शिवसेनेचे ‘नैसर्गिक जोडीदार’ आपणच आहोत आणि आपल्याविना शिवसेनेला पर्यायच काय, असा दंभ काहीजणांना गेल्या काही वर्षांत झाला होता. त्या दंभाला टाचणी लागून आता दीड वर्ष उलटत आलं. या तथाकथित नैसर्गिक जोडीदारांनी शिवसेनेचा वापर करून आपला विस्तार करून घेतला आणि नंतर स्वबळाच्या टिमक्या वाजवायला लागले. त्यांना शिवसेनेने त्यांची जागा दाखवून दिली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वच पक्षांवर आणि सर्व नेत्यांवर कुंचल्याच्या माध्यमातून सणसणीत फटकारे ओढले, जणू असूडच चालवले. पण त्यांनी व्यक्तिगत पातळीवर शत्रुत्व बाळगले नाही आणि मुंबईच्या, महाराष्ट्राच्या हितासाठी जेव्हा अशा विरोधकांशी मैत्री करण्याची वेळ आली, तेव्हाही ते मागे हटले नाहीत… त्याचंच दर्शन घडवणारं हे त्यांच्याच कुंचल्यातून उतरलेलं १९८२ सालातल्या दसरा मेळाव्याचं रणशिंग चित्र! हा मेळावा समाजवादी काँग्रेस आणि लोकदल यांच्याबरोबरचा मैत्री मेळावा होता… आज राज्याच्या विकासाला कटिबद्ध असणारी महाविकास आघाडीही शिवसेनेच्या याच व्यापक हिताच्या भूमिकेतून आणि परंपरेतूनच झाली आहे, हे आता ‘स्वघोषित नैसर्गिक मित्रां’ना कळून जायला हरकत नाही.