□ निकोप लोकशाहीसाठी संवेदनशील न्यायपालिकांची गरज : सरन्यायाधीश ए. व्ही. रमण्णा
■ मुळात देशाला लोकशाहीची गरज आहे, असं विद्यमान सत्ताधीशांना वाटतंय का, हा खरा प्रश्न आहे.
□ धर्माच्या दावणीला बांधून राष्ट्र बळकट होईल हा भ्रमच : विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांचे प्रतिपादन
■ हा भ्रमाचा भोपळा जगभर, वारंवार फुटत आला आहे, धर्म दुय्यम मानून भाषेच्या आणि संस्कृतीच्या आधारावर झालेली बांगलादेशाची निर्मिती हे आपल्या परसातले उदाहरण आहे- त्यातून आपण काही शिकलो का?
□ देशात आता नवीन साखर कारखान्यांना परवानगी नको – नितीन गडकरी
■ जुन्यांवर कब्जा झाला का?
□ गोडसे समर्थनाचा ट्रेंड दुर्दैवी : यशोमती ठाकूर
■ हा काही नवा ट्रेंड आहे का? गांधीजी हयात होते, तेव्हापासूनचा हा ट्रेंड आहे. असे किती ट्रेंड आले आणि गेले तरी गांधीजींना हटवू शकत नाहीत हो! काळजी कशाला करता?
□ विरोधकांकडून फसवणूक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधकांवर टीकास्त्र
■ शेतकरी कायदे चर्चेविना दामटून संमत करा, असं विरोधकांनी सांगितलं होतं? आणि तुम्ही ते ऐकलंत?… ऐकावं ते नवलच!
□ भाजपला ज्योतिषी बदलण्याची गरज : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
■ स्वत:च्या कर्माने गाळात जाणार्याला ग्रहतारेही वाचवू शकत नाहीत, तिथे ज्योतिषी बदलून काय होणार, कप्पाळ!
□ देशात अब्जाधीशांच्या संख्येने द्विशतक गाठलं
■ यांच्या तिजोर्या भरताना किती सामान्य लोक भिकारी झाले, तेही मोजा कधीतरी.
□ जामीन अर्जावर बंदी आणणे म्हणजे कैद्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणे : सर्वोच्च न्यायालयाचे मत
■ लोकांना अकारण तुरुंगात डांबून दहशत माजवण्याच्या विचारात असलेल्यांनाच असल्या क्रूर कल्पना सुचू शकतात.
□ भारतीय महिला बुद्धिबळ संघाने बलाढ्य रशियाला नमवून रचला इतिहास
■ आणि आपल्याकडे विनोदी लेखक, व्यंगचित्रकार वगैरे मंडळी अजून बायकांना कसं डोकं नाही, यावर पांचट विनोद करत असतात.
□ लॉकडाऊनमध्येही लाचखोरीला उधाण
■ कसलीही बंदी आली की ती लाचखोरीची संधीच असते. या काळात लाचखोरी वाढलीच असेल उलट.
□ डिसेंबरअखेर घोटाळेबाजांवर कारवाई : किरीट सोमय्या
■ कभी कभी तो (इसे) लगता है कि यही कोर्ट है, यही सरकार है, यही पुलिस है… चांगल्या मनोचिकित्सकाची गरज आहे यांना!
□ पतीचे स्टेटस बाजूला ठेवून स्वत:ला घडवा : अमृता फडणवीस यांचे महिलांना आवाहन
■ त्यांच्याकडेच पाहा. त्या आज ज्या काही आहेत त्यात त्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत, याचा काहीतरी वाटा आहे का! सगळं स्वकर्तृत्त्व!
□ हिमाचल प्रदेशातून कंगना राणावत पोटनिवडणूक लढवणार?
■ का नाही? भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी लागणार्या सगळ्या अर्हता आहेत तिच्यापाशी.
□ ट्विटर अकाउंट सुरू करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे कोर्टाला साकडे
■ सगळ्या ट्विटरकरांनी ट्रम्प यांना पाठिंबा द्यायला हवा, भाजपचे पगारी ट्रोल मिळून तरी किती मनोरंजन करणार?
□ लखीमपूर खेरीतील हिंसाचारावर भाजपच्या खासदारांचे मौन
■ ते जनतेचे प्रतिनिधी नाहीत, मोदींचे होयबा आहेत.
□ दोन वर्षांत ५००पेक्षा अधिक राजकीय पक्षांची नोंद
■ बेरोजगारी किती आहे देशात आणि हाच सगळ्यात फायद्याचा बिनभांडवली धंदा आहे ना!
□ राज्य सरकार चालवतंय तरी कोण? आशिष शेलार यांचा प्रश्न
■ चालतंय ना नीट? मग झालं. तुम्ही चालवत नाही आहात एवढंच पुष्कळ आहे सामान्य जनतेसाठी.
□ शिवसेनेने युतीबद्दल विचार करावा : रामदास आठवले
■ केला आहेच की… म्हणूनच तर महाविकास आघाडी अस्तित्त्वात आली.