माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या मी त्याला जाऊ नको असं सांगत असताना हट्टाने प्रयागराजच्या कुंभमेळ्याला गेलाच. ज्या दिवशी तिथे चेंगराचेंगरी होऊन हजारो भाविक पायदळी तुडवले जाऊन त्यातील किमान ३० मृत्यू पावले आणि शेकडो वाहून गेले अशी बातमी मी टीव्हीवर ऐकली तेव्हा माझ्या छातीत धस्स झालं. मी पोक्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो, पण फोन लागत नव्हता. अखेर पोक्याला कशी काय सुबुद्धी झाली आणि त्याने तो सुखरूप असल्याचा फोन केला, तेव्हा माझा जीव भांड्यात पडला.
त्यानंतर दुसर्या दिवशी पुन्हा त्याचा फोन आला तेव्हा त्याने त्या दुर्दैवी घटनेचं जे वर्णन केलं ते भयानक होतं. त्याच्या मते या दुर्घटनेत किमान एक हजार भाविकांचे बळी गेले असून योगी सरकार आणि केंद्र सरकार खरा आकडा कळू नये म्हणून पत्रकारांनाही तिथे जाण्यास मज्जाव करत होते. पोलिसांच्या दंडेलशाहीचा भरपूर प्रसाद पत्रकारांना मिळाला. काहींचे कॅमेरे जप्त करण्यात आले, तर काहींवर लाठीचार्जही करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपच्या केंद्रातील नेत्यांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या त्या तर त्या दुर्घटनेपेक्षा भयानक होत्या, असे पोक्या म्हणाला. प्रत्यक्ष जे घडलं, त्याची सत्य माहिती कशी लपवता येईल असेच प्रयत्न होत होते. भाजपपुढे सदैव लोटांगण घालण्यास तयार असलेल्या अनेक पत्रकारांनीही प्रसारमाध्यमांतून मृतांचा खरा आकडा न देता ३० हा सरकारी आकडा जाहीर करून आपल्या ओंगळ निष्ठेचं प्रदर्शन केलं.
त्यानंतर अनेक नेते, मंत्री, खासदार यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यातली ‘शोले’ फेम भाजप खासदार हेमा मालिनीची प्रतिक्रिया ऐकून पोक्याला ती दुर्घटना पाहिल्यावर जितका झटका बसला नसेल त्याच्या शंभर पट झटका त्या बसंतीची प्रतिक्रिया समजल्यावर बसला. तो तसाच तातडीने ती ज्या हॉटेलात उतरली होती तिथे तिला जाब विचारण्यासाठी गेला. आपण भाजपवादी पत्रकार असून तुमच्या व्हायरल झालेल्या प्रतिक्रियेच्या संदर्भात तुमची सविस्तर भूमिका समजावून घेण्यासाठी आलो आहोत असं पोक्याने तिला सांगितलं तेव्हा ती खूश झाली आणि तिने पोक्याला मुलाखत दिली. पोक्याने मला ईमेल करून ती पाठवली. तीच ही मुलाखत…
– नमस्कार हेमाजी. कुंभमेळ्यात इतक्या मोठ्या प्रमाणात बळी जाऊनसुद्धा तुम्हाला ही दुर्घटना छोटी आणि क्षुल्लक का वाटते? तुम्ही अगदी ठामपणे म्हटलंय की, चेंगराचेंगरीची घटना मुळीच मोठी आणि गंभीर नाही. प्रसारमाध्यमांत ती वाढवून दाखवण्यात आली आहे.
– खरंच आहे ते. चेंगराचेंगरीत काही लोक मृत्यू पावले असले तरी धिस इज नॉट बिग इन्सिडेंट. और इतने बडे कुंभमेले में जहां पचास कोटी से ज्यादा भक्तगण आये हैं, भगदड में तीस मरे ये कोई बडा हादसा नहीं है। हर रोज देशभरके अॅेक्सिडेंट में कम से कम हजार लोग मरते हैं। इसके सामने तीस फिगर किस झाड की पत्ती है।
– हेमाजी, फक्त तीस नाही मेले. हजार से ज्यादा भक्त मरे ऐसा बोलते हैं वहां के लोग!
– ना ना ना… तो हमारे योगीजी झूठ बोल रहे हैं क्या? हमारे मोदीजी झूठ बोल रहे हैं क्या? ते कधीच खोटं बोलत नाहीत. मैं बोली ना! ये एक सिंपल इन्सिडंट है। ऐसे बडे बडे देशों में ऐसे छोटे छोटे हादसे हो जाते हैं। मैं भी वहां पवित्र स्नान करके आयी। मुझे देखने के लिए तो लोग कूद पडे थे। वहां छम्मक छल्लो ममता कुलकर्णी से ज्यादा
फॅन थे मेरे। वहां लोग मुझपे मरते रहे, लेकिन खुद कोई भी नहीं मरा। ‘शोले’ में टांगा चलानेवाली बसंती अब भी इतनी ही खुबसुरत है, जितनी ‘शोले’ में थी।
– हे काय बोलता हेमाजी?
– झूठ नाही बोलत मी. प्रयागराजला माझ्या फॅन्सनी मला नाचायचा आग्रह केला असता तर मी नाचलेसुद्धा असते. ‘शोले’मध्ये गब्बरने मला काचांवर नाचायला लावलं ते आठवतंय ना! इथे मला आमच्या भाजप नेत्यांनी लोकांच्या मनोरंजनासाठी नाचायला लावलं असतं मातीत, तरी मी नाचले असते. मला पाहायला लाखो लोकांची गर्दी झाली असती तरी कुठलीही दुर्घटना घडली नसती इतका चोख बंदोबस्त केला असता योगीजींनी. माझ्या डोळ्यांसमोर आताही चित्र उभं राहतंय… मी नाचतेय आणि समोर बसून मोदीजी, अमित शहाजी आणि योगीजी मला दाद देतायत… मी गाणं म्हणतेय, जब तक है जान, जाने जहां, मैं नाचुंगीऽऽ मैं नाचुंगीऽऽ
– पण हेमाजी, हे तिघं किती प्रेमळ आहेत, इतके प्रेमळ की सारा देश त्यांच्या तालावर नाचतोय. तळहाताच्या फोडासारखे जपतायत ते जनतेला. त्यांनी कुंभमेळ्याला कडक बंदोबस्त केला म्हणून सारं कसं काहाही मोठी आपत्ती न येता पार पडलं असं म्हणताहेत भाजपप्रेमी भक्तगण.
– खरंच आहे ते.
– मग ते खासदार पप्पू यादव असं का म्हणाले की महाकुंभात येणारे राजकीय नेते आणि गर्भश्रीमंतांना तिथेच मृत्यू यायला हवा, जेणेकरून त्यांना ‘मोक्ष’ मिळेल.
– ते काय म्हणतात त्यात मला रस नाही. त्यांना म्हणावं, तुम्हीही तसंच मोक्षपदाला जा. झालेली दुर्घटना अगदी क्षुल्लक आणि किरकोळ आहे. माझे मिस्टर धर्मेंद्रही तेच म्हणाले. ते असंही म्हणाले की माझ्या हेमाबद्दल कुणी वाईट बोलेल तर त्याला मी एका ठोशात स्वर्ग दाखवीन आणि मोक्ष मिळवून देईन. शेवटी अशा फालतू दुर्घटनेला हे लोक नको इतका भाव का देतात तेच समजत नाही. यांना खरं तर आमच्या गब्बरच्या ताब्यातच द्यायला हवं!