विराजचं वय वाढतं आहे. घरचे सतत त्याला लग्न कर, लग्न कर म्हणत आहेत. तो एवढ्यात नको असं म्हणतो आहे. खरं तर त्याचं एका मुलीशी प्रेमही जुळलं आहे. ती त्याला आवडतेही. पण एकूणच लग्न करावं की नको हे त्याला कळत नाहीय. त्याला लग्न करून सर्वांसारखा संसार करायचा आहे. पत्नीसोबत सहजीवनाचा आनंद घ्यायचा आहे. पण अनेक मित्रांचा, परिचितांचा डिवोर्स झाल्याचं त्याने पाहिलं, ऐकलं आहे. विराज विचार करतो, आपलं भावी पत्नीशी पटेल काय? की भांडणं होतील? डिवोर्सची वेळ आली तर आपल्याला किती मन:स्ताप सहन करायला लागेल? मित्रांना असा मनस्ताप सहन करावा लागला आहे. एकटा आहेस, सुखी आहेस असं मित्र आपल्याला म्हणतात ते थट्टेने म्हणत असतील तरी आपण अविवाहित असतो, तोवर घरचे सांभाळून घेतात. लग्न केल्यावर मात्र हात वर करतात. तुझं तू बघ म्हणतात, हेही विराजने पाहिलं आहे.एकूण, भावी पत्नीशी संसार सुरळीत होईल की नाही, याची भीती वाटत असल्याने विराज लग्नाचा निर्णय घेऊ शकत नाही. पण या भीतीतून तो अविवाहित राहण्याचाही निर्णय घेऊ शकत नाही. त्याला लग्न तर करायचं आहे. या परिस्थितीत विराजने काय करावे?
विराजने अनावश्यक घाबरण्याची गरज नाही. नियोजित जोडीदारासोबत आपलं पटू शकतं की नाही याचा अंदाज येण्यासाठी त्याने तिच्यासह तज्ज्ञाकडून विवाहपूर्व समुपदेशन (प्री मेरिटल कौन्सिलिंग) घ्यायला हवं. पत्रिका जुळते का हे पाहण्यापेक्षा मनं, मतं जुळत आहेत की नाही याचा अंदाज घेता येईल, ज्यातून लग्नाचा निर्णय घेणे सोपे जाईल. परफेक्ट जोडीदार अशी काही गोष्ट नसते. एकमेकांशी जमवून, जुळवून घेत सहजीवन जगायचं असतं. योग्य तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून समुपदेशन घेऊन लग्नाबाबत निर्णय घेता येईल.
विराजप्रमाणेच, लग्न केल्यानंतर ज्यांचे संबंध बिघडत जातात, जे एकमेकांवर दोषारोप करत राहतात, त्या जोडप्यांनीही समुपदेशन घ्यायला हवं. दोघांमध्ये फार मोठे प्रश्न नसतील तर समुपदेशनाने त्यांचा परस्परसंवाद सुधारू शकतो, नातं सुधारू शकतं. पण संबंध सुधारण्याची शक्यताच नसेल तर ते समुपदेशनाने समंजसपणे, शांतपणे वेगळं होण्याचा निर्णय घेऊ शकतात. उगीच मानसिक त्रास सहन करत एकत्र राहण्यापेक्षा वेगळे होण्याचा निर्णय योग्य ठरतो. एकमेकांबद्दल कमालीचा राग, चीड, संताप असेल तर त्यातून काही अघटित घडू शकतं.
माणसाला जीवनात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात. हे निर्णय तरुणांना, मध्यमवयीनांना घ्यावे लागतात, तसे ज्येष्ठांनाही घ्यावे लागतात. उदा. दाते काका काकू. मुलगा लग्न करतोय हे कळल्यावर ते मुलाला म्हणाले, तुम्ही दोघं वेगळे रहा. तुम्हाला तुमची स्पेस मिळू दे, आम्हाला आमची स्पेस मिळू दे. एकत्र राहून मतभेद होणे, त्यातून खटके उडणे, भांडणे होणे यापेक्षा वेगळं राहू. शेजारच्या देशमुख काका-काकूंना मात्र वाटलं की मुलगा आणि सून यांच्यासोबतच राहावं. त्या दोघांशी जमवून घेऊ. आता शरीरं थकली आहेत. आजारपणं असतात. त्यांच्या आधाराची, मदतीची आपल्याला गरज आहे. आपलीही त्यांना मदत होईल असं पाहू. त्यांनी विचार केला की मुलगा आणि सून आपल्यासोबत राहत आहेत तर आपण का म्हणा की तुम्ही वेगळे राहा? योग्य वाटला तो निर्णय दाते आणि देशमुख काका काकूंनी घेतला.
रश्मी ही २७ वर्षांची तरुणी आहे. रश्मीने आजवर अनेक नोकर्या बदलल्या आहेत. अधिक पगाराची नोकरी मिळाली की ती नव्या ठिकाणी जॉईन होते. रश्मीची मैत्रीण चित्रा देखील रश्मी इतकीच शिकलेली आणि हुशार आहे. पण ती गेली अनेक वर्षे एकाच कंपनीत नोकरी करते आहे. आपण इथे रुळलो आहोत. नव्या ठिकाणी टिकू शकलो नाही तर, असा ती विचार करते. अनेक ऑफर येऊनही चित्रा सध्याची नोकरी सोडून नव्या ठिकाणी जात नाही. ती आहे तिथेच नोकरी करत राहते. रश्मीचा पगार आणि अनुभव वाढत गेला, पण चित्रा ‘आहे ते बरं चाललंय’ म्हणत आहे तिथंच आहे.
मंडळी, निर्णय घेणे याचं महत्व मोठं आहे. आपण निर्णयच नाही घ्यायचा, असं म्हटलं तर जगणं कठीण होईल. आपल्याला पावलोपावली छोटे मोठे निर्णय घ्यावेच लागतात. छोटे निर्णय आपण घेतो. पण मोठे निर्णय घेणं टाळतो. आहे ते तसंच चालू देतो. त्यात आपल्याला सुरक्षितता वाटते. नवं पाऊल उचलण्यात धोका वाटतो. आपण निर्णय घेऊन काही पावले उचलत नाही. पण धोका न पत्करून आपण एकप्रकारे धोकाच पत्करतच असतो.
काही निर्णय घ्यावे लागणार हे माहीत असून आपण ते निर्णय लांबणीवर टाकतो. चालढकल करत राहतो. आपण निर्णय घेत नाही याची मनाला टोचणी मात्र लागत राहते.
आपण निर्णय घेण्याचं टाळतो कारण परिस्थिती चिघळेल असं आपल्याला वाटतं. पण आपण निर्णय घेतला नाही म्हणून परिस्थिती तशीच राहते असं नाही. ती बदलू शकते. चिघळू शकते.
मंडळी, निर्णय तर घ्यावेच लागतात. आपण आज जे काही बर्या वाईट अवस्थेत आहोत ते आपण काल घेतलेल्या निर्णयामुळेच आहोत.
आपण सगळ्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ हा खेळ पाहिला आहे. या खेळातसुद्धा तुम्ही काय निर्णय घेता याचं खूप महत्त्व असतं. तुम्ही जो निर्णय घेता त्यावर तुम्ही काही कमवता किंवा गमवता. या खेळात जशा आपल्याला मदत करणार्या काही हेल्पलाइन असतात तशा जीवनातही असतात. आपण त्या वापरायला हव्या. प्रत्येक वेळी हेल्पलाइन उपलब्ध असेलच असं नाही (कौन बनेगा करोडपती खेळात प्रश्न बदलून मिळतो, जीवनात तसं होत नाही. चुकीचे ऑप्शन आपल्यालाच ओळखावे लागतात). जीवनात काही महत्वाचे निर्णय घ्यायची वेळ येते, तेव्हा सल्ला देणारं कुणी असो किंवा नसो, सारासार विचार करणं, बुद्धीचा वापर करून योग्य निर्णय घेणं आवश्यक असतं. आपण इतरांचा सल्ला घेऊ शकतो, पण निर्णय आपल्यालाच घ्यायचा असतो. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. निर्णय न घेण्यापेक्षा एकवेळ चुकीचा निर्णय घेतलेला तरी चालेल. आपल्याला योग्य वाटतो तो निर्णय आपण घेतो, तेव्हा त्याच्या बर्या-वाईट परिणामांना आपण सामोरे गेले पाहिजे. चुकीचा निर्णयसुद्धा आपल्याला खूप काही शिकवून जातो.
मंडळी, आजारपण, डॉक्टर, हॉस्पिटल या गोष्टी काही कुणाला चुकल्या नाहीत. स्वत:च्या किंवा आपल्या माणसांच्या आजारपणात तातडीने हालचाली कराव्या लागतात. कधीकधी ताबडतोब ऑपरेशन करावे लागणार, असं डॉक्टरांकडून सांगितलं जातं. हॉस्पिटल, डॉक्टर रूग्णाच्या जीवितासाठी योग्य घाई करीत आहेत असंही असू शकतं किंवा त्यांच्या स्वत:च्या भल्यासाठी ते घाई करतायत, असंही असू शकतं. वैद्यकीय क्षेत्राची विश्वासार्हता लयाला गेली आहे, असा आपल्याला अनुभव आहेच. पण आपण त्यातले जाणकार नसतो. सेकंड ओपिनियन घ्यावं, असं आपल्याला वाटू शकतं. काही लोक सेकंड ओपिनियन (दुसर्या डॉक्टरचा सल्ला) घेतात. पण त्यात उशीर झाला तर? त्यात वेळ दवडायचा नाही म्हणून माणसं डॉक्टर म्हणतील तो निर्णय घेतात. त्या क्षणी माणसाला तेच योग्य वाटतं. ही घाई आवश्यक की अनावश्यक हे तपासून घेणं शक्य असेल तर ते तपासून निर्णय घेता आला तर खूप बरं. परंतु ही तशी कठीण गोष्ट असते.
जीवनात कोणताही निर्णय घेताना त्या निर्णयाचा सांगोपांग विचार करावा लागतो. ज्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा आहे, त्याचे अनेक पदर लक्षात घ्यावे लागते. कधी कधी एखादा मुद्दा, एखादा पदर उशिरा लक्षात येतो. तो लक्षात आल्यावर निर्णय बदलण्याची वेळ येऊ शकते. निर्णय बदलायची वेळ टाळून गेली असेल, तर इलाज नाही. पण निर्णय बदलणे शक्य असेल तर तो बदलायला हरकत नाही.
मंडळी, ‘घोंगडं भिजत ठेवणे’ हा वाक्प्रचार ऐकला असेलच. एखादं काम पूर्ण न करता ते मोठा काळ तसंच ठेवणं, याला ‘भिजत घोंगडं ठेवणं’ असं म्हणतात. राजकारणात, राजकीय फायद्यासाठी अशी वेगवेगळ्या प्रश्नांची, समस्यांची घोंगडी भिजत ठेवली जातात.
जिथे गरज आहे तिथे निर्णय घ्यायला आवश्यक तो वेळ घेणं ठीक आहे. कारण घोंगडं भिजवण्याचंही एक महत्त्व आहेच. घोंगडं भिजवत ठेवलं नाही, तर त्याची जी खळ असते ती निघून जात नाही. ते घोंगडं वापरण्यायोग्य, मऊ मुलायम होण्यासाठी भिजवत ठेवून चोळणं मळणं आवश्यक असतं. परंतु घोंगडं भिजवण्याला काही मर्यादाही असायला हवी. जर आपण महिनोन्महिने, वर्षानुवर्ष घोंगडं भिजवत ठेवलं तर ते कुजेल, त्याला वास येईल. म्हणून योग्यवेळी योग्य निर्णय घ्यायला हवेत.