केवळ मराठीच नव्हे तर सर्वच हिंदुस्थानी नाटकांचा पाया हा संस्कृत नाटके आहेत. गाण्याच्या आणि नृत्याच्या आधारावर उभं करुन त्याला नाट्यरुप दिले जात होते. काव्य, गाणं, नृत्य, वाद्य, नाट्य ही नाटकाची प्राणतत्वे होती. भरतमुनींच्या काळापासून ते सोळाव्या सतराव्या शतकापर्यंत यक्षगान नाटकांपर्यंत नृत्ये रंगली. संस्कृत भाषा बहरली. तिला आश्रय मिळाला. पण काळाच्या ओघात जाती-व्यवस्थेच्या अडचणींमुळे ही भाषा आणि त्याचा आविष्कार हा प्रामुख्याने काही समाजापुरता मर्यादित राहिला. मराठी रंगभूमीचे उगमस्थान ही संस्कृत भाषा आणि नाटके आहेत, हे काळाच्या वेगवान बदलात विसरून चालणार नाही, याची आठवण ही मुंबईतल्या प्रसिद्ध रुईया महाविद्यालयातील संस्कृत विभागाने ‘गंधर्वसख्यम’ या नाटिकेतून करून दिली आहे. ती रंगभूमीच्या वाटचालीत संस्कृत व संगीत यावर नवा प्रकाश टाकणारी ठरते; एक संस्कृत-मराठी भाषेतील म्हणजे ‘संस्मरा’ असलेला हा विलक्षण सांगीतिक अनुराग झालाय.
आजच्या संगणकयुगात कालबाह्य वाटणारी संस्कृत भाषा का, कशाला, कुणासाठी, असा प्रश्न पडणे, हे स्वाभाविक आहे. पण आजची तरुणाई काही एक संबंध नसताना किंवा अर्थही कळत नसताना स्पॅनिश, कोरियन गाणी ही सर्रास गाताना दिसतेच की. आपल्याकडे परकीय भाषेचा अभ्यास केला जातो, हे सत्य मान्य करावेच लागेल. मग आपली संस्कृती असलेली संस्कृत भाषा नव्या रंगरूपात प्रकट झाली तर नवं जनरेशन निश्चितच अधिक आकर्षित होईल, हा प्रामाणिक हेतू या संस्कृत नाट्यनिर्मितीमागे ठळकपणे दिसून येतोय. दुसरी बाब म्हणजे सुसंस्कृत-शृंगारप्रधान गाणी व संवाद हे नव्या चालीत किंवा शैलीत बांधले, तर त्याला तरुणाई अक्षरशः डोक्यावर घेते. ते शब्द चाल-ताल त्यांना आपलासा वाटतो. ही जादू या भाषेत आहे.
असो. तर नाटकाच्या कथानकाकडे वळूया.
ही तशी गंधर्वलोकाची कथा. जी मृत्यूलोकापर्यंत म्हणजे आपल्या आजच्या जगापर्यंत पोहोचते. गंधर्वलोकाचे स्वामी श्री गंधर्व आणि त्यांचा जिवलग मित्र काव्य गंधर्व. तो गंधर्वसभेत राजकवी होता. त्याची प्रेयसी अर्थात पत्नी कांता. दोघांचे अगदी जिवापाड प्रेम. त्याचं एक उदाहरण म्हणजे भोजनाला बसल्यानंतर पहिला घास प्रेयसीला भरविल्याखेरीज श्री गंधर्व भोजन करीत नसे. अशा या दोघा प्रेमवीराची एका शापचक्रामुळे ताटातूट होते. प्रेयसी गायब होते. प्रेमवीर विरहात जातो. शोधाशोध करतो. वेडापिसा होतो.
प्रेयसी कांता ही आता मृत्यूलोकात आलेली. तिचा जन्म झालेला. वयात आलेली. मागल्या जन्मीची स्मृती विस्मृतीत गेलेली. शापचक्राचा पुरता प्रभाव पडलेला. काव्यगंधर्व मूळ रूपात पृथ्वीवर पोहोचतो. मुंबापुरीत येतो आणि चक्क रुईया कॉलेजच्या दिमाखदार ‘ट्रॅडिशनल डे’च्या सोहळ्यात हजेरी लावतो. गंधर्वाचा गेटअप व संस्कृतभाषा मुखात, यामुळे तो सार्यांचेच आकर्षण ठरतो. दरम्यान, वीस वर्षांचा काळ उलटलेला. या कॉलेज घोळक्यातही त्याच्या सखीचा शोध सुरू आहेच. तो स्पर्धक बनतो. तिथे त्याला कॉलेजचे मित्र भेटतात. मैत्री करतात. एक ‘हार्टब्रेक’ झालेला दोस्त म्हणून त्याच्यावर शिक्काही बसतो. गतस्मृतींना उजाळा मिळतो. नव्या रंगरूपातली त्याची सखी कांता हिची भेट होते. ती पूर्वजन्मीची ओळख पुरती विसरलेली. पवित्र प्रेम आणि संस्कृतचं नवं रुप, यासाठीच ती शापवाणी होती, असा उलगडा होतो.
नव्या पिढीच्या तरुणांना ही प्रेमकथा नवी दृष्टी आणि प्रेरणा देईल, असा आशावाद प्रगट करून हा प्रेमरुपी खेळ कळसापर्यंत पोहोचतो. आजच्या पिढीसमोर प्रेमाच्या ज्या विचित्र संकल्पना निर्माण झाल्या आहेत, त्यांना नेमके उत्तर देण्याचा प्रयत्नही यात आहे. केवळ शारीरिक आकर्षण म्हणजे प्रेम नव्हे, तर त्याही पलीकडे एक भावनिक ओलावा, एक जबाबदारी, एक सुसंवाद… यालाही महत्व आहे. हे यातून मांडलं गेलंय.
ही तशी लवस्टोरीच. जिथे प्रेम आहे तिथे विरह हा असतोच, या कविराज कालिदासांच्या रचनेतल्या वनलाईनवर सारं कथानक फुलविण्यात आलंय. यात संस्कृत संवाद आहेतच, पण सोबत दोन निवेदक मराठीत भाष्य करत कथाही मांडतात. त्यावर आपल्या प्रतिक्रियाही नोंदवितात. हे याच्या शैलीचं वेगळेपण. अमेय जोशी आणि डॉ. श्रीहरी गोकर्णकर या दोघांनी अभिवाचन व संवाद हा सहजसुंदर केलाय. प्रांजल अक्कलकोटकर यांनी कथा व संगीत या दोन्ही जबाबदार्या कल्पकतेने सांभाळल्या आहे. दोन युगांत ही कथा संवाद व संगीतातून नेमकेपणानं आली आहे.
काव्यगंधर्वच्या भूमिकेत सौमिल कारखानीस यांची निवड शोभून दिसते. त्याची देहबोली भूमिकेला न्याय देणारी आहे. गंधाली घैसास (सखीश्री), ओमकार जोशी (राजा श्रीगंधर्व), ओम फडणीस (नवा गंधर्व), रेवती देशमुख (नवगंधर्वाची कांता), रेणुका घैसास (सुरभी) यांच्यासह सार्या कलाकारांनी चांगली जाण दाखविली आहे. संस्कृत, मराठी, हिंदी या भाषांवर प्रभुत्व दिसते. स्पष्ट शब्दोच्चार आणि संस्कृत भाषेतला गोडवा हा बहारदारच. कलाकारांचे टीमवर्क मस्त जुळलं आहे.
कलाकारांसोबतच नृत्ये आणि त्यातील रचना कथानकाला एका उंचीवर घेऊन जाण्यास मदतच करणार आहे. ओम फडणीस, सानिका पेठे, रेणुका घैसास, अपूर्वा नरे यांनी श्ाास्त्रीय नृत्ये चांगली पेश केलीत. काळाचे पुरते भान त्यात दिसून येते. ऋषिकेश देसाई आणि शौनक पिंपुटकर यांनी पार्श्वसंगीत तालासुरात सजविले आहेत. त्यात नवं आणि जुनं यांचं चांगलं मिश्रण दिसलं. दोघा वृक्षांची मांडणी, लेव्हल, बैठका हे सारं प्रांजल अक्कलकोटकर यांनी नेपथ्यरचनेतून उभा केलंय. हालचालींना कुठेही अडचण होणार नाही याचे भान नेपथ्यात आहे. नृत्ये व प्रसंग त्यातून मोकळेपणानं आकाराला येतात.
वाद्यवृंदाचे ‘लाइव्ह म्युझिक’ हे देखील या नाट्याचे आकर्षण बनले आहे, जे कायम नाटकाला साथसोबत करते. अखिलेश काकडे आणि ऋषिकेश देसाई यांची गिटार, सई जोशी कीबोर्ड, मिलिंद फडके, सौमिल फडके यांचा तबला आणि योगेश सुमंत याची संतूर यांची भट्टी चांगली जमली आहे. मागील बाजूला वाद्यवृंद कायम ठेवून पुढल्या जागेत प्रसंग साकार होतात. टायमिंगचे नेमके भान सार्यांना असल्याचेही जाणवते.
संस्कृत नाटकांची मराठीत अनेक भाषांतरे झालीत. त्यालाही एक परंपरा आहे. अनुवाद, रुपांतराचा त्यामागे इतिहास जसा आहे. मराठी भाषेतील नाटकांना आणि एकूण जडणघडणीत संस्कृत नाटकांचे योगदान महत्वाचे ठरते. ‘प्रबोध चंद्रोदय’ हे संस्कृत भाषेतलं पहिलं नाटक. ज्याचा अनुवाद मराठीत झाला. एका रूपकात्मक नाट्य म्हणूनही त्याची ओळख आहे. याही नाटकात व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांमध्ये असणारे एक बांधेसूद वळण एकत्रितपणे बघावयास मिळते. रंगभाषा बदलण्याचा प्रयत्न नव्या दमाच्या संस्कृत अभ्यासकांनी यात केलाय. यशापयशाची किंवा बुकिंगची पर्वा त्यांना नाही. गुरुशिष्याच्या परंपरेचेही दर्शन यातून होते.
प्राचीन काळापासूनच संस्कृतला देवभाषेचा दर्जा मिळाला होता. मुंबई विद्यापीठाने संस्कृत विषयासाठी जो स्वतंत्र विभाग स्थापन केला, त्याला यंदा ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. संस्कृत भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी तसेच त्याचा अभ्यास व संशोधनासाठी खास प्रयत्न सुरू आहेत. संस्कृत भाषा ही जगाची ज्ञानभाषा म्हणून ओळखली जाते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही संस्कृत भाषेला महत्व देण्यात आलंय. नव्या पिढीला संस्कृत भाषेचे किमान मूलभूत ज्ञान प्राप्त व्हावे, यासाठी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, शासकीय स्तरावरही ‘प्रयोग’ सुरु आहेतच. त्या पार्श्वभूमीवर रुईया महाविद्यालयाने संस्कृत विभागातर्फे या नाटिकेची निर्मिती केलीय. त्याला शैक्षणिक पार्श्वभूमी असली तरी मनोरंजनाचीही जोड आहे; हे नोंद घेण्याजोगे.
अशा निर्मितीची दखल अ. भा. मराठी नाट्य परिषद, राज्याचा सांस्कृतिक विभाग यांनी घेणे ही काळाची गरज आहे. संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेपुरता विचार न करता संस्कृत विभागाचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा हा प्रकल्प अधिक डोळसपणे बघितल्यास या प्रयत्नांना गती मिळेल. अशा नाटकातून संस्कृत नाटकांना नवे रसिक निश्चितच मिळू शकतील. या नाटकाचे अधिकाधिक प्रयोग व्हावेत ही आशा. प्रदर्शनापुरती अशी नाटके देखावा न ठरता रसिकांनीही साथ द्यावी, हीच अपेक्षा.
गंधर्वसख्यम
मूळ संहिता – डॉ. श्रीहरी गोकर्णकर
कथा, संगीत – प्रांजल अक्कलकोटकर
दिग्दर्शन – डॉ. गोकर्णकर / अक्कलकोटकर
पार्श्वसंगीत – ऋषिकेश देसाई / शौनक पिंपुटकर
नेपथ्य – प्रांजल अक्कलकोटकर
प्रकाशयोजना – सोहम दायमा
छायाचित्रे – संजय पेठे
निर्मिती – संस्कृतश्री (रुईया महाविद्यालय)