एकीकडे आपण म्हणतो, देव चराचरात भरलेला आहे. दुसरीकडे त्याला वेगवेगळी रूपं, नावं देतो. वर त्यातला एका ठिकाणचा एक देव नवसाला पावायला लागतो. हे काय गौडबंगाल आहे? माझ्या घरातला देव पावणार नाही का? त्यासाठी तिथेच कशाला जायला हवं?
सुधा शेळके, आपटे रोड, पुणे
– पुण्यात घरा घरात इडली सांभार, डोसे बनतातच की, पण तरीही वैशाली वाडेश्वरला जगात तोड नाही, म्हणून लोक गर्दी करतातच ना? प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग असतो आणि कुणाच्या श्रद्धेचं काही मोजमाप करता येत नाही.
लोक भ्रष्टाचाराबद्दल जेवढे सजग असल्याचं दाखवतात, तेवढे सोशल मीडियावरच्या खोट्या बातम्या, नेत्यांच्या थापा यांच्याबद्दल का सजग नसतात… तेही भ्रष्ट आचरणच आहे आणि देशाला घातकच आहे की.
सुधन्वा नाईक, घाटकोपर
– पण आजकाल आपल्या सोयीच्या अफवांवर विश्वास ठेऊन तेच बरोबर आहे असं समजून त्याला कवटाळून बसण्याचाच काळ आहे. आणि याचं मुख्य कारण मीडियासुद्धा त्याला हातभार लावून तुमचा भ्रम पक्का करत राहतो. त्यातच त्यांचा व्यवसाय दडलेला आहे.
‘पिंजरा’ सिनेमाचा रिमेक केला, तर त्यात तुम्हाला कोणती भूमिका करायला आवडेल? इतर कलाकार कोण असावेत असं वाटतं? आज त्याच्या दिग्दर्शनाची धुरा कोण सांभाळू शकेल?
अनिल पांचाळ, नालासोपारा
– हे सगळं निर्माता कोण आहे आणि त्याच्या मनात काय आहे त्यावर सगळं अवलंबून असतं. मी निर्माता नाही आणि झालोच तर मला पिंजर्यात पैसे घालायची गरज वाटत नाही.
देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणार्याचे हात घ्यावे, असं कवी म्हणतो, पण लोक तर पहिल्या दोन ओळींमध्येच अडकलेले दिसतात. देणार्याचे हात घ्यायचे म्हणजे ते हातही काढून घेतील काय, अशी भीती वाटते.
परशुराम गोटखिंडे, कोल्हापूर
– अहिंसा परमो धर्मा: याची दुसरी, धर्म हिंसा तथैवच ही ओळही; लोक तिचा मथितार्थ लक्षात न घेता, शब्दश: अर्थ घेतील की काय या शंकेने आपल्याला सांगितली गेली नाही की काय असंही मला वाटतं. तसंच असावं हे ही.
अलीकडच्या काळातल्या हिंदी गाण्यांमध्ये गायक आतडी पिळवटून, विव्हळून गात आहेत, असं का वाटतं? प्रेमाचं गाणंही भिकार्याचं गाणं वाटतं हो आजकाल.
मुख्तार शेख, गोवंडी
– कदाचित आजच्या प्रेमाच्या संकल्पनेमध्येच याचं गुपित दडलं असावं.
देवळात जाताना चप्पल का काढतात?
कारण चपला ठेवण्याची जागा मंदिराच्या बाहेरच केलेली असते म्हणून.
टिमकी आणि ढोल यात फरक काय?
-आपलं कर्तृत्व सुरु होतं तेंव्हा आपली आर्थिक कुवतही कमी असते. तेंव्हा तिची जाणीव स्वतःच इतरांना कमी खर्चात करून देताना वाजवली जाते ती, टिमकी. आणि तरीही त्याचा उपयोग होत नाही, असं लक्षात आल्यावर, जरा खिशात पैसे येऊ लागले की, जास्त पैसे खर्च करून, माणसं कामाला लावून जास्तीत जास्त लोकांना ऐकू येईल यासाठी जो वाजवला जातो त्याला ढोल म्हणतात.
अशोक परब, ठाणे
सुविधासंपन्न असणे आणि सुखी असणे यात फरक काय?
विवेक जगताप, भांडुप
-टॉयलेट अतिशय आलिशान आहे, पण तरीही पोट साफ होत नाही, यामध्ये जेवढा फरक आहे तेवढाच.
मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं?
-या गाण्याच्या पुढच्या ओळी आठवत नसतील तर स्वतःच्या काहीही ओळी लिहा. भले लोकांना ते विडंबन काव्य वाटलं तरी ते काव्य रचून तुम्हाला जो मनातून आनंद होईल ते म्हणजेच सुख.
मन बाजिंदे किंवा उडू उडू झालं तर काय करायचं?
संजय क्षीरसागर, पिंपळे गुरव
-नेटवर्क, वायफाय बंद करून टाकायचं.