एनएसडीमधली तीन वर्षे कुमारच्या आयुष्यात सुवर्णकाळासारखी होती. ज्यांनी अनेक दिग्गज कलाकार घडवले होते त्या अल्काझी यांच्यासारख्या गुरूंकडे त्याला शिकायला मिळाले. त्या तीन वर्षात कुमारची नाटकांकडे पाहायची दृष्टी बदलली. नावीन्याचा ध्यास जडला. एनएसडीची पदवी घेऊन कुमार पुन्हा मुंबईत आला. दिल्लीला जाताना त्याच्या कलासरगम संस्थेने सत्कार केला होता, कुमार दिल्लीहून परत येईपर्यंत त्या संस्थेत नवीन लोक प्रस्थापित झाले होते आणि कुमार तोपर्यंत मुलुंडमध्ये राहायला गेला होता.
– – –
‘मी कुमार, कुमार सोहोनी, एनएसडीमधून आलोय, आम्ही आमच्या ग्रूपतर्फे तुझी एकांकिका केली होती, ‘टुरटुर’…’
अशी स्वत:ची ओळख त्याने मला करून दिली होती… आमच्या ‘या मंडळी सादर करूया’ या संस्थेमधला विकास फडके ठाण्याला राहायचा, त्याच्या शेजारीच कुमार सोहनी राहायचा आणि त्यांच्याही ग्रूपमध्ये विकास काम करायचा. त्याच्या बोलण्यात प्रचंड आत्मविश्वास होता आणि महत्वाकांक्षी अस्वस्थपणा होता. एनएसडीमधून नाट्यविषयक शिक्षण घेऊन झाले होते, त्या शिक्षणाचा योग्य तो वापर कारकीर्द उभी करण्यास व्हायलाच हवा, या उत्साहाने भारावलेला कुमार सतत कुठे ना कुठे तरी कार्यरत असायचा.
त्याकाळी एनएसडीचा दबदबा होता, आताही आहे. पण अलीकडे नाट्यविषयक शिक्षण देणार्या अनेक संस्था आहेत. शिवाय औरंगाबाद, पुणे, मुंबई येथील विद्यापीठांमध्येही रीतसर नाट्यशिक्षण दिले जाते. शिवाय अनेक प्रशिक्षित आणि यशस्वी रंगकर्मींचे वर्कशॉप्सही अनेक मोठ्या शहरांमध्ये होत आहेत, पण त्याकाळी एनएसडी सोडल्यास इतर संस्था फार कमी होत्या. अनेक तरुणांना त्यामुळे दिल्लीतील या संस्थेबद्धल आकर्षण होते. आजही आहे. त्यावेळी तिथे शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी शिष्यवृत्ती जाहीर होत असे, त्यात देशभरातील विविध भागांतून येणार्या विद्यार्थ्यांमधून फक्त दोघांनाच शिष्यवृत्ती मिळत असे. कुमारच्या हातात ती जाहिरात पडली. त्यावेळी तो ड्राफ्ट्समनची नोकरी करीत होता. पण मनात मात्र नाटक आणि अभिनय होताच. कुमार आणि त्याच्या सहकारी रंगकर्मी मित्रांनी ठाण्यात ‘कलासरगम’ नावाची संस्थाही काढली होती, त्या हौशी नाट्यसंस्थेतर्फे एकांकिका नि नाटके ती मंडळी सादर करीत. तशात ही जाहिरात हातात पडली आणि महत्वाकांक्षी कुमार झपाटल्यासारखा एनएसडीची स्वप्ने पाहू लागला. अडीच हजार अर्जामधून अडीचशे मुलं मुलाखतीसाठी बोलवण्यात आली आणि त्यातून फक्त दोघांनाच निवडण्यात येणार होते. कुमारच्या मनात शंकाही आली नाही की, बापरे एवढ्या गर्दीमधून आपण निवडले जाऊ की नाही वगैरे. अर्ज ठोकला, त्यातल्या अटींप्रमाणे दोन नामवंत रंगकर्मीची शिफारस लागत असे, त्या शिफारसकर्त्यांकडे नंतर सरकारकडून उमेदवारांविषयी चौकशीही करण्यात येणार होती आणि ती चौकशी गोपनीय असणार होती. तीही मिळवली. ठाण्यातच राहणारे प्रथितयश लेखक श्याम फडके यांच्या ‘तीन चोक तेरा’ या नाटकात कुमारची आई काम करायची. त्यामुळे त्यांचे पत्र मिळाले आणि नटवर्य मामा पेंडसे हेही ठाण्यातलेच, त्यांचीही ओळख होतीच, त्यांनीही शिफारसपत्र दिले आणि कुमारचा अर्ज दिल्लीला पोचला. तरी बेसावध न राहाता आणि गप्प न बसता कुमारने मुलाखतीची तयारी सुरू केली. ठाण्यातच रहाणार्या एनएसडीच्या माजी विद्यार्थिनी आणि यशस्वी अभिनेत्री सुहास जोशी यांची कुमारने भेट घेतली आणि मार्गदर्शनही घेतले. त्याप्रमाणे काही नाटकातील उतारे आणि स्वगते पाठ करून ठेवली. लहानपणी लोकसेवा दलात काम केल्यामुळे संगीत आणि गाणेही कुमारला उत्तम जमत असे. ‘घाशीराम कोतवाल’ नाटकातील नाना फडणवीसांची भूमिका आणि त्यातल्या संगीताचीही कुमारने तयारी करून ठेवली होती. अखेर मुलाखतीसाठी बोलावणे आले. आईवडील आणि मित्र राजा टकले यांच्याबरोबर कुमार दिल्लीला पोहोचला. तिथे मुलाखत घ्यायला इब्राहीम अल्काझी, बी. व्ही. कारंथ, दीना पाठक, कमलाकर सोनटक्के, एम. के. रैना आदी दिग्गज उपस्थित होते. त्या अर्ध्या तासात कुमारने पोवाड्यापासून ते ‘घाशीराम’पर्यंत सर्व काही करून दाखवले. तरीही नोकरी करून तुम्ही शिक्षण कसे घेणार हा प्रश्न विचारण्यात आलाच. त्यावर या नाट्यशिक्षणाला प्राधान्य देणार असे उत्तर देऊन कुमारने त्यांचे समाधान केले. त्यानंतर जुलै १९७६च्या १० तारखेला नाट्यदर्पण रजनी होती साहित्य संघात. ती बघायला कुमार गेला होता. घरी पोचायला रात्रीचे दोन वाजले. तेवढ्या रात्रीही कुमारच्या आईने दिल्लीहून आलेले पत्र कुमारच्या हातात ठेवले. त्यातला मजकूर वाचून घरात प्रचंड आनंद झाला. कुमारची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली होती. मात्र दुसर्या दिवशी या आनंदाला अनपेक्षित कलाटणी मिळाली. तीन वर्षासाठी दिल्लीला जाऊन राहावे लागणार होते. तेही हॉस्टेलवर. नाटकाची आवड असूनही कुमारच्या आईने या गोष्टी साठी नकार दिला. आपल्या मुलाला ती एवढ्या लांब एकट्याला पाठवायला तयार नव्हती, आणि कुमारबरोबर दुसरे कोणी जाऊ शकत नव्हते. मोठा तिढा उभा राहिला. अखेर कुमार पुन्हा एकदा सुहास जोशींकडे गेला. त्यांच्यामार्फत आईची समजूत घातली, एनएसडीचे शिक्षण कुमारचे आयुष्य बदलून टाकील, याची हमी सुहासताईंनी कुमारच्या आईला दिली. त्यानंतर ती तयार झाली.
एनएसडीमधली तीन वर्षे कुमारच्या आयुष्यात सुवर्णकाळासारखी होती. ज्यांनी अनेक दिग्गज कलाकार घडवले होते त्या अल्काझी यांच्यासारख्या गुरूंकडे त्याला शिकायला मिळाले. त्या तीन वर्षात कुमारची नाटकांकडे पाहायची दृष्टी बदलली. नावीन्याचा ध्यास जडला. एनएसडीची पदवी घेऊन कुमार पुन्हा मुंबईत आला. दिल्लीला जाताना त्याच्या कलासरगम संस्थेने सत्कार केला होता, कुमार दिल्लीहून परत येईपर्यंत त्या संस्थेत नवीन लोक प्रस्थापित झाले होते आणि कुमार तोपर्यंत मुलुंडमध्ये राहायला गेला होता. मुलुंडच्या लोकांना एकत्र आणून ‘संस्था, मुलुंड’ नावाची संस्था स्थापन करून कुमारने राज्य नाट्य स्पर्धेसाठी प्रा. श्रीहरी जोशी लिखित ‘आरूपाचे रूप’ हे नाटक स्पर्धेत सादर केले.
पहिला ब्रेक
कुमारचे मुख्य लक्ष्य होते व्यावसायिक रंगभूमीवर नाटक दिग्दर्शित करणे. त्यासाठी स्पर्धेतून चमकणे गरजेचे होते. याआधीचे व्यावसायिक रंगभूमीवरील अनेक दिग्दर्शक राज्य नाट्य स्पर्धेतूनच हळूहळू व्यावसायिक रंगभूमीवर प्रस्थापित झाले. प्र. ल. मयेकर यांचे ‘मा अस साबरीन’ हे नाटक कुमारने राज्य नाट्य स्पर्धेत सादर केले. परंतु तेच नाटक बॉम्बे पोर्ट ट्रस्टनेही सादर केले होते आणि ते पहिले आले होते. त्यावेळी प्र. ल. मयेकर यांनी कुमारला पुढचे नाटक तुला देईन असे आश्वासन दिले आणि ते पाळले. १९८४-८५ च्या राज्य नाट्यस्पर्धेत ‘अथ मनुस जगन हं..’ हे नाटक प्र. ल. मयेकरांनी लिहिले आणि कुमारने बसवले. त्या वर्षीची सर्व बक्षिसे मिळवली. पण त्यामुळे व्यावसायिक रंगभूमीचे दार कुमारसाठी फक्त किलकिले झाले. पूर्ण उघडले नाही. त्या नाटकावर डॉ. लागू इतके खुश झाले, की त्यांनी कुमारला बोलावून त्या नाटकाचे जास्तीत जास्त प्रयोग व्हावेत म्हणून चक्क २५ हजार रुपयांची देणगी दिली. त्यामुळे कुमारने ‘संस्था, मुलुंड’तर्फे या नाटकाचे जवळजवळ ५० प्रयोग केले. हा नावीन्यपूर्ण प्रयोग रसिकांनीही उचलून धरला.
दुसरा ब्रेक
त्यानंतर पुढे प्र. ल. मयेकरांनी ‘अग्निपंख’ नावाचे नाटक लिहिले आणि कुमारच्या मनात ते व्यावसायिक रंगभूमीवर स्वत:च निर्माण करून दिग्दर्शित करायचे विचार आले. प्रभाकर पणशीकर यांच्या ‘नाट्यसंपदा’ या संस्थेकडून ते होणार होते, पण नाही झाले. त्या दरम्यान कुमारच्या ‘अथ मनुस जगन हं’च्या निमित्ताने डॉ. लागूंशी भेटी गाठी व्हायच्या. नवीन काय करतोयस? असे डॉक्टरनी विचारताच ‘अग्निपंख’विषयी कुमारने सांगितले आणि उत्सुकता म्हणून आणि प्रलंचे नाटक म्हणून डॉक्टरनी स्क्रिप्ट वाचायला मागितले. काही दिवसांनी डॉक्टरनी चक्क ‘मी यात रावसाहेबांची भूमिका करीन’ म्हणताच कुमारचा त्यावर विश्वासच बसेना. व्यावसायिक रंगभूमीचे किलकिले झालेले दार कुमारला डॉ. लागूंनी स्वत:च्या हाताने उघडून दिले. डॉक्टरांना हे स्क्रिप्ट आवडले आहे ही बातमी कानावर जाताच ‘रंगयात्री’ या व्यावसायिक नाटकाचे निर्माते मधुकर नाईक कुमारकडे धावत आले आणि नाटक निर्माण करायची जबादारी घेतली. कारण आधीचे ‘दुभंग’ हे नाटक नाईकांनीच निर्माण केले होते. कुमारने आणि प्रलंनी हो म्हटल्यानंतर नाईकांनी स्क्रिप्ट वाचले तेव्हा त्यांना ते नवख्या दिग्दर्शकाने बसवण्याऐवजी अनुभवी दिग्दर्शकाने बसवावे असे वाटून परस्पर तशा कारवाया करायला सुरुवात केली. पण डॉक्टरांनी ठामपणे ‘कुमारच दिग्दर्शित करील’ असे म्हणताच नाटक हातचे जाऊ नये म्हणून नाईक यांनी ‘मी त्यातला नाही’ असे दाखवत निमूटपणे नाट्यनिर्मिती केली आणि कुमारचे पहिले व्यावसायिक नाटक रंगभूमीवर आले… तेही प्र. ल. मयेकर यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकाने लिहिलेले आणि डॉक्टर लागू यांनी अभिनीत केलेले.
त्यानंतर मात्र कुमारची एकेक नाटके येतच गेली. निर्माते त्याच्याकडे येत गेले, नाटके यशस्वी होत गेली आणि नवीन लेखकही भेटत गेले. विशेष म्हणजे एनएसडीचाच एक विद्यार्थी प्रशिक्षित होऊन आला, तो म्हणजे अभिराम भडकमकर. लेखक म्हणून त्याचं पहिल नाटक आलं ‘पाहुणा’. त्या नाटकातच खूप मोठा स्पार्क होता. व्यावसायिक नाटकाला लागते तशी बांधणी होती. दिलीप जाधवने या नाटकाची निर्मिती केली होती आणि मी संगीत केले होते. खूप मोठ्या वाटणार्या या नाटकाचं लेखक खूप छोटा, म्हणजे अगदी पोरसवदा तरूण होता. पण लक्षणे सगळी मोठ्या नाटककाराची होती आणि भविष्यात ते खरेही ठरले. कुमारने त्याचे ‘देहभान’ हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणले. चंद्रकांत कुलकर्णीने ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ हे त्याने लिहिलेले नाटक आणले. त्यानंतर अलीकडे ‘सुखांशी भंडातो आम्ही’ हे नाटक कुमारने दिग्दर्शित केले. एनएसडीमधून अभिनयाचे धडे घेतलेलेल्या या लेखकाला लेखनाच्या विविध शाखांमध्येही संचार करायला तितकेच आवडते आणि त्यात तो कमालीचा यशस्वीही झालाय. या लेखकाशी कुमारची जोडी जमलीय. अगदी प्र. ल. मयेकरांसारखी.
एकदा निर्माता दिलीप जाधवने माझ्याकडे एक स्क्रिप्ट पाठवले आणि म्हटले ‘दादा, याचं म्युझिक तुम्ही करायचे, वाचून कळवा. दिग्दर्शक आहे कुमार सोहोनी’. लेखक होता प्रदीप दळवी. तोपर्यंत मी माझ्या सर्वच नाटकांचे संगीत करीत होतो आणि राजन ताम्हाणे दिग्दर्शित ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकाचे मी केलेले पार्श्वसंगीतही गाजत होते. मी अर्थातच हो म्हटले. पण नाटकाचे नाव होते, ‘सासू मेलीच पाहिजे’. नाव वाचून मला कसे तरीच वाटले. ‘सासू’ हा विनोदाचा विषय होऊ शकतो, आणि सून हा छळण्याचा, हे मनोरंजनक्षेत्रात चलनी नाण्यासारखे वापरले जाते. पण एकदम मारून टाकण्याचाच अट्टहास म्हणजे नाव एकदम नकारात्मकच वाटले. मी दिलीपला आणि कुमारला तसे सांगितले आणि एक सकारात्मक नाव सुचवले, ‘वासूची सासू’. त्यातल्या जावयाचे नाव ‘वासू’ केले की प्रश्न मिटला. लेखक प्रदीप दळवी आणि कुमार दोघांनाही युक्ती आवडली. नाटकात दिलीप प्रभावळकर सासूच्या भूमिकेत असणार होते, हा एक धमाल योग होता. शिवाय अरूण नलावडे, अश्विनी भावे, अतुल परचुरे, अविनाश खर्शीकर अशी दमदार पात्रयोजना होती. ‘वासूची सासू’चे प्रयोग सुरू झाले, जोरात धावू लागले. त्यानंतर कुमारची अनेक नाटके आली. सुरेश खरे लिखित ‘कुणीतरी आहे तिथे’ या नाटकाने प्रचंड यश संपादन केले.
तिसरा ब्रेक
त्यानंतर कुमारला चित्रपटांमध्ये रुची निर्माण झाली. याच नाटकावर आधारित त्याने पहिला चित्रपट निर्मित आणि दिग्दर्शित केला. तो होता ‘मंतरलेली एक रात्र’. कुमारचा नाटक, सिनेमा, मालिका असा स्वैर संचार सुरू होता. त्याच्या आणखी एका नाटकाला मी संगीत दिले, ते नाटक होते, ‘रातराणी’. लेखक प्र. ल. मयेकर आणि प्रमुख भूमिका भक्ती बर्वे, सतीश पुळेकर, अरुण नलावडे अशी पात्रयोजना होती. ‘रातराणी’ नाटकाचं संगीत हे माझ्यासाठी एक आव्हान होतं. खरे तर प्र. ल. मयेकरांना त्यावेळी अनंत अमेंबल किंवा अशोक पत्की संगीतकार असावेत असे वाटले. पण कुमारने आग्रह धरला की संगीत मीच करावे. प्र.लं.नी स्क्रिप्ट वाचले आणि त्यावेळी त्यांना मी सांगितले, की याची संकल्पना माझ्या डोक्यात ही अशी आहे, त्यावेळी त्यांचे डोळे चमकले आणि त्यांनी ताबडतोब होकार दिला. इतकेच नव्हे तर संगीताची पहिली ट्रायल झाली त्यावेळी त्यांनी चक्क मिठीच मारून दाद दिली. संपूर्ण प्रोसेसमध्ये कुमारने माझ्यावर जो विश्वास ठेवला त्याचा परिणाम उत्तम निकालात झाला. आजही ते संगीत कित्येक रसिकांच्या स्मरणात आहे.
मी आणि कुमारने एकमेकांसाठी भरपूर काम केले. माझ्या अनेक नाटकांची प्रकाशयोजना कुमारने केली. कित्येक इव्हेंटसच्या प्रकाशयोजना केल्या. महाराष्ट्र शासनाचा एक खूप मोठा कार्यक्रम होता ‘संकल्प’. त्यात अनेक रंगकर्मी सामावले होते आणि अनेक कलाकारांना प्रथम संधी मिळाली होती. त्याचे दिग्दर्शन मी आणि वामन केंद्रे यांनी केले होते आणि प्रकाशयोजना कुमार सोहोनीची होती.
ब्रेक के बाद
कुमार अतिशय शांत पद्धतीने वातावरण हलके फुलके ठेवून काम करीत असतो. पावलोपावली कोट्या करीत राहणे हा त्याच्या निर्मळ स्वभावाचा दाखला आहे. मन स्वच्छ असेल तरच हे असे प्रसन्न राहणे जमते. हे सर्व त्याच्या आई आणि आजोबांकडून आले. घरात आध्यात्मिक संस्कार खूप झाले. त्याच्या आजोबांनी तर वासुदेवानंद सरस्वतींबरोबर नर्मदायात्रा केली आहे. त्यामुळे घरात कुमारनेही अनेक वेळा गुरुचरित्राचे वाचन केले आहे. कामात शिस्त आणि विचारांमध्ये स्पष्टपणा येण्यासाठी त्याला हे संस्कार आयुष्यभर उपयोगी पडले. कुमार आजूबाजूला असला की वातावरणात तणाव फिरकतसुद्धा नाही हे मी अनेक वेळा अनुभवले. हेही त्याच्यात त्याच्या आईकडूनच आले. त्याची आई ‘टूरटूर’ नाटकाची प्रचंड फॅन होती. तिच्या अखेरच्या काळात तिने कुमारकडे आग्रह धरला, मला ‘टूरटूर’ बघायचे आहे. त्यावेळी नेमकी ‘टूरटूर’ची ऑडिओ कॅसेट आली होती. कुमारने आईची इच्छा सांगताच मी स्वत: त्यांना ती नेऊन दिली. ती त्यांनी कॅसेट झिजेपर्यन्त ऐकली. ‘टूरटूर’ने लाखों लोकांना आनंद दिला, पण कुमारच्या आईचे अखेरच्या काळातील असाध्य रोगाशी झगडणे ‘टूरटूर’ने सुसह्य केले, ही गोष्ट मी आजन्म विसरणार नाही.
२०१० साली नाट्य परिषदेने नाट्य संमेलन अमेरिकेत भरवले. त्या काळात संपूर्ण दहा दिवस मी आणि कुमार एकत्र होतो. विमानातही शेजारी आणि तिकडच्या वास्तव्यात रूम पार्टनर. रोज रात्री आमच्या रूममध्ये वेगळं सांस्कृतिक मंडळ बसायचं, धमाल असायची. गप्पांना आणि मिमिक्रीला ऊत यायचा. तशात तिकडे, मी, राजन ताम्हाणे, मंगेश कदम, चंद्रकांत कुलकर्णी आणि कुमार असा आम्हा पाच दिग्दर्शकांचा आपोआप एक ग्रूप बनला. मोहन जोशींनी आमच्या ग्रुपचे नाव ‘५ड’ असे ठेवले. एकूण तो सगळा प्रवास अतिशय धमाल असाच झाला. अगदी शेवटी येताना माझं विमान चुकलं आणि मी तिकडेच अडकलो तो दुसर्या दिवशी कसाबसा तिकडून निघालो आणि पासपोर्ट मुंबई विमानतळावर विसरलो, ते दुसर्या दिवशी मी आणि कुमारने परत विमानतळावर जाऊन त्याचा शोध घेतला, तिथपर्यंत आम्ही एकत्र होतो.
सहकुटुंब कुमार
नाटक-सिनेमाचे विश्व जरी ग्लॅमरस असले तरी इथंही या झगमगाटापासून दूर राहून कुटुंबात रमणारे माझ्या आणि कुमारसारखे कित्येक कलाकार आहेत. कुमारची पत्नी- पूर्वाश्रमीची उज्वला टकले ही एक उत्कृष्ट अभिनेत्री. प्रदीप राणेच्या ‘अॅश इज बर्निंग’ या एकांकिकेत तिला अनेक स्पर्धांमधून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे. लग्नानंतर ती श्रद्धा सोहोनी झाली, पण कुमारसाठी तिने चक्क स्वत:च्या नाटकाच्या कारकीर्दीवर पाणी सोडले आणि तिने सारस्वत बँकेत नोकरी पत्करली ती अखेरपर्यंत निभावली. आज त्यांची मुलगी भैरवी त्यांच्या दोन नाती आणि जावयासहित कॅनडामध्ये स्थायिक आहे.
एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे प्रत्यक्षातला स्वत:विषयी भरभरून बोलणारा कुमार सोहोनी. मला तर नेहमी त्याला पहिले की स्टेशनवरच्या वजनकाट्याची आठवण होते. त्यात आपण एक नाणे टाकले की जे तिकीट बाहेर येते त्यावर आपले वजन तर असतेच, पण भविष्यही असते, काय खावे काय खाऊ नये, हेही लिहिलेले असते आणि शेवटी पुन्हा भेटूया असेही असते. कुमार अगदी तसा आहे. कधी भेटला की त्याच्याकडे सांगण्यासारखे भरपूर असते. नुसतं आपण विचारायची खोटी, की ‘काय रे, सध्या काय चाललंय? त्यावर कुमार धडाधड आपली प्रोजेक्ट्स सांगायला सुरुवात करतो. कोणतं नाटक, कोणता सिनेमा, मालिका कोणती, लेखक कोण, काम कोण करतंय, कोणाशी बोलणी सुरू आहेत यापासून ते याआधी काय काय रिजेक्ट केले, मग हे कसे सापडले, ते किती मस्त आहे, निर्माता कोण, किती बजेट या सर्व गोष्टी कुमार मोठ्या उत्साहाने त्या तिकीटासारखे आपल्यासमोर मांडत जातो, त्यात भूतकाळ, वर्तमानकाळ, आणि भविष्यकाळ हे सर्व तो काळवेळ विसरून सांगतो. त्यावेळी त्याचा उत्साह वाखाणण्यासारखा असतो. त्यामध्ये त्याचा एक प्रांजळपणा असतो, तो अत्यंत दुर्मिळ असतो आणि म्हणून आपण आपलं सर्व बाजूला ठेवून त्याचं ऐकत जातो.
अलीकडे त्याची तीन पुस्तके प्रकाशित झाली. तोच प्रकार त्याच्या या लिखाणात सामावलेला आहे. बर्याच वेळाने त्याच्या लिखाणात पूर्ण विराम डोकावतो. इतकं त्याला सांगायचंय हे त्यातून जाणवते.
कुमार सोहोनीसारखा रंगकर्मी बराच काळ शांत दिसला तर त्यावर कुणी जाऊ नये. या काळात त्याचे लिखाण, वाचन, दिग्दर्शन, नव्या प्रयोगाची आखणी, सांसारिक समस्यांची उकल, लेकी-जावयाबरोबर आणि नातींशी व्हिडिओ गप्पा हे सर्व सुरू असतं.
मध्यंतरी त्याच्या एका पुस्तकाची मी प्रस्तावना लिहावी म्हणून त्याने एक हस्तलिखित पाठवलं, त्यातलं अक्षर बघून मी चाट पडलो. अक्षरशः छापील अक्षर. मी उत्सुकतेने विचारलं, कोणाचे रे हे अक्षर? तर म्हणाला माझेच.. मी टाईप नाही करत, माझ्या नाटकांच्या आणि सिनेमांच्या संहिताही मी अशाच आधी स्वतःच्या हाताने लिहून काढतो, मग त्या पक्क्या डोक्यात बसतात… एनएसडीची ही कुमारला मिळालेली देणगीच बहुतेक शेवटपर्यंत त्याने जोपासली आहे. म्हणूनच की काय, त्याची कारकीर्द आणि वैयक्तिक जीवन इतके शिस्तबद्ध, सुडौल आणि त्याच्या हस्ताक्षराइतकंच देखणं आहे.