पहिलीचा आमचा वर्ग सुरू होऊन जवळपास दीड महिना झाला होता. मागच्या दोन आठवड्यापासून प्रवेशदेखील बंद झाले होते. आणि एके दिवशी वर्ग चालू असताना अचानक एक मुलगा वर्गात आला आणि एका बाकाच्या खाली मांडी घालून बसला. बाई फळ्यावर काहीतरी लिहीत होत्या, त्यामुळे हा वर्गात येऊन बसलेला त्यांना समजले नाही. मुलांकडे बघितल्यावर त्यांनी याला बघितले आणि विचारले, ‘कोण रे तू? आणि असा खाली का बसला आहेस?’
‘इनोद. माझी माय सोडून गेली हितं.’
‘अरे पण प्रवेश झालाय का तुझा शाळेत?’ बाईंनी विचारले.
पहिलीतील मुलाला काय ठाऊक असणार? बाईंनी त्याला एका बाकावर बसायला सांगितले. मधल्या सुट्टीत जाऊन बघितले तर बाईंना समजले की त्याचा शाळेत रीतसर प्रवेशच घेतला नव्हता. मग बाईंनी त्याच्या आईला निरोप पाठवून प्रवेश घ्यायला लावला.
विनोद खरे तर दुसर्या तुकडीत जायला हवा होता, प्रवेशाच्या क्रमानुसार तुकड्या लागल्या होत्या. पण पहिल्या दिवशी या वर्गात बसलो, आता मी हलणार नाही असे म्हणून विनोद चक्क तिथेच थांबला. बाईंनी दटावून बघितले, त्याला दुसर्या वर्गात सोडून या रे असे मित्रांना सांगून बघितले. पण तो कुठला ऐकतोय. तो चक्क पहिल्या दिवशी जसा मांडी घालून खाली बसला होता तसा जमिनीवर बसला. मुले त्याला ओढू लागली तसा त्याने बाक घट्ट पकडून धरला. सोडेचना. होता एव्हढा बारकासा, पण चार मुलांच्याने देखील हलेना. शेवटी कसे बसे त्याला उचलले तर याने भोकाडच पसरले. कंटाळून शेवटी बाईच म्हणाल्या, ‘राहू दे. सोडा त्याला. बसेल आपल्याच वर्गात. वेडा मुलगा आहेस का रे विनोद.’ पण हे शेवटचे वाक्य बाईंनी प्रेमाने उच्चारले होते हे सगळ्यांना समजले. आणि मग विनोद वर्गातून गेला नाही ते नाहीच. पुढची दहा वर्षे तो आमच्या बरोबर होता.
विनोद आमच्या वर्गात दाखल झाला तेव्हाच लक्षात आले होते की हे एक अजब प्रकरण आहे. दहा वर्षात सगळ्या वर्गाची करमणूक करण्याचे काम विनोदने केले. त्याच्याकडे गप्पा मारण्याची, खरे तर थापा मारण्याची एक अद्भुत जादू होती. सगळे त्याच्याकडे लोहचुंबकासारखे आकर्षित होत.
भरपूर तेल लावलेले तपकिरी केस, वेधक तपकिरी डोळे, शेंड्याला बटण असल्यासारखं छोटं नाक, पातळ ओठ, सावळा रंग, गळ्यात काळा दोरा, हाताची आणि पायाची लांबसडक बोटं, गुडघ्यापर्यंत लांब पांढरा शर्ट आणि पँट होता होता राहिलेली तितकी लांब निळी चड्डी असा वेश. त्याची चड्डी इतकी ढिली होती की त्यात अजून एक दोन विनोद सहजच खपून जातील. चालताना त्या चड्डीचा फटक फटक आवाज येई. आम्हाला या गोष्टीचे भयंकर हसू येई. आम्ही सगळे हसतोय म्हटले की तो मुद्दाम चालून दाखवी. पुन्हा पुन्हा कपडे घेणे परवडणार नाही म्हणून त्याच्या आईने वाढत्या मापाचा गणवेश त्याला घेतला होता. तो गणवेश फाटला पण कधीही विनोदला मापाला बरोबर झाला नाही. फाटेपर्यंत ढिलाच होता. चार वर्षे वापरून देखील एवढ्या लवकर कसा फाटला म्हणून त्याची आई त्याला ओरडली होती.
नंतर त्याने प्रवेश एवढ्या उशिरा का घेतला म्हणून आम्ही एकदा त्याला विचारले होते. त्याच्याकडे गणवेश नव्हता म्हणून तो शाळेत यायला तयार नव्हता असे त्याने सांगितले. विनोदचे वडील बांधकाम मजूर होते. त्या कामातील लोकांना असते तशी त्यांनाही दारू पिण्याची सवय होती. त्यापायी घरदार पणाला लागले होते. आई गल्लोगल्ली टोपलीतून भाजी विकायची. त्यावरच कुटुंबाची गुजराण होत असे.
विनोद एक अजब रसायन होतं. म्हंटले तर हट्टी, म्हंटले तर समंजस. घरी वेळ घालवायचा नाही म्हणून त्याला शाळेत यायला आवडायचे. तो घरी थांबला तर त्याचा बाप त्याला कामावर घेऊन जायचा. आमच्या शाळेत येण्यासारखी त्याची परिस्थिती नव्हती. आमची फी खरे तर फार नव्हती. त्याच्यासाठी ती देखील माफ झाली असती. पण गणवेश, पुस्तकं, वह्या याचा खर्च आईला कसा परवडणार? मनपाच्या शाळेत त्याचा प्रवेश झाला होता. तिथून तो पळून येत असे. शेवटी या शाळेत घातल्यावर तो किमान वर्गात बसू लागला. वर्गात यायचा तेही एकदम महाराजांच्या थाटात. आपण शाळेत शिकायला येत नसून फक्त वेळकाढूपणा करायला येतो याची जराशीही खंत त्याला नव्हती. कायमच तो जग जिंकायला निघाल्याचा भाव चेहेर्यावर घेऊन वावरत असे. नाटकात काम केले असते तर तो फार पुढे गेला असता असे मला आजही वाटते. कारण बाई प्रश्न विचारत तेव्हा हा जगज्जेता असा काही निरागस चेहरा करत असे की बाईंना त्याला रागावल्याबद्दल वाईट वाटे. आपण कुणा निरागस पोराला उगीच ओरडलो असा भाव त्यांच्या मनी दिवसभर राहात असणार. बरे नंतर नंतर तो कसा आहे हे लक्षात येऊनही बाईंनी त्याच्यावर राग धरला वगैरे कधीही घडले नाही.
अभ्यास तर तो कधी करत असेल की नाही कुणास ठाऊक? कुठली तरी खाकी पिशवी तो दप्तर म्हणून वापरत असे. कित्येक वर्षे ती तशीच होती. त्या पिशवीत खरेच काय होते कुणास ठाऊक? कधी हात लावू देत नसे. खांद्याला लावली की त्याच्या चड्डीच्या बरोबरीने उंची येईल एवढी ती पिशवी मोठी होती. नंतर तिचे कोपरे मळले, बंद तुटला तर दोन वेगवेगळे बंद त्या पिशवीला लागले. पण पिवशी मात्र कित्येक वर्षे तीच होती.
विनोद अभ्यासात एकदम झिरो होता. पण आम्हा सगळ्यांसाठी मात्र तो हिरोपेक्षा कुठेही कमी नव्हता. रोजच त्याच्याकडे सांगण्यासारखे काहीतरी असे. पुढे जाऊन समजले की त्या सगळ्या थापा असत. पण त्या थापा गोष्टीरूपात तो इतक्या रंजक पद्धतीने सांगे की मागे बाई येऊन उभ्या राहिल्या तरी कळत नसे. त्याच्या गोष्टीतून त्यांच्या वस्तीत अमिताभ बच्चन येऊन गेलेला होता, पंतप्रधान येऊन गेलेले होते. त्यांच्या वस्तीच्या कोपर्यावर एक दुकान होते, त्या दुकानदाराच्या घरी म्हणे असा टीव्ही होता की जो आपल्या आवाजातील सूचना घेत असे. म्हणजे ‘आवाज कमी’ म्हंटले की आवाज कमी होत असे. त्याचे वडील ज्या साईटवर काम करत होते तिथे म्हणे पन्नास मजली बिल्डिंग होणार आहे. त्यावेळी छोट्या शहरात दहा मजली इमारत देखील नव्हती तर पन्नास म्हणजे आश्चर्यच होतं. त्याची आई विकत असलेल्या भाजीत म्हणे एकदा काकडीच्या आत मोठा साप निघाला होता. त्यांच्या वस्तीत त्याने एकदा पांढरा साप बघितला होता. अशा कित्येक थापा त्याने आम्हाला मारल्या आणि आम्ही तोंडे उघडी ठेवून त्या ऐकल्या. त्याची सांगण्याची पद्धत इतकी रंजक असायची की कित्येकदा बाई देखील त्याच्या गोष्टी ऐकत बसायच्या. त्याने सांगितलेल्या थापांवर आमचे बालपण पोसले गेलेले आहे. त्यामुळे आता राजकारण्यांच्या भूलथापा आम्हाला तितक्या भुरळ घालत नाहीत.
पेपरमधे मात्र त्याचा चांगलाच गोंधळ होत असे. दहा वर्षात त्याला चांगला अभ्यास कधीही जमला नाही आणि चांगले गुणही कधी घेता आले नाहीत. पुढे पुढे तर पेपरमध्ये देखील तो सिनेमाच्या पटकथा किंवा स्वतःच्या मनाच्या गोष्टी लिहून येत असे. बाईंची किती बोलणी त्याने यासाठी खाल्ली होती. बोलणे खाईपर्यंत तो अत्यंत मख्ख आणि गंभीर चेहर्याने उभा राही. बोलणे संपले की तो पुन्हा नॉर्मल मोडवर येऊन गप्पा मारणे सुरू करे. एक अभ्यास सोडला तर तो जगमित्र होता. संपूर्ण शाळेत त्याला न ओळखणारे कोणीही नव्हते. अभ्यास सोडून बाकी सगळ्या कामात तो तरबेज होता. वर्ग संपल्यावर बाईंचे सगळे सामान या वर्गातून त्या वर्गात नेण्यापासून ते मैदान स्वच्छ करण्यापर्यंत सगळी कामे तो एकहाती करत असे. ढोलपथकात तो ढोल फार छान वाजवत असे. मुले मुली कायम त्याच्या आजूबाजूला घोळका करून असत.
पाचवीत गेल्यावर त्याच्या अभ्यासाची खरी मजा झाली. इंग्रजी नावाच्या विषयाने त्याला जेरीस आणले. आतापर्यंत काठावर गुण घेत तो कसाबसा पुढच्या वर्गात गेला. कितीही लाल रेघा त्याच्या प्रगतीपुस्तकावर गेल्या तरी त्याच्या आईचा अंगठा येतच असे; कारण त्या लाल रेघेचा अर्थच आईला कळत नसे. आईने लाल रेघेबद्दल काही विचारलेच तर हा थाप ठोकत असे की ज्या विषयात चांगले गुण आहेत त्यात बाईंनी लाल रेघा ओढल्या आहेत. पण इंग्रजीने मात्र त्याचे धाबे दणाणले. पहिल्या घटक चाचणीत त्याला शून्य गुण मिळाले कारण एबीसीडी लिहिता आली नाही. इंग्रजी वाचनाचा तास म्हणजे तर त्याच्यासाठी संकट. त्या तासाला हजर राहावे लागू नये म्हणून त्याने जे काही बहाणे केलेले आहेत त्या बहाण्यांचे एक पुस्तक होऊ शकेल. ‘आज माझे इंग्रजी मौनव्रत आहे. आमच्याकडे मंगळवारी इंग्रजी बोलत नाहीत. आईने सांगितलय की आजच तुझा आजा गेलता तर आज काही इंग्रजी बोलू नको,’ असे काहीही तो सांगत असे. एके दिवशी मात्र विनोदला बाईंनी पकडलेच आणि इंग्रजी धडा वाचायला सांगितला. मुळात त्या दिवशी कुठलाही बहाणा न सांगता विनोद वाचनाच्या तासाला हजर कसा याचे आम्हाला आश्चर्य वाटले होते आणि बाईंनी वाच म्हणाल्यावर कुठलेही आढेवेढे न घेता हा वाचायला तयार झाला तेव्हा तर आमच्या तोंडात बोटेच घालायची बाकी होती. आणि यापेक्षा जास्त मोठे आश्चर्य म्हणजे कुठेही न अडखळता विनोदने धडा वाचला. अगदी नीट वाचला. बाईंची शाबासकी मिळवली. आम्ही मात्र तास संपल्यावर त्याला घेराव घातला. त्याचे पुस्तक तपासले. पण काहीही सापडले नाही. त्याने मात्र ‘इंग्लिशचा मी आता व्यवस्थित अभ्यास करू लागलो आहे’ अशी शेखी मिरवली.
त्यानंतर बरेच महिने तो छान वाचत राहिला. विनोदने खरेच इंग्रजी विषयात गती मिळवली आहे यात आम्हाला काही शंकाच राहिली नाही. पण एके दिवशी त्याचे बिंग फुटलेच. त्याला धडा वाचायला सांगितला, पण तो पुन्हा जुन्या पद्धतीने बहाणे करू लागला. पुस्तक विसरले आहे म्हणाला. बाईंनी त्यांचे पुस्तक त्याला दिले तर म्हणाला, ‘आईने शप्पथ घातलीय, कोणाच्या वस्तू वापरशील तर उजव्या मांडीवर बेंड येईल.’ कुठल्याही दिवशी स्वतःचे पेन, पेन्सिल, खोडरबर असे काहीही न वापरता इतरांच्या वस्तू वापरून शिकलेला विनोद असले बहाणे सांगत होता. पण, बाईंनी त्याला खाली बसवले. आता मात्र आमच्या डोक्यात शंकेची पाल चुकचुकली. पुढच्या वाचनाच्या दिवशी जेव्हा तो पुन्हा आत्मविश्वासाने वाचू लागला, तेव्हा बाई मागून गुपचूप त्याच्या जवळ जाऊन उभ्या राहिल्या. आपल्या तडफदार इंग्रजी वाचनाची जादू करण्यात विनोद इतका मग्न झाला होता की बाई मागे येऊन उभ्या आहेत हे त्याला समजलेच नाही. बाईंनी त्याच्या हातातून पुस्तक खसकन ओढून घेतले. पुस्तकाच्या आत एक वही लपवलेली होती. त्यात सगळे इंग्रजी धडे मराठीत म्हणजे देवनागरी लिपीत लिहून आणलेले होते. पण या प्रसंगाने डगमगेल तो विनोद कसला! उलट नंतर आम्हालाच ओरडला, ‘मास्तरीण मागे येऊन उभी होती तर तुम्ही काय करत होता गं पोरींनो? राखी पौर्णिमेला राखी बांधता कशाला मग? त्या द्रौपदीने स्वतःची पैठणी फाडून दिली होती कृष्णासाठी आणि तुम्ही साधे बाईंच्या ओरड्यापासून मला वाचवू शकल्या नाहीत.’
विनोदने शाळा मात्र कधीही चुकवली नाही. आम्ही पाचवीत गेल्यावर त्याचे वडील बांधकामाच्या साईटवरील बिल्डिंगवरून पडून वारले. तरीही तो दुसर्याच दिवशी शाळेत आला. कदाचित वडिलांनी बरोबर नसण्याची सवय जुनीच असेल, आता फक्त शरीराने ते गेले होते.
त्याची परिस्थिती आत्यंतिक गरिबीची होती. सगळे मिळून डबा खायला बसत. पण तो कधीही कोणाच्या डब्यातील काहीही खात नसे. त्याच्या डब्यात नेहमी शिळी भाकरी आणि ठेचा असे. आमच्या डब्यातील घे म्हंटले तरीही तो घेत नसे. म्हणायचा की ताज्या अन्नाला जीभ लवकर चटावते, त्याची सवय करून घ्यायची नाही.
आपल्याला अभ्यास येत नाही याची लाज त्याने कधीही बाळगली नाही. उलट तो हुशार मुलांना स्कॉलर म्हणत असे. ‘आपल्याला कुठे एवढी अक्कल आहे. पोटापुरते गुण मिळाले बस झाले,’ असे निर्लज्जपणे म्हणत असे. थापा, गप्पा, गोष्टी यानेच त्याने शाळा गाजवली. तो गरीब असल्याची खंत त्याला नव्हती की अजून पैसा हवा अशी आस देखील त्याने धरली नव्हती. तो आम्हाला दिसला तसाच होता की अजून कसा याचा विचार करण्याचे आमचेही वय नव्हते. त्याच्या थापा ऐकून, त्या थापा आम्हाला ऐकवताना त्याच्या चेहेर्यावरचा आनंद बघून आम्हालादेखील आनंद मिळत असे. तो आमच्यासाठी जास्त महत्वाचा होता.
आमचा त्याचा संपर्क दहावीनंतर सुटला. नंतर कधी तो कुठल्या संमेलनाला देखील आला नाही. पण असे ऐकले आहे की दहावीनंतर त्याने मेकॅनिकलचा डिप्लोमा केला. छोटी नोकरी धरली. आईने त्याला फार कष्टाने मोठे केले होते. तिचे पांग फेडले. तीन खोल्यांचे छोटे घर बांधले. त्याला ‘रखमा आशीर्वाद’ असे आईचे नाव दिले. शाळेच्या परीक्षेत त्याला चांगले गुण घेता आले नसले तरी जगण्याच्या शाळेत त्याने पैकीच्या पैकी गुण घेतलेले होते.
मी काय म्हणते की जर तुम्हाला अजूनही कुठे तरी तपकिरी डोळ्यांचा, बटनासारखे छोटे नाक असलेला, चपचपीत तेल लावून केस बसवलेला, गळ्यात काळा दोरा घातलेला आणि गोष्टीगोष्टीत थापा मारून बोलणारा पण त्या थापांमधून तुम्हाला न फसवता केवळ आनंद देणारा कोणी भेटला तर मला येऊन सांगाल का?
कदाचित तो आमचा विनोद असेल.