पोलीस खात्यात प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी येणारे अनुभव फार वेगवेगळे असतात. काही वेळा त्यामधून खूप काही शिकायला मिळते, तर काही वेळा वरिष्ठ अधिकार्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागते. असाच एक अनुभव मला सांगोला पोलीस स्टेशनमध्ये काम करताना आला. तिथे मी इनचार्ज होतो. एके दिवशी दुपारी साडेबाराच्या सुमारास जेवणासाठी घरी निघालो होतो.
ऑफिसमधून बाहेर पडणार, तेवढ्यात घाईघाईने ठाणे अंमलदार माझ्या जीपजवळ आले आणि म्हणाले, जवळच्या एका गावात १७ वर्षांच्या एका मुलाचा विहिरीत शॉक लागून मृत्यू झाला आहे. घटनेचे गांभीर्य पाहून आऊटपोस्ट हवालदार गोडसे व स्टाफ तातडीने घटनास्थळाकडे जाण्यासाठी निघाले. मी जेवणासाठी घरी आलो होतो खरा, पण माझे मन काही जेवणात लागेना, ड्रायव्हरलाही पटकन जेवून येण्यास सांगितले. अवघ्या दहा मिनिटांत आम्ही घटनास्थळाकडे जाण्यासाठी निघालो.
घटना घडलेले ठिकाण शहरापासून १७ ते १८ किलोमीटर अंतरावर होते. त्या ठिकाणी राहणार्या महादेव पाटील (नाव बदलले आहे) यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत हा प्रकार घडला होता. मी पोहोचेपर्यंत हवालदार गोडसे यांनी दोन पंच बोलवून पंचनामा करण्यास सुरुवात केलेली होती.
उन्हाळ्याच्या दिवसांत विहिरीचे पाणी कमी होते किंवा आटते. अशावेळी विहिरीचा खडक ब्लास्ट करून किंवा फोडून ती खोल करतात, ज्यायोगे पाण्याचे नवीन स्रोत मिळतात व पाणी स्टोअरेजही वाढते. त्याप्रमाणे ही विहीर खोल करण्याचे काम येथे सुरू होते. फोडलेल्या खडकाचा भाग लोखंडाचा एक पाळणा खाली सोडून वर काढतात, त्या कामाला ‘क्वारी लावणे’ असे म्हणतात. महादेव पाटील यांच्याकडे १५ ते २० वर्षांपासून भगवान (नाव बदललेले आहे) नावाचा गडी कामाला होता. त्याला संजय (नाव बदलले आहे) नावाचा मुलगा होता, तो १७ वर्षाचा होता. हे कुटुंब विशिष्ट समाजाचे होते. बारावीचे शिक्षण तो तालुकाच्या ठिकाणी घेत होता. मालक महादेव पाटील हे वारकरी संप्रदायातले होते आणि संजयच्या शिक्षणाचा खर्च ते स्वतः करीत होते. अगदी त्याचा कपडालत्ता, फी, जेवण, खोलीभाडे इत्यादींचा संपूर्ण खर्च ते स्वतः करीत होते. संजयला उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने तो घरी आला होता. विहिरीवर क्वारीचे काम चाललेले पाहून तो वडिलांना म्हणाला, आलोच आहे तर मीही क्वारीचे काम करतो, तेवढाच रोजगार मिळून चार पैसे मिळतील. आणि त्याने त्या कामाला जाण्यास सुरुवात केली.
कामाचा तो चौथा दिवस होता. तो विहिरीत उतरला. विहिरीत तळाशी एक लाइट घेतलेला होता, त्याच्या वायरला त्याचा हात लागला. करंट लागून संजयला जोरदार शॉक बसला आणि तो दूर फेकला गेला. त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला होता. एका लाकडी खाटेला दोर बांधून माणसे विहिरीत खाली उतरवली गेली आणि त्याचे प्रेत वर काढण्यात आले. संजय मयत झालेला होता. आम्ही यायच्या आधी संजयचे वडील आणि त्यांच्या भावाने विहिरीत उतरून त्याची खात्री केलेली होती. एका स्थानिक डॉक्टरकडूनही तो मयत झाल्याची खात्री झाली. प्रेताचा इन्क्वेस्ट पंचनामा वगैरे सोपस्कार झाले. एमएसईबीच्या इलेक्ट्रिक इन्स्पेक्टरला शॉर्टसर्किट झाले किंवा कसे याबाबत तपासणी करून अहवाल मिळण्यासाठी रिपोर्ट पाठवण्यात आले. घटनास्थळाचे, विहिरीचे वरून व खाली उतरून कलर फोटो काढण्यात आले. मृतदेह पोस्टमार्टेमसाठी सरकारी हॉस्पिटलला पाठवला गेला. पोस्टमार्टेम झाले. मी डॉक्टरांशी चर्चा केली. त्यांनी शॉक लागून मृत्यू झालेला आहे, असे सांगितले आणि तसे अॅडव्हान्स सर्टिफिकेटही दिले.
रात्री मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आला. घटना अत्यंत दुःखदायक होती. मयताच्या घरच्यांचा आक्रोश मोठा होता, त्यामुळे त्या रात्री मयताचे वडील व इतरांकडे चौकशी करणे अशक्य होते. घटनास्थळाची परिस्थिती आणि इतर साक्षीदार यांच्याकडे विचारपूस करता मुलाचा मृत्यू हा शॉक लागून झालेला होता, असे माझे प्राथमिक मत झाले होते. परंतु एमएसईबीचा अहवाल प्राप्त होणे बाकी होते. तसेच मुख्य म्हणजे मुलाच्या आईवडिलांकडे चौकशी करणे बाकी होते. त्यांचा कोणावर संशय आहे का हे बघणे अत्यंत आवश्यक होते.
दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा मी व हवालदार गोडसे घटनास्थळी जाऊन मयताचे वडील भगवान यांच्याकडे विचारपूस केली. कोणावर संशय आहे का, असे विचारता त्यांनी कोणावरही संशय नसल्याचे सांगितले व शॉक लागण्याच्या घटनेला दुजोरा दिला. मालकांविषयी विचारता ते म्हणाले, मालक देवमाणूस आहेत त्यांच्या कृपेनेच पोरगा तालुक्याला शिकत होता, अडीअडचणीला मालक देवासारखे पाठीशी उभे राहतात. इतक्या दिवसांत एकदाही मालक माझ्याशी वाईट वागलेले नाहीत वगैरे हकीकत सांगितली. त्याचप्रमाणे मुलाच्याही आईनेही हकीकत सांगितली. इतर नातेवाईक इत्यादींनीही आईवडिलांप्रमाणेच हकीगत सांगितली. त्यांचे जाबजबाब घेण्यात आले. कोणताही संशयाचा प्रकार नसल्याने पुढील तपास हवालदार गोडसे यांच्याकडे देण्यात आला होता.
तिसर्या दिवशी मयताचे वडील भगवान हे एका संघटनेच्या पदाधिकार्यांना घेऊन माझ्याकडे आले. मुलाचा खून झालेला आहे, विहीर मालकाने विहिरीला पाणी लागत नाही, म्हणून मुलाचा नरबळी दिलेला आहे, तुम्ही विहीर मालक महादेव पाटील यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवा, असे त्यांचे म्हणणे होते. आत्तापर्यंत केलेला तपास मी त्या लोकांना सांगितला. तसेच भगवान यांनी माझ्यासमक्ष माझी कोणाविरुद्ध तक्रार नाही, कुठलाही संशयाचा प्रकार नाही असा जबाब दिलेला आहे, असे सांगितले. त्यावर ते लोक म्हणू लागले भगवानला मालकाने दम दिला असल्याने भीतीपोटी त्याने कोणाविरुद्ध तक्रार दिलेली नाही. खरे तर भगवानचा जबाब घेतला, तेव्हा आजूबाजूला कोणीही नाही याची काळजी मीही घेतलेली होती, जेणेकरून त्याच्यावर कोणाचा दबाव यावयास नको. त्या लोकांनाही हे सारे समजून सांगितले. मात्र, ते लोक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी मालक महादेव पाटील यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा म्हणून एक अर्ज माझ्याकडे दिला. मी गोडसेंना बोलवून घेतले यांच्याशी चर्चा केली, तेही या गोष्टीने अवाक् झाले होते.
दुसर्या दिवशी खुनाचा गुन्हा दाखल झाला की नाही याची त्या लोकांनी चौकशी केली आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी ते सोलापूरला गेले. अकस्मात मृत्यू (ए.डी.) सदराखाली झाला प्रकार नोंदवून त्याची चौकशी चालूच होती. पोलीस अधीक्षकांना मी फोनवरून झाल्या प्रकाराची संपूर्ण माहिती दिली. नरबळीचा प्रकार आहे, असे त्या लोकांनी सांगितल्यामुळे ते काळजीत पडले होते. म्हणाले, लवकरात लवकर तपास करून योग्य वाटल्यास खुनाचा गुन्हा दाखल करा. पुन्हा शिष्टमंडळ पोलीस स्टेशनला माझ्याकडे आले आणि खुनाचा गुन्हा दाखल करा, म्हणून हट्ट धरु लागले. तसेच पंचनाम्यात विहिरीत पडलेला हळदी कुंकु, गुलाल याचा उल्लेख केलेला नाही, अशी तक्रार त्यांनी केली. सुदैवाने मी आधीच फोटोग्राफरकडून विहीर तळ व परिसराचे रंगीत फोटो काढून घेतलेले होते. त्यामध्ये हळदी कुंकू, गुलाल नव्हता. ते फोटो त्यांना दाखवल्यावर ते खजील झाले. पाणी कुठे मुरते आहे हे माझ्या लक्षात आले.
दुसर्या दिवशीही मी खुनाचा गुन्हा दाखल केला नाही, कारण खरा प्रकार मला माहीत होता आणि काहीही संबध नसताना निरपराध इसमाला अटक होऊ नये, असे मला वाटत होते. खुनाच्या गुन्ह्यात साधारणपणे तीन-चार महिने तरी जामीन मिळत नाही. वरील मंडळी पुन्हा एकदा जिल्हा पोलीसप्रमुखांना भेटायला गेली व त्यांनी तक्रार केली, त्यामुळे पोलीसप्रमुख चिडले आणि मला म्हणाले, मला काही सांगू नका, तुम्ही खुनाचा गुन्हा दाखल करा, मी उद्या ११ वाजेपर्यंत वाट बघेन आणि गुन्हा दाखल केला नाही तर तुम्हाला सस्पेंड (निलंबित) करीन.
मी साहेबांना खूप समजावून सांगितले. शेवटी मला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तरी मुदत द्या, असे सांगता, ठीक आहे, पाच वाजेपर्यंत गुन्हा दाखल केला नाही, तर तुम्हाला सस्पेंड करीन असा सज्जड दम दिला आणि फोन आदळला. खुनाचा गुन्हा दाखल करून टाकावा, असं मनात येऊ लागले, परंतु सद्सद्विवेक बुद्धीने त्यावर मात केली आणि निलंबनाची भीती निघून गेली. दुसर्या दिवशी सकाळी पोलीस स्टेशनला यायला निघालो. बघतो तर काय, पोलीस स्टेशनच्या गेटसमोरील मोकळ्या जागेत धरणे धरण्यासाठी मांडव बांधण्याची तयारी चालू होती. माझ्याकडे आलेली व पोलीस प्रमुखांकडे गेलेली संबंधित मंडळी तेथे उपस्थित होती. ते लोक माझ्या चांगल्या ओळखीचे होते. पोलीस स्टेशनला काम करण्याची माझी पद्धत त्यांना माहितही होती. अनेकदा यापूर्वी ते अनेक कामांसाठी आलेले होते. ती कामे कायदेशीर असल्याने कोणत्याही दबावाला न जुमानता मी ती केलेली होती. म्हणून मी त्या लोकांना म्हटले, सगळे आत या. पाच मिनिटांत ती सगळी मंडळी माझ्यासमोरच्या खुर्च्यांमध्ये येऊन बसली. मी शांतपणे सगळ्यांकडे बघितले व त्यातील दोन तीन प्रमुख नेत्यांना म्हणालो, ‘खरंच तुमच्यापैकी कोणाला असे वाटतेय का? मी पैसे वगैरे खाऊन खुनाचा गुन्हा दाखल करीत नाहीये…’ आणि गप्प बसलो. कोणी माझ्याकडे बघेना, बोलेना.
मी त्यांना विचारले, तुमचे नक्की म्हणणे काय आहे? तरीही ते गप्पच होते आणि एकमेकांकडे बघत होते. मी त्यांना समजावून सांगितले, ‘भगवानचा मालक हा अत्यंत देवमाणूस आहे, हे मी तुम्हाला सांगावयास नको. भगवानने ते तुम्हाला सारे सांगितलेलेच असेल. अशी गड्यांवर प्रेम करणारी माणसे कमी असतात. तुम्ही अशा माणसाला निष्कारण गुंतवलं तर गरिबांना मदत करण्यास कुणी पुढे येईल का? आणि माझ्या तपासात तुम्ही म्हणता तसे निष्पन्न होत नाहीये, नक्की काय प्रकार आहे?’
यावर ते बर्याच वेळाने म्हणाले, साहेब भगवान अत्यंत गरीब माणूस आहे, त्याचा हाताशी येणारा कर्ता मुलगा गेलेला आहे, मालकाला त्याला काहीतरी मदत करायला सांगा. मी म्हणालो, तुम्ही मालकाकडे जा आणि बाहेरच्या बाहेर तशी बोलणी करा, माझ्या इथे बोलणी करणे मला बरे वाटत नाही. त्याप्रमाणे ते लोक मालकाकडे जायला निघाले. जाताना बाहेरचा मांडवही गेला. त्यांची बोलणी झाली आणि संजयच्या वडिलांनी पुन्हा एकदा माझ्याकडे कुठलीही तक्रार नसल्याचे सांगितले. हा प्रकार काय झालाय तसा जबाब पूर्वी सांगितल्याप्रमाणेच लिहून दिला.
हा प्रकार होईपर्यंत चार ते साडेचार वाजलेले होते. मी एस.पी. साहेबांना झालेली घटना कळवली. यावर ते म्हणाले, ‘अच्छा हो गया, नहीं तो पाँच बजे के बाद मैं तुमको सस्पेंड करनेवाला था, वो कुवां मालिक, तुम्हारा कोई रिश्तेदार है क्या?’
यावर मी त्यांना काय बोलणार?
माझ्या मनात चाललेले कायदा, प्रोसिजर, नीती-अनीती, पाप-पुण्य यांचे विचार त्यांना सांगून काय उपयोग होता?
– राजेंद्र भामरे
(लेखक पुण्याचे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत.)