दोन, तीन, चार! तो पावलं मोजतो. चार पावलात स्टँडबाहेर उभा!
काय आहे ना? फेब्रुवारीत थंडी कमी झाली तरी मधनंआधनं अशे बोचरे वारे सावलीत बसलं का झोंबात्या. गार लागतं! मग उन्हात उभं राहून काटा मोडायचा!
तसं त्याला स्टँडवर आज यावं लागलं, ब्राम्हणाकडून कुंडली आणण्यासाठी. बायांच्या डोक्यात असतंय ना? ह्या गावचा बामन चांगली कुंडली काढून देतो? त्या गावचा बामन बरी शांती करतो, असलं काही? हा तसंच त्याच्या म्हातारीच्या डोक्यात कुणी भरलंय! मग काय? घरातून आदेश मिळाला, जाय त्या गावात अन् घेऊन ये कुंडली! म्हणून तो निघाला! हा आता त्याचा गंज इश्वास नाहीये. पण घरच्यांनी सांगितलं तर ऐकावा लागतं ना?
एवढ्यात घरच्यांच्या डोक्यात त्याचं लग्नं घुसलंय! पटकन भाजून दिलं म्हणजे त्याचा तो पाहिल म्हणून! त्यावर तो बोलला नाही, असं थोडंच आहे? पण…
तितक्यात एक बस बर्मनगत म्युझिक देत उलट्या बाजूनं येती. थांबती. चारदोन शाळेची पोरं उतरत्या! ह्या दिसात सराव परीक्षायचा हंगाम चालू असतोच. यांचंबी तसंच काही असंल! ती काय? ती पोरं, पहिल्याचं काय, तिसरं कसं लिहायचं होतं, असलं काही बोलत गल्ल्यांत गुडूप व्हत्या. तो उभाच! फुफाट्यागत त्याच्या डोळ्यांपुढून त्याच्या शाळेच्या दिसाचे आठव पुन्हा उडू लागत्या!
ह्याच स्टँडवर पेपर देऊन आल्यावर कल्ला व्हायचा. कुणी पूर्ण सोडवल्याच्या भपार्या मारायचं तर कुणाच्या शंभरपैकी शंभर कॉप्या बरोबर आलेल्या असायच्या. तर एकदोन रडूवीरांना नेमकी काही प्रश्नं रडवून गेलेली असायची. बरं दुसरीकडं डिटेलवार उजळणी चालू असायची. कधी कधी राडे व्हायचे. कधी अख्खा ग्रुप गुलाबी मूडमधी जायचा. त्याच्यात पहिली क्रश, दुसरं प्रेमप्रकरण, तिसरं… नको यार! त्रास होतो. तो चटकन एक पाऊल मागं सरकून मान वाकडी करून स्टँडच्या भितीवर लावलेलं घड्याळ बघतो. येऊन दहा मिनिटं झाली. पण असलं काही आठवायला लागलं का सगळी उलघाल होती. दिवस किती सर्रकन धावले नाही? त्यानंतर कॉलेज झालं. चार ठिकाणी कामं बदलून झाले. त्याला बी दहा वर्षे झालीत की?
पत्रे वाजवीत एक नवी हिरव्या-पिवळ्या रंगाची बस येती. बसावा का? फुल्ल भरेल दिसती. पण तिच्यानंतर थेट तासानं बस आहे. कॉलेजात असताना भरेल बस सोडूनच दिल्या जायच्या. एखादी निवांत बस भेटली म्हणजे जरा नजारा बघत आणि… यायला काय आठवतंय? तो चटकन बसमधी चढतो. तशी कंडक्टर बेल देतो. गाडी निघते. तो चालत्या गाडीचं दार ओढतो. मागं जावं का? नाही बरंय इथंच! कॉलेजला असताना दारात उभं राहून जायचं एक फॅड होतं, भासमारी पोरं दारात उभी राहून हवा करायची. शायनिंग मारायची! दाराच्या खिडकीतून बाहेर बघताना गार वारा त्याचे केस उडवतो. तो हातानं केस सावरतो.
‘तिकीट? तिकीट??’ कंडक्टर गळ्यातलं मशीन सांभाळीत पुढं येतो. तो खिश्यातून हिरवा गांधी काढून कंडक्टर पुढं धरतो नि बोटानं खुणावतो. कंडक्टर त्याप्रमाणे एक तिकिटं काढून सोबत निळ्या-लाल लहाण्या नोटा काढून त्याच्याकडं देतो. तो न मोजताच खिश्यात घालतो. न् पुन्हा उभा, बाहेर बघत!
कुठलं गाव येतंय बहुतेक. टपर्या-टुपर्या दिसू लागत्या. तशी मागची काही बाया-माणसं बाचकी-बोचकी, पिसुड्या घेऊन उतरायला पुढं तयारीनं येत्या. आता त्यांना उतरायचं म्हणजे बाजूला व्हावं लागंल. तो पायर्या चढून मागं येतो. उभं राहायला पण जागा नाहीय. दाटीवाटीतून मागं जात असताना एक सीटवरून एक म्हातारा हळूच उठतो. हातात काही आहेराची पिशवी असंल. इथं बसावं का? नको! बाजूला पंजाबी टॉप, जीन्स घातलेली, स्कार्फ गुंडाळलेली कुणी पोरगी दिसती. उगाच… आयला ती बस म्हणून खुणावतेय.
‘मावशी त्याच्यासाठी जागा धरलीय मी!’ ती त्या जागेवर बॅग ठेऊ पाहणार्या एका काकूला बोलते. आवाज…? कुठंतरी ऐकल्यागत वाटतो ना?
‘फोन झाला असंल बाई! इथं बाप-भाऊये! तू पुढल्या श्टॉपवर थांब! तेच्याशिवाय का..?’ काकू फणकार्यानं ताण मारीत बडबडत मागं जाते.
त्याला उगाच अवघडल्यावानी होतं. एकतर सारी बस टकामका बघायला लागली, काकू नाराज झाली अन् झेंगाट नसताना… एक मिनिट! वळख नसताना ह्या स्कार्फवाल्या पोरीनं भांडून जागा का धरली? तो शंकेनं बघू लागतो.
‘बस ना!!’ ती चिडून बोलते, तशी त्याची तंद्री भंगते. तो हुकुमाबरोबर तिच्या शेजारी बसतो. पण दोन वीत अंतर ठेवून. नको पब्लिकला काही इशू! आणि उगाच जागा धरली म्हणून कुठल्या बी मुलीला खेटणं बरं नाही ना?
तो बसतो. पण ही आहे कोण? ह्या प्रश्नानं त्याच्या डोक्यात काहूर माजतं. नाव विचारावा का? हा तिचा इन्सल्ट होईल ना? म्हणशील, एवढी जागा धरली. आणि नावही माहीत नाही म्हणजे..! मग करावं काय? स्कार्फ?
विचार डोक्यात यायची वेळ आणि तिची स्कार्फ काढण्याची वेळ एकच होते. हळुवार हातांनी शिंपलं उघडावं आणि आतला मोती चकाकावा. तसं झालं! अरे ही तर ती! हो तीच! ती नाही का..? पण ही तीच आहे का? सातव्या यत्तेतल्या स्कॉलरशिपच्या ट्युशनमधली..???
यायला काय सुंदर दिसते रे ही? लग्नं झालं असेल का हिचं? कश्याला रिकाम्या चौकश्या? बस म्हंटली का बसावं! जागा मिळाली ना? मग आणखी काय पाहिजे होतं?
‘काय करतोस सध्या?’ तिचा दुखरा प्रश्न! काय उत्तर द्यावा बरं? बाकीची पोरं कंपन्याकुंपन्यांत मोठ्या पोष्टीवर कामाला आहेत. तसं सांगावा आणि पुढल्या स्टॉपला तिनं बळंच उतरवून ‘दे पार्टी!’ म्हणावं! म्हणजे घ्या..! खिश्यात मोजून सातशे रुपडे आहेत. बामनाचे पैसे वेगळे ठेवलेत पाकिटात. आईनं दिलेत तशे. ना ते मोजलेत, ना बघितलेत! त्या सातशे रुपयांत रिटर्नचं भाडं, रस्त्यात भूकबिक लागली तर वडे-बिडे खाल्ले तर ते! आणि उरलेल्यात पाणीबिनी, इमर्जन्सी असं सगळं आलं.
‘अरे! मी विचारलं, काय करतोस?’ तिचा दुसर्यांदा सवाल. आयला ‘तू कसाय? काय चाललं?’ असले प्रश्न हिला सुचत नसतील का?
‘काँट्रॅक्ट बेसिसवर कामाला जातो… एक ठिकाणी!’ पडलेल्या चेहर्यानं तो उत्तर देतो.
‘कुठं ट्राय नाही केलंस? एखादी एक्झाम वगैरे?’ तिचा पुढला प्रश्न! सातवीत हिला फक्त उत्तरंच सुचायची. आणि आता प्रश्न पडताय.
‘करायला फी लागते. जाण्यायेण्याचं भाडं लागतं. अभ्यासाला वेळ लागतो. सगळं जमवायचं म्हणजे नाही शक्य होत!’ तो थेट उत्तर देतो.
‘बरोबर! प्रपंच मागे लागल्यावर हिशेब सुचतोच,’ किंचित हसत ती बोलते.
‘म्हणजे? काय संबंध?’ नेमकं हिला म्हणायचं काय आहे? तो चक्रावल्या भेणं विचारतो.
‘मग तुझं लग्नं झालंय ना?’ ती खोद घालून विचारते.
‘नाही!’ त्याचं एक शब्दात उत्तर. हिनं आज बुद्धीमत्ता चाचणीचे पेपर नाष्ट्याला खाल्ले होते की काय? एकामागोमाग एक प्रश्न?
‘अरे मी ऐकलं होतं तसं काही..!’ ती सारवासारव करू बघते. ‘मग कुठं काही बघताय की नाही घरचे?’ ही टिचकुल्या पाडतेय का? त्याच्या कपाळभर आठ्या पसरतात.
‘घरचे बघताय ना! पोर वयात आलं की घरच्यांना घोर लागतोच…’ आणखी काय सांगावं?
‘मग मुलगी कशी हवीय? काही अपेक्षा?’ अरे का बसलो मी हिच्याजवळ? शाळेत असताना बरी होती ना ही?
‘मुलगी..? तुझ्यासारखी! कमावती हवी! रंग-रूप-शिक्षण… तू करतेस का लग्न माझ्याशी?’ मग अंगावर आल्यावर शिंगावरच घ्यावं की? त्यानं तेच केलं.
‘नाही… नाही! केलं असतं पण तुझी जात वेगळीय ना? मग घरचे…’ गडबडलेल्या तिला चाचरताना जातीचं कारण गावतं. बुडत्याला काडीचा आधार!
‘जात..?’ तो मोठ्याने हसतो. इतकं की मागचे पुढचे बसलेले प्रवासी त्यांच्याकडं बघू लागतात.
‘ऐ हळू बोल नं! म्हणजे मला तसं बोलायचं नव्हतं! मी तशी जात वगैरे मानत नाही. पण तुला पक्की नोकरी नाहीय ना? त्यात शेती वगैरे… घरबीर! ते सगळं विचारतील ना घरचे? सॉरी! ममीपपा जरा ओल्ड फॅशन्ड आहेत, त्यामुळं…’ ती जाम सारवासारव करू बघते.
‘अगं असू दे! मी काही इतकं सिरियसली विचारलं नाही. तू जी नकाराची कारणं देतेय, तीच रोज मी ऐकतोय. त्यामुळं त्यात नवीन नाही काही! आणि आपलं राज्यच फुल्ल पुरोगामी फुले-शाहू-आंबेडकरांचं आहे ना? त्यामुळं जात कुणी मानतच नाही. फक्त जोडीदार जातीतला मिळावा ही अपेक्षा धरतो. त्यात काय?’ तो हसून बोलतो, ‘ते जाऊ दे! तुझं बरं चाललंय ना?’
‘हो! म्हणजे पपांच्या ओळखीने बँकेत जॉब लागला आहे,’ अवघडलेल्या तिचं उत्तर येतं.
‘ते माहीत आहे गं! मला ते विचारायचंच नव्हतं…’ त्याला काही वेगळं उत्तर हवंय तर…
‘पपांनी एक चांगलं स्थळ बघितलंय. ते उद्या बघायला येताय. पपांचा आग्रह आहे, सगळं मनासारखं असलं तर एवढ्यात साखरपुडा करायचा… पण मला नाही करायचं लग्न! मी खूपदा सांगितलं, मला श्रीमंताघरची शोभेची बाहुली नाही बनायचं! पण कुणी ऐकतच नाही!’ ती डोळ्यांच्या कडा पुसू लागते.
‘मग किती दिवस अशी एकटी राहणार आहेस? मुलांना शक्य आहे, घरदार सोडून एकट्यानं हिंडणं. पण तरण्या मुलीनं रस्त्यानं आणि उजळ माथ्यानं फिरू शकण्याइतकं वातावरण सुरक्षित नाहीय आपल्याकडं! रोज बातम्या बघतेस ना?’ तो समजावणीच्या सुरात तिला सांगतो.
‘मग तू करशील माझ्याशी लग्न?’ ती एकाएकी पवित्राच बदलते.
‘लग्न? इथं वर्तमानात समस्यांच्या निखार्यावरून चालताना इश्काच्या नुसत्या झुळकीनं देखील जिवाला गारवा मिळतो. त्यात कुणी सदाबहार जीवनसाथी मिळाला तर उत्तमच! पण माझ्या पायाखालचे निखारे तुझे पाय पोळणार नाहीत, याची मला आधी काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी थोडा वेळ लागेल. तोवर थांबशील?’
त्याच्या प्रश्नामागून घंटी वाजते. त्याचा स्टॉप दिसू लागतो…