एका विद्यार्थीप्रिय शिक्षकाच्या प्रभावाने मार्शलला शिवसेनेच्या विचारांची लागण झाली आणि आमच्या घरातले वातावरण शिवसेनामय बनले. श्रीरामपूर शहरातला शिवसेनेचा संस्थापक सभासद असलेला मार्शल अखेरपर्यंत सामान्य शिवसैनिकच राहिला. त्याच्याबरोबर असलेल्या आणि त्याच्यानंतर या संघटनेत आलेल्या अनेक जणांनी नंतर राजकारणात जम बसवला, काहीजण तर आमदार आणि मंत्रीही झाले.
—-
सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात श्रीरामपूरला आमच्या घरात ‘जय भवानी, जय शिवाजी’चे गजर घुमायला लागले. माझा थोरला भाऊ, मार्शल मॉडर्न स्कूलमध्ये मॅट्रिकला म्हणजे अकरावीला शिकत होता. त्याला एका विद्यार्थीप्रिय शिक्षकाच्या प्रभावाने शिवसेनेच्या विचारांची लागण झाली आणि आमच्या घरातले वातावरण शिवसेनामय बनले. त्या शिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच मार्शल पहिल्यांदा शाळेच्या आणि नंतर बोरावके कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबर आणि इतर मित्रांबरोबर लेझीम खेळू लागला. या खेळाच्या माध्यमातून शिवसेनेचा आमच्या घरात प्रवेश झाला.
मार्शल रोज भल्या पहाटे तालमीत जायचा, तेथे लंगोट लावून घाम घाळायचा, आपल्या मित्रांबरोबर मल्लखांबावर कसरती करायचा. रात्री भिजवून ठेवलेली हरबर्याची डाळ सकाळी खायचा आणि रोज संध्याकाळी आपल्या वयाच्या तरुणांना घेऊन मैदानावर ढोल-ताशांच्या गजरात ‘जय भवानी, जय शिवाजी’ असे गर्जत लेझीम खेळायचा.
संगमनेरला येशूसंघीय धर्मगुरूंच्या ज्ञानमाता शाळेच्या बोर्डिंगमध्ये असताना मार्शलने नेतृत्वगुणांची झलक दाखवून दिली होती. या गुणांचा विकास या काळात होत गेला. आमच्या घरात लोखंडी पलंगांखाली अनेक लेझीम आणि ताशे असायचे. तेव्हा मार्शल आणि त्याच्या सहकार्यांबरोबर मैदानावर या मर्दानी खेळाचा एक-दोनदा अनुभव घेतल्याचे आठवते.
यादरम्यान मार्शलने शिवसेनेचा खास पटका त्याच्या गळ्याभोवती कधी गुंडाळला आणि भगवा टिळा कपाळावर कधी लावला, हे माझ्या लक्षातही आले नाही.
याच काळात वयाच्या पंधराव्या वर्षी फादर म्हणजे कॅथोलिक धर्मगुरू होण्यासाठी मी घर आणि कुटुंब सोडले होते. गोव्यात मिरामार येथे प्री-नोव्हिशिएट वा पूर्व-सेमिनरीत राहून हायर सेकंडरीचे आणि नंतर पदवीचे शिक्षण घेताना सुट्टीवर श्रीरामपूरला आलो म्हणजे मार्शलचे ते भगवे रूप मला अचंबित करून जायचे. मार्शल माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा. माझ्याहून धाकट्या दोन बहिणी त्याला ‘आप्पा’ म्हणायच्या आणि मग हळूहळू घरातले सर्वच जण त्याला ‘आप्पा’ म्हणू लागले.
कॉलेजच्या सुट्टीत गोव्याहून घरी परतलो की मार्शल आणि त्याच्या मित्रांकडून मुंबईच्या शिवसेना दसरा मेळाव्याच्या अनेक सुरस आठवणी ऐकायला मिळायच्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्कवरील दसरा उत्सवानिमित्त होणारे भाषण ऐकण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील शिवसैनिक मुंबईला जात असत. दसर्याआधी महाराष्ट्रातील शिवसैनिकांचे थवेच्या थवे मुंबईच्या दिशेने रेल्वेने निघायचे. या काळात मुंबईच्या दिशेने जाणार्या रेल्वेगाड्यांत खच्चून गर्दी असे.
‘मात्र या दिसांत कुठल्याबी रेल्वे स्टेशनच्या एकाही टिकेट कलेक्टरची (टीसी) रेल्वे डब्यात चढण्याची वा प्रवाश्यांना तिकीट विचारायची टाप नसते. परतीच्या प्रवासातबी अशीच स्थिती असते!’ अशी वाक्ये मी त्या वेळी अनेकदा ऐकत असे. बाळासाहेबांना मुंबईबाहेर दौरे करण्याची तोपर्यंत गरज भासली नव्हती. शिवसेनेचा विस्तार तोपर्यंत औरंगाबाद सोडा, ठाण्यातसुद्धा झाला नव्हता. मात्र बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाने तेव्हाच्या शहरी आणि गावगाड्यांतील तरुणांमध्ये गारूड निर्माण केले होते. तोपर्यंत शिवसेनेने पूर्ण वेळ राजकारण करण्याचा निर्णय घेतला नव्हता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जसे आजही स्वत:ला पूर्णत: सांस्कृतिक संघटना म्हणवून घेतो, तसेच शिवसेना त्याकाळी स्वत:ला केवळ एक सामाजिक संघटना, लुंगीवाल्या मद्राशी (दाक्षिणात्य) लोकांविरुद्ध लढणार्या मराठी माणसांची संघटना असे म्हणवून घेत असे. तोपर्यंत शिवसेनेने अधिकृतरित्या हिंदुत्वाचा गंडाही बांधून घेतला नव्हता.
या वार्षिक मुंबई दौर्यात शिवसैनिकांना रोमांचित करणारा एक खास अनुभव असे; तो म्हणजे दसर्यानंतर ‘मातोश्री’वर होणारी खुद्द बाळासाहेबांची भेट! शिवसेनेची मुंबई महापलिकेत सत्ता येण्यास अजून बराच काळ होता. त्यामुळे त्या काळात ‘मातोश्री’वर आजच्यासारखे सुरक्षेचे प्रस्थ नसायचे. दसरा मेळाव्याच्या मुंबईच्या वारीत राज्यातील शिवसैनिकांना त्यांच्या दैवताला भेटण्यासाठी मातोश्रीत मुक्त प्रवेश असे. बाळासाहेबांचे भाषण ऐकल्यानंतर दुसर्या दिवशी ‘मातोश्री’वर बाळासाहेबांना भेटण्यासाठी, त्यांना मानाचा मुजरा करण्यासाठी मार्शल आणि त्याच्याबरोबर गेलेले त्याचे इतर शिवसैनिक अगदी आतुर असायचे. गेली अनेक वर्षे दिवाळीच्या सणात शरद पवार मित्रमंडळींना, पक्ष कार्यकर्त्यांना आणि चाहत्यांना बारामतीला घरी भेटत असतात. तसलाच हा ‘मातोश्री’वरचा त्या काळातला एक सोहळा होता.
मार्शल हा श्रीरामपूरचा म्हणजे एका शहराचा शाखाप्रमुख असल्याने दरवर्षी त्याला जोडीदारांबरोबर आपल्या ‘विठ्ठला’चे दर्शन घेण्याची संधी मिळायची. आसनावर बसलेल्या बाळासाहेबांना मुजरा करून आम्ही मागे चालत जातो, ही भेट काही क्षणांचीच असते, पण स्मरणीय असते, असे मार्शलआप्पा म्हणायचा.
ब्लॅक अँड व्हाइट फोटोग्राफीच्या त्या जमान्यात आपली छायाचित्रे काढणे वा इतरांकडून काढून घेणे खूप अशक्यप्राय असायचे. पुढे कलर फोटोग्राफीच्या काळात काही मोजक्या लोकांच्या हातात कॅमेरे आले आणि विशेष घटना कॅमेर्यात बंदिस्त करणे शक्य होऊ लागले. याच काळात मार्शलने बाळासाहेबांची मातोश्रीवर घेतलेल्या भेटीचे छायाचित्र घेण्यात आले. ते त्यानंतर मार्शलआप्पाच्या जीवनातील एक मोठ्या घटनेचा ऐवज म्हणून जपून ठेवण्यात आले होते.
सत्तरच्या दशकात मुंबईत ‘दलित पँथर’ने दलित तरुणांमध्ये नवे वारे निर्माण केले होते, तसेच त्यानंतरच्या काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवसेनेचे वारे तयार झाले होते. गावोगावी वेशीपाशी शिवसेनेच्या नव्या शाखांचे बोर्ड लावले जात होते. शिवसेनेच्या शाखा बनवणार्या या तरणाबांड पोरांपैकी बहुसंख्यजण मार्शलसारखेच सुशिक्षित बेरोजगार असायचे. आक्रमकता आणि बेडरपणा हा त्यांचा जणू स्थायीभावच असायचा. ‘घाशीराम कोतवाल’ हे विजय तेंडुलकरांचे नाटक, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसंबंधित रामायणातील ‘रिडल्स’चा वाद आणि त्यानंतरचे मराठवाडा विद्यापीठ नामांतर यांबाबत शिवसेनेने घेतलेल्या भूमिका वादग्रस्त ठरल्या. बाळासाहेबांविषयीचा कमालीचा आदर असल्याने त्यांचा आदेश पाळणे हे शिवसैनिकांचे कर्तव्यच असायचे. एक कट्टर शिवसैनिक म्हणून शिवसेनेच्या धोरणास पाठिंबा देण्याबाबत मार्शलही अगदी ठाम असायचा! त्याबाबत कधीही मतांतरे वा दुमत नसायचे. या प्रकरणासंबंधींचे काही वाद अनेक महिने, काही वर्षे चालले होते. मार्शलआप्पाने नेहमीच बाळासाहेबांच्या भूमिकेची पाठराखण केली.
‘(शिवाजी) महाराजांनी कधी जाती-धर्माचा बागुलबुवा केला नाही. त्यांच्या मावळ्यांत सगळ्या जातींचे आणि मुसलमान लोकही होते. तसेच साहेब पण (बाळासाहेब ठाकरे) जाती-धर्माचा असा संकुचित विचार करत नाहीत!,’ असे मार्शलचे म्हणणे असायचे. शिवरायांच्या अंगरक्षकांमध्ये आणि सैन्यातसुद्धा मुसलमान होते, तसेच शिवसेनेतही आमदार साबिर शेख आहेत, असा तो नेहमी दाखला द्यायचा.
एकदा नाताळाच्या सुट्टीत मी घरी आलो होतो, तेव्हा ओट्यापाशी रस्त्याला लागून खांबावर उंच जागी नेहमीप्रमाणे ख्रिस्तजन्माची शुभवार्ता देणारा तारा लावलेला होता. सारवलेल्या अंगणात ‘नाताळाच्या शुभेच्छा’ असे रंगीत रांगोळीने लिहिले होते आणि घराच्या पत्र्यावर टांगलेल्या उंच बांबूवर भगवा झेंडाही फडकावलेला होता.
त्या काळात प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणार्या दलित पँथर आणि शिवसेनेच्या अनेक सामान्य, तळागाळातील कार्यकर्त्यांना जे काही भोगावे लागले, ते सर्व मार्शलच्याही वाट्याला आले. मोर्चे, दमदाटी, सरकारी कामकाजामध्ये आडकाठी वगैरे अनेक आरोपांत तो अनेकदा गुंतला गेला. पोलिसचौकशा आणि कोर्टकचेर्यांचा त्याच्यामागे ससेमिरा सुरू झाला. मी गोव्यात असल्याने सटी-सहामाही श्रीरामपूरला आल्यावर यासंबंधीची अगदी तुरळक माहिती बाईकडून मला मिळायची. (नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी आईला ‘बाई’ हेच संबोधन असते!) डोळ्यातील पाणी पदराने टिपत बाई मला ही माहिती सांगायची, तेव्हा माझाही थरकाप उडायचा. त्या काळात मार्शलच्या तुरुंगाच्या किती वार्या झाल्या असतील, याची मला आजही कल्पना नाही. त्याला ताबडतोब जामीन मिळवून त्याची सुटका करणारे शिवसेनेचे इतर नेते, त्या वेळी आजच्याइतके प्रस्थापित झालेले नव्हते.
यादरम्यान पणजीत ब्रदर म्हणून प्राथमिक दीक्षाविधी होऊन सफेद झगा मिळण्याआधीच फादर होण्याचा निर्णय मी बदलला होता. मात्र मी गोव्यातच स्थायिक झालो होतो. पणजीतील ‘नवहिंद टाइम्स’ या इंग्रजी दैनिकात मी त्या वेळी बातमीदार होतो. ‘कामिल, इथल्या पोलिसांनी जारी केलेली तडीपार नोटीस रद्द करण्यासाठी तू काही करू शकशील काय?’ असे मार्शलने मला विचारले होते.
गोव्यात मी क्राईम रिपोर्टर असलो तरी अहमदनगर जिल्ह्यात पोलीस खात्यात मला कोण ओळखणार किंवा कोण माझे ऐकणार होते? मी त्याला अहमदनगरचे शिवसेना नेते अनिल राठोड यांना याबाबत भेट असे सांगितले. यावर मार्शल नुसताच हसला. त्यानंतर मार्शलच्याच एका सहकार्याने मला सांगितले की, मार्शल आणि राठोड या दोघांची चांगली ओळख आहे.
एकदा बाई सांगत होती, बहुधा १९८४ला पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर श्रीरामपुरात बाजारपेठेत झालेल्या जाळपोळ आणि लुटालुटीनंतरची ही घटना असावी. ‘गेल्या महिन्यात ऐन मध्यरात्री घराच्या मागल्या आणि पुढच्या दारांवर जोरदार थापा पडल्या, काठ्यांचे आवाज आले… पोलिसांची पुन्हा एकदा धाड पडली होती. उघडलेल्या दोन्ही दारांतून काठ्यांचा आवाज करत पोलिसांनी झोपलेल्या सर्वांच्या अंगावरच्या गोधड्या आणि चादरी दूर केल्या होत्या. मोठी बाया-माणसं आवाजानं जागी झाली तरी पोरंसुरं झोपलेलीच होती. पोलिसांनी मग दोन्ही-तिन्ही खोल्यांतील पलंगांखाली वाकून, तिथल्या सामानांत आणि भरलेल्या बोचक्यांत काठ्या फिरवल्या.’ मग परत जाताना त्या पोलिसांचा सायब तुझ्या दादांकडे वळून म्हणाला, ‘पारखे टेलर, माफ करा, घरातल्या तुम्हा सगळ्यांना रात्री-अपरात्री हा तरास होतो. पन यावेळी आम्हाला मार्शलला पकडायचेच आहे!’ ते पुलिस गेल्यानंतर एक तास उलटला तरी पलंगाखाली गोवर्या आणि ऊसांच्या खोडक्यांच्या पाेत्यांमागे लपलेला मार्शल बाहेर आला नाही. पहाटे बाहेर आला आणि काही दिवस पुन्ना गायबच झाला.’
शिवसेनेने राजकीय पक्ष म्हणून वावर सुरू केला, तेव्हा मार्शलनेसुद्धा राजकारणात उडी घेतली. श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत तो उभा राहिला. ‘मार्शल जॉन पारखे’ या नावाचा युवक बहुसंख्य हिंदू असलेल्या वॉर्डातून खुल्या वर्गातून उमेदवार म्हणून उभा राहिला होता. दलित असला तरी ख्रिस्तीधर्मीय असल्याने त्याला आरक्षण नव्हते. त्यामुळे जे व्हायचे तेच झाले. मार्शलचा पराभव झाला. आमच्याच चाळीतील एक उमेदवार निवडून आला आणि त्यानंतर तो प्रस्थापित नगरसेवक बनला. या निवडणुकीचा धडा घेऊन पुढच्या पालिका निवडणुकीत जर्मन दवाखान्याच्या परिसरातील वॉर्डातून मार्शलआप्पा उभा राहिला. जर्मन मिशनरींनी उभारलेला तो दवाखाना, तेथील ख्रिस्ती देऊळ, येशूसंघीय फादरांतर्फे चालवल्या जाणार्या आरटीआर, सोशल सेंटर वगैरे संस्थांच्या आसपासच्या त्या परिसरातील ख्रिस्ती मतदारांची संख्या लक्षणीय होती. मार्शल हा त्या परिसरातील सर्वांना परिचित असणार्या पारखे टेलरांचा मुलगा होता, त्यालाही बहुतेक सर्व ख्रिस्ती मतदार ओळखत होते. मात्र या ख्रिस्ती तरुणाने शिवसेनेचा भगवा झेंडा घेऊन मते मागावीत, हे त्या लोकांच्या पचनी पडले नाही. मार्शलचा त्या निवडणुकीतही पराभव झाला.
त्यानंतर मार्शलआप्पा निवडणुकीच्या फंदात पडलाच नाही. या क्षेत्रात आपल्याला फार मजल मारता येणार नाही, हे त्याच्या लक्षात आले होते. श्रीरामपूर शहरातला शिवसेनेचा एक संस्थापक सभासद असलेला मार्शल अखेरपर्यंत सामान्य शिवसैनिकच राहिला. त्याच्याबरोबर असलेल्या आणि त्याच्यानंतर या संघटनेत आलेल्या अनेक जणांनी नंतर राजकारणात जम बसवला, काहीजण तर आमदार आणि मंत्रीही झाले.
दहा-बारा वर्षांपूर्वी प्रदीर्घ आजाराने मार्शलआप्पाचे निधन झाले, तेव्हा श्रीरामपूर आणि अहमदनगरहून प्रसिद्ध होणार्या विविध दैनिकांत छोट्याशा एक कॉलममध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांत ‘एक जुने, कट्टर शिवसैनिक’ म्हणून त्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्याच्या चाळीसाव्यानिमित्त कबरीपाशी मेणबत्त्या लावून प्रार्थना झाल्या, फुले वाहण्यात आली. यानिमित्त जमलेल्या लोकांना बसण्यासाठी मार्शलच्या घराभोवती छोटासा मांडव घालण्यात आला होता…
…आणि घराच्या पहिल्याच खोलीत दोन्ही हात जोडून आपल्या दैवताला – बाळासाहेब ठाकरेंना – दंडवत घालणार्या मार्शलआप्पाचे ‘ते’ छायाचित्र होते.
– कामिल पारखे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)