प्रोफेसर शास्त्री जेव्हा मेवाडच्या त्या छोट्याशा गावात पोहोचले, तेव्हा काळोखाने जवळपास सर्व परिसरावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली होती. रातकिडे अजून जागे झाले नव्हते, पण छोट्या छोट्या उडणार्या किड्यांनी दोन चार मिणमिणत्या दिव्यांभोवती रुंजी घालायला सुरुवात केली होती. तीन मोठे तंबू, त्यांच्या भोवतीच्या दहा बारा छोट्या तंबूंसोबत अक्राळ विक्राळ सावल्या सर्वत्र पसरवत होते.
‘सर, साईटवर थांबायचे आहे का सरळ गेस्ट हाऊसला जायचे?’ ड्रायव्हर सखारामने नम्रतेने विचारले आणि त्या तंबूंवर नजर खिळवून असलेले प्रोफेसर शास्त्री एकदम भानावर आले. पण ते काही उत्तर देणार, तोवर गाडीच्या आवाजाने आणि दिव्यांमुळे लक्ष वेधलेले पाच सहा लोक गाडीच्या दिशेने येताना दिसले. शास्त्री गाडीचा दरवाजा उघडून खाली उतरले. समोरून आलेल्या घोळक्यातल्या एका हट्ट्याकट्ट्या इसमाने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाने भारावलेल्या शास्त्रींचा हात आपोआप पुढे झाला.
‘मी डॉ. शेखावत आणि ही माझी टीम.. ही रेखा, हा राजन आणि हा अजय.’ शास्त्रींनी सगळ्यांशी हात मिळवले.
‘मी प्रोफेसर शास्त्री..’ शास्त्री नम्रतेने म्हणाले.
‘सर, तुम्हाला कोण ओळखत नाही? आमच्या अभ्यासक्रमात तुमची पुस्तके होती आम्हाला,’ नम्रतेने रेखा म्हणाली.
‘पण सर तुम्ही असे एकदम गायब कुठे झाला होतात? गेली तीन चार वर्षे जणू अज्ञातवासात होता तुम्ही,’ काहीशा नाराजीने शेखावत म्हणाले. शास्त्री मंदपणे हसले आणि गप्प राहिले.
‘एनीवेज पण आम्ही तुम्हाला शेवटी शोधून काढलेच.’
‘जोनाथन माझा आवडता शिष्य, त्यामुळे फक्त त्याच्या संपर्कात होतो अन त्यानेच मला बरोबर अडकवले,’ शास्त्रींच्या वाक्याने सगळ्यांच्याच चेहर्यावर हसू उमटले.
‘सर, तुम्ही आता आराम करा. सकाळी अजय किंवा राजन तुम्हाला न्यायला येतील,’ शेखावत नम्रपणे म्हणाले.
शास्त्रींनी थोड्या नाखुशीनेच मान डोलावली. खरे तर ज्या कामासाठी ते इथे आले होते, तिथे कधी एकदा हजर होतोय असे त्यांना झाले होते. पण उगाच वायफळ उत्साह दाखवून देखील उपयोग नव्हता. सगळ्यांचा निरोप घेऊन ते गाडीत बसले आणि गेस्ट हाऊस दाखवण्यासाठी अजय त्यांच्याबरोबर निघाला.
‘अरे असू दे. इथला रस्ता न रस्ता माझ्या परिचयाचा आहे. आयुष्याची पाच वर्षे घालवली आहेत मी ह्या प्रदेशात,’ हसत हसत शास्त्री म्हणाले.
गेस्ट हाऊस लहान पण टुमदार होते. राजस्थानी शैलीतील एखाद्या हवेलीचा लुक त्याला देण्यात आला होता. जेव्हा शास्त्री इथे राहत होते, तेव्हा हे गेस्ट हाऊस म्हणजे मोडकळीला आलेला डाकबंगला होता. डाकबंगल्याची आठवण येताच शास्त्री भूतकाळात हरवले. त्यांनी बॅग उघडली आणि सगळ्यात खाली तळकप्प्यात असलेली एक छोटीशी वस्तू बाहेर काढली. एका दगडात कोरलेली स्फिंक्सची मूर्ती होती ती. ती मूर्ती नाही, तर किल्ली आहे याची शास्त्रींना पूर्ण खात्री होती. या किल्लीचे कुलूप शोधण्यात हयात गेली, पण नशिबी फक्त अपयश आले. पण आता त्यांना पुन्हा एकदा यशाचा रस्ता दिसायला लागला होता, डॉ. शेखावतच्या रूपाने.
– – –
पुराणकथा आणि इतिहासाची शास्त्रींना लहानपणापासून प्रचंड आवड होती. पुढे त्यांनी उच्चशिक्षणासाठी तोच विषय निवडला. त्यातल्या त्यात ग्रीक संस्कृतीवर त्यांचे प्रचंड प्रेम. ग्रीक, रोमन संस्कृतीविषयी लिहिलेले एकही पुस्तक असे नसेल, जे त्यांनी वाचले नव्हते. पुढे ते पुरातत्त्व खात्यात कामाला लागले आणि त्यांच्या अभ्यासाला नवा आयाम मिळाला. १९७८च्या सुमाराला मेवाडमध्ये कुंदनबनजवळ एका पुरातत्त्व साईटवर काम करत असताना त्यांच्या आयुष्याला खरी दिशा मिळाली. तिथे एका पुरातन मंदिराचे अवशेष सापडले होते. त्यावर काम करत असताना, शास्त्रींना एका शिल्पाचे अवशेष मिळाले. पूर्ण अभ्यासाच्या अंती ते स्फिंक्स असावे असा दावा शास्त्रींनी केला आणि सगळ्या टीमने त्यांना वेडात काढले. ग्रीक पुराणातले स्फिंक्स इथे मेवाडमध्ये?
शास्त्रींचा दावा सर्वांनी खोडून काढला, मात्र, शास्त्री आपल्या मतावर ठाम होते. स्वाभिमानी शास्त्रींनी नोकरी सोडली आणि स्वत: मेवाडमध्ये स्थायिक झाले. झपाटल्यासारखे शास्त्री आता कुंदनबन आणि परिसराचा वेध घेऊ लागले. त्या भागाच्या संदर्भातली सगळी माहिती, इतिहास, लोककथा याचा त्यांनी अभ्यास चालू केला. स्वत:ची एक छोटी टीम बनवून काही ठिकाणी खोदकामाच्या परवानग्या देखील मिळवल्या. अशाच एका खोदकामात शास्त्रींच्या हाताला असे काही लागले की शास्त्री जगाचे नशीब बदलायला सिद्ध झाले. शास्त्रींच्या हाताला खोदकामात एक हस्तिदंती पेटी लागली. त्या पेटीत होती काही भूर्जपत्रे आणि एक छोटीशी कोरलेली स्फिंक्सची मूर्ती.
ग्रीक पुराणानुसार स्फिंक्स ही एक राक्षसी होती. पंजे सिंहाचे, शरीर कुत्र्याचे, सापासारखी शेपटी पण तोंड आणि छाती मात्र मानवी असे तिचे भयावह रूप होते. शास्त्रींना सापडलेल्या भूर्जपत्रांची भाषादेखील पुरातन ग्रीक भाषा ‘एलोइक’शी साधर्म्य दाखवणारी. त्या संपूर्ण लिखाणाचा आणि चिन्हांचा जो काही अर्थ शास्त्रींना लागला, त्यानुसार अनेक शतकांपूर्वी आपले राज्य गमावलेल्या आणि देशोधडीला लागलेल्या कोणा राजाला संकटमोचक म्हणून ही मूर्ती देण्यात आली, ती कोणी दिली याचा काही उल्लेख नव्हता. मात्र त्या राजाने गमावलेले सर्वस्व परत मिळवले. त्या आनंदात त्याने कुलदेवतेच्या म्ांदिरासमोर स्फिंक्सची देखील एक मूर्ती उभारली.
या राजाचे, त्याच्या वंशजांचे पुढे काय झाले याचा शास्त्रींना खूप शोध घेतला, मात्र सर्व काही जणू हवेत विरून गेले होते. मात्र प्राचीन पुस्तकात त्यांना या संदर्भात एक कथा आढळली. त्यात कोण्या राजाने जनावरांचे अवयव असलेल्या एका राक्षसाची मूर्ती उभारली आणि मग त्याच राक्षसाच्या शापाने त्याचा अंत झाला, असा पुसटसा उल्लेख होता. आता झपाटलेल्या शास्त्रींनी त्या कथेचे संदर्भ शोधायला सुरुवात केली. तुटके फुटके संदर्भ शोधत त्यांना जे काही ज्ञान मिळाले, ते अद्भुत होते. या स्फिंक्सच्या मदतीने हा राजा एका काळातून दुसर्या काळात प्रवास करू शकत असे, अर्थात टाइम ट्रॅव्हल. राजा काळाच्या ज्या प्रवेशद्वारातून ये जा करत असे, त्या प्रवेशद्वारावरच त्याने हे मंदिर उभारले होते आणि शास्त्रींच्या हाताला जी मूर्ती लागली होती, ती होती या प्रवेशद्वाराची किल्ली.
आता शास्त्रींना शोध घ्यायचा होता, तो त्या मंदिराचा आणि ते सापडल्यावर आपल्या शोधाने जगाला थक्क करून टाकायचे होते. टाइम ट्रॅव्हलच्या नुसत्या कल्पनेने त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहत असत. मात्र हे रोमांच हळूहळू विरू लागले, याला कारण होते सततच्या धावपळीला मिळत असलेले अपयश. पाच वर्ष शास्त्रींनी प्रचंड प्रयत्न केले, पण एक तर त्यांना महत्त्वाची माहिती लपवून इतर तज्ज्ञांची मदत घ्यावी लागत होती आणि जवळचे पैसेदेखील संपत आले होते. शेवटी हताश निराश शास्त्री पुन्हा दिल्लीला परतले आणि प्रोफेसरी करू लागले. मात्र मनाला वेध लागले होते ते त्या काळाच्या प्रवेशद्वाराचे.
१९९०च्या सुमाराला शास्त्रींच्या मेवाडमधल्या निलांबर या परिचिताचा फोन आला आणि शास्त्रींच्या आशा पुन्हा प्रफुल्लित झाल्या. तिथल्या एका संस्थानिकाला पूर्वजांच्या काळातील एक पोथी आणि दगडी कोरीव मूर्ती सापडली होती. त्या पोथीमध्ये विविध कथांबरोबर प्राण्यांचे अवयव असलेल्या मानवी चेहर्याचा राक्षसाची देखील कथा होती. शास्त्रींनी ताबडतोब रजा टाकली आणि मेवाडला धाव घेतली. त्या पोथीतील कथेनुसार कालप्रवास करणार्या या राजाने, ज्याचे नाव संकर्ण होते, भविष्यात स्फिंक्सकडून त्याची हत्या होणार असल्याचे पाहिले होते. मग राजाने अत्यंत हुशारीने स्फिंक्सकडूनच एक असे तळघर बनवून घेतले, ज्यात कितीही ताकदवान शत्रूला, मग तो मानव असो वा दानव असो, बंद करता येत असे. एक दिवशी त्याच तळघरात त्याने शिताफीने स्फिंक्सला बंद केले. संतापलेल्या स्फिंक्सने राजाला, पूर्ण साम्राज्याला शाप दिला आणि नेस्तनाबूत केले. शापित राजा आजही वेगवेगळ्या योनींमध्ये जन्म घेत असतो आणि त्याच्याकडून त्या बंदीघराच्या किल्लीचा ठावठिकाणा जाणून घेण्यासाठी स्फिंक्स आपल्या अमानवी ताकदीने प्रयत्न करत असतो.
आपल्याला मिळालेली किल्ली नक्की कसली आहे, या संभ्रमात आता शास्त्री पडले होते. या सगळ्या लोककथाच असाव्यात असे त्यांना वाटू लागले होते. पण त्यांचा अभ्यासू मेंदू मात्र माघार घ्यायला तयार नव्हता. शास्त्रींनी ती सापडलेली मूर्ती बघायला मागितली. मूर्ती म्हणजे जवळपास दगड उरला होता, इतक्या ठिकाणी भंगली होती. मात्र कोणा उभ्या असलेल्या स्त्री किंवा पुरुषाची ती मूर्ती असावी. अभ्यासासाठी म्हणून शास्त्री ती मूर्ती दिल्लीला घेऊन आले.
शास्त्रींना दिल्लीत पोहोचायला बरीच रात्र झाली होती. थकलेल्या शास्त्रींनी घरात येताच पलंगावर अंग टाकले. क्षणात शास्त्रींना झोप लागली. मात्र काही वेळातच त्यांना कोणीतरी दोन्ही हातांनी उठवून बसवले आणि ते जागे झाले. भोवतालचा परिसर पूर्णपणे अनोळखी होता. त्यांच्या आजूबाजूला चित्रविचित्र चेहर्याचे प्राणी वावरत होते आणि… आणि समोर दगडी चबुतर्यावर स्फिंक्स बसलेली होती. तिचे ते आग ओकणारे डोळे, समोरचा दगड घासत असलेले पंजे आणि वळवळणारी शेपटी सर्व जणू शास्त्रींचा वेध घ्यायला टपले होते.
शास्त्रींनी पुन्हा एकदा आजूबाजूचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र काळोखात लावलेल्या दोन तीन दिव्यांचा फारसा उजेड नव्हता. ते दिवेदेखील चरबीचे असल्याने, एक प्रकारचा उग्र दर्प सर्वत्र पसरला होता. नजर फिरवता फिरवता शास्त्रींची नजर स्वत:कडे वळली आणि ते हादरले. त्यांच्या अंगावर एक पायघोळ झगा फक्त होता.
‘संकर्ण किल्ली..’ तिच्या आवाजाने आसमंत थरारला. शास्त्रींच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. संतापलेल्या स्फिंक्सच्या शेपटीचा तडाखा शास्त्रींना बसला आणि ते कळवळले. गच्च मिटलेले डोळे त्यांनी उघडले तेव्हा ते त्यांच्या पलंगावर होते. या स्वप्नातून शास्त्री भानावर आले आणि त्यांना संपूर्ण खोलीत पसरलेला उग्र दर्प नाकाला झोंबला. चरबीच्या दिव्याचा दर्प…
या एकाच स्वप्नाची पुनरावृत्ती सतत व्हायला सुरुवात झाली आणि शास्त्री हादरले. त्यांची प्रकृती खालावायला लागली. सतत धास्ती वाटायची, शरीर अचानक थरथरायला लागायचे. शेवटी शास्त्रींनी त्या संस्थानिकाची मूर्ती परत पाठवून दिली, स्फिंक्सची मूर्ती बँकेच्या लॉकरमध्ये ठेवली आणि नव्या संशोधनासाठी अमेरिकेचा रस्ता पकडला. पण त्यांचे नशीब असे की, आज तीन वर्षांनी पुन्हा एकदा स्फिंक्सने त्यांना साद घातली होती. मेवाडमध्येच पुरातत्त्व खात्याला काही जुने अवशेष सापडले होते, जे ग्रीक बांधकामाशी मिळते जुळते होते. सर्वच गोंधळले होते. शेवटी अथक परिश्रमाने या विषयातील तज्ज्ञ असलेल्या शास्त्रींना डॉ. शेखावतांनी शोधून काढले आणि शास्त्रींचे पाय पुन्हा एकदा मेवाडला लागले.
कधी एकदा सकाळ होते या उत्सुकतेत शास्त्रींनी बिछान्याला पाठ टेकवली. झोप लागेल का नाही, शंका होती, पण लागली आणि आज पुन्हा एकदा किती तरी वर्षांनी चार हातांनी त्यांना पुन्हा खसकन उठवले आणि शास्त्रींना जाग आली. तीन वर्षांनी आज पुन्हा एकदा तेच स्वप्न. पण आज असे विचित्र का वाटते आहे? आजचा देखावा तोच आहे, पण दिशा का चुकत आहेत? आज शास्त्री स्फिंक्स बसलेल्या चबुतर्याच्या उजव्या हाताला होते, त्यांच्या हातात ती दगडी किल्ली होती. आणि स्फिंक्ससमोर त्याच गबाळ वेषात दुसरे शास्त्री बंधनात जखडलेले होते. त्या बंधक शास्त्रीने काकुळत्या नजरेने किल्ली हातात घेतलेल्या शास्त्रींकडे पाहिले आणि हताश होऊन तो खाली कोसळला. त्याच्या मुखातून निघालेला चीत्कार स्फिंक्सच्या अमानवी हास्यात विरत गेला.
‘संकर्ण मी तुला सांगितले होते, मला बंधन तू घातलेस.. मला मुक्तदेखील तूच करणार. जर मी तुला कालप्रवास घडवू शकतो, तर कालाचा वेधदेखील घेऊ शकतो!’ विजयी स्वरात स्फिंक्स म्हणाली आणि तिची नजर शास्त्रींकडे वळली, त्या नजरेत उपहास ठासून भरलेला होता.
लडखडत्या पायांनी आणि निराश मनाने शास्त्री मागे वळले आणि कालचक्राच्या प्रवेशद्वाराकडे परत निघाले. शास्त्री म्हणून जन्म घेण्यापूर्वी किती योनीमधून आणि किती यातनांमधून जावे लागणार आहे, या कल्पनेने संकर्ण अंतर्बाह्य थरारत होता.