टोक्या यास, तुझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या… आज तू घरात नसताना व तुझी डुप्लिकेट चावी माझ्याकडे असल्यामुळे मी माननीय आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या सनसनाटी मुलाखतीची टेप तुझ्या घरी ठेवून जात आहे. ती ऐकून मला अभिप्राय कळवावा.
– नमस्कार डॉक्टरसाहेब.
– मला डॉक्टर बिक्टर म्हणू नका. तो डॉक्टर या पदवीचा अपमान आहे. आजकाल कुणालाही डॉक्टर ही पदवी देतात. हा त्या पदवीचा अपमान आहे. हे पुन्हा सांगतो. कुणाचे ज्ञान काय, त्याचा वकुब काय हे जाणून न घेता सरसकट कुणालाही ही पदवी बहाल करतात. मला जर डबल डॉक्टर ही पदवी मिळाली तर मी ती साभार परत करीन.
– अहो, पण तुम्ही एवढे का चवताळता? आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांच्या या कार्यातील निपुणतेबद्दल ही पदवी डी. वाय. पाटील इस्पितळाचे डॉक्टर माननीय, आदरणीय डी. वाय. पाटील यांनी आपल्या इस्पितळातर्फे दिली आहे. तो तर मुख्यमंत्र्यांच्या आदराचा क्षण आहे.
– कसला आदर! मी एवढे चिंबोरी संशोधनाचे कार्य त्या धरणाच्या चिखलात बुडून केले, पण माझी दखल कुणालाही घ्यावीशी वाटली नाही. आणि यांनी कसलेही कार्य न करता यांना मात्र आरामात डॉक्टर ही पदवी मिळाली.
– साहेब.. तुमचे संशोधनाचे कार्य कुणाला माहीत नाही! आज त्यामुळे जगभर तुम्हाला नावाजतात. परवा काम्पुचियात झालेल्या इंटरनॅशनल आरोग्य समितीच्या बैठकीतही तुमचे नाव एक चांगला
डॉक्टर म्हणून घेण्यात आले. तुमच्या चिंबोरी संशोधनाइतकेच तुमचे नव्या कोरोनाविषयीचे संशोधन जगभर नावाजेल, याची आपल्याला नसली तरी त्यांना खात्री आहे. मागे तुम्ही कोंबड्यांवर संशोधन करत होतात याचीही त्यांना माहिती आहे.
– म्हणजे मी काय पशुवैद्यकीय डॉक्टर आहे की काय? पण तुम्हाला सांगतो, खराखुरा हाडाचा डॉक्टरला पशू किंवा माणसात भेद करता येत नाही. तसं तर कोंबडा-कोंबडी, कबुतर, खेकडा, चिंबोरी, कालवं यांवरील माझं संशोधनही प्रसिद्ध आहे. माणसापेक्षा हे पशू परवडतात. त्याशिवाय मी घोडा, बैल यांचाही अभ्यास केला आहे.
– खरंच, तुम्हाला देशाचा आरोग्यमंत्री म्हणून राज्यसभेत स्थान दिलं पाहिजे. तुम्ही जर केंद्रीय आरोग्यमंत्री झाला असता तर हा दोन नंबर कोरोना आल्यापावली चीनला परत गेला असता. पण केंद्र सरकार त्या दोन नंबर कोरोनाच्या रुग्णांचे आकडे देते आणि ठोस उपाययोजना काहीच करत नाही.
– आमचे हातपाय बांधलेले आहेत सर. आम्हाला सारे काही कळते पण वळत नाही. फक्त कोरोना रुग्णांसाठी मोठमोठी उपचार केंद्रे तयार करून फक्त पेशंटची वाट पाहणारे आम्ही कोणत्याही ठोस उपाययोजना करण्याचे फक्त नाटक करतो. खरोखर तो दोन नंबर कोरोना आला आहे का याची कुणालाच खात्री नाही. कोरोना पेशंट म्हणून साधा सर्दी खोकला, ताप आल्यास कुणालाही कोरोनाची औषधे देतात. याद्या प्रसिद्ध होतात. आणि चार-पाच दिवसांनी घरी पाठवून देतात.
– मग केंद्र सरकारने काय करायला हवे?
– तुम्हाला जर फक्त कोरोनाची भीती दाखवून इतर गोष्टी म्हणजे सिलिंडर, पेट्रोल, डिझेल यांची दरवाढ, जीवनावश्यक वस्तूंनी गाठलेला महागाईचा कहर यांच्यापासून जनतेचे लक्ष विचलित करायचे असेल तर ही कोरोनाची हूल योग्य आहे असे म्हणावे लागेल.
– डॉक्टर, तुम्हीसुद्धा!
– आम्ही हुकमाचे बंदे.
– मग त्यांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं?
– सर्वप्रथम मागच्या कोरोनाच्या वेळी परदेशातून येणारी विमान वाहतूक बंद केली पाहिजे. किंवा येणार्या प्रवाशांची विमानतळावरच कोरोना चाचणी करून त्यांना सरकारी आरोग्य केंद्रात दाखल केले पाहिजे.
– हो ना. अगदी करेक्ट. मागे तो अमेरिकेचा ट्रम्प आला आणि मोदी कोरोनाची लाट आली असतानाही त्याच्या सरबराईत महिना नव्हे दोन महिने मग्न होते. त्यावेळी ट्रम्पला वेळीच हाकलून जर नंतर ज्या उपाययोजना केल्या त्या त्या काळात केल्या असत्या तर कोरोना देशभर पसरू शकला नसता. पण हे महाशय ट्रम्पबरोबर गोंडा घोळवित बसले आणि त्या दरम्यान कोरोनाने भारतभर शिरकाव केला, हे कितीही नाकारलेत तरी सत्य आहे.
– पण मी काय करू शकतो?
– तुम्ही केंद्र सरकारचा कोरोनाविषयीचा ढिसाळ कारभार बघून स्वाभिमानाने राजीनामा द्या. सगळेजण तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील.
– आणि मोदी-शहांनी डोळे वटारले तर कुठल्या कुठे नेऊन टाकतील.
– इतकी तुम्हाला तुमच्या परमपूज्य दैवतांविषयी खात्री असेल तर मग प्रश्नच संपला. तुमच्या स्थानिक परमदेवतेला डॉक्टर शिंदेंना सांगून बघा. ते काहीतरी मार्ग काढतील.
– त्यांना कोण विचारतंय! आंबा खाऊन झाला की त्याच्या सालीसकट आणि कोयीसकट कुठल्याकुठे फेकून देतील ते कळणारही नाही.
– पण या नव्या दोन नंबर तथाकथित कोरोनाविषयी तुमचं मत काय?
– तो जर असलाच तर त्याला ढेकणासारखा चिरडायला मला मुळीच वेळ लागणार नाही. सध्या मी जातीने सर्व कोरोना केंद्रांना भेट देत आहे. पण रुग्णांच्या चेहर्यावर त्यावेळच्या सारखे गांभीर्य दिसत नाही. त्यांनाही माहीत आहे की हा नवा कोरोना आपल्या शरीरात वेगळ्या रूपाने शिरलेला नाही.
– बरोबर आहे. सध्या मोदी-शहा निवडणुका कशा जिंकता येतील. त्या डावपेचात मग्न आहेत. त्यांच्या दृष्टीने जनतेच्या आरोग्यापेक्षा सत्तेची खुर्ची मोठी आहे. त्यावेळी उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी कोरोनाची परिस्थिती किती उत्तमपणे हाताळली होती. सर्व भारताने आणि परदेशांनीही त्यांच्या नियोजनपूर्वक आखणीचे मनापासून कौतुक केले होते. त्यावेळी तुम्ही त्यांच्याविरुद्ध कटकारस्थाने करणारी बंडखोर मंडळी त्यांचे मंत्रिमंडळ कसे पाडता येईल याचा विचार करत होता.
– हे मात्र खरे आहे. या पापाला क्षमा नाही. देवच आम्हाला प्रायश्चित्त देईल.