नॉर्वेला मुक्कामी पोहोचलो. स्थिरस्थावर झालो. दुसर्या दिवशी मला लवकर जाग आली. हे घर समुद्र आणि त्या मागील डोंगराच्या सुंदर रांगानी वेढलेले होते (याला इकडे फियॉर्ड (Fjord) असे म्हणतात. फियॉर्ड म्हणजे एक लांब, खोल, खार्या-गोड्या पाण्याने भरलेली खाडी किंवा नदीची उपनदी जी पर्वतरांगा किंवा डोंगरांच्या मध्ये वसलेली असते. फियॉर्ड सामान्यतः आकर्षक आणि लांबट असतात आणि त्यांची निर्मिती हिमनदीच्या हालचालींमुळे होते). घरमालकाने पार्किंगमध्ये स्पीड बोट पार्क करून ठेवली होती. घराची समुद्राकडच्या बाजूची एक भिंत घरमालकाने पूर्णपणे काचेची बांधली होती. त्यामुळे त्या भिंतीजवळच्या दिवाणखान्याच्या सोफ्यावर बसून या सुंदर दृश्याचा अनुभव घेता येत होता. बायको आणि कन्या या दोघीही निवांतपणे झोपल्या असल्यामुळे माझ्यासाठी हे समोरचे दृश्य, चांगले हवामान, नीरव शांतता आणि एवढा वेळ हा सुकून होता. एक अनुभूतीच म्हणा ना! हा क्षण असा असतो तेव्हा फक्त तुम्ही असता, आनंदाच्या सर्वोच्च टोकावर असल्यासारखे वाटते. भिरभिरणारे मन एवढे शांत असते की त्याची आपल्याला अजिबात सवय नसते. मला हे सुकूनवाले क्षण समुद्राच्या पाण्यात न जाता संध्याकाळच्या उन्हात वाळूमध्ये झोपून लाटांचा आवाज ऐकण्यास किंवा लोकांची लगबग बघण्यास मिळतात… गावी गणपतीच्या दिवसात दुपारी बांधावर बसून, डुलणारी शेतं बघण्यात, मुसळधार पाऊस किंवा बर्फवृष्टी खिडकीत बसून बघण्यात मिळतात. प्रत्येकाची अनुभूतीची व्याख्या वेगवेगळी असते. स्थळकाळ बदलत असतात, परंतु भावना तीच असते. ती अनुभूती मिळते तेव्हा तुम्ही बदलता, तुमचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. या क्षणात कधी तरी तुम्ही अचानक हसता किंवा डोळ्यातून आसवे गळतात. प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो.
फक्त आजच्या दिवशी चांगले हवामान असल्याने आम्ही ब्रेकफास्ट करून सिटी सेंटर फिरून येण्याचा विचार केला. आमचे घर हे एका बेटावर (काल्ड फियॉर्ड) आणि सिटी सेंटर हे दुसर्या बेटावर होते. एका बेटावरून दुसर्या बेटावर जाण्यासाठी त्यांनी बहुतेक ठिकाणी उंच उलट्या अर्धचंद्राकृती आकाराचे पूल बांधले आहेत. घरापासून एअरपोर्टचा रस्ता मस्तपैकी समुद्राच्या बाजूने होता, परंतु समुद्र मला उधाणलेला वाटत होता. मी मुद्दाम डोंगराच्या गुहेतली पार्किंग घेतली होती, जेणेकरून कार इंजिन गरम राहील आणि बर्फवृष्टी झाल्यास कारवरचा बर्फ काढायची कटकट होणार नाही. नॉर्वेमध्ये सगळीकडे पार्किंगचे चार्जेस खूपच महाग होते आणि ही तर सुरुवात होती. या दिवसाचा आम्ही खास दिनक्रम बनवला नव्हता. सिटी सेंटर आणि आजूबाजूचा परिसर पायी फिरून फील घ्यायचा होता.
सहसा आम्ही सहलीचा स्थलदर्शनाचा कार्यक्रम भरगच्च बनवत नाही. केवळ सोशल मिडियावर जागा टॅग करायच्या म्हणून घाईत भरपूर पर्यटनस्थळांना टिकमार्क स्टाइल झटपट भेटी देण्याच्या भानगडीत पण पडत नाही. भरपूर वेळ हाताशी असेल तर एखाददोन दिवस निवांतपणे आजूबाजूच्या दुकानाच्या, माणसांच्या, वाहनाच्या धावपळीच्या गोष्टी बघण्यात पण जाम मजा असते. सुरुवातीला एकट्याने बॅचलर म्हणून फिरताना, मग कपल म्हणून फिरताना, नंतर मुलीच्या जन्मानंतर फिरतानाचा प्रवास आणि त्याचा आस्वाद बदलत गेला.
मी नॉर्वेच्या थंडीसाठी तीन लेयरचे कपडे आणि खास टोपी घातली होती. ती रुस स्टाइलची होती आणि ती माझे कपाळ, दोन्ही कान, तोंड आणि नाक झाकायला आणि उबदार ठेवायला मदत करत होती. हवामान शून्य किंवा एक अंश सेल्सिअस होते, पण स्थानिक लोक माझ्याकडे, त्या टोपीकडे विचित्र नजरेने बघताहेत, असा सारखा भास होत होता. त्यांच्यासाठी हे तापमान नेहमीचे होते. त्या हवामानात मी त्यांना ओव्हरड्रेस्ड वाटलो असणार. पर अपने को क्या! तबियत सलामत तो अपनी ट्रिप झकास!!
सगळे सिटी सेंटर फिरून झाल्यावर मग समुद्राजवळ फोटोशूट करून झाल्यानंर काळोख झाला आणि आम्हाला दुपारच्या जेवणासाठी भूक लागली. उत्तरध्रुवीय क्षेत्रात असल्याने आणि हिवाळ्यामुळे दुपारी तीन वाजताच अंधार झाला. कॅफेमध्ये मस्त हॉट कॉफी आणि ग्रिल सँडविचने शरीरामध्ये ऊब आली. मग जवळ असलेल्या पोलर म्युझियममध्ये गेलो. पोलर म्युझियम लहान असले तरी खूपच रोचक आणि डोळे उघडणारे होते. हे ध्रुवीय आणि आर्क्टिक प्रदेशातील जीवनाची आणि तिथल्या संशोधनाची चांगली माहिती देते. या म्युझियममध्ये मुख्यत: आर्क्टिक प्रदेशातील संशोधन, संशोधक आणि ध्रुवीय क्षेत्रातील ऐतिहासिक प्रवासाबद्दल माहितीचे दालन आहे. पोलर म्युझियममध्ये ध्रुवीय शोध, विशेषत: उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या आसपास झालेल्या ऐतिहासिक मोहिमा, तसेच त्या क्षेत्राशी संबंधित उपकरणे, वस्त्रं आणि विविध सामानाचे प्रदर्शन आहे. या म्युझियममध्ये रॉबर्ट फाल्कन स्कॉट, आणि रोनाल्ड अॅडमंडसन यासारख्या प्रसिद्ध पोलर संशोधकांची मोहिमाची माहिती दर्शवली आहे. त्याचप्रमाणे, म्युझियममध्ये त्या काळातील खगोलशास्त्र, हवामानशास्त्र, समुद्रशास्त्र, आणि शास्त्रीय संशोधन यांबद्दलही महत्त्वपूर्ण माहिती आहे. तसेच हे म्युझियम आर्क्टिक वन्यजीवांवर मानवी क्रियाकलापांचा झालेला दु:खद आणि हानीकारक परिणाम देखील दाखवते. रक्ताने रंगलेल्या फोटोंमध्ये पीडित सील्स, आर्क्टिक फॉक्स, वॉलरस आणि नॉर्स
ओक्स इ. प्राण्यांची चित्रे दिसतात. या गोड प्राण्यांचा संहार का गेला केला हे कोडे मला अजून समजत नाही.
या म्युझियममुळे मला स्वाल्बार्ड या उत्तर ध्रुवीय प्रदेशाची माहिती मिळाली. हा नॉर्वेच्या मुख्य भूमीपासून सुमारे १,००० किमी उत्तरेला आहे. या प्रदेशात कामासाठी व्हिसा लागत नाही. परंतु स्वाल्बार्डमध्ये मरण्याची किंवा जन्मण्याची परवानगी मात्र नाही. १६व्या आणि १७व्या शतकात हा प्रदेश शिकार आणि शोषण यासाठी कुप्रसिद्ध होता. पोलर बेअर, वॉलरस, सील, आणि इतर ध्रुवीय प्राण्यांची शिकारीमुळे त्यांच्या संख्या अत्यंत कमी झाली आणि पर्यावरणीय संतुलनावर परिणाम झाला. या दु:खद अनुभवातून पोलार बेअर आणि इतर प्राण्यांच्या शिकारीवर कडक निर्बंध घालण्यात आले. स्वाल्बार्डमध्ये ध्रुवीय दिवस (Midnight Sun) एप्रिलच्या मध्यापासून ते ऑगस्टच्या मध्यापर्यंत चालतो. याचा अर्थ म्हणजे, लाँग्येअर्बीनसारख्या मुख्य शहरांमध्ये सूर्य मध्यरात्री १२ वाजता देखील आकाशात असतो. या काळात सूर्य कधीही क्षितिजाच्या खाली जात नाही. हिवाळ्याच्या काळात मात्र सूर्य खूप लांब अंतरावर अस्तित्वात नसतो आणि इथे रात्री २४ तासांचा अंधार अनुभवला जातो. हा काळ निसर्गाच्या विश्रांतीचा आणि शांततेचा असतो. स्वाल्बार्डमध्ये ध्रुवीय रात्र ऑक्टोबरच्या मध्यापासून ते फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत असते.
पुढच्या दिवशी आम्हाला नॉर्दन लाइट्स टूर जायचे असण्यामुळे आम्ही लवकर घरी आलो. रात्रीपासून सीझनची पहिली बर्फवृष्टी सुरू झाली आणि आम्ही थोडे चिंतेत पडलो. दुसर्या दिवशी नॉर्दन लाइट्स टूर होती संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते पहाटे दोन किंवा तीन वाजेपर्यंत. दुपारी जोरदार बर्फवृष्टी असली असती तर मला बर्फावरच्या ड्रायविंगचा आत्मविश्वास नव्हता आणि परत सहलीच्या पिकअप पॉइंटशेजारी कोठेही पार्किंगची व्यवस्था नव्हती. पहाटेच्या वेळी बर्फात, लहान मुलगी सोबत असताना ४५ मिनिटे ड्राइव्ह करणे म्हणजे अतिसाहसीपणा झाला असता. तो टाळण्यासाठी बायकोने लगेच सिटी सेंटरमध्येच काही तासांसाठी राहण्याचा पर्याय सुचवला. यावेळी मीही ही आयडिया उचलून धरली. तिने लगेच दुसरे एअरबीएनबीचे घर (त्या पिकअप पॉइंटपासून फक्त पाच मिनिटे चालत) शोधून काढले आणि ते आमच्या बजेटमध्ये सुद्धा होते. आम्ही फोन करून घराच्या मालकिणीला चॅटबॉक्स वरून कल्पना देऊन ठेवली आणि लगेच ते बुक करून टाकले. इकडे फक्त राहायला वेगळी खोली असली तरी वॉशरूम कॉमन होते. पण काही तासाचा प्रश्न असल्याने त्याची काहीच अडचण नव्हती.
आकाशाला रंगवणारी स्वप्नवत कहाणी
तिसर्या दिवसाची सकाळ सुंदर सूर्यप्रकाशाने झाली. रात्री हलकी बर्फवृष्टी झाल्याने समोरच्या डोंगरमाथ्यावर बर्फाची चादर आणि सूर्याचा प्रकाशाचा सुंदर मिलाफ मला दिसला. मी सुरुवातीला फोटो घ्यायच्या भानगडीत पडलो नव्हतो, परंतु या वेळी बायको सकाळी लवकर उठली. ती नाश्ता बनवत असल्याने तिने फोटो घ्यायची ऑर्डर मला दिली. पुरुष जरा कोठे निवांतपणे पडला असेल तेव्हा तेव्हा बायको हात धुवून मागे लागते, कुठले तरी काम सांगतेच. तुमच्या घरी पण हेच होत असेल ना?
संध्याकाळपासून जोरदार बर्फवृष्टी होणार असल्यामुळे यावेळी आम्ही कार न घेता सार्वजनिक बसचा वापर करायचा ठरवले. ११ वाजण्याच्या सुमारास घर सोडले आणि चालत बस स्टॉप कम बस स्टेशनला आलो. मी अॅप डाऊनलोड करून तिघांचे तिकीट आधीच काढले होते. म्हणून बसचालकाला तिकीट दाखवले. ‘तिकीट दाखवायची काहीच आवश्यकता नाही’ असे बोलून त्याने मला बुचकळ्यात टाकले. मुलीने नेहमीप्रमाणे शेवटची आडवी सीट पकडली. मी मात्र अॅप उघडून टर्म्स एंड कंडिशन्स वाचू लागलो आणि मला तो का असे बोलला याचा उलगडा झाला. तुम्ही ड्रायव्हरला तिकीट दाखवायची गरज नाही, तिकीट तपासनीस आला तरच त्याला तिकीट दाखवावी अशी सूचना होती. हे लोक एवढे प्रामाणिक का बरं असतील?
आम्ही सिटी सेंटरला उतरल्यावर सरळ दुसर्या एअरबीएनबी घरी पोहोचलो. घराचे मालक, नॉर्वेजियन नवरा आणि त्याची कजाकिस्तानियन बायको (दोघेही सत्तरी पार) यांनी हसून स्वागत केले. देव सुद्धा पण स्वर्गात कायच्या काय गाठी बांधत असतो. घर त्यांनी सुंदर आणि नीटनेटके ठेवले होतेच, शिवाय भिंतीवर खूप सारी पेंटिंग्स होती. घरमालकाने सर्व घर दाखवून घरातील नियमाची उजळणी केली. आम्ही केवळ काही तासांसाठी येथे राहणार होतो आणि त्यांना त्याची परत कल्पना दिली. एवढे सगळे करेपर्यंत दुपारचे दोन वाजले होते आणि घरमालकाने आम्हाला थाय रेस्टॉरंट सुचवले जेवणासाठी. आम्हाला पूर्ण कल्पना आली होती की हे या दिवसाचे एकमात्र जेवण होते, मग दुसर्या दिवशी सकाळपर्यंत फक्त नॉर्दर्न लाइट्स ‘देवी’साठीचा उपवास घडणार होता.
आम्ही सागरी किनार्याजवळील टूरच्या ऑफिस पत्त्यावर पोहचलो. टूर गाइड एलिझाबेथने प्रवासाची माहिती दिली आणि प्रत्येकाला रात्रीच्या अंधारात चमकणारे पट्टे घालायला दिले. जेणेकरून तिला सर्व ग्रुपवर अंधारात नजर ठेवता येईल. बस आली, परत एकदा मुलीने चालकाच्या बाजूची सर्वात शेवटची सीट पटकावली. संपूर्ण बसमध्ये एक पण सीट रिकामी नव्हती. बस चालू झाल्यावर एलिझाबेथने परत प्रवासाची रूपरेखा सांगायला सुरुवात केली. तिने खराब हवामानाची आणि धोकादायक प्रवासाची कल्पना देऊन, बसचालक उत्तम, अनुभवी आणि डोंगरातील रस्त्यावर धुवांधार बर्फवृष्टीतही बस चालवण्याचा खूप वर्षांचा अनुभव असलेला आहे, हे सांगून सर्वांना आश्वस्त केले. नंतर सर्व ५२ प्रवाश्यांना सीटबेल्ट लावण्याची सूचना देऊन प्रवासात बसमध्ये खाण्याची हौस भागवता येणार नाही असे प्रेमाने ‘बजावले’. ट्रॉम्सोचे हवामान खूपच खराब झाल्याने तिने आपण सर्व फिनलंडच्या बॉर्डरपर्यंत जाऊन बघू या, असे आशादायक चित्र तिने आमच्या डोळ्यांसमोर उभे केले. परंतु तिथे पोहचेपर्यंत सुद्धा बर्फवृष्टी होत होती. मग तिने आपण फिनलंडमध्ये प्रवेश करून लाइट्स चेस करू या, त्यासाठी पासपोर्टची आवशकता नाही, अशी माहिती दिली.
चला तर मग, देश नंबर १५ ला, ‘नॉर्दर्न लाइट्स, स्वागत नहीं करोगे हमारा?’
रात्रीच्या ११ च्या सुमारास हायवेच्या बाजूला थांबवले. खाली उतरल्यावर सगळीकडे जंगल दिसत होते आणि अद्भुत, अद्वितीय अशा नॉर्दर्न लाइटचे दर्शन झाले. बाहेर उणे १२ डिग्री तापमान होते, आम्ही फक्त पाच ते दहा मिनिटेच बाहेर राहू शकत होतो. मग परत बसमध्ये जाऊन गरम हवा घेऊन परत बाहेर येत होतो. जसजसा प्रकाश बदलत जातो आणि एका भागातून दुसर्या भागात जातानाचा प्रकाशाचा (ध्रुवीय ज्योति- Aurora Borealis) प्रवास म्हणजेच प्रकाशाचे नृत्य खूपच रोमांचित करून जाते. उणे बाराच्या तापमानात हाताचा एक ग्लोव्ह काढून मोबाइलमधून फोटो काढणे हे खरंच मोठे दिव्य काम आहे. ४/५ मिनिटांत हात सुन्न पडून जातो. आजूबाजूला अंधार असल्याने मोबाइलमधून काही फोटो व्यवस्थित आले नाही. सुदैवाने एलिजाबेथने डीएसएलआर लेन्सवाला कॅमेरा आणला होता आणि ती प्रत्येकाचे नॉर्दर्न लाइट्सबरोबरचे फोटो संयमाने काढत होती. दुपारच्या जेवणापासून रात्रीच्या बारा वाजेपर्यंत कडकडीत उपवास घडला होता. टूर कंपनीने चहा, कॉफी, हॉट चॉकलेट आणि कुकीजची व्यवस्था केली होती. ते खाल्ल्यावर मस्त उबदार वाटले.
ऑफिस गर्दीच्या वेळेस विरार ट्रेनला धक्काबुक्की न करता व्यवस्थित आत जाता येऊन उभे राहण्याची जागा मिळवणारा किंवा किमान चौथ्या सीटला जागा मिळणारा माणूस जितका भाग्यवान, तितकाच पहिल्याच प्रयत्नात नॉर्दर्न लाइट्स पाहायला मिळणाराही भाग्यवान. नॉर्दर्न लाइट्सचा पाठलाग करणे किंवा बघायला जाणे यासाठी कमालीचा संयमाबरोबर चिकाटीसुद्धा लागते. काही जण ट्रॉम्सोला आल्यावर दोन टूर बुक करतात सेफर साइड म्हणून. पहिल्या प्रयत्नात दिसलेच नाही तर दुसर्यात तरी दिसतील.
परतीचा प्रवास जोरदार बर्फवृष्टीमुळे धोकादायक वाटत होता. परंतु टूर गाइडने सुरुवातीला आम्हाला चालकाच्या स्किलबद्दल आश्वस्त केले होते, त्याचा अनुभव या प्रवासात आला. डोंगर आणि वेगवेगळ्या छोट्या बेटावरच्या अगणित पुलांवरून या जोरदार बर्फवृष्टीत पहाटेच्या एक वाजताही तो बस सुंदर हाकत होता. जसा एक दारुडा दुसर्या दारुड्याला चांगलाच ओळखून असतो तसा माझ्यातला चालक या बसचालकावर फिदा होता. मी कुलू-मनाली-चंदीगडचा प्रवास असाच रात्री केला होता. बसमधील ५२ प्रवाशांपैकी फक्त दोनच व्यक्ती परतीच्या प्रवासात टक्क जाग्या होत्या, एक म्हणजे बस चालक आणि दुसरी म्हणजे आमच्या अर्धांगिनी. तिने या ट्रिपसाठी, नॉर्दर्न लाइट्ससाठी प्रचंड रिसर्च, वेळ (त्यातील ५० टक्के वेळ मला मनवण्यात) ओतला होता. माझ्या कपाळवरच्या स्पीडब्रेकर आणि चिंतेकडे कानाडोळा करून ट्रिपसाठी आकाश पाताळ एक केले होते, पण आज चक्क भीती आणि त्याच चिंतेमुळे तिची झोप उडाली होती. शेवटच्या सीटवर बसून ती ड्रायव्हरचे ड्रायविंग आणि स्किल्स बघायचे सोडून निसर्गाचे रौद्ररूप बघत होती, त्यामुळे तिची वाचाच गेली होती. आता बारी माझी होती, हसण्याची. ती मी थोडीच सोडणार होतो. अशा नवर्याच्या विनिंग मोमेंट संसारात खूपच कमी वेळा येतात, हो ना?
ट्रॉम्सोच्या सिटी सेंटरला पोहोचेपर्यंत पहाटेचे पावणे तीन वाजले. अजूनही नाइट क्लब्स चालू होते, पण परिसरात असुरक्षित नाही वाटले, का कुणास ठाऊक! चालत पाच मिनिटांत सिटी सेंटरच्या एअरबीएनबीमध्ये पोहचलो आणि उबदार अंथरुणात गाढ झोप लागली.
(क्रमश:)