देवेंद्र फडणवीस
सगळे भ्रष्ट आमच्या युतीत
मोजून घ्या तुम्ही एकेकाला
म्हणूनच होतो महायुतीचा
निवडणुकीतही बोलबाला
एकापेक्षा एक वरचढ
भ्रष्टाचारी हे मेरूमणी
गर्व असे आम्हाला त्यांचा
केवढी त्यांची अफाट करणी
बचे हुए सब भ्रष्टाचारीयों
या या तुमचे आहे स्वागत
सगळे कलंक पुसून जातील
आवडेल बघा आमची पंगत
—– —– —–
छगन भुजबळ
फडणवीस माझे रक्षणकर्ते
त्यांनीच माझी वाचवली पत
अजितदादा लबाड आहेत
करतो त्यांची बघा कशी गत
खाली मुंडी पाताळधुंडी
पाहती मजला ते पाण्यातच
पक्ष एक तरी दुजाभाव का
दिसतो त्यांच्या तो डोळ्यातच
जेव्हा तेव्हा खुपते त्यांना
का नकळे हे माझे बाहुबळ
मी ओबीसी-नेता स्वयंभू
म्हणून करती का माझा छळ?
—– —– —–
अजित पवार
लाच देऊनी मते घेतली
तेव्हा बहिणी हव्या होत्या
तिजोरीलाच बसता दट्ट्या
मलाही झाल्या डोईजड त्या
एकनाथांनी फूस लावता
हात बहिणींनी धुवून घेतले
बँकांसकट लठ्ठ पगारी
बहिणींनी तर शिखर गाठले
पापात होतो मी सहभागी
सत्ता मिळताच जिभल्या चाटल्या
शिवता शिवता तिजोरीच्या त्या
खिशांसकटही चड्ड्या फाटल्या
—– —– —–
धनंजय मुंडे
विपश्यनेला गेल्यानंतर
मला मिळाली मन:शांती ती
सगळी पापे धुवून निघाली
आता नाही वाटत भीती
सत्तेबरोबर आली मस्ती
असंगांशी नडला संग
मंत्रीपदाला लागे घरघर
उघडे पडले माझे ढोंग
आता फक्त वाट बघावी
केव्हा फुटते माझे भांडे
तरीही आशा आहे धूसर
मनात फक्त खातो मांडे
—– —– —–
एकनाथ शिंदे
आमच्या तिघात वाद नाहीत
भक्कम एकजूट आहे आमची
उगाच चिंता करता तुम्ही
जाणून आहे काळजी तुमची
खुर्चीसाठी आहोत आम्ही
खुर्ची नाही आमच्यासाठी
भांडू-तंडू, पायही ओढू
तरीही चिकटू जनतेसाठी
जरी ही तोंडे तीन दिशांना
सत्तेसाठी चिकटाचिकटी
पायात गोळे आले तरीही
तोंडाला ही चिकटपट्टी