होळीपौर्णिमा, धुळवड आणि रंगपंचमी हे खास आपले मराठी सण.
मुंबई आणि इतर शहरांमधले चाकरमानी होळीसाठी उत्साहाने गाव गाठतात. कोकणात या सणाचं माहात्म्य अधिक. तिथे ठिकठिकाणच्या ग्रामदेवता होळीनंतर पालखीतून बाहेर पडतात आणि भक्तांना त्यांच्या घरी जाऊन दर्शन देतात. घरातली एखादी वडीलधारी व्यक्ती आली असावी, अशा सन्मानाने देवाचं, देवीचं स्वागत केलं जातं. आपली सुखदु:खं त्यांना सांगितली जातात. आपल्या लेकरांच्या, माहेरवासिणींच्या छोट्या छोट्या इच्छा, अपेक्षा तू पूर्ण कर, त्यांच्यावरच्या संकटात त्यांच्या पाठिशी उभी राहा, उभा राहा, असं गार्हाणं देवाला घातलं जातं.
आज महाराष्ट्राची सगळी कुलदैवतं पालखीत स्वार होऊन मराठीजनांच्या घरी पोहोचतील, तर त्यांना काय चित्र दिसेल?
राज्यात तीन पक्षांचं (एक पक्ष आणि दोन फुटीर गट) महायुतीचं सरकार अनपेक्षितपणे सत्तेत आलेलं आहे. देशावर सत्ता गाजवणारा भारतीय जनता पक्ष पहिल्यांदाच बहुमताच्या जवळ पोहोचला आहे. मनात आणेल त्या दिवशी या पक्षाचं संपूर्ण बहुमताचं सरकार स्थापन होऊ शकतं, तरीही त्याने दोन फुटीर गट सोबत ठेवण्याची कसरत चालवली आहे. कारण त्याला सगळ्यात आधी त्यांना संपवायचं आहे.
राजकारणात युती किंवा आघाडी होते ती मित्रपक्षांची. इथे एकमेकांची काटाकाटी करण्याचे जे काही खेळ सुरू आहेत, ते पाहिल्यावर अशा मित्रांपेक्षा शत्रू परवडले, असं म्हणण्याची वेळ आली आहे. होळीच्या वेळी गंमती गंमतीत बोंब मारली जाते. अशी बोंबाबोंब विरोधकांच्या बाबतीत करण्याऐवजी किंवा विरोधकांना ती संधी देण्याऐवजी हे सत्तेतले तीन दिवटेच एकमेकांच्या विरोधात उघड आणि छुपी बोंबाबोंब करताना दिसत आहेत.
तथाकथित महाशक्तीने साम-दाम-दंड-भेद वापरून आणि सगळ्या संसदीय कार्यपद्धती खुंटीला टांगून शिवसेना फोडली, तेव्हा गरजेसाठी मुख्यमंत्री म्हणून उभे केलेले बाहुले आता ‘जनतेच्या मनातला मीच मुख्यमंत्री’ म्हणून रुसून गावी जाऊन बसते आहे. ज्या ठाण्यात पैशांचा पूर वाहवून लोकांचं पाठबळ मिळालंय, तिथेही ‘शत प्रतिशत भाजप’ हे मिशन राबवणारी महाशक्ती योग्य वेळी आपल्याला प्रगतिशील शेतकरी बनवून कायमचे गावातच स्थायिक व्हायला लावेल, याचा अंदाज मिंधेगिरी स्वीकारताना आलाच नसेल?
दुसरीकडे ‘एकच वादा’वाल्या दादांचा वांधा करण्याचा कार्यक्रम जोरात सुरू आहे. बीडमध्ये त्यांच्या नाकाखाली सुरू असलेल्या ‘आकाराज’मधली रक्ताची होळी उघडकीला आली. अवघा महाराष्ट्र हादरला, सुन्न झाला. तरी आपल्या सहकार्याचा नैतिकतेच्या भूमिकेतून राजीनामा घेण्याचीही हिंमत दादांना दाखवता आली नाही. करारी बाण्याचे कठोर नेते ही इतक्या वर्षांत निर्माण केलेली त्यांची प्रतिमा किती भुसभुशीत होती, तेच त्यातून उघड झालं. मात्र त्याचवेळी आपल्या मित्रांचे एकेक टायर पंक्चर करत सुटलेल्या महाशक्तीचाही कर्तव्यदक्षतेचा मुखवटा ओरबाडला गेलाच. जुने आका गेले तेव्हा त्यांना घालवून हिरो बनू पाहणार्यांनी आधीच ‘समांतर आकाराज’ निर्माण केलेलं आहे, हेही भेसूर चित्र पाहिलं महाराष्ट्राने.
होळीच्या वेळी पेटवल्या जाणार्या होमात अमंगलाचा नाश करायचा असतो, असं म्हणतात. राज्यातील जनतेने ती संधी दवडली आणि आता महाराष्ट्राच्या नावाला न शोभणारी ही रक्तरंजित, शिवराळ, गुंडशाहीची धुळवड पाहण्याची वेळ आली. कोणत्याही वयातल्या महिला इथे सुरक्षित नाहीत, पुण्यासारख्या सुसंस्कृत आणि सुशिक्षित शहरात कोयता गँग उदयाला येत आहेत. सत्ताधार्यांशी लगट असलेले ‘चिल्लर’ लोक महाराष्ट्राच्या आराध्यदैवताची, छत्रपती शिवाजी महाराजांची यथेच्छ बदनामी करतात आणि त्यांच्यावर कसलीही कारवाई होत नाही. त्यांच्याविरोधात आवाज उठवला जाऊ नये म्हणून ऐतिहासिक चित्रपटाच्या माध्यमातून औरंगजेबाचं भूत थडग्यातून बाहेर काढून लोकांपुढे नाचवलं जातं.
कोणीतरी टिल्लू टॉम शिवसेनेला मतं देणार्या गावांना निधीच देणार नाही, असली भाषा करतो. एक टिनपाट ‘भय्या’ महाराष्ट्रात येऊन मुंबईच्या एका उपनगराची भाषा गुजराती आहे, असे तारे तोडतो आणि मराठीत बोलणार नाही, मराठी पाट्या लावणार नाही, या उर्मट परप्रांतीयांच्या गुर्मीला बळ पुरवतो. यांच्या पालख्या नाचवण्यात धन्यता मानणार्या बुद्धिगहाण मराठीजनांना त्यांची पालखी उतरवून यथासांग ‘पूजा’ करण्याची बुद्धी होत नाही! कोणीतरी उपटसुंभ या राज्याचं एक महत्त्वाचं खातं बाहेरून चालवतो, असा आरोप एक सत्ताधारीच करतो, तेव्हा इकडे मुख्यमंत्री ‘मित्रां’च्या खात्यातले फिक्सर दूर केले म्हणून आरत्या ओवाळून घेण्यात मग्न असतात. महाराष्ट्रात उद्योगधंदे करायचे तर खंडणीबहाद्दरांना खंडण्या द्याव्या लागतात, असं उद्योजक जाहीरपणे सांगतात. मग आपले उद्योगधंदे इतर राज्यं पळवून नेत आहेत, ते आपल्याच राज्यात राहू देत, असं गार्हाणं तरी कोणत्या तोंडाने घालायचं?
आपली कुलदैवतं, ग्रामदैवतं गावांमध्ये वसतात आणि तिथल्या वस्तीतच बाहेर पडतात हे त्यांच्यासाठी फार बरं आहे… तिथल्या वाड्यावस्त्यांमध्ये रस्तेच नसणं किंवा दर वर्षी बांधलेले रस्ते वाहून जाणं, दिवसातून आठ आठ तास वीज नसणं, या सगळ्याची त्यांना सवय आहे. या दैवतांनी शहरांमधल्या भाविकांच्या उद्धारासाठी पालख्या शहरांत वळवल्या तर काय अवस्था होईल त्यांची? जागोजाग खणून ठेवलेले खड्डे, िसमेंटचा, धूळमातीचा २४ तास उडत असलेला खकाणा, बकाली पाहून देव हतबुद्धच होतील आणि दरवर्षी श्री गणराय या सगळ्या खातेर्यात कसे अवतरतात, असा प्रश्न त्यांना पडेल. त्यांच्याकडे ‘बा देवा महाराजा’ म्हणून गार्हाणे घालणार्यांना तेच म्हणतील, अरे मराठी माणसा, तुझी भायली आणि भुतुरली पिडा तूच स्वकर्माने ओढवून घेतली आहेस. आता तरी शहाणा हो. खरं शिवबंधन कोणतं ते ओळख आणि एकजुटीचा धागा हो!
म्हणा, होय महाराजा!