फेब्रुवारी २१ ते २३ दरम्यान राजधानीत दिल्ली येथे ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे. त्याआधी १९५४ साली ३७वे मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे संपन्न झाले होते. आता तब्बल ७० वर्षानंतर दुसर्यांदा दिल्ली येथे भरणारे संमेलन हे महाराष्ट्राबाहेर भरणारे २४वे साहित्य संमेलन आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका व समीक्षक डॉ. तारा भवाळकर आहेत. मराठी साहित्य संमेलनांकडे मागे वाळून पाहता १४७ वर्षांचा मराठी साहित्य संमेलनाचा इतिहास चटकन डोळ्यासमोर येतो. तेव्हा त्यातील काही महत्त्वाच्या घटना, वादविवाद, साहित्य संमेलनाची बदलती स्थळे, संमेलनाध्यक्षाची निवड आदी गोष्टींचा ऊहापोह करणे क्रमप्राप्त होते.
मराठी साहित्य संमेलन ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची सांस्कृतिक परंपरा आहे. १८७८ सालापासून चालत आलेली परंपरा, साहित्योत्सव आजही आनंदात साजरा केला जातो. साहित्य संमेलने भरविण्यात त्याची जागा निवडीपासून व अध्यक्षनिवडीपर्यंत, साहित्य संमेलनात चर्चेस येणारे सामाजिक, साहित्य, भाषा विषय यात काळानुरूप बदल झालेला पहावयास मिळतो. गेल्या १४७ वर्षात साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद फक्त साहित्यिकांनीच भूषविले नसून समीक्षक, इतिहासकार, विचारवंत, समाजसेवक, समाजसुधारक, संस्थानिक यांनीही ते भूषविले आहे. म्हणूनच साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिकांपुरतेच मर्यादित न राहता समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारे साहित्याचे, संस्कृतीचे आणि सामाजिक विचारांचे व्यासपीठ बनले आहे.
१८७८ साली न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘मराठी ग्रंथकारांचे संमेलन’ या नावाने मराठी साहित्य संमेलन प्रथम सुरू झाले. रानडे काही साहित्यिक नव्हते. परंतु त्या काळच्या शिक्षित समाजात प्रतिष्ठित विचारवंत व न्यायमूर्ती होते. १९९५पर्यंत ग्रंथकारांची फक्त नऊ संमेलने झाली. दहाव्या संमेलनापासून म्हणजे १९१७पासून महाराष्ट्र साहित्य संमेलन, मराठी साहित्य संमेलन अशी नावे संमेलनाला दिली गेली. यवतमाळ येथे १९७३ साली कविवर्य ग. दि. माडगूळकर यांच्या अध्यक्षतेखाली ४९वे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ या नावाने संमेलन घेण्यात आले. तेव्हापासून याच नावाने साहित्य संमेलन भरवले जात आहे.
१९४७पर्यंत साहित्य संमेलन हे फक्त साहित्यिकांचे संमेलन नव्हते तर ते साहित्यावर प्रेम करणार्यांचे होते. सातार्यात १९०५ सालच्या संमेलनाचे अध्यक्ष दादासाहेब (रघुनाथ पांडुरंग) करंदीकर हे केवळ साहित्यिकांचे मित्र म्हणून अध्यक्ष झाले. १९९५ साली मुंबई येथे भरलेल्या संमेलनाचे अध्यक्ष गंगाधरराव पटवर्धन हे साहित्यिक नव्हते, तर मिरज संस्थानचे विद्याव्यासंगी अधिपती, व्यायामाचे व मल्लविद्येचे पुरस्कर्ते अशी त्यांची ओळख होती. तर ग्वाल्हेर येथे १९२८ साली भरलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बापूसाहेब (माधव श्रीहरी) अणे हे होते. ते हिंदुस्थानी राजकारणाला श्रेष्ठ दर्जाचे नेते, मुत्सद्दी राजकारणी व संस्कृत पंडित म्हणून परिचित होते. इंदूर येथे १९३५ साली भरलेल्या साहित्य संमेलनाचे बाळासाहेब (भगवानराव श्रीनिवासराव) पंतप्रतिनिधी हे औंध संस्थानचे अखेरचे अधिपती हे कीर्तनकार, चित्रकार व नमस्कार व्यायामाचे पुरस्कर्ते होते. कोल्हापूर येथे १९३२ साली झालेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदी थोर संस्थानिक बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांची निवड झाली. स्वातंत्र्यानंतर सातारा येथे १९६२ साली झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी काकासाहेब (नरहर विष्णू) गाडगीळ हे अध्यक्ष होते. ते मुत्सद्दी राजकारणी प्रभावशाली वक्ते, व्यासंगी ग्रंथकार होते. ह. ना. आपटे, न. चिं. केळकर, श्री. कृ. कोल्हटकर, शि. म. परांजपे, कृ. प्र. खाडिलकर, माधवराव पटवर्धन (माधव ज्युलियन), स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, आचार्य प्र. के. अत्रे, ग. त्र्यं. माडखोलकर हे साहित्यिक, अध्यक्ष बनले. स्वातंत्र्यानंतर शं. द. जावडेकर, कृ. पां. कुलकर्णी, श. द. पेंडसे, अनंत काणेकर, कवी अनिल, कुसुमावती देशपांडे, वि. वा. शिरवाडकर, पु. शि. रेगे, ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे, दुर्गा भागवत, पु. भा. भावे, व्यंकटेश माडगूळकर, शंकरराव खरात, शंकर पाटील, विश्राम बेडेकर, वसंत कानेटकर, के. ज. पुरोहित, मधु मंगेश कर्णिक, राम शेवाळकर, विद्याधर गोखले, नारायण सुर्वे, वसंत बापट, य. दि. फडके, केशव मेश्राम, अरुण साधू, आनंद यादव, उत्तम कांबळे, वसंत आबाजी डहाके, डॉ. नागनाथ कोतापल्ले, प्रा. सदानंद मोरे, श्रीपाल सबनीस, डॉ. अरुणा ढेरे, फ्रान्सिस दिब्रेटो आदी साहित्यिकही अध्यक्षपदी विराजमान झाले. काही समीक्षक, इतिहासकारही अध्यक्ष झाले. तर काही साहित्यिकांची पात्रता असूनही ते अध्यक्ष होऊ शकले नाहीत. त्याचीही यादी मोठी आहे.
महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा प्रदेश आहे. फुले-शाहू-आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात दलित साहित्यिकाला संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्यासाठी १९८४ साल उजाडण्याची वाट पाहावी लागली. हे निश्चितच पुरोगामी महाराष्ट्र म्हणविणार्यांना भूषणावह नाही. जळगाव येथे १९८४ साली भरलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दलित साहित्यिक शंकरराव खरात यांची निवड झाली. त्यानंतर २००५ साली केशव मेश्राम आणि २०१० साली उत्तम कांबळे हे अध्यक्ष झाले. फक्त पाच महिला साहित्यिक, सावित्रीच्या लेकी आतापर्यंत अध्यक्ष झाल्या. ग्वाल्हेर येथे १९६१ साली भरलेल्या संमेलनात कुसुमावती देशपांडे या पहिल्या महिला साहित्यिका अध्यक्ष झाल्या. त्यानंतर १९७५ साली कराड येथे दुर्गा भागवत. १९९६ साली आळंदी येथे शांता शेळके आणि २००१ साली इंदूर येथे विजया राजाध्यक्ष यांची अध्यक्षपदी निवड झाली. २०१९ सालच्या ९२व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे यांची निवड झाली. तर आताच्या दिल्लीतील साहित्य संमेलनात डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाली आहे. पहिल्या महिला स्वागताध्यक्ष १९३६ सालच्या जळगावच्या संमेलनाला आनंदीबाई शिर्के यांच्या रूपाने लाभल्या. तर १९९४च्या पणजी येथील संमेलनाला गोव्याच्या मुख्यमंत्री शशिकला काकोडकर, तर २००१च्या इंदूरच्या संमेलनाला लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष होत्या. १९९० साली पुणे येथील साहित्य संमेलनाला संतसाहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. यू. म. पठाण हे अध्यक्ष होते. हे एकमेव मुस्लीम साहित्यिक, मराठी साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. २०२० साली धाराशीव येथे संपन्न झालेल्या संमेलनाच्या ९४व्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांची निवड करण्यात आली होती.
आतापर्यंत पार पडलेल्या ९७व्या मराठी साहित्य संमेलनात पाच महिला साहित्यिक, तीन दलित साहित्यिक, एक ख्रिश्चन साहित्यिक आणि एक मुस्लीम साहित्यिक अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिकांपुरते मर्यादित न राहता समाजातील सर्व घटकांना, दलित, आदिवासी, मुस्लिम, शोषित यांना सामावून घेणारे मराठी साहित्याचे, संस्कृतीचे आणि विचारांचे व्यासपीठ असले पाहिजे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार हे स्वागताध्यक्ष आहेत. १९५४ साली दिल्लीत संपन्न झालेल्या ३७व्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काकासाहेब गाडगीळ हे स्वागताध्यक्ष होते. १९५४चे मराठी साहित्य संमेलन हे संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भरले होते. महाराष्ट्रातील मराठी भाषिकांच्या मनातील संयुक्त महाराष्ट्राच्या न्याय्य मागणीचा आवाज दिल्लीश्वरांपर्यंत पोहोचवावा आणि ही न्याय्य मागणी आहे हे पटवून देण्यासाठी तेव्हाच्या मराठी साहित्य संमेलनातील सहभागी व्यक्तींचा उद्देश होता. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०-१२ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ऑक्टोबर २०२४मध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याची घोषणा केली. तेव्हा मोदी यांची आभार मांडण्याची संधी प्राप्त झाली आहे. पण त्याचबरोबर सध्या महाराष्ट्रावर केंद्र सरकार जो अन्याय करीत आहे आणि मुंबईचे आर्थिक महत्व उद्ध्वस्त करण्याचा कुटील डाव केंद्रातील काही महाराष्ट्रद्वेष्टी मंडळी करीत आहेत. तो थांबला पाहिजे. ‘मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे’ हे ठणकावून सांगण्यासाठीही दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात मराठी नेत्यांनी आणि साहित्यिकांनी हिंमत दाखवली पाहिजे. कारण महाराष्ट्रातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय घटनांवर मराठी साहित्यिकांनी व्यक्त झाले पाहिजे. त्याचे प्रतिसाद अखिल भारतीय मराठी सहित्य संमेलनात उमटले पाहिजे असे असले तरी, संमेलनावरील टीका, संमेलनापूर्वी, संमेलनातील वादविवाद अपेक्षित धरून प्रतिवर्षी भरणारे हे मराठी साहित्य संमेलन मराठी साहित्यप्रेमींना हवेसे वाटते.