ज्या भारतात जन्मावरून जात आणि जातीवरून उच्चनीचता ठरवणारी व्यवस्था होती (अजूनही लोकांच्या मनात आहेच), तो भारत सर्वांना समान मानणार्या लोकशाहीची जननी आहे, असं आपले पंतप्रधान कशाच्या आधारावर सांगत असतील?
– विनय जोशी, कोथरूड
टेलिप्रॉम्प्टरच्या आधारावर बोलतात… आणि हे (विरोधक जगजाहीर बोलतात… बिचारे पंतप्रधान स्वतःच्या मनाचं बोलतात ते पण टेलिप्रॉम्प्टरच्या आधारावर बोलतात का? त्याबद्दल तुमच्यासारखे अंधविरोधक बोलत नाहीत.)
लोक साप पाहायला प्राणीसंग्रहालयात का जातात?… त्यांना आसपास ते दिसत नाहीत का?
– मुकुंद शिरगावकर, चिपळूण
कारण आजूबाजूचे दुतोंडी गरळ ओकणारे, रंग बदलणारे, दोन पाय आणि मणका असूनही सरपटणारे, शब्द फिरवणारे आस्तिन के साप आसपास बघून बघून कंटाळा आलेला असतो. त्यामुळे एकच तोंडी, विषारी असूनही गरळ न ओकणारे, पाय नसल्याने सरपटणारे, कात टाकूनही रंग न बदलणारे साप बघायला लोक प्राणी संग्रहालयात जातात.
मराठी माणूस प्रेमात ‘पडत’ का असतो?
– यशवंत देशपांडे, दादर
मराठी माणसाला खोटं बोलायला आवडत नाही आणि प्रेमात आपण तोंडावर पडणार याचा त्याला आत्मविश्वास असतो. त्यामुळे प्रेमात तोंडावर पडल्यावर त्याला अर्धसत्य तरी सांगता येतं की पडलो म्हणून तोंड फुटलं.
इंग्लीशमध्ये माणूस गॉड फियरिंग असतो, मराठीत पापभिरू असतो; आपल्याला त्रास होईल किंवा कोणीतरी देव आपल्याला शिक्षा करील या भीतीने जी होते ती भक्ती कशी?
– अर्चना पत्की, आंजर्ले
भक्ती केली तरच पद मिळतं… फायली बंद होतात… रात्री शांत झोप लागते… अगदीच काही नाही तरी ४० पैसे तरी मिळतात आणि हे सगळं देव प्रसन्न झाला तरच देतो आणि देवाला प्रसन्न करण्यासाठी जे केले जात तीच भक्ती असते आणि अशी भक्ती केली नाही तर पद जातं, नोकरी जाते, धाड पडते, बंद फायली पुन्हा उघडतात. अशा शिक्षांच्या भीतीने फक्त भक्ती केली जात नाही तर देवही बदलले जातात.
पावसाळा म्हणजे तुमच्यासाठी कांदा भजी विथ चाय गर्रम की नुसतीच रम?
– राजा गावडे, नाशिक
कसली चाय गरम आणि रम? आमच्या नशिबी फक्त बायकोचा दम. छत्री कशाला हवी? विसरून याल.. आणि छत्री नाही नेली तर आल्यावर, भिजून का आलात? घरात येऊ नका… चिखल करू नका. कशाला पावसात जायचं? गप्प घरी बसायचं ना, म्हणून आरडाओरडा… घरी बसावं तर, घरी बसून काय अंडी उबवताय? बाकीचे पुरुष बघा कसे भर पावसात घराबाहेर पडतात (त्या बाकीच्या पुरुषांसारखं तुमच्या नशिबी पण हेच असणार राजाभाऊ… उत्तराबरोबर तुम्हाला हे पण लिहून देतो).
तुमची बायको तुमच्यावर अजूनही प्रेम करते का?
– अंजली कोपरकर, श्रीरामपूर
तुमचा विचार काय आहे? (तुम्ही घटस्फोट स्पेशालिस्ट वकील आहात का? तुम्ही पुनर्विवाह मंडळ चालवता का?) बायको माझ्यावर प्रेम करते की नाही, यापेक्षा मी तिच्यावर प्रेम करतो हे महत्त्वाचं आहे… बघितलं… याला म्हणतात उत्तर. वाचल्यावर विनोद म्हणून वाचक खुश, आणि नवरा आपल्यावर अजून प्रेम करतो म्हणून बायको पण खुश.)
तुम्ही नाटकांचा पक्ष सोडून सिनेमा आणि टीव्हीच्या पक्षात चालला आहात, अशी ब्रेकिंग न्यूज नुकतीच सूत्रांनी सांगितली आहे… ती खरी आहे का?
– नौशाद अहमद, बीड
असं जरी झालं तरी, हे नाटक माझंच म्हणून मी त्याच्यावर दावा सांगणार नाही (कारण नाटक ज्याचं असतं त्या निर्मात्याची इतकी देणी असतात की ती मी देऊ शकत नाही. शिवाय माझ्याबरोबर नाटक सोडून कुत्रंही येणार नाही (आणि नाटक असंच सोडायला ते काही माझ्या काकांचं नाही).
लग्न झाल्यावर सौभाग्याची निशाणी म्हणून बायकाच मंगळसूत्र का घालतात? पुरुष का नाही एखादं सौभाग्यचिन्ह घालत?
– मैथिली डावरे, सूरत
तुम्ही तुमच्या नवर्याला मंगळसूत्र घालून फिरायाला लावा. या प्रश्नाला वाचा फोडा. खूप जीवनमरणाचा प्रश्न आहे हा.
मैथिलीजी, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है (क्रांती स्वतःपासून करायची असते)!!!