समाजाचा निरक्षर ते साक्षरतेचा प्रवास रीलबाज समाजमाध्यमांमुळे साक्षरतेकडून निरक्षरतेकडे चालला आहे. कधी काळी वर्तमानपत्रात छापून आलेली बातमी म्हणजे सत्य होतं. आता मात्र हायपर-स्पीड न्यूज आणि टीआरपीच्या खेळात सत्य कुठे हरवलंय हेच कळेनासं झालं आहे. स ला ते स ला ना ते हा सिनेमा या नव्या पत्रकारितेच्या वास्तवावर भाष्य करतो. तो ग्रामीण पत्रकारिता, सत्तेच्या हातातील माध्यमं, माध्यमांमधली सरंजामशाही, पर्यावरण विरुद्ध मानवी हाव, नीतिमत्ता अशा अनेक घटकांचा अन्वयार्थ लावत जातो.
ताडोबाच्या जंगलातील नयनरम्य रस्त्यावरील थरारक पाठलाग प्रसंगाने चित्रपट सुरू होतो… कट् टू… सिनेमाच्या मुख्य नायकाच्या गाडीला अपघात होऊन तो घायाळ झालाय. हा अपघात म्हणावा की घातपात? वर्तमान काळ आणि भूतकाळ यांची सांगड घालून सिनेमाची गोष्ट सुरू होते. चंद्रपुरातील एका कीर्तनकाराच्या घरात जन्मलेला पण बापाचं छत्र हरवलेला तेजस देशमुख (साईंकित कामत) हा जुगाडू वृत्तीचा मुलगा. कॅरम पार्लर चालवणार्या सोबतच पैसे मिळवायचे वेगवेगळे मार्ग शोधत असतो. वयाच्या पस्तिशीपर्यंत १३५ कोटी रुपये कमवून मग निवृत्ती घ्यायची अन् पुढचं आयुष्य सुखात घालवायचं हे त्याचे स्वप्न. पैसे कमविण्यासाठी तेजस मोबाइलवर इंटरेस्टिंग व्हिडीओ बनवून यूट्युबवर पोस्ट करतोय, त्यातून थोडीफार कमाई होतेय. विहिरीत पडलेल्या एका वाघिणीच्या व्हिडीओमुळे त्याला मुंबईतील महाराष्ट्र माझा या वृत्तवाहिनीत पार्ट टाइम रिपोर्टरचे (स्ट्रिंगरचे) काम मिळते. मुंबई भेटीत तो समिधाच्या (रिचा अग्निहोत्री) प्रेमात पडतो आणि तिला आपलं लक मानतो. स्ट्रिंगर ते रिपोर्टर या प्रवासात तेजस अन् त्याचं जीवन झपाट्याने बदलत जातं. त्याच्या व्यक्तिमत्त्वातील बदल पत्नी समिधाच्या नजरेतून सुटत नाहीत. १३५ कोटी रुपये रुपयांच्या मोहजालातून बाहेर पडत सामान्य जीवन जगण्याची गळ ती त्याला घालते. मात्र, तेजस त्यापुढे निघून गेलेला असतो. एका वाघिणीच्या मृत्यूनं दोघांच्या आयुष्यात वादळ निर्माण होतं. तेजसचे स्वप्न पूर्ण होतं का तो अपघातातून बचावतो का? हे प्रत्यक्ष चित्रपटात अनुभवण्याची मजा आहे.
सिनेमाची पटकथा अत्यंत कल्पकतेने बांधली आहे. सिनेमा सतत भूतकाळ आणि वर्तमानाच्या टप्प्यात फिरत राहतो, पण तरीही त्याचा गोंधळ होत नाही. दिग्दर्शक संतोष कोल्हो यांनी हा प्रवास सहजतेने घडवला आहे. प्रतीकात्मकतेचाही वापर त्यांनी केला आहे. समिधाच्या घरी तेजसच्या धक्क्यानं फिश बाउल खाली पडतो, त्यातील मासोळी बाहेर तडफडते. ‘या छोट्याशा बाउलमधून बाहेर पडून समुद्रात जायला हवं’, या तत्त्वज्ञानातून तेजसचे स्वप्न विचारांच्या रूपात बाहेर पडतात. तेजसचा अॅक्सिडेंट होण्यापूर्वी कोळी जाळं विणतोय, साप बिळातून बाहेर येतोय अशा प्रतीकांमधून काहीतरी अघटित घडणार आहे, याची चाहूल लागते.
श्रीकांत बोजेवार यांच्या वैदर्भीय भाषेतील संवादाने सिनेमाला अजून रंगत आणली आहे. त्यांच्यामुळे प्रेक्षक विदर्भाच्या मातीशी जोडला जातो. सिनेमा समजण्यात त्याने कुठेही अडथळा येत नाही किंवा रंजकतेत खंड पडत नाही. पैशाचा हव्यास-कौटुंबिक सौख्य, प्रियकर-प्रेयसी, नवरा-बायको, पत्रकार-सामान्य नागरिक, पर्यावरण-प्रकल्प या प्रत्येक नात्यात लपलेला संघर्ष सिनेमात सहज गुंफला आहे. निरागस प्रेमकहाणी ते पत्रकारितेतील अवमूल्यन असा मोठा पैस सिनेमा मांडतो.
हिंदी-मराठीत विविध भूमिकांमध्ये छाप सोडणार्या छाया कदम यांनी या सिनेमात पोलिस अधिकार्याच्या भूमिकेत वर्दीतील माणूसपण दाखवले आहे. पैशासाठी वाटेल ते करणारा हसनभाई (खाण माफिया) ही भूमिका साकारताना उपेंद्र लिमये यांनी राजकीय वरदहस्तामुळे आलेली बेफिकिरी दाखवताना खर्जातील आवाजाचा उत्तम वापर केला आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेतून प्रसिद्ध झालेला साईंकित कामत इथे तेजसच्या व्यक्तिरेखेत आहे. सुरुवातीला ग्रामीण भासणारा, गळ्याभोवती अभिमानाने गमछा गुंडाळणारा स्ट्रिंगर जसजसा पत्रकार बनतो, तसतसा त्याच्यात होणारे सूक्ष्म बदल साईंकितने कमालीच्या सफाईने दर्शविले आहेत. कीर्तनकाराचे संस्कार त्याचा चांगुलपणा दाखवतात, तर १३५ कोटींचे स्वप्न त्याला एक निर्दय पत्रकार बनवते. ही मनाची घालमेल त्याने उत्तम दर्शविली आहे. तोतरेपणावर मात करून प्रसंगी कणखर निर्णय घेणारी समिधा ऋचा अग्निहोत्रीने मेहनतीने साकारली आहे.
पत्रकार आणि खाणमालक यांच्या संघर्षात जिल्ह्यातील सत्ताकारण आणि राजकारण दिसलं नाही ही उणीव जाणवते. तेजस आणि समिधाच्या नात्यावर भर दिलेला सुरुवातीचा भाग थोडा लांबला आहे. मात्र, एकदा सिनेमाने गती घेतली की तो शेवटपर्यंत प्रेक्षकांना सोडत नाही. पुढे काय होईल याची उत्सुकता कायम ठेवत सिनेमाचा शेवट सिनेमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो हे सिनेमाच्या टीमचं यश आहे.
ओटीटीमुळे जागतिक दर्जाचे सिनेमे पाहून मराठी प्रेक्षकांची अभिरुची बदलली आहे. ताम झाम, बिग बजेट, स्टार पॉवर यापेक्षा चांगल्या आशयावर विश्वास ठेवणार्या प्रेक्षकांसाठी ‘स ला ते स ला ना ते’ हा पाहण्यासारखा सिनेमा आहे.