बाळासाहेब, तुम्ही लावलेल्या कल्पवृक्षाला विषारी फळं आली! सत्तातुर निर्लज्जपणे वागत आहेत!
बाळासाहेब, आपल्या महापरिनिर्वाणाला ११ वर्ष होऊन गेलीत. आपण जाताना सर्वांना आवर्जून सांगितले होते, माझ्या उद्धव व आदित्यला संभाळून घ्या! तेव्हा तर सर्वांनी माना डोलावल्या, कारण तुम्हाला विरोध करायला कोणाची माय व्याली नव्हती. परंतु आपल्या नंतर मात्र शिवसेनेत दबा धरून बसलेले अनाजी पंत व गणोजी शिर्के फितुरीची बीजं रोवत होते. दिल्ली पतपादशहाशी संधान साधून एखाद्या गाफिल क्षणी पाठीत वार करण्याच्या संधीची वाट पहात होते.
ज्यांना तुम्ही ओळख दिली, सत्तास्थानी आरूढ केले, रोडपतीचे करोडोपती नव्हे तर अब्जोपती बनवले, ज्यांना सायकलचे वांदे होते ते लाखोच्या गाड्या उडवू लागले, चाळीत राहणारे आलिशान बंगल्यांत राहू लागले, फार्म हाऊस, शेती, भूखंडांचे धनी झाले, तेच तुमच्या विचारांचे, तुम्ही लावलेल्या अमृत वेलीचे, तुमच्या पुत्राचे, तुमच्या नातवाचे व लाखो शिवसैनिकांचे गारदी निघाले.
उद्धवसाहेब पाठीच्या मणक्यांच्या दुर्घर आजाराने अंथरूणात जायबंद होते, तेव्हा या गारद्यांनी डाव साधला, पाठीत खंजीर खुपसला आणि शिवसेनेचा वाघ घायाळ केला, ज्या धनुष्य बाणाच्या निशाणीवर हे निवडून आले तेच धनुष्यबाण मोडीत काढायला निघाले. आपण, दत्ताजी साळवी, वामनराव महाडिक, लिलाधर डाके, सुभाष देसाई, मनोहर जोशीसर, धर्मवीर आनंद दिघे साहेब, साबीरभाई शेख, सतीश प्रधान, या सारख्यांनी परिश्रमपूर्वक संगोपन केलेली, हजारो शिवसैनिकांच्या त्याग, भगवा गार्डचे शौर्य, बलिदान करून घरादाराची राखरांगोळी करून शिवसेनेचा वटवृक्ष केला, कल्पवृक्ष केला; त्याच कल्पवृक्षाच्या मुळावर घाव घालू पाहणारी अवलाद निपजली.
आधी दिघे साहेब गेले, नंतर आपण गेलात! मग काय! या गारद्यांना रान मोकळे मिळाले.आणि साहेब दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या ठाणे शहरावर आपण पुत्रवत प्रेम केले ज्या ठाण्याला तुम्ही पहिला नगराध्यक्ष, महापौर दिले, अनेक आमदार व खासदार दिले, ठाण्यात गडकरी रंगायतन नाट्यगृह दिले, तरण तलाव, तलावपाळीचा तलाव व दादोजी कोंडदेव स्टेडियम दिले, ज्या ठाण्यातील एका मामुली रिक्षाचालकाला आपण व दिघे साहेबांनी रंकाचा राव केला, त्यानेच भाजपाशी संगनमत करून शिवसेना संपवण्याचा विडा उचलला. ज्या आनंद आश्रमातून शिवसेनेचे धोरण आखले जायचे व विजयी तोरणं बांघली जात होती त्याच आनंद आश्रमातून फुटीचे कट रचले गेले व आज शिवसेना संपवण्याची कारस्थानंही आखली जात आहेत. जे ठाणे भाजपमुक्त करण्याचा विडा दिघे साहेबांनी उचलला होता, तिथेच शिवसेनेसाठी कबर खोदण्याचा लांच्छनास्पद प्रकार होत आहे.
आपण एकदा दिघेसाहेबांना विचारले होते, आनंद, हे दाढीवाले कशाला आणलेस? तेव्हा दिघेसाहेब अभिमानाने बोलले होते, ‘हे ठाण्याचे भविष्य आहेत.’ पण हाय देवा, त्या दाढीवाल्यातील एका एकनाथ शिंदेने दिघेसाहेबांचा विश्वासघात केला. त्यानेच गारदी बनून शिवसेनेच्या पाठीत सपासप वार करायला घेतले आहेत. इतकेच नव्हे तर बाळासाहेब व दिघे साहेब हे जे आमचे आदर्श आहेत व त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी व शिवसेना वाचविण्यासाठी बंड नव्हे तर उठाव केला! असा बकवास करीत होता, तोच आज ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा हा उघडपणे शिवसेना संपवण्याची भाषा बोलत आहे, देवेंद्र फडणवीस तर ‘आम्ही बदला घेतला’ असे म्हणत आहेत, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेला व त्याची जी हुजूरी करणारा तोच दाढीवाला भाजपाने शिवसेना फोडण्याच्या बदल्यात जहागिरी दिलेली मुख्यमंत्रीपदाची उष्टी पत्रावळ चाटण्यात धन्यता मानत आहे. ज्या दिल्लीचे बादशहा आपल्या मातोश्रीवर झुकत होते, तिथे हा मिंध्यांसारखा दिल्ली दरबारी कंबर मोडेपर्यंत वाकून कुर्निसात करण्यात धन्यता मानत आहे.
बाळासाहेब, सत्तेचा माज आलेले हे गद्दार निष्ठावंत शिवसैनिकांवर अनन्वित अत्याचार करीत आहेत. खोट्या केसेस करणे, तडीपारीच्या धमक्या देणे, शाखा ताब्यात घेणे, अशी मोगलांना व इंग्रजी राजवाटीलाही लाजवणारी कृत्यं ते करीत आहेत.
ठाण्याचा तो ढेरपोट्या नरेश व आपल्या हयातीत जो कधीच शिवसैनिक नव्हता किंबहुना शिवसेना विरोधक होता असा दीपक केसरकर यांचे प्रवक्ते बनतात. इतर पक्षांतून शिवसेनेत येऊन आमदार झालेले संधीसाधू या गद्दाराचे साथीदार म्हणवतात.
बाळासाहेब, आपण जाण्याचीच जणू हे गद्दार व त्यांचे गॉड फादर वाट पाहत होते, असेच वाटते. अहो, यांना एकवीरा आई नको, यांना तुळजापूरची भवानी माता नको तर यांना कामाख्या देवी नवसासाठी लागते! नवस कसला तर शिवसेना संपवण्याचा. जे काल परवापर्यंत आम्ही फक्त बाळासाहेबांचे व दिघे साहेबांचे असे उठता बसता बोलत होते, तेच आज ‘आम्ही मोदीसाहेबांची माणसं’ असं देश विदेशात निर्लज्जपणे जाहिररित्या बोलत आहेत.
‘कामातुरानां न भयं न लज्जा!’ असे ऐकले होते, परंतु या गद्दारांना पाहून ‘सत्तातुरानां न भयं न लज्जा!’ असे म्हणावे असे वाटते. वैचारिक व्यभिचाराची व नैतिक अध:पतनाची सीमा त्यांनी कधीच पार केली आहे. तुमच्या मुलावर, तलवारीचे वार करताना ते ‘बाळासाहेबांची शिवसेना’ ही ढाल संरक्षणासाठी वापरत आहेत. मी वयाच्या १६व्या वर्षापासून आपली भाषणं ऐकत आलो आहे. आपली ठाकरी भाषा अधुनमधून माझ्या अंगात (लेखणी व वाणीत) संचारत असते. आपले शब्द हे अंगार होते, ते या भंगार लोकांसाठी वापरण्याचा मोह मला टाळावा लागत आहे. तरी एकच सांगतो, या नायट्यांचा नायनाट होईपर्यंत मी माझ्या लेखणीच्या तलवारीची धार बोथट होऊ देणार नाही. मग माझ्यावर कितीही दबाव येऊ दे!
या गद्दारांची सद्दी संपवण्यासाठी आपण उद्धवजी, आदित्यजी, अरविंद सावंत, भास्कर जाधव, रवींद्र वायकर, विनायक राऊत, संजय राऊत, अंबादास दानवे, सुषमा अंधारे आदी नेत्यांप्रमाणेच राजन विचारे, विजय साळवी व माझ्यासारख्या लाखो शिवसैनिकांना आशीर्वाद देऊन या गद्दारांचा राजकीय अंत करण्याचे बळ द्यावे, ही विनंती.