देव तुमच्यावर प्रसन्न झाला आणि त्याने तीन वर देतो असं सांगितलं, तर त्याच्याकडे काय मागाल?
– प्रीती सोनवणे, चेंबूर
तुम्ही म्हणालात म्हणून… खात्यात १५ लाख येऊ देत, मुंबई-गोवा हायवे पूर्ण होऊ देत, निवडणुका बॅलेट पेपरवर होऊ देत, अशा मागण्या मागितल्या तर ती देवाचीच परीक्षा घेतल्यासारखी होईल. मग तुम्हीच आम्हाला लिब्रांडू म्हणाल… सो देवाकडे काय मागायचं हे आमचं आम्हाला ठरवू दे… ते पण दुसरा ठरवायला लागला, तर काही दिवसांनी देवाने आम्हाला काय द्यायचं हे पण दुसराच ठरवायला लागेल… हे तुम्हाला चालेल? त्यापेक्षा तुम्ही तुम्हाला हवं ते देवाकडे मागा. आम्ही देवाकडे एकच मागणं मागतो, ‘सगळ्यांना’ चांगली बुद्धी दे.. आता आजूबाजूच्या लोकांची बुद्धी बघता देव आमच ऐकतो की नाही तुम्हीच ठरवा!
भारत विश्वगुरू बनलेला असताना, गुजरात राज्य हे जगातल्या कोणत्याही देशाच्या बरोबरीला आलेलं असताना लाखो रुपये खर्च करून, जिवावर उदार होऊन अमेरिकेत बेकायदा घुसखोरी करण्याचा मूर्खपणा काही भारतीय लोक का बरं करत असतील? तुमचा काय अंदाज?
– महेश केंद्रे, यवतमाळ
मग अमेरिकेतील ‘आपल्या इव्हेंट’साठी माणसं काय यवतमाळमधून आणणार होतात का? भारत विश्वगुरू बनला आहे हे जगाला यवतमाळमधून ओरडून सांगणार का? पडलेल्या रुपयाचा (रस्त्यात पडलेल्या नाही) फायदा यवतमाळमध्ये राहणारे घेणार का? त्या पडलेल्या रुपयाचा फायदा भारतात राहणार्यांना यवतमाळमध्ये राहणारे सांगणार का? अमेरिकेत घुसखोरी करणार्यांना मूर्ख म्हणण्याचा मूर्खपणा तुम्ही का करताय? त्यांना कायदेशीरपणे आपल्याकडे येऊ दिलं नाही हा अमेरिकेचा मूर्खपणा आहे.
तुमच्या घरी तुम्ही बायकोला भांडी घासण्यात मदत करता की ती तुम्हाला कपडे धुण्यात मदत करते?
– रेश्मा वाळके, धानोरी
तुम्ही स्वतःच्या घरावरून दुसर्याची घरं पारखताय का? बायकोला मदत करणं आणि बायकोची मदत घेणं ‘तुमचे हे’ करत असतील. भांडी घासणं, कपडे धुणं ही असली कामं आम्ही स्वतः करतो. ओके? उत्तर वाचून खुश झालात का? का आम्हाला असे अडचणीचे प्रश्न विचारता? उद्या आमची कामं वाढली तर तुम्ही मदतीला येणार आहात का?
पूर्ण कपडे घालून एखादा माणूस सार्वजनिक ठिकाणी जाहीर स्नान करतो, तेव्हा त्याचा अर्थ काय घ्यायचा?
– विनोद पाटील, शिरसी
तुम्हाला काय वाटतं… माणसाने सार्वजनिक ठिकाणी जाहीर स्नान करताना पण टेलीप्रॉम्प्टर घेऊन स्नान करायच का? यातून अर्थ घेण्यापेक्षा बोध घ्या पाटील साहेब… करावं तसं भरावं लागतं. बाथरूममध्ये कोण काय घालून आंघोळ करतोय हे बघाल, तर सार्वजनिक ठिकाणी पूर्ण कपडे घालून आंघोळ करावी लागेल. त्यामुळे ‘स्वत:चं ठेवायचं झाकून, दुसर्याचं बघायचं वाकून’ ही सवय सोडा.
एआय म्हणजे आई म्हणजे माता, असा शोध आपल्याकडे नुकताच लागलेला आहे… मग सिनेमात आपल्या आईला नेहमी आये अशी प्रेमाने हाक मारणारे दादा कोंडके हेच एआयचे खरे संशोधक आहेत, हा इतिहास आपल्यापासून दडवून ठेवला गेला आहे का?
– स्वप्नील कुंटे, पाथर्डी
तुम्हाला दादा कोंडके यांनी तयार केलेला इतिहास पुसायचा आहे का? उद्या तुम्ही’ दादा कोंडके यांनी स्वत: चित्रपट बनवलेच नाहीत, त्यांनी एआय वापरून पिक्चर बनवले म्हणाल. स्वत: वर्तमानात ‘घंटा वाजवण्याचंही’ काम केलेलं नसताना, दुसर्याच्या इतिहासाबद्दल शंख का करताय? तुम्ही नक्की पाथर्डीकर आहात का ‘सोलापूरकर’ आहात?
व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तुम्ही एखाद्या रोमँटिक ठिकाणी बायकोबरोबर फिरायला जाता की एकटेच फिरायला जाता?
– मीनाक्षी काटकर, पंढरपूर
हा प्रश्न आहे की सिग्नल देताय? असा प्रश्न लोकांना पडेल… नका ना असे प्रश्न विचारू ‘ताई’ (खोटं बोलता येत नाही आणि खरं सांगता येत नाही अशी अवस्था होते ना आमच्यासारख्या ‘सरळमार्गी’ नवर्यांची.)
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात तुम्ही सात कोटीचा जॅकपॉट जिंकलात, तर क्या करोगे आप इतनी धनराशी का?
– विराज जगदाळे, सिल्लोड
एवढी धनराशी आम्हाला मिळाली तर आम्ही प्रत्येक देशवासीयाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकू… प्रश्न विचारायला तुमचं काही जात नाही… उत्तर द्यायला आमचं काही जात नाही… कौन बनेगा करोडपतीपेक्षा हा खेळ चांगला आहे… जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा आपण खेळत जाऊ…