हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अगदी प्रारंभीचे अंगरक्षक उदयदादा बटवार यांचं २१ डिसेंबर २०२२ रोजी दु:खद निधन झालं. २१ डिसेंबर २०२३ हा त्यांचा पहिला स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या स्मृती चाळवणारा लेख.
– – –
काही व्यक्ती अशा असतात की त्यांच्या केवळ अस्तित्वानंच महफलीला आगळा रंग चढतो, चैतन्य येतं, ती प्रफुल्लित होते. उदयदादा बटवार हे त्यापैकीच एक. अत्यंत लोभस व्यक्तिमत्व. पहिल्याच भेटीत समोरच्याला आपलंसं करून घेणारं. इतकंच नव्हे तर उदयदादांचे एकेक किस्से कळू लागले की ‘उदय बटवार’ लोकांना आधारवड वाटू लागत. आपल्या सार्या समस्यांचं, प्रश्नांचं उत्तर उदयदादांकडून मिळेल, याची त्याला खात्री वाटू लागे… आणि हे खरंच होतं की! एखादी व्यक्ती उदयदादांकडे जाऊन समस्या सांगत असे, ती ते लक्षपूर्वक ऐकून घेत. त्यात त्या व्यक्तीवर अन्याय झाल्याचं उदयदादांना वाटलं की ‘उदय बटवार फॉर्मुल्या’नं ती समस्या सोडवली जायची. मग त्यात उदयदादांचा शब्द अखेरचा आणि तो दोन्ही पक्षांना मान्य होण्याजोगा असायचा.
उदयदादांचं व्यक्तिमत्वच तसं होतं, एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटातील नायकासारखं. व्यायामानं कमावलेलं शरीर (शरीरसौष्ठवाच्या आकाराचं… ‘व्ही’ शेपमधलं), दाट कुरळे केस, रूंद खांदे आणि आवाजात समोरच्यावर जरब बसवण्याची ताकद. उदयदादानं कुणाच्या कानाखाली आवाज काढलाच तर, त्याच्या डोळ्यासमोर सारी आकाशगंगा फेर धरील, अशी त्यांच्या पंजाच्या तडाख्याची दहशत. त्यांच्या चालण्यातही आत्मविश्वास ठासून भरलेला. रस्त्यातून चालताना, त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाचा प्रभाव, त्यांना पाहणार्या स्रियांवरही होत असे. त्या त्यांना वळून वळून पाहात. ही नंतर आख्यायिका होऊन बसली. त्यांच्या तरूणपणातल्या या गोष्टी.
त्या काळात तरुणांवर गारूड व्हायचं ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं. मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी, त्यांना मानसन्मानानं, स्वाभिमानानं स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी आणि ताठ कणा ठेवण्यासाठी ‘शिवसेना’ ही संघटना बांधणार्या बाळासाहेबांभोवती दणकट शिवसैनिक कडं करून असत. त्यात उदय परब, चंदू मास्तर, बाळा चव्हाण, उदय बटवार हे कट्टर शिवसैनिक, पदरमोड करून, बाळासाहेबांचे ‘चिलखत’ झालेले होते. विशेषत: बाळासाहेबांचा कुठेही दौरा असला की हे ‘चिलखत’ त्यांच्याभोवती सदोदित असे. त्यात अत्यंत नि:स्वार्थी आणि बाळासाहेबांचा शब्द प्रमाण मानणारे उदयदादा हे बाळासाहेबांच्या विशेष मर्जीतले झाले होते.
उदयदादांचं वास्तव्य केईएम इस्पितळासमोरच्या ‘मावावाला बिल्डिंग’मध्ये. केईएममध्ये तर उदयदादांनी आपली ‘ओळख’ निर्माण करून ठेवली होती. त्यामागं कारणही तसंच होतं. ‘शिवसेने’चा प्रारंभीचा काळ हा ‘राड्या’चा होता. त्यात बरेच शिवसैनिक घायाळ होत, जखमी होत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी केईएम हे सरकारी इस्पितळ उदयदादांच्या ओळखीनं हक्काचं झालं होतं. बाळासाहेबही विश्वासानं उदयदादांवर ती जबाबदारी हक्कानं सोपवत. इथले अनेक डॉक्टर्स उदयदादांच्या ‘दोस्तान्या’त अलगदपणे जमा झाले होते, त्याला उदयदादांचा स्वभाव, बोलणं आणि एकूणच व्यक्तिमत्व कारणीभूत होतं.
केईएम आणि आजूबाजूच्या परिसरातही उदयदादांचा ‘दरारा’ निर्माण झाला होताच. पण हा दरारा लोकांच्या भल्यासाठीच होता. केईएममधून कुणी वृद्ध रूग्ण अथवा जवळपास रहाणारा रूग्ण यांना टॅक्सी मिळाली नाही की कुणीतरी ते उदयदादांच्या कानावर घाली. मग दोन्ही हातात दगड-विटा… जे सापडेल ते… घेऊन, रस्त्याच्या मधोमध उभं राहून ते टॅक्सी थांबवत. त्या रूग्णाला, त्याच्या नातेवाईकांना टॅक्सी मिळवून देत. भाडं नाकारलं तर आपल्या टॅक्सीचं काही खरं नाही, हे टॅक्सीवाल्याला कळत असे. उदयदादाचं बलदंड शरीर, हातातील दगडधोंडे आणि आवाजातील जरब यामुळेच कुठल्याही टॅक्सीवाल्याची ‘नाही’ म्हणायची हिंमत होत नसे.
त्यावेळी उदयदादांच्या आसपास जी पंटर मंडळी होती, त्यांना आपल्यासोबत घेताना त्यांनी तारतम्य पाळलं होतं. आपल्या वडापाव, भाजीपावच्या गाडीवर त्यांनी अनेक बेकार तरूणांना व्यवसायात गुंतवलं होतं. उगाचच कुणालाही ते जवळ येऊ देत नसत. त्यांची पार्श्वभूमी चांगल्या कुटुंबातली आहे, असं कळलं की ते त्याला ‘पंटर’ होण्यापासून परावृत्त करत. आज ‘विमा क्षेत्रा’त स्वतःचा दबदबा निर्माण करणारे ‘स्टार एजन्ट’ किरण वालावलकर यांच्या बाबतीत घडलेला किस्सा याचं द्योतक! वालावलकरही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक. एकदा पंटरगिरीमुळे त्यांना एका टोळीनं उचलून नेलं. हे उदयदादांना कळताच ते मोटरबाईकवरून त्यांच्या अड्ड्यात घुसले. मोटरबाईकच्या फायरिंगनंच त्यांनी ओळखलं की उदयदादा आलेत. त्यांनी तिथून वालावलकर यांची सुटका केली आणि आपल्याकडे नेऊन त्यांना ‘डोस’ दिला. किरण यांची आई शिक्षिका असल्यानं उदयदादांना त्यांच्याविषयी आदर होता. ते म्हणाले, ‘उद्या तुझ्या आईला कुणी विचारलं की तुम्ही आमच्या मुलांवर संस्कार करता आणि तुमचा मुलगा तर असं वागतो, तर त्या माऊलीनं काय उत्तर द्यायचं? तू जे काही करतोयस ते तुला आईनं सांगितलंय का? नाही ना? मग तू या भानगडीत अजिबात पडू नकोस. नाहीतर तुझ्या अशा ठिकाणी वार करीन की तू आयुष्यभर लक्षात ठेवशील.’
उदयदादांनी सोबतच्या कार्यकर्त्यांना कधी वार्यावर सोडलं नाही. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना ‘मोक्का’ कायद्याखाली आपल्याला आणि आपल्या पंटरना आत टाकणार याची कुणकुण उदयदादांना लागली. म्हणून काही मोजक्याच कार्यकर्त्यांना घेऊन ते वसंतदादांकडे गेले. वसंतदादांनी उदयदादांचं म्हणणं ऐकून घेतलं. मग विचार करून म्हणाले, ‘मी नाही टाकत तुम्हाला मोक्काखाली आत’. मग अट टाकत म्हणाले, ‘पण तुम्ही सगळे काँग्रेसमध्ये या’.
हे ऐकताच उदयदादा संतापानं ताडकन उठले, ‘मोक्का लागला तरी चालेल. पण शिवसेना आणि बाळासाहेबांना सोडणार नाही.’
‘अहो बटवार बसा… खाली बसा.’ पण उदयदादा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तिथं असणार्या आपल्या कार्यकर्त्यांना वसंतदादा म्हणाले, ‘बघा, बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक कसा असतो ते.’ आणि याच कडवट शिवसैनिकाला एका गद्दारानं दिवाळी भेट पाठवली ती त्यानं घरात घेतलीच नाही.
‘शिवसेना’ या मंदिरात ‘बाळासाहेब’ हे उदयदादांचं दैवत होतं. या दैवताच्या विरोधात एक वाक्यच काय, एक अक्षरसुद्धा त्यांना सहन होत नसे. बाळासाहेबांच्या कृपेनं महापौर झालेल्या व्यक्तीनं एकदा उदयदादांसमोर ‘बाळासाहेबांना काय कळतंय?’ असं म्हणताच, त्यांच्या पदाचा वगैरे विचार न करता, त्यांच्याच चेंबरमध्ये त्यांची गचांडी धरली. तिथं असणारे एक ज्येष्ठ शिवसेना नेते मध्ये पडले नसते तर उदयदादांनी त्यांना मारलंच असतं.
एका बाजूला असं राकट व्यक्तिमत्वाला संवेदनशील, रसिक, मवाळ बाजूही होती. उदयदादा हे जुन्या हिंदी चित्रपटगीतांचे शौकीन. जुन्या गाण्यांचा अफाट, हेवा करण्याजोगा, संग्रहही त्याच्यापाशी होता. शिवाय ही गाणीही त्यांना तोंडपाठ. सूर-तालाचं त्यांना उत्तम ज्ञान होतं. मा. भगवानच्या शैलीत त्यांचे पाय थिरकत, तेव्हा त्यांच्या चेहर्यावरून आनंद ओसंडून वाहत असे. आपल्या ‘आनंदयात्री’ या कंपूत ते नेहमीच सहभागी असत, आनंद साजरा करण्यात अग्रणी असत.
उदयदादा जिंदादिल होते. आयुष्य त्यांनी सर्वार्थानं उपभोगलं. ‘रडणं’ हा शब्द त्यांनी जन्मापासूनच आयुष्यातून हद्दपार केला. खाण्यापिण्याचा आणि खिलवण्याचा त्यांना शौकच होता. इतरांना खाऊ-पिऊ घालणं हा त्यांचा आनंद होता. मैफल जमवणं आणि त्याचा स्वच्छंद आनंद घेणं, हे त्यांच्या उत्तरायुष्यातील जीवनध्येय झालं होतं. त्यांच्या मैफलीत त्यांचे जिवलग मित्र जॉनी लिवर, विकी गोरक्ष, किरण वालावलकर आणि आनंदयात्री कंपू, मोहन जोशींसारखे सेलेब्रिटी असत. ‘आनंद देणं आणि घेणं’ हेच तत्व त्यांनी आयुष्यभर पाळलं. म्हणूनच आपल्या कुठल्याही व्याधींचे स्तोम त्यांनी माजवलं नाही. कदाचित याच त्यांच्या बेफिकिरीचा त्यांच्या व्याधीनं गैरफायदा घेतला. पत्नी डॉली यांच्यावर आणि ममता, प्रीती, श्वेता या तिन्ही मुलींवर त्यांनी अपार, अथांग प्रेम केलं. उदयदादानं आपल्या मित्रांना सांगितलं होतं की मी गेल्यावर रडत बसू नका. रडलेलं मला आवडत नाही. त्यापेक्षा मस्त मैफल जमवून आनंद साजरा करा.’ अर्थात हे सांगायलाही जिगर लागते.
कुणी मोठी व्यक्ती गेली की ‘पोकळी निर्माण झाली’ असं म्हणायचा प्रघात आहे. उदयदादांसारखी व्यक्ती गेली की या शब्दांमागचा अर्थ कळू लागतो. त्यांच्या कुटुंबीयांसाठी, कार्यकर्त्यांसाठी, परिसरातील जनतेसाठी एक ‘आधारवड’ गेल्याचीच भावना आहे. उदयदादाच्या जाण्यानं मैफिल सुनी सुनी झाली, बेरंगी झाली, त्यातलं चैतन्यच हरपलंय.