• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

खेटरे मारून घ्या!

- मर्मभेद

Nitin Phanse by Nitin Phanse
September 6, 2024
in मर्मभेद
0

बुडत्याचा पाय खोलात असं म्हणतात, तशी अवस्था राज्यात पुन्हा सत्तेत येण्यासाठी तडफडणार्‍या बेकायदा महायुती सरकारची झाली आहे. नाहीतर महाविकास आघाडीने शिवपुतळा पडण्याच्या घटनेबद्दलचा संताप व्यक्त करण्यासाठी ‘सरकारला जोडे मारा आंदोलन’ केल्यावर वेडपटासारखे ‘विरोधकांना खेटरे मारा’ आंदोलन करण्याची दुर्बुद्धी त्यांना सुचती ना!
एकतर कुणीतरी आपल्याला (प्रतीकात्मक) जोडे मारतंय तर आपण खेटरे मारणे ही कल्पनाशून्यतेची परिसीमा! काहीतरी वेगळी, प्रभावी कल्पना तरी काढा. शिवाय असं आंदोलन करण्यात केवढी अहंमन्यता, किती माज! ज्याची वाटायला हवी लाज, त्याचाच माज?
मुळात विरोधकांवर ही वेळ आणली कोणी?
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचंच नव्हे, तर देशाचं आराध्य दैवत. त्यांचा नुकताच उभारलेला पुतळा कोसळणं ही अतिशय लाजिरवाणी आणि संतापजनक घटना आहे. ती आपल्या कार्यकाळात घडली असेल तर बाकी काहीही करण्याच्या आधी महाराष्ट्राची हात जोडून, नाक रगडून माफी मागायला हवी होती. त्यानंतर पुतळा पडण्यामागे ज्या काही सबबी सांगायच्या त्या सांगितल्या असत्या, तर महाराष्ट्राच्या जनतेने मोठ्या मनाने सत्ताधीशांना काही प्रमाणात माफही केले असते. विरोधकांनाही इतक्या तीव्रतेची आंदोलने करण्याची गरज पडली नसती. पण, महाराष्ट्राच्या महापुरुषाचा पुतळा पडला तरी यांचे मिंधे, नकटे नाक वर! कधी वार्‍यांच्या वेगाची गणितं सांगतायत, कधी नौदलावर बिल फाडतायत. ना माफीचा चकार शब्द, ना गुन्हेगारांवर काही कारवाई.
त्यानंतर सगळ्या महाराष्ट्रात उडालेला संतापाचा भडका पाहून सगळ्यात आधी उपरती झाली ती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना. त्यांनी हात जोडून माफी मागितली. सकाळी उठून परसाकडे जाऊ का, हेही ज्यांना दिल्लीला विचारावं लागतं आणि फोन एंगेज लागला तर ताटकळावं लागतं, त्यांनी माफीही दिल्लीवरून तंबी मिळाल्यावर मागितली, यात काही आश्चर्य नाही. या सगळ्यांच्या अभद्र युतीचे कर्ते करविते आणि स्वपायावर धोंडा पाडून घेणारे तिसरे लाठीवीर काही अजूनपर्यंत माफीमधला म उच्चारायला तयार नाहीत. उलट ते मंत्र जपल्यासारखं एकच सांगतायत, याचं राजकारण करू नका! त्याचं राजकारण करू नका! बदलापुरातली संतापजनक घटना असो की शिवपुतळा पडणे असो- यांची हीच एक टेप.
मुळात हे सांगण्याचा तुम्हाला अधिकार आहे का?
तुम्ही विरोधात बसला होतात तेव्हा कशाकशाचं आणि कोणत्या पातळीचं राजकारण केलंत, ते विसरलात का?
या घटना महाविकास आघाडी सरकारच्या काळात घडल्या असत्या तर त्या सरकारचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री ताबडतोब माफी मागून मोकळे झाले असते, तडफेने कारवाई सुरू झाली असती, दोषी एव्हाना गजाआड झाले असते- तरीही तुम्ही काट्याचा नायटा करून, कपडे काढून बोंबा मारत फिरला असतात गावभर. महाविकास आघाडीने सुसंस्कृतपणे प्रतीकात्मक आंदोलने केली, याबद्दल आभार माना, नाहीतर बदलापूरमध्ये मूळ गुन्ह्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न, उत्स्फूर्त जनआंदोलन करणार्‍यांवर गुन्हे दाखल करणे या उद्योगांपासूनच जनतेची मनस्थिती प्रत्यक्षात जोडे मारण्याचीच झाली होती. त्यात शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीत जे काही बरळत सुटला आहात, त्याने भरच घातली असेल. त्यात पुन्हा राजकोटावरची अश्लाघ्य राडेबाजी पाहिल्यावर महाराष्ट्राची मान शरमेने आणखी झुकली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर माफी आली ती त्यानंतर.
मोदी हे कायमच नमवत भूमी वगैरे थाटात चालत असतात. त्यांना कशाचाही खेद, खंत करण्याची सवय नाही. हे मोठमोठ्या घोषणा करून मोकळे होतात, माघार घ्यायची वेळ येते तेव्हा बिल कुणा छोट्या सहकार्‍यावर फाडलं जातं. त्यांच्या आयुष्यात बहुदा पहिल्यांदाच त्यांनी माफी मागितली आणि तीही स्वत:च्या थेट चुकीसाठी नाही, तर इतरांच्या चुकीसाठी मागितली, हेच मोठे आश्चर्य! अर्थात, मुळात हा शिवपुतळा इतक्या घाईत, इतक्या सुमार कारागीराकडून (कलावंत ही उपाधी विटाळू नये) बनवून घेण्याची वेळ आली ती पंतप्रधानांना निवडणुकीच्या आधी काहीतरी भव्यदिव्य करून दाखवण्याची घाई होती म्हणूनच. या सतत रिबिनी कापत फिरण्याच्या आणि मग छाती ठोकत बाता मारण्याच्या रोगामुळेच महाराष्ट्राच्या दैवताच्या पुतळ्याची ही विटंबना ओढवली आहे… पंतप्रधान त्याला अप्रत्यक्षपणे जबाबदार आहेतच.
पण, त्यांनी, माफी मागण्याचा सराव नसल्यामुळे की काय, माफी मागितली तीही धमकी दिल्याच्या सुरात. आम्ही पाहा किती संस्कारी, आम्ही माफी मागायला तयार असतो, विरोधक माफी मागत नाहीत, ही त्यांची एकंदर माफीची भाषा! ही उन्मत्त माफी महाराष्ट्राने स्वीकारलेली नसेल, विरोधी पक्षांनी स्वीकारली नसेल, तर त्याचा दोष त्यांना कसा देणार? ही माफी मागायला इतका उशीर झालेला आहे की आता तिला कसलाही अर्थ उरलेला नाही.
सध्याच्या बेकायदा सरकारचे, शिवपुतळ्याच्या कारागीराइतकेच सुमार शिल्पकार अजूनही माफी मागत नाहीत, ते आता महाराजांचा नवा इतिहास सांगू लागले आहेत, हेही महाराष्ट्र पाहतो आहे, त्याची नोंद घेतो आहे…
…त्यामुळे अजून थोडी लाज शिल्लक असेल किंवा किमान आगामी विधानसभा निवडणुकांत थोडीफार अब्रू वाचवायची असेल, तर, सच्चा आत्मक्लेश करा; खेटरे मारा आंदोलन करून उपयोग नाही, खेटरे मारून घेण्याचं आंदोलन करा.
…नाहीतर महाराष्ट्राची शिवप्रेमी जनता संधी मिळेल तेव्हा मतपेटीतून एक मोजून दहा पैजारा हाणेल!

Previous Post

महाराष्ट्र धर्मरक्षक ‘मार्मिक’!

Next Post

नकट्यांचा बाजार सारा

Next Post

नकट्यांचा बाजार सारा

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.