार होता कामा नयेत.
कारभारी : मग एक प्याला चहापन्हा नौरंगजेबांस देऊन बघुयात…?