टाणा स्टेशनला नेमणुकीस होतो. एके दिवशी पोलीस स्टेशनला बसलो होतो, तेव्हा एका तरुण महिलेने जाळून घेतल्याची खबर येऊन थडकली. तालुक्याच्या ठिकाणी होणार्या गुन्ह्यांमध्ये तरुण महिलेचा अशा प्रकारे होणार्या मृत्यूला गंभीर स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे माहिती कानावर पडते ना पडते तोच एका क्षणाचाही विलंब न करता ताबडतोब दोन पंचांना घेऊन जीपने घटना घडली त्या ठिकाणी रवाना झालो.
पोलीस स्टेशनपासून ते ठिकाण पाच ते सात मिनिटाच्या अंतरावर होते. घटनास्थळी पोहचलो तेव्हा मला त्या घरातून येणारा धूर दिसला. अशी घटना क्वचितच घडत असल्याने घराजवळ काय झाले ते पाहण्यासाठी, जाणून घेण्यासाठी त्या परिसरातील बघ्यांची मोठ्या संख्यने गर्दी केली होती. त्यामुळे एरवी मोकळा दिसणारा तो रस्ता लोकांच्या गर्दीने गजबजून गेला होता. घराचा मुख्य दरवाजा आतून बंद होता. दार आतून बंद आहे, ते ढकलून उघडण्याचा आम्ही प्रयत्न केला पण ते उघडत नाही, असे तिथे जमलेल्या लोकांनी सांगितले. दोन पंचासमक्ष तो आम्ही तोडून उघडला.
दाराची आतील कडी बंद होती, दार ढकलून तोडल्याने कडी स्क्रूसकट बाहेर आलेली दिसत होती. घरात धुराचे साम्राज्य पसरलेले होते. समोर हॉल आणि आत किचन होते. सुमारे २५ वर्षे वयाची एक महिला तिथे पडलेली होती. तिचा श्वास थांबलेला दिसला. ती मृत झालेली असावी, हे लक्षात आले. तरीही डॉक्टरांकडून तपासून ती जिवंत असल्यास वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी जाड चादरीचा स्ट्रेचरसारखा उपयोग करून त्या महिलेस ग्रामीण रुग्णालयात एका कर्मचार्यासोबत पाठवून दिले.
दोन्ही पंचासमक्ष पाहणी करता घर हे तीन खोल्यांचे असल्याचं आढळून आलं. घरात त्या महिलेव्यतिरिक्त कोणी नव्हते. त्या घराला आत येण्यासाठी आणखी काय दुसरा रस्ता, खिडकी ,दरवाजा किंवा जेथून कोणी आत जाऊ येऊ शकेल अशी जागा आहे का, हे पाहिले. परंतु तसे काहीच दिसून आले नाही. घटना घडलेल्या ठिकाणी जमिनीवर रॉकेलचे डाग दिसत होते, त्याचा दर्प येत होता. बाजूलाच अर्धवट जळलेल्या दोन तीन काड्या आणि माचीस दिसून आली. किचनमधील छत धुराने काळवंडलेले होते. जळालेल्या साडीचे तुकडे इतस्तत: पसरलेले दिसत होते. पंचासमक्ष रॉकेलचा कॅन, जळलेल्या काड्या, कपड्यांचे तुकडे, आदी वस्तू पंचनामा करून जप्त करण्यात आल्या. रुग्णालयातून महिला मरण पावलेली असल्याची खबर मिळाली. पोस्टमॉर्टेम केल्यावर डॉक्टरांनी महिलेचा मृत्यू जाळून झाल्याचे सांगितले.
मयत मुलीचे वडील नाशिकला सरकारी खात्यात अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी मुलीचा डॉक्टर नवरा, मुलीच्या सासरची माणसे अशांच्या ‘जाचामुळेच मुलीने आत्महत्या केली’ अशी फिर्याद दिली. त्याप्रमाणे भारतीय दंडसंहिता कलम ३०६, ४९८-अ इत्यादी कलमाप्रमाणे फिर्याद दाखल केली आणि तपास सुरू केला. मुलीचे वडील नाशिकला जाऊन वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना भेटले. साहेबांनी सांगितले की, ‘भामरे चांगले अधिकारी आहेत ते केस व्यवस्थित हँडल करतील, उत्तम तपास करतील’.
या काळात माझा नाशिक जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झाल्याने जळगाव जिल्ह्यात बदली झाली होती, पण या केसमुळे ती रद्द झाली आणि माझा तिथला मुक्काम एक वर्षाने वाढला. या दरम्यान मुलीचे वडील मला व उपविभागीय पोलीस अधिकारी लक्ष्मणराव कोल्हटकर यांना अनेकदा भेटले होते, प्रत्येक वेळी त्यांचा आग्रह असायचा तो म्हणजे, आम्ही डॉक्टर जावयांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, त्यांना आयपीसी ३०२ (म्हणजे खुनाचे) कलम लावावे. मी आणि कोल्हटकर साहेबांनी त्यांना याबाबत अनेकदा समजावून सांगितले की आम्ही त्या घराचा दरवाजा तोडून उघडलेला आहे आणि घराला दरवाजाव्यतिरिक्त खिडकी किंवा तत्सम कोणतीही जागा नाही की येथून कोणी बाहेर जाऊ-येऊ शकेल. त्यामुळे या घटनेत आयपीसी ३०२ लावायचा प्रश्नच येत नाही. व्हायचे तेच झाले गुन्ह्यासाठी हेच तपासी अंमलदार असावेत असा हट्ट धरणारे ते गृहस्थ आता माझ्याविरुद्ध तक्रारी करू लागले होते. सुदैवाने उपविभागीय अधिकारी कोल्हटकर व वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांना वस्तुस्थितीची पूर्ण माहिती होती. त्यांनी कागदपत्रे व्यवस्थित बघितलेली होती त्यामुळे फारसा त्रास झाला नाही. मात्र, तेव्हा वर्तमानपत्रात उलट सुलट बातम्या रोज येत राहिल्या. तालुक्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू होती.
या दरम्यान एक मजेशीर घटना घडली. नाशिक येथून महिला संघटनेचे प्रभावीपणे काम करणार्या कुसुमताई पटवर्धन सटाण्याला आल्या. त्या वयाने ज्येष्ठ व खूपच अनुभवी होत्या. त्यांनी माझी घरी भेट घेतली. त्यांच्याबरोबर तीन चार महिला पदाधिकारीही होत्या. मी वस्तुस्थिती समजावून सांगितली त्या समाधानी झाल्या. परंतु म्हणाल्या की असे प्रकार पुन्हा घडू नयेत, समाजात प्रबोधन व्हावे यासाठी आम्ही गावातून एक मोर्चा काढणार आहोत आणि या प्रकरणाचा निषेध करणार आहोत. मी मोर्चाला परवानगी दिली. माझे नवीनच लग्न झालेले होते पत्नी घरीच होती. त्यांचीही कुसमताईशी ओळख झाली. महिला प्रतिनिधी म्हणाल्या की, ‘तुमच्या पत्नीला मोर्चात घेऊन जाऊ का?’ यावर मी म्हणालो, ती स्वतंत्र नागरिक आहे तिने ठरवावे जायचे की नाही. आण्िा आमची बायकोही त्या मोर्चाला गेली.
दरम्यान मी पोलीस स्टेशनला काम करीत बसलो असतानाच पोलीस स्टेशनचे हवालदार अण्णा अहिरे, जे मोर्च्याचा बंदोबस्त करीत होते ते जोरात सायकल मारीत पोलीस स्टेशनला आले आणि म्हणाले, ‘मोर्च्याचे रूपांतर एसटी स्टॅण्डजवळ सभेत झाले आहे आणि कोणीतरी एक बाई मध्येच भाषण करते आहे आणि ती बाई पोलिसांना व तुम्हालाही वाईट साईट बोलते आहे आणि हे ऐकून मॅडम (सौ. भामरे) रडायला लागल्या आहेत. मला गंमत आणि काळजी वाटली. मी ताबडतोब एक साध्या वेशातला पोलीस पाठवून दिला आणि तिला रिक्षातून घरी रवाना करायला सांगितले. मोर्चा पोलीस स्टेशनला निवेदन घेऊन आला तेव्हा कळले की कोणीतरी आगंतुक महिलेने माइक हातात घेऊन तो प्रकार केलेला होता. नंतर घरी जाऊन बायकोची समजूत काढली. आता केव्हा तरी आठवण आली की आम्हा दोघांनाही त्यांचे हसू येते (आता ती रडल्याचे कबूल करीत नाही).
दरम्यान तपासात डॉक्टर आणि त्याच्या घरचे लोक यांच्याविरुद्ध पुरावा मिळाल्याने त्यांना अटक करून कोर्टात दोषारोप पत्र पाठवले. पैसे आणि इतर गोष्टी मिळवण्यासाठी त्या मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून तिचा डॉक्टर नवरा आणि घरातील कुटुंब यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र कोर्टात पाठवण्यात आले. दरम्यान, आम्ही मुलीच्या वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे गुन्ह्यात (आयपीसी ३०२) हे खुनाचे कलम न लावल्यामुळे तिचे वडील प्रचंड नाराज झाले होते, ते डॉक्टर आणि पोलिसांवर चिडून होते. अधून मधून ‘तशा’ मजकुराचे तक्रारींचे अर्ज वरिष्ठांकडे जात होते.
आरोपी डॉक्टर ज्या घरात राहात होता, त्या घराचा दरवाजा लाकडाचा, दुपाखी (दोन फळ्यांचा) होता. एके दिवशी सकाळी वर्तमानपत्र घेण्यासाठी डॉक्टरांनी दरवाजा उघडला. त्यांच्या सुदैवाने त्यांनी दोन दरवाजांपैकी डाव्या बाजूचा दरवाजा उघडला आणि बाहेरून वर्तमानपत्र घेण्यासाठी वाकले असताना त्यांना संशय आला. पायरीवर कॅरीबॅगसारखे प्लॅस्टिकची काहीतरी वस्तू ठेवलेली आहे आणि त्यातून गेलेली एक दोरी घराच्या न उघडलेल्या दरवाजाला बांधलेली दिसून आली. त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशनला फोन करून हा प्रकार कळवला. पोलीस आले, त्यांनी बघितले तर तो शक्तिशाली बॉम्ब होता. त्याची दोरी न उघडलेल्या दरवाजाला बांधलेली होती. जर डॉक्टरांनी उजव्या बाजूचा दरवाजा उघडला असता तर दोरीला बांधलेले स्विच ऑन झाले असते आणि त्या बॉम्बचा स्फोट झाला असता. पोलिसांनी बॉम्बशोधक पथकाला ताबडतोब बोलावून घेतले. त्यांनी तो बॉम्ब जंगलात नेऊन निकामी केला. केवळ नशीब बलवत्तर म्हणून डॉक्टर त्या बॉम्बस्फोटातून वाचले.
या प्रकाराबद्दल पोलीस स्टेशनला संबंधित कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला. बॉम्ब लावण्याचे कृत्य करणारे आरोपी मध्य प्रदेशातील होते. आपल्या मुलीच्या आत्महत्येच्या गुन्ह्यास आयपीसी ३०२ लावण्याचा आग्रह करता करता सासरेबुवा स्वत:च जावयाचा ३०२ करायला निघाले होते…
– राजेंद्र भामरे
(लेखक पुण्याचे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत.)