राजे रावण यांना प्राचीन भारत ते लंका दोन्ही देश जोडणारा जागतिक दर्जाचा मोठा पूल बांधायचा होता. पण ते तंत्रज्ञान लंकेत नव्हते. असा मोठा पूल अत्यंत कमी कालावधीत बिनव्याजी पैसे खर्च न करता फुकटात बांधून मिळावा यासाठी त्यांनी गुप्त योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी स्वत: जातीने भाग घेऊन रामाच्या पत्नीला सीतेला किडनॅप करून लंकेत आणून ठेवले. त्यांच्या प्लॅननुसार सारे घडत गेले. रामाने स्वखर्चाने वानरसेनेच्या मदतीने लंकेपर्यन्त रामसेतु बांधण्याचे काम धडाक्यात सुरू केले.
—-
दशाननला दहा तोंडे होती. दहा मस्तकांचा भार पेलण्यासाठी त्यांच्याकडे ५६ इंची सीना होता. दहा तोंडे असल्याने तो सर्वांशी भरपूर मन की बात करत असे. पण सारी मस्तके एकमेकांना चिकटलेली असल्याने आणि त्यांचे कान निकामी झालेले असल्याने तो कुणाचेच ऐकत नसे. कुणीही फोटोग्राफरने कोणत्याही दिशेने त्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला, तरी त्याचे कॅमेर्याकडे बरोबर लक्ष असायचे. दहा तोंडे असल्यामुळे त्याची सेल्फी काढण्याची हौस नेहमीच पुरी होत असे. दशानन महाराज नेहमीच वेगवेगळ्या प्रसंगी जनतेला सेल्फी काढण्याचे आवाहन करत असत. त्यांना दहा मस्तकांवर वीस डोळे असल्याने शत्रूराष्ट्रांवर ५६ इंची सीना ताणून एकाच वेळी वीस वीस ‘लाल आँखे’ करून बघण्याच्या निव्वळ वल्गना करता येत असत. त्यामुळे शेजारपाजारची शत्रुराष्ट्रे भीतीने थरथर कापत असत.
दशानन महाराज कैलासवासी शंकर महादेवचे नस्सीम भक्त होते. त्यांच्यावर रचलेली कवने त्यांना मुखोद्गत होती. ते प्रकांडपंडित, उच्चशिक्षित होते. त्यांचे उच्च शिक्षण कुठल्या प्राचीन विद्यापीठात झाले, त्यांना कुठकुठल्या शैक्षणिक पदव्या मिळाल्या होत्या त्याचा प्राचीन ग्रंथात पुराणात शोध घेणे चालू आहे.
दशानन महाराजांना म्हणजेच राजा रावणला बहुरूप्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारांनी दाढीमिशा वाढवून वेशभूषा करून सर्वसामान्य जनतेत मिसळून त्यांना आश्चर्यचकित करण्याचा आवडता छंद होता. रावणाने तारुण्यातली उमेदीच्या काळातली बहुमोल वर्षे हिमालयात जाऊन दाढीमिशा आणि डोक्यावर जटा वाढवून तपश्चर्या करून भिक्षुकी मागून काढलेली होती. एकदा दाढीमिशा वाढवून भिक्षुकी वेशभूषा करून पंचवटीत पर्णकुटीसमोर उभा राहून त्याने श्रीरामाची पत्नी सीतेकडे भिक्षेची याचना केली होती.
रावण शिवभक्त असल्याने त्याला आपल्या राज्यात म्हणजे श्रीलंकेत जगातल्या सर्वात उंच शिवलिंगाची स्थापना करायची होती. त्यासाठी कैलास पर्वताच्या पलीकडील राष्ट्राकडून मोठे शिवलिंग बनवून घेतले होते. एवढे प्रचंड शिवलिंग श्रीलंकेत वाहून आणताना त्यांना लघुशंकेसाठी थांबावे लागले. त्याचवेळी शत्रुपक्षातील बालगणेशाने तेथे एंट्री घेतली. शिवलिंग सांभाळण्याची तयारी दर्शवली. पण स्वच्छता मोहीम चालू असल्याने त्यांना रस्त्याच्या कडेला लघुशंका करता येणे शक्य नव्हते. आणि दहा तोंडे घेऊन सार्वजनिक स्वच्छतागृहात प्रवेश करता येत नव्हता. त्यामुळे आडोसा शोधण्यात बराच वेळ गेला. तेवढ्या वेळेत बालगणेशाने शिवलिंग रस्त्याच्या कडेला खाली उतरवून ठेवले. पण शिवलिंग वनटाइम इंस्टॉल कंडिशन असल्याने ते पुन्हा उचलून दुसरीकडे इंस्टॉल करणे शक्य नव्हते. त्यामुळे भव्य शिवलिंग श्रीलंकेत उभारण्याचे स्वप्न त्यांचे हयातीत पूर्ण झाले नाही.
श्रीलंकेला लागून प्राचीन भारताची सीमा होती. त्यावेळी यातला बराचसा परिसर वादग्रस्त होता. त्यावर दोन्ही राष्ट्रांनी हक्क सांगितला होता. याच परिसरात साधू ऋषिमुनि भारतातील राजेमहाराजे यांचे युवराज, राजकुमार यांना सशस्त्र सेनेचे प्रशिक्षण देत असत. त्यांचा श्रीलंकेतील जनतेला मोठा धोका होण्याची शक्यता असल्याने रावण तेथे सैन्य पाठवून सर्जिकल स्ट्राईक करून साधू ऋषिमुनी यांचे मठ आश्रम, प्रशिक्षण केंद्रे, होम हवन यज्ञ सारे काही उध्वस्त करून देत असे.
राजा रावणला निरनिराळ्या देशात पुराना रिश्ता जोडण्याची प्रचंड आवड होती. त्यामुळे राजे रावण वेगवेगळ्या देशातल्या राजकन्यांच्या मांडलेल्या स्वयंवरात भाग घेत असत. त्यात बहुतेक वेळा ते तोंडघशी पडत असत.
रावणाने विश्व खजिनदार बँकर्स कुबेर यांना पदच्युत करून मांडलिक बनवून ठेवले होते. कुबेराकडची सर्व संपत्ती लंकेच्या खजिन्यात जमा झाल्याने लंकेत पिवळाधमक सोन्याचा धूर निघत असे. राजा रावणाविरुद्ध कुबेर तोंडातून ब्र देखील उच्चारू शकत नसे. कुबेराकडचे पुष्पक विमान हिसकावून घेऊन स्वत:च्या तैनातीस ठेवले होते. हिंडकेसरी रावणाला पुष्पक विमानातून वेगवेगळ्या राष्ट्रात बिन बुलाये मेहमान होऊन विनाकारण भरपूर फिरता येत असे. विमानप्रवासात रावण आराम करत नसे. सोबत सरकारी कामकाजाच्या आणि खजिन्याच्या हिशोबाच्या वह्या-भूर्जपत्रे सोबत घेऊन जात असे. रावणाला दहा तोंडाच्या वीस डोळ्यांनी एकाच वेळी दहा दहा फायलींतली कागदपत्रे वाचून त्यावर झटपट निर्णय घेता येत असे. अशा त्याने निर्णय घेऊन स्वाक्षरी करून सरकारी मुद्रा उमटवलेल्या कागदपत्रातून दिव्य प्रकाश बाहेर पडून विमान झळाळून निघत असे. असे तेज:पुंज दिव्य विमान आकाशातून पाहून अखिल विश्वातील अभागी जनता अचंबित होऊन प्रार्थना करत असत की, ‘सार्यात विश्वाचा तारणहार विश्वविधाता केवळ एकच दिव्य पुरुष आहे, तो म्हणजे दशानन, अशा तेज:पुंज राजाचे राज्य आकाश, पृथ्वी आणि पाताळ अशा तिन्ही लोकी नांदू दे’. पुष्पक विमान प्रवासात ध्वनिवेगापेक्षाही जास्त गतीने सरकारी फायलींचा निपटारा करून गतिमान प्रशासनाचा वर्ल्ड रेकॉर्ड करत असत.
राजे रावण यांना प्राचीन भारत ते लंका दोन्ही देश जोडणारा जागतिक दर्जाचा मोठा पूल बांधायचा होता. पण ते तंत्रज्ञान लंकेत नव्हते. असा मोठा पूल अत्यंत कमी कालावधीत बिनव्याजी पैसे खर्च न करता फुकटात बांधून मिळावा यासाठी त्यांनी गुप्त योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी स्वत: जातीने भाग घेऊन रामाच्या पत्नीला सीतेला किडनॅप करून लंकेत आणून ठेवले. त्यांच्या प्लॅननुसार सारे घडत गेले. रामाने स्वखर्चाने वानरसेनेच्या मदतीने लंकेपर्यन्त रामसेतु बांधण्याचे काम धडाक्यात सुरू केले.
याचदरम्यान रामाने या भव्य प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी आपला मीडिया वृत्तप्रतिनिधी हनुमानाला पाठवला. पण राजे रावणाला पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जाणे आवडत नसे. मार्मिक प्रश्न उपस्थित करणार्या वृत्तपत्रकारांशी शत्रुत्व असल्याने त्याने हनुमानाला पकडून बंदी केले. त्याच्या शेपटाला आग लावण्याचे आदेश दिले. हनुमानाची दीर्घ प्रचंड शेपटाला गुंडाळण्यासाठी लंकेत पुरेसे चिंध्या-वस्त्र कापड नव्हते. त्यामुळे लंकेतील जनतेजवळच्या मोठ्या रकमेच्या नोटा बळजबरीने जमा करून हनुमानाच्या शेपटाला गुंडाळल्या. शेपटाला आग लागल्यानंतर हनुमानाने तेथून उडी मारून पळ काढला. लंकेत हिंडत सैरावैरा उड्या मारत सर्वत्र आगी लावत जाळपोळ करून दिली. जिथे सोन्याचा धूर निघत होता, त्या लंकेत पुढचे कित्येक महिने कोळशाचा निळा काळा जर्द धूर निघत होता. त्या धुरात लंकेतील जनता श्वास कोंडून गुदमरून तरफडत होती. पण राजा रावण राम आणि वानरसेनेकडून फुकटात पूल बांधून मिळतोय म्हणून खुशीत होता.
रावण मंत्रिमंडळात मोटाभाई कुंभकर्णासारखे मंत्री होते. ते शहा-सहा महिने दिवसरात्र झोपा काढत असत. एकदा उठल्यावर सहा महिने फक्त भुकेने व्याकूळ होऊन भरपूर खात असत. अशा पार्टटाईम अर्धशिक्षित मंत्र्यामुळे निकराच्या लढाईत रावणावर युद्धात पराजय झाला. मुलांसह स्वत:वर मृत्यू ओढावून रावणराज्य लयास गेले. रावणराज्य पुन्हा येऊ नये म्हणून जनता दरवर्षी त्याच्या पुण्यतिथीला दसर्याला रावण, कुंभकर्ण, मेघनाथ यांच्या प्रतिकृती जाळून दिवस साजरा करत असतात.
– जयंत जोपळे
(लेखक समाजमाध्यमांवर खुसखुशीत लेखनासाठी प्रसिद्ध आहेत)