सणासुदीच्या काळात (दिवाळी, नाताळ, नवीन वर्ष) पूर्वीच्या काळी मिठाई भेट देण्याची प्रथा होती. परंतु गेल्या काही वर्षात सणासुदीला माव्यामध्ये भेसळीच्या बातम्या कानावर पडू लागल्यामुळे मिठाईचं महत्त्व कमी झालंय. आजचा ग्राहक हायजिन आणि आरोग्याला जास्त महत्त्व देतो, त्यामुळेही सुट्या मिठाईला पर्याय म्हणून आकर्षक पॅकिंगच्या चॉकलेटला मान्यता मिळाली आहे.
– – –
‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला…’ हे बालगीत आपण सगळ्यांनी ऐकलं आहे… वय विसरायला लावणार्या या गाण्यातील चॉकलेटने सगळ्यांनाच भुरळ घातली आहे. चॉकलेट म्हटल्याबरोबर गोडमिट्ट रसदार चव जिभेवर रेंगाळू लागते. चॉकलेटच्या व्यापाराची गोष्ट ही केवळ खाद्यपदार्थाची गोष्ट नसून, मानवी भावभावनांशी संबंधित असणारा अनोखा प्रवास आहे. हा प्रवास रसदार मिठ्ठास असण्यासोबतच त्यात इतिहास, संस्कृती आणि व्यापाराचं अद्वितीय मिश्रण आहे.
चॉकलेटचा उगम २००० वर्षांपूर्वी मेसोअमेरिकेत झाला. माया आणि अझ्टेक संस्कृतींमध्ये ‘थिओब्रोमा कॅको’ या झाडाच्या बियांपासून तयार केलेला पेय ‘देवांचं अन्न’ म्हणून ओळखलं जात असे. या पेयाला ‘चोकाहुआट्ल’ म्हणत, ज्याचा अर्थ होता ‘कडवट पाणी’. हे कडवट पेय गरम पाण्यात कॅको बीन्स आणि मसाल्यांचा वापर करून तयार केलं जाई. त्याकाळी धार्मिक विधींमध्ये आणि खास करून राजघराण्यातील लोकांमध्ये याला विशेष महत्त्व असे.
चॉकलेटला मेसोअमेरिकेतून युरोपमध्ये आणण्याचं श्रेय जातं क्रिस्टोफर कोलंबस आणि हर्नान कॉर्तेस या स्पॅनिश शोधकांना. जग पालथं घालणार्या या समुद्रवीरांनी १५व्या शतकाच्या उत्तरार्धात कॅको बियांना युरोपमध्ये आणलं. सुरुवातीला चॉकलेट फक्त राजघराण्यातील लोकांसाठी असायचं. पण नंतर १६व्या शतकात साखर आणि दुधाचा वापर करून गोडसर चॉकलेट तयार होऊ लागलं. यामुळे चॉकलेट सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय होऊ लागलं. १९व्या शतकांमध्ये औद्योगिक क्रांतीने केवळ उत्पादनाच्या तंत्रज्ञानातच बदल घडवला नाही तर खाद्यपदार्थांच्या उत्पादनातही नवी क्रांती घडवून आणली. चॉकलेटचा प्रवासदेखील याच क्रांतीमुळे आमूलाग्र बदलला. कॅकोच्या बीजांपासून तयार होणार्या कडवट पेयाचा प्रवास सामान्यजनांसाठी सोयीच्या गोडसर चॉकलेट बारपर्यंत पोहोचविण्यामध्ये औद्योगिक क्रांतीचं मोठं योगदान आहे.
चॉकलेट उद्योगाच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे १८२८ साली कॅस्पर व्हॅन हौटेन यांनी लावलेला कॅको प्रेसचा शोध. कॅको प्रेसमुळे कॅको बियांमधील नको असलेली नैसर्गिक चरबी, म्हणजेच कोको बटर, काढून टाकता येऊ लागलं. यामुळे उरलेल्या कोको पावडरचा चॉकलेट तयार करण्यासाठी सहज वापर करता येत होता. यापूर्वी चॉकलेट प्रामुख्याने द्रवस्वरूपातच वापरलं जायचं, पण या शोधामुळे चॉकलेटच्या घनस्वरूपाचा पाया रचला गेला.
जे. एस. फ्राय अँड सन्स या इंग्लंडमधील कंपनीने १८४७ साली जगातील पहिल्या सॉलिड चॉकलेट बारचं उत्पादन केलं. कोको पावडर, कोको बटर, आणि साखर यांचं मिश्रण करून त्यांनी पहिल्यांदा घनस्वरूपातील चॉकलेट तयार केलं. हा मोठा क्रांतिकारक बदल होता, कारण यामुळे चॉकलेट हे केवळ पेय किंवा औषध नव्हे तर खाण्यायोग्य गोड पदार्थ म्हणून लोकप्रिय होऊ लागलं.
औद्योगिक क्रांतीच्या काळात चॉकलेटला गोडसर आणि क्रीमयुक्त बनवण्याच्या प्रयत्नांना यश मिळालं. १८७५ साली डॅनियल पीटर आणि हेन्री नेस्ले यांनी एकत्र येऊन मिल्क चॉकलेटचा शोध लावला. नेस्ले यांनी विकसित केलेल्या कंडेन्स्ड मिल्कचा वापर करून डॅनियल पीटर यांनी गोडसर आणि मऊसर चॉकलेट तयार केलं. या शोधामुळे चॉकलेटचा आस्वाद एका नव्या उंचीवर गेला, त्यानंतर ते मध्यमवर्गीय लोकांमध्येही लोकप्रिय होऊ लागलं.
औद्योगिक क्रांतीपूर्वी चॉकलेटचं उत्पादन हाताने केलं जात असे, ते खर्चिक आणि निवडक लोकांपुरतेच मर्यादित होतं. मात्र, औद्योगिक यंत्रसामग्रीचा वापर सुरू झाल्यानंतर उत्पादनप्रक्रियेत प्रचंड सुधारणा झाली. रॉलिंग मशीन (चॉकलेट मऊ आणि गुळगुळीत बनवण्यासाठी), कोन्शिंग प्रक्रिया (१८७९) – रॉडॉल्फ लिंट यांनी कोन्शिंग मशीनचा शोध लावला. यामुळे चॉकलेटचा पोत अधिक स्मूथ झाला आणि चवही अधिक परिपूर्ण झाली. चॉकलेटच्या मोठ्या प्रमाणात वितरणासाठी आधुनिक
पॅकेजिंग तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं. या सर्व प्रयत्नांमुळे मोठ्या प्रमाणावर कॅको बियांचं रूपांतर चॉकलेटमध्ये करणं शक्य झालं. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक मोठे ब्रँड्स उदयाला आले, सर्वसामान्यांसाठी स्वस्त आणि सुलभ होऊन चॉकलेट घराघरात पोहोचलं.
भारतीयांच्या जिभेला आणि मनाला कॅडबरी म्हणजेच चॉकलेट अशी खात्री पटवून देणार्या कॅडबरी कंपनीची गोष्ट सुरू झाली १८२४साली, इंग्लंडमध्ये. त्या काळात दारू पिण्याला विरोध करण्यासाठी टेम्परन्स नावाची एक चळवळ उभी राहिली. त्या चळवळीचे (क्वेकर पंथाचे) सदस्य असलेल्या जॉन कॅडबरी यांना वाटलं की नुसतं दारू पिऊ नका असं लोकांना सांगण्यापेक्षा ऐवजी काय प्यायला हवं हे देखील सांगायला हवं. याच विचारातून त्यांनी आपल्या बर्मिंगहॅम येथील किराणा दुकानात छोटासा कॅफे उघडून कोको बिया खलबत्त्यात कुटून हॉट चॉकलेट विकायला सुरुवात केली. त्यांच्या या उपक्रमाला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. चॉकलेटच्या वाढत्या मागणीमुळे जॉन कॅडबरीने व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एक गोदाम विकत घेऊन मोठ्या प्रमाणावर कोको आणि हॉट चॉकलेट यांचे उत्पादन सुरू केले. १८४२ पर्यंत ते १६ प्रकारच्या हॉट चॉकलेटची आणि ११ प्रकारच्या कोकोची विक्री करत होते. परंतु किरणा व्यवसाय आणि चॉकलेट व्यवसाय यातील फरक जॉन कॅडबरी यांना ओळखता आला नाही. कंपनी जवळजवळ दिवाळखोरीत निघाली होती तेव्हा रिचर्ड आणि जॉर्ज कॅडबरी या जॉन कॅडबरी यांच्या मुलांनी कंपनीची सूत्रे हाती घेतली. या सुपुत्रांनी उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर भर दिला. हॉट चॉकलेट बनवत असताना कोको बियांमधील बटर वाया जात होते. जे चवीला चांगलं लागत होतं, या बटरचा बेटर उपयोग कसा करून घ्यायचा याचं उत्तर त्यांना १८६६ मध्ये चॉकलेटच्या स्वरूपात सापडलं.
१९०५मध्ये एक अशी गोष्ट घडली ज्याने कॅडबरी कंपनीचा डंका संपूर्ण जगात वाजला. त्या काळात ब्रिटिश चॉकलेट उत्पादक चॉकलेट बनवताना दूध पावडरचा वापर करत होते. स्वित्झर्लंडमधील उत्पादकांनी मात्र आपल्या चॉकलेटमध्ये गोडसरपणा आणण्यासाठी कंडेन्स्ड मिल्क वापरायला सुरुवात केली होती, यामुळे त्यांचं चॉकलेट युरोपमध्ये लोकप्रिय झालं. जॉर्ज कॅडबरी ज्युनियर यांनी स्विस उत्पादकांच्या पावलावर पाऊल टाकत स्विस चॉकलेटच्या धर्तीवर, पण अधिक हुशारी दाखवत त्यापेक्षा जास्त दूध घालून क्रीमी आणि गोडसर चॉकलेट बनवले. मग काय इतर स्पर्धकांपेक्षा त्यांच्या चॉकलेटची चव ‘लय भारी’ झाली. एका ग्राहकाच्या मुलीने या नवीन चॉकलेटला ‘डेअरी मिल्क’ असे नाव सुचवले. अल्पावधीतच डेअरी मिल्क हा ब्रिटनमध्ये सर्वाधिक विकला जाणारा चॉकलेट बार बनला. सुरुवातीला डेअरी मिल्कही मोठ्या ब्लॉक्सच्या स्वरूपात विकली जात होती आणि दुकानदार ती सुट्ट्या भागांमध्ये कापून ग्राहकांना विकत होते. मात्र, काही काळातच या चॉकलेटला एवढी लोकप्रियता मिळाली की कॅडबरीने ते वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये विकायला सुरुवात केली.
कॅडबरीने दुसर्या महायुद्धानंतर ऑस्ट्रेलिया, भारत, कॅनडा, दक्षिण आप्रिâका आणि विविध युरोपियन देशांमध्ये फॅक्टरी सुरू केल्या. ही कंपनी १९४८मध्ये भारतात आली, तेव्हा भारतातील चॉकलेट उद्योग प्रारंभिक अवस्थेत होता. चॉकलेट हे मुख्यतः ब्रिटिशांशी संबंध आलेल्या श्रीमंत वर्गात लोकप्रिय होते, त्यामुळे स्थानिक उत्पादन मर्यादित होते.
कॅडबरीच्या आगमनानंतर भारतीय बाजारपेठेत चॉकलेटने कूर्मगतीने हातपाय पसरायला सुरुवात केली. भारतातील चॉकलेटची गाडी फास्ट धावण्याला पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या कल्पनेतून साकारलेली श्वेतक्रांतीही (ऑपरेशन फ्लड) कारणीभूत ठरली. त्या काळात सरकारचे मुख्य धोरण गायीच्या दुधाचे उत्पादन वाढवणे आणि त्याची विक्री करणे हे होते. याचा फायदा कॅडबरी कंपनीने उचलायचा ठरवलं. तोपर्यंत दुधाच्या पावडरने चॉकलेट बनवणार्या कॅडबरी कंपनीने भारतीय डेअरीच्या दुधाचा वापर आपल्या चॉकलेटमध्ये केला. त्यांनी ‘डेअरी मिल्क’ ब्रँडच्या रॅपरवर दोन ग्लास अस्सल दूध चॉकलेटवर ओतलं जातंय, असं चित्र छापलं. दुधाची विक्री वाढतेय म्हणून सरकार खुश आणि अस्सल दुधाचं चॉकलेट मिळतंय म्हणून जनता खुश.
या निर्णयाने कॅडबरीचा खप वाढला, पण एका पॉइंटनंतर विक्री पुढे गती घेईना, कारण आपल्याकडे कॅडबरीला लहान मुलांचे खाणे म्हणूनच ओळख मिळाली होती. १९९४मध्ये कॅडबरीने भारतीय तरुणांना टारगेट करायचं ठरवलं. यासाठी त्यांनी नेहमीच्या इंग्रजाळलेल्या जाहिरातींपेक्षा सर्वसामान्य जनतेला कळेल अशा देशी भाषेत जाहिरात बनवायला पीयूष पांडे यांना सांगितलं. पुढे या जाहिरातीने इतिहास घडवला. ती जाहिरात अशी होती… एक अटीतटीचा क्रिकेटचा सामना… शेवटच्या बॉलवर सिक्सर.. सामना जिंकून देणार्या तरुणाची बिनधास्त गर्लफ्रेंड सुरक्षारक्षकांना चुकवून मैदानात धाव घेते आणि त्याचे तोंड कॅडबरीने गोड करते… ‘असली स्वाद जिंदगी का’ या स्लोगनने चॉकलेट सर्व वयोगटातील लोकांसाठी आहे, हा संदेश तरुणाईत पोहोचला. यानंतर व्हॅलेंटाईन डेला ग्रीटिंगसोबत कॅडबरी देणं हे एक रिच्युअलच बनून बसलं. या जाहिरातींमधून ‘द रियल टेस्ट ऑफ इंडिया’ असा दावा करणार्या कॅडबरी ब्रँडची लोकप्रियता वाढली.
बस्तान बसल्यावर कॅडबरीने सर्व आर्थिक गटासाठी प्रॉडक्ट बनवायला सुरुवात केली. लहान मुलांसाठी दोन रुपयाचं शॉट्स, कनिष्ठ मध्यमवर्गीयांसाठी पाच रुपयाचं फाइव्ह स्टार. मध्यमवर्गीयांसाठी दहा आणि वीस रुपयाचं डेअरी मिल्क, उच्चभ्रू वर्गासाठी साठ ते तीनशे रुपये किंमतीचे सिल्क बाजारात आणून कॅडबरी म्हणजेच चॉकलेट असे भारतीय ग्राहकांच्या मनात बिंबवण्यात यश मिळवले.
ऑक्टोबर २००३मध्ये, महाराष्ट्रातील काही भागात कॅडबरीमध्ये किडे आढळून आले. कॅडबरीने सुरुवातीला सगळा दोष किरकोळ दुकानदारांच्या माथ्यावर मारला, यामुळे कॅडबरी आपली जबाबदारी झटकत असल्याची भावना ग्राहकांमध्ये निर्माण होऊन त्यांच्या मालाच्या विक्रीत ३० टक्के घट झाली. नंतर मात्र कॅडबरीने उत्पादनांच्या पॅकेजिंगमध्ये सुधारणा केल्या आणि ग्राहकांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी महानायक अमिताभ बच्चन यांना ब्रँड अॅम्बेसेडर बनविण्यात आलं. वर्तमानपत्रे, रेडिओ तसेच टीव्हीवर जाहिरातींचा भडीमार करत कॅडबरीने गेलेली पत पुन्हा मिळवली.
भारतीय चॉकलेट बाजारपेठेत तब्बल ६५ टक्के बाजारपेठ कॅडबरीने व्यापलेली होती. यापेक्षा जास्त मार्केटचा हिस्सा मिळवण्यासाठी कॅडबरीसमोर दोन पर्याय होते, प्रतिस्पर्ध्यांशी अटीतटीची स्पर्धा करणे अथवा भारतातील चॉकलेट व्यवसाय अजून वाढवणे. कॅडबरीने दुसरा मार्ग स्वीकारला. भारतीयांना गोड खाण्याची प्रचंड आवड आहे, हे लक्षात घेऊन कॅडबरीने मिठाईकडे आपला मोर्चा वळवला. मिठाईचं एकूण मार्केट चॉकलेटपेक्षा २० पटींनी जास्त आहे. पण भारतीय ग्राहकांना मिठाईला पर्याय म्हणून कॅडबरीकडे वळवणं इतकं सोपं नव्हतं. पुन्हा महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या मदतीला आले. २००४ साली पप्पू पास हो गया… खुश है जमाना आज पहिली तारीख है, अशा जाहिरातींनी कॅडबरी हा केवळ वाढदिवस किंवा व्हॅलेंटाईन डेसारख्या दिवशी खाण्याचा पदार्थ नसून पाडवा असो की दिवाळी… कोणत्याही आनंदाच्या क्षणी ‘कुछ मीठा हो जाये’ असं म्हणायचं आणि कॅडबरी खायची असं लोकांच्या मनात ठसवलं गेलं. भारतात चॉकलेट म्हणजे कॅडबरी असा सार्वत्रिक समज करून देण्यात कॅडबरीच्या मार्केटिंग खेळीचा मोठा वाटा आहे.
२००० च्या दशकात कॅडबरी कंपनीची भारतातील चॉकलेट बाजारपेठेवर ७० टक्के मक्तेदारी होती. ती मोडून काढण्यासाठी कोणत्याही कंपनीला त्यांच्या चॉकलेटमध्ये कॅडबरी जे देत नाही ते देणं गरजेचं होतं. या वेगळेपणाचा शोध घेऊन काही कंपन्यांनी कॅडबरीच्या साम्राज्याला टक्कर द्यायला सुरुवात केली. त्यापैकी एक म्हणजे भारतीयांची सकाळ नेसकॅफेने ताजीतवानी करणारी नेस्ले कंपनी. नेस्लेने वेफर्स आणि चॉकलेट यांच्या संयोगातून बनविलेले किटकॅट आणि मंच बाजारात आणून चॉकलेट व्यवसायात क्रंचीनेस आणला. नेस्ले ही स्वित्झर्लंडस्थित बहुराष्ट्रीय कंपनी, त्यांनी १९१२मध्ये भारतात पदार्पण केल्यानंतर मॅगी, मिल्कमेड, नेसकॉफी, अशा उत्पादनांमध्ये मोठे नाव कमावले. कॅडबरीच्या कुछ मीठा हो जाये या टॅगलाईनला टक्कर देताना नेस्लेने ‘हॅव अ ब्रेक, हॅव अ किटकॅट’ ही टॅगलाइन सुरू केली. किटकॅट वॉफल-चॉकलेटच्या क्रंची स्वादाने नेस्लेला चॉकलेट व्यवसायात ब्रेक थ्रू मिळवून दिला. शालेय विद्यार्थी आणि टीनएजर्सच्या पॉकेटमनीला परवडणारा पाच रुपयांचा मंच बार बाजारात आणून चॉकलेट व्यवसायात खळबळ माजवली. तसेच कॅडबरीच्या डेअरी मिल्कला टक्कर देण्यासाठी नेस्ले क्लासिक आणि मिल्की बार हे चॉकलेट्स बाजारात आणले. आज भारताच्या चॉकलेट बाजारातील सुमारे १५-२० टक्के वाटा नेस्लेच्या उत्पादनांचा आहे.
दुग्धजन्य पदार्थात भारतात नंबर वन असलेल्या अमूलने चॉकलेट उद्योगात १९७३ साली प्रवेश केला. चॉकलेट व्यवसायात वेगळेपण जपताना अमूलने भारतीय चवीला अनुरूप डार्क चॉकलेट, फ्रूट अँड नट, शुगर फ्री चॉकलेट बाजारात आणले. इतर कंपन्यांच्या तुलनेत चॉकलेट्स किंचित स्वस्त आणि गुणवत्तेमध्ये उच्च हा त्यांचा यूएसपी होता. अर्थात दुधाच्या व्यवसायातील विश्वासार्हतेचा फायदा त्यांना झाला. ‘अमूल डार्क चॉकलेट – हर हेल्थ का पंच’ ही टॅगलाइन हेल्थ कॉन्शियस ग्राहकांसाठी प्रभावी ठरली. भारतात डार्क चॉकलेट सेगमेंटमध्ये अमूलचे मोठे वर्चस्व आहे. अमूलच्या चॉकलेटची वार्षिक उलाढाल १५०० कोटींची आहे.
हॅपी मील विकताना बर्गरवर खेळणे फ्री दिल्यामुळे मॅकडोनल्ड लहान मुलांमध्ये प्रसिद्ध झाले. हीच मार्केटिंग आयडिया वापरून ‘फेरेरो’ या इटालियन कंपनीने लहान मुलांसाठी अंड्यासारखा आकार असलेले ‘किंडर जॉय’ चॉकलेट बाजारात आणले. या प्लास्टिकच्या अंड्याचे दोन भाग केल्यावर एका भागात चविष्ट मिल्क चॉकलेट आणि कोको क्रीममध्ये दोन कुरकुरीत वाफल बॉल्स असतात अणि दुसर्या भागात एक छोटे खेळणे असते. कंपनीने जाहिरातींमध्ये ‘मुलांसाठी मजेदार सरप्राइझ’ हा संदेश ठळकपणे मांडला. भारतात त्यांच्या जाहिरातींमध्ये प्राणी, कार, कोडी, कार्टून कॅरेक्टर्स, सुपरहिरोज आणि अॅनिमेटेड पात्रांचा समावेश केला जातो, अशा टार्गेटेड जाहिरातींमुळे लहान मुलांमध्ये ते अधिक प्रसिद्ध झाले आहे. फेरेरो रोशर हा चॉकलेट ब्रँड उच्चभ्रू ग्राहकांसाठी लक्झरी ब्रँड म्हणून ओळखला जातो. अनोखी चव आणि लक्झरीयस पॅकिंग हे फेरेरो रोशर प्रीमियम चॉकलेट कंपनीचे वैशिष्ट्य आहे. याच्या प्रत्येक बॉलमध्ये हेजलनट्सने भरलेला कुरकुरीत वेफर असतो, त्यावर मखमली मिल्क चॉकलेटचा थर दिला जातो आणि बाहेरच्या लेयरवर हेजलनट्स आणि चॉकलेटचे मिश्रण असतं. रॉयल चवीचे हे चॉकलेट त्याच्या गोल्डन फॉइल पॅकिंगमुळे एक उत्कृष्ट आणि आकर्षक भेटवस्तू मानले जाते. या चॉकलेटची आणखी एक खासियत म्हणजे हे चॉकलेट बनवण्याचं गुपित ते प्राणपणाने सांभाळतात. कंपनी त्यांच्या उत्पादन प्रकल्पांमध्ये प्रगत आणि स्वयंचलित तंत्रज्ञानाचा वापर करते, जेणेकरून त्यांची सिक्रेट रेसिपी कुणालाच कळणार नाही. फेरेरो कंपनीची ‘नुटेला’, ‘फेरेरो रोशेर’, ‘टिक टॅक’ या ब्रँडसारखी अनेक उत्पादने बाजारात प्रसिद्ध आहेत. ई-कॉमर्स आणि शॉपिंग मॉल्समध्ये हा ब्रँड जास्त विक्री करतो. फेरेरो इंडियाने चॉकलेट मार्केटमध्ये १०-१२ टक्के वाटा मिळवला आहे. २०२३मध्ये भारतातील विक्री ३५०० कोटी रुपये होती.
प्रत्येक कंपनी ग्राहकांना आणखीन काय हवं आहे हा गॅप शोधून बिझनेस रणनीती ठरवत असते. इथे दोन प्रबळ कंपन्यांमध्ये स्पर्धा पाहायला मिळते. परंतु काही दिवसांपूर्वी साजरा झालेल्या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी एकाच कंपनीचे दोन जाहिरातफलक एकमेकांसमोर लागलेले पाहायला मिळाले. डेरी मिल्क सिल्क– प्रेमाचा गोडवा दाखवण्यासाठी. आणि ज्यांचं ब्रेकप झालं आहे किंवा ज्यांना प्रेम मिळालं नाही अशा गटासाठी ‘प्रेम असो वा नसो, चॉकलेट हवंच!’ फाइव्ह स्टार चॉकलेट. याला ड्युअल ब्रँडिंग स्ट्रॅटेजी असं म्हटलं जातं. बाजारात कोणत्याही मानसिकतेच्या ग्राहकाला अपील करण्यासाठी दोन विरुद्ध दिशांनी खेळण्याची युक्ती! आज अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि भारतीय होममेड चॉकलेट्स या व्यवसायात उत्तम कामगिरी करत असताना अशा अनोख्या मार्वेâटिंगच्या जोरावर कॅडबरी आजही ५८ टक्के भारतीय बाजारपेठ आपल्या ताब्यात ठेवून आहे.
चॉकलेट व्यवसायात मल्टिनॅशनल कंपन्या प्रचंड व्यवसाय करत असताना, कुछ मीठा हो जाये यात साखर जास्त आहे हे हेल्थ कॉन्शस ग्राहकांना कळलं आणि ते कमी मीठा असलेल्या चॉकलेटचा शोध घेऊ लागले. हा शोध त्यांना कस्टमाईज होममेड चॉकलेटकडे घेऊन गेला. होममेड चॉकलेट हा ट्रेंड तसा नवा नाही. दक्षिण भागातील उटी आणि कुर्ग भागातील होममेड चॉकलेट व्यवसायाचा पाया १९८०-९०च्या दशकात घातला गेला. या भागाचे थंड आणि दमट हवामान कोको लागवडीसाठी अनुकूल होते. १९६०-७०च्या दशकात कॅडबरी आणि नेस्ले यांनी दक्षिण भारतातील कोको उत्पादकांना मदत केली, त्यामुळे येथे कोको शेती अधिक व्यापक झाली. पर्यटकांनी या भागातील स्थानिकरित्या बनवलेल्या शुद्ध आणि चविष्ट चॉकलेट्सना मोठ्या प्रमाणात पसंती द्यायला सुरुवात केली. हळूहळू काही व्यावसायिकांनी घरगुती चॉकलेट्सना अधिक व्यापारी स्वरूप दिले, यातून किंग स्टार, मॉडर्न बेकर्स, जॉनी’ज चॉकलेट्स आणि उटी होममेड चॉकलेट्स यांसारख्या ब्रँड्सनी बाजारात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. हे चॉकलेट्स विशेषतः शुद्ध कोको बिया, हस्तनिर्मिती आणि अनोख्या फ्लेवर्समुळे प्रसिद्ध झाली.
एथर चॉकलेट्स, जॅनिस चॉकलेट्स आणि पास्कल चॉकलेट्स ही भारतातील काही आघाडीची होममेड चॉकलेट ब्रँड्स आहेत. एथर चॉकलेट्सची सुरुवात एका आयटी अभियंत्याने आपल्या स्वयंपाकघरात केली. त्यांना बाजारात मिळणार्या चॉकलेट्समधील कृत्रिम पदार्थ आणि अतिरिक्त साखरेमुळे आरोग्यावर होणारे परिणाम जाणवले, त्यामुळे त्यांनी शुद्ध कोकोपासून घरच्या घरी चॉकलेट बनवायला सुरुवात केली. त्यांची चव लोकप्रिय झाली आणि मागणी वाढत गेली. जॅनिस चॉकलेट्स ही मुंबईतील एका गृहिणीने सुरू केलेली कंपनी आहे. सुरुवातीला घरच्या मग ओळखींच्या लोकांना चॉकलेट्स देऊन पाहिले, नंतर सोशल मीडियावर विक्री सुरू केली आणि हळूहळू मोठ्या प्रमाणावर व्यवसाय फुलू लागला. पास्कल चॉकलेट्स ही गोव्याची कंपनी असून ती हँडमेड चॉकलेट्स आणि ऑरगॅनिक कोको यावर भर देते.
होममेड चॉकलेट्सकडे मोठ्या कंपन्यांनी सुरुवातीला अनऑर्गनाइज्ड मार्केटचा एक हिस्सा म्हणून दुर्लक्ष केलं, परंतु होममेड चॉकलेट्सचा खप वाढून व्यवसायावर परिणाम होऊ लागला, तशी मोठ्या ब्रँड्सनी मार्केटिंग रणनीती बदलून ऑरगॅनिक आणि हाय-एंड प्रीमियम चॉकलेट्स बाजारात आणायला सुरुवात केली. याशिवाय किरकोळ विक्रेत्यांवर दबाव टाकून या स्थानिक ब्रँड्सला शेल्फ स्पेस मिळू नये, याची काळजी घेतली. होममेड चॉकलेट्स बनविणार्या नवउद्योजकांना आपला ब्रँड लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी टेलिव्हिजन जाहिरातींचा अवाढव्य खर्च परवडणारा नव्हता. पण फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडिया साईट्समुळे ठराविक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोफत आणि माफक दरात उपलब्ध झाला. अॅमेझॉनसारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने होममेड चॉकलेट्स भारतात आणि परदेशात पोहोचवली. या संधीमुळे अनेक होममेड चॉकलेट विक्रेत्यांनी ऑनलाईन विक्री वाढवून स्वत:चा वेगळा ग्राहकवर्ग बनवला.
उत्तम दर्जाचं होममेड चॉकलेट बनवण्यासाठी उच्च-गुणवत्तेचा कच्चा माल आवश्यक असतो. चॉकलेट बनवताना लागणार्या मुख्य घटकांमध्ये कोको पावडर, कोको बटर, साखर, दुधाची पावडर, व्हॅनिला एक्सट्रॅक्ट, नट्स, लेसिथिन आणि विविध फ्लेवर्स यांचा समावेश होतो. हा सर्व कच्चा माल स्थानिक होलसेल बाजार (मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट) ई-कॉमर्स साइट्स आणि बेकरी सप्लाय स्टोअर्समध्ये सहज उपलब्ध आहे. होममेड चॉकलेट व्यवसायासाठी काही आवश्यक उपकरणे घ्यावी लागतात. यामध्ये मिश्रक, टेम्परिंग मशीन, मोल्ड्स, रेफ्रिजरेटर, पॅकेजिंग मशीन आणि डिजिटल स्केल यांचा समावेश होतो. तुम्ही घरून छोट्या प्रमाणावर व्यवसाय करत असाल, तर २०० ते ३०० चौरस फूट जागा पुरेशी आहे. मात्र, मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करायचा असेल, तर किमान ५०० ते १००० चौरस फूट जागा आवश्यक आहे. व्यवसाय सुरू करण्याआधी आपण बनवलेले चॉकलेट घरच्यांना आणि मित्रमंडळींना खायला देऊन त्यांचा अभिप्राय जाणून घ्यावा.
तुम्ही बनवलेल्या होममेड चॉकलेट्सना व्यावसायिक दर्जा प्राप्त झाला की त्यांच्या विक्रीसाठी वेगवेगळ्या संधी शोधाव्यात. हल्ली प्रदर्शनांमध्ये आणि फूड फेस्टिव्हल्समध्ये सहभागी होणे हे एक महत्त्वाचे मार्केटिंग तंत्र आहे. अशा कार्यक्रमांमध्ये लोकांना चव चाखवण्याची संधी मिळते आणि प्रत्यक्ष विक्रीदेखील होते. मोठ्या कंपन्यांचे घाऊक प्रमाणात बनवले जाणारे चॉकलेट्स प्रिझर्वेटिव्ह आणि कृत्रिम घटकांनी युक्त असतात, असं मानलं जातं.
डार्क चॉकलेटमधील अँटीऑक्सिडंट्सचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो, या माहितीचा प्रसार झाल्यामुळे प्रदर्शनाला भेट देणारे ग्राहक प्रीमियम आणि आर्टिझनल चॉकलेट्स निवडू लागले आहेत. भारतीय ग्राहक आता मोठ्या ब्रँड्सवर विसंबून न राहता अधिक आरोग्यदायी आणि चविष्ट पर्याय शोधत आहेत. होममेड चॉकलेट ब्रँड्सनी या गरजेचा फायदा घेत चॉकलेटमध्ये भारतीय चवीनुसार स्थानिक फ्लेवर्सचा समावेश करायला सुरुवात केली आहे. ज्यात आलं, वेलदोडा, हळद यांसारखे घटक घालून बनवलेली मसाला चॉकलेट, बदाम, पिस्ता, काजू घालून बनवलेली प्रीमियम ड्रायफ्रूट चॉकलेट, संत्री, आंबा, पेरू, बेरी यांसारख्या नैसर्गिक फळांच्या चवींचा समावेश असलेली फ्रूट-बेस्ड चॉकलेट, शिवाय आरोग्य-संवेदनशील ग्राहकांसाठी खास व्हेगन आणि लो-शुगर चॉकलेट, अशी विशेष चॉकलेट्स बनवून चॉकलेटच्या विश्वात स्वत:ची वेगळी जागा निर्माण केली आहे. हा तात्पुरता ट्रेंड नसून ही भारतीय चॉकलेट मार्वेâटमध्ये होत असलेली मोठी क्रांती आहे. याचाच परिपाक म्हणून या क्षेत्रात अनेक स्टार्टअप्स आणि स्थानिक ब्रँड्सही मोठा व्यवसाय करताना दिसतात. होममेड चॉकलेटचा सर्वात मोठा ग्राहक
कॉर्पोरेट कंपन्या आहेत. या कंपन्या कर्मचारी, क्लायंट आणि व्यावसायिक भागीदारांसाठी विशेष चॉकलेट हॅम्पर्स तयार करून घेतात.
विविध कॉर्पोरेट इव्हेंट्समध्ये कस्टमाइज्ड चॉकलेट गिफ्टिंग हा नवा ट्रेंड बनला आहे. सणासुदीच्या काळात (दिवाळी, नाताळ, नवीन वर्ष) पूर्वीच्या काळी मिठाई भेट देण्याची प्रथा होती. परंतु गेल्या काही वर्षात सणासुदीला माव्यामध्ये भेसळीच्या बातम्या कानावर पडू लागल्यामुळे मिठाईचं महत्त्व कमी झालंय. आजचा ग्राहक हायजिन आणि आरोग्याला जास्त महत्त्व देतो, त्यामुळेही सुट्या मिठाईला पर्याय म्हणून आकर्षक पॅकिंगच्या चॉकलेटला मान्यता मिळाली आहे.
भारतीय चॉकलेट उद्योग २०२४मध्ये सुमारे २४,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे आणि २०३३ पर्यंत तो सुमारे ४५,००० कोटी रुपये होईल, असा अंदाज आहे. गोड खायचं तर चॉकलेट हवं हे भारतीय ग्राहकांच्या मनावर बिंबवलं गेलंय. याच गोष्टीचा फायदा मोठे चॉकलेट ब्रँड्स घेताना दिसतात. मराठी माणसांनी त्यांचं चॉकलेट खाऊन गोड मानून घ्यायचं की आपलं होममेड चॉकलेट बनवून या गोडाच्या व्यवसायात आपलं चांगभलं करायचं, ते ठरवा.