कोणत्याही कारणाने का असेना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अखेरीस त्यांच्या हिंदूऐक्याच्या तर्कसंगत आणि तात्विक धोरणाच्या विरोधात जाऊन जातनिहाय जनगणनेला अनुकूलता दर्शवलेली आहे. जातनिहाय जनगणनेच्या विषयात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सामाजिक-आर्थिक जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करणार्या याचिकेवर विचार करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्याचवेळी केंद्रातील सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च न्यायालय असलेल्या संघानेही जातनिहाय जनगणनेला अनुकूलता दर्शवलेली आहे. त्यामुळे भाजप सरकार यासंदर्भात काय आणि केव्हा निर्णय घेणार तसेच यासंदर्भात प्रत्यक्ष लोकांमध्ये काम करणार्या स्वयंसेवकांची आरक्षणविरोधी भूमिका आणि पाठोपाठ जातनिहाय जनगणनेला असणार्या विरोधाचे काय करणार? त्याखेरीज संघातील कथित विचारवंतानाही एकाच वेळी जातीच्या संघटनेचे आकर्षण आणि हिंदुऐक्याची ओढ वाटू लागते, त्याची नोंद अन्य जाती घेत असतात, ही बाबही लक्षात घेण्यासारखी आहे.
संघाच्या स्वयंसेवकांचा आणि संघविचाराच्या लोकांच्या मेंदूची जडणघडण नेमकेपणाने आणि सातत्याने तेच ते मुद्दे मांडून विशिष्ट प्रकारे घडवण्यात आलेली असते. त्यामुळे संघाने जरी अधिकृतपणे काहीही भूमिका मांडली तरी सर्वसाधारण स्वयंसेवकांना ती पचेल, रुचेल अशी स्थिती आता नाही. साधारणपणे हिंदू समाजाला एक करायचे म्हणजे जात विसरली पाहिजे आणि जात विसरायची असेल तर जातीवरून ज्या गोष्टी येतात, त्या विसरायला लावणे आणि त्यातील मुख्य बाब म्हणजे जातीनुसार दिलेले आरक्षण. जाती विसरून हिंदूंनी एक व्हावे असा संघाचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी संघ कार्यरत आहे. मात्र आता एकदम संघाने जातनिहाय जनगणनेला अनुकूलता दाखवलेली असल्याने संघ परिवारातील केंद्र सरकार काय भूमिका घेणार हा प्रश्न आहेच. त्यापेक्षाही जातनिहाय जनगणनेमुळे हिंदूऐक्याच्या कार्याची पिछेहाट होणार ही सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटणारी शंका कशी दूर करणार?
आतापर्यंत फक्त शेड्यूल कास्ट (एससी) आणि शेड्युल ट्राईब (एसटी) यांच्या आरक्षणाला पाठिंबा देण्याच्या संघाच्या भूमिकेत प्रामाणिकपणा दिसतो. बाकी मंडल आयोगाची अंमलबजावणी, ओबीसी आरक्षण याबाबत संघाची भूमिका काहीही असली तरी स्वयंसेवकांची भूमिका वेगळी असते असे अनेकदा दिसून येते. जोपर्यंत सोशल मिडियाचा प्रसार झाला नव्हता तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने किंवा संघटनेने अधिकृतपणे सांगितलेली भूमिका खरी असल्याचे मान्य करण्यावाचून पर्याय नव्हता. आता परिस्थिती बदलेली आहे. सोशल मिडियाची ताकद सगळ्यांनाच समजलेली आहे. तिचा प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार वापर करत असतो. त्यामुळे कुठल्याही विषयावर संघटना काय म्हणते यापेक्षा सोशल मिडियावर कार्यकर्त्यांची भूमिका काय असते याला महत्त्व आले आहे. राष्ट्रीय पातळीवरून काहीही सांगितले गेले तरी आपल्या ग्रुपमधील, सोशल मिडियावरील, फ्रेंडलिस्टमधील त्या संघटनेचा कार्यकर्ता, स्वयंसेवक, हितचिंतक, समर्थक काय सांगतो तेच खरे मानले जाते. सोशल मिडियावर संघाचे स्वयंसेवक किंवा समर्थक हे कायम दोन मुद्द्यांवर कट्टर भूमिका मांडत असतात. त्यापैकी पहिली म्हणजे गांधीहत्येचे समर्थन आणि दुसरी म्हणजे आरक्षणाला विरोध. आरक्षणामुळे गुणवत्ता मारली जाते आणि आमची संधी हिरावली जाते असा त्यांचा युक्तिवाद असतो. त्यापुढे जाऊन हिंदूऐक्यासाठी सगळेच आरक्षण रद्द केले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे असते.
या पार्श्वभूमीवर संघाने जातनिहाय जनगणनेला अनुकूलता दर्शवलेली असली तरी या विषयावर स्वयंसेवकांची जी वैचारिक जडणघडण करण्याचा प्रयत्न केल्याचे दाखवले जाते ते सगळे कसे काय बदलणार, असा प्रश्न आहे. त्याचवेळी आपल्या जातीवर केंद्रित हिंदूऐक्य व्हावे, अशी धडपड कोरेगाव-भीमासारख्या प्रयोगातून दिसते, तेव्हा अन्य समाज एकंदरीत हिंदूऐक्याविषयी सावध भूमिका घेऊ लागतात. संघ स्वयंसेवक असणार्या राज्याच्या गृहमंत्र्यांकडून प्रत्यक्ष हिंसाचारात सहभागी असणार्या ३००-४०० नक्षलवाद्यांना सोडून दिले जाते आणि ज्यांना प्रकृतीमुळे नीट चालतादेखील येत नाही अशा सात-आठ जणांना अटक केली जाते. हे सगळे कुणाला वाचवण्यासाठी करण्यात आले याचा अंदाज त्या हिंसाचारात पोळलेल्या जातींना येतो, तेव्हा अर्बन नक्षल नरेटिव्ह यशस्वी झाल्याच्या आनंदात मश्गूल होऊन चालणार नसते.
जात हा हिंदू समाजाचा अविभाज्य घटक आहे. हिंदू धर्मातून जाती वगळल्या तर फक्त निर्जीव सांगाडा उरतो. पुन्हा जातीमागून येणारी विविधताही लक्षणीय आहे. त्या विविधतेचा प्रत्येक जातींना अभिमान असतो. जन्मापासून ते मरणापर्यंत प्रत्येक टप्प्यावर जातींच्या प्रथा-परंपरा वेगवेगळ्या आहेत. खाद्यसंस्कृती, पेहराव, चालीरीती, कुलदैवते यातही विविधता आहे. आता शहरीकरण आणि खुली अर्थव्यवस्था, त्यातून निर्माण झालेली जीवघेणी स्पर्धा यात तग धरून राहताना प्रत्येक ठिकाणी जातीचे टुमणे लावून चालत नाही म्हणून परिस्थितीच्या रेट्यातून आम्ही जातपात मानत नाही, असे म्हटले जाते. पण त्यातही संधी मिळाली, की जातीचा अभिमान, अहंकार उफाळून येतोच. प्रत्येक जातीने जातीतील महापुरुष शोधून त्याच्यावर आपलाच हक्क सांगून यथाशक्ती जातीची अस्मिता जागरूक ठेवण्याचे काम केल्याचे दिसते. हे सगळे विसरून हिंदू म्हणून एक व्हावे यासाठी स्थापनेपासून संघाने काम केलेले आहे. त्यातून हिंदूऐक्याच्या दृष्टीने स्वयंसेवकांची एक विशिष्ट मानसिकता तयार झालेली आहे, असे वाटत असले तरी हिंदूऐक्याची शिकवण देणारे, हिंदुत्वाची भूमिका हिरीरीने मांडणारेदेखील प्रत्यक्षात आपल्या जातीचा अभिमान बाळगतात. आता जातनिहाय जनगणनेला अनुकूलता दर्शवून एकदम त्याला छेद देणारी भूमिका संघाने मांडलेली दिसते.
आता इतरांना हिंदूऐक्य, हिंदुत्व, देशभक्ती सांगणार्या संघ स्वयंसेवकांचे वागणे कसे असते हे पाहिले तर हे कसे ढोंगी आहेत हे लक्षात येते. विनय सहस्रबुद्धे हे संघाच्या थिंक टँकमधील अग्रणी विचारवंत. भाजपचे माजी राज्यसभा सदस्य, २०१८पासून भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष. एवढे बुद्धिमान आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे व्यक्तिमत्त्व सकाळी ठाण्यात संघाच्या शाखेत जाऊन बौद्धिक देऊन हिंदूजागृतीचे कार्य करतात आणि संध्याकाळी कोथरूडमध्ये ब्राह्मण महासंघाच्या कार्यक्रमात जाऊन ब्राह्मण जागृतीचे कार्य करतात. अविनाश धर्माधिकारी, राहुल सोलापूरकर यांच्यासारखे स्वयंसेवक तर आता ब्राह्मणरत्ने शोधून काढू लागले आहेत. त्यांची पुस्तके प्रकाशित करू लागले आहेत. अर्थात कुठल्याही जातीने संघटना स्थापन करून त्याद्वारे विधायक कार्यक्रम करण्याला आक्षेप असण्याचे कारणच नाही. आक्षेप याला आहे, की तुम्ही जातींच्या संघटनेत जाऊन जातीअभिमानाची भाषणे ठोकणार आणि लगेच बाकीच्या जातींना हिंदूऐक्याचे आणि हिंदुत्वाचे डोस पाजणार. इथे खरे संघाचे दर्शन घडते.
अर्थात भारतातील सर्वच समाजसुधारक, शिक्षणमहर्षी, स्वातंत्र्यसेनानी तसेच विविध क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तिमत्वांनी जातनिरपेक्ष व्यापक भूमिका घेऊन, देश व समाजहिताचा विचार करून आयुष्यभर काम केले. त्यासाठी प्रसंगी स्वतःच्या जातीचा, समाजाचा रोष पत्करला. आता अशा महान व्यक्तिमत्वांना जातीच्या चौकटीत बसवण्याच्या कामात संघ स्वयंसेवकांना सहभागी व्हावे असे वाटत असेल तर अन्य जाती या स्वयंसेवकांच्या हिंदूऐक्याच्या सचोटीबद्दल योग्य ती नोंद घेतील. एखाद्या जातीचे रत्न म्हणून त्यांना संबोधण्याऐवजी या समाजसुधारकांना हिंदुरत्न म्हटले असते तर संघ संस्काराच्या दृष्टीने ते अधिक योग्य ठरले असते. गंमत म्हणजे या जातअभिमानाच्या या उपक्रमात हिंदुअभिमानी संघ स्वयंसेवकांचीच गर्दी झाली होती. जातीची संघटना म्हणून सर्वसामान्य नागरिकांनी विधायक उपक्रम, कार्यक्रम करण्याला कुणाचाच आक्षेप नाही. कुठल्याही जातीने आपल्या जातीतील महान, आदरणीय व्यक्तिमत्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे यालाही आक्षेप नाही. उलट हे काम अन्य जातबांधवांसाठी प्रेरणादायी, आनंददायी आणि स्फूर्तिदायी असते. पण आपण जातसंघटनेचा पुरस्कार करायचा आणि इतरांना जात विसरून हिंदूऐक्य करण्याचे धडे देणे हे हास्यास्पद आहे.
आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि ज्यांनी हिंदू जागृती आणि हिंदूऐक्यासाठी आयुष्य वेचले त्यांची ओळख समाजाला हिंदूरत्न म्हणून व्हावी की त्यांच्या जातीचे रत्न म्हणून व्हावी याचा विचार अविनाश धर्माधिकारींनी केला किंवा नाही केला तरी अन्य समाज नक्की करेल. एकूण काय संघ स्वयंसेवकांनी केव्हाच जातनिहाय जनगणना सुरू केलेली आहे. सहस्रबुद्धे, धर्माधिकारी यांनी त्याची पताका हाती घेतलेली आहे.
अर्थात दोष केवळ अशा प्रातिनिधिक स्वयंसेवकांचा नाही तर हिंदूऐक्याच्या कार्याची शंभरी गाठूनही संघाच्या सरसंघचालकपदापर्यंत महाराष्ट्रातील अन्य जातीतील व्यक्ती अंगभूत गुणांच्या आणि कर्तृत्वाच्या आधारे पोहोचू शकला नाही, ही एकूणच हिंदू समाजव्यवस्थेतील त्रुटी दाखवणारी बाब आहे.