पुढील लेखाची वाट पाहायला लावणारे सदर
`धंदा म्हणजे काय रे भाऊ’ हे `मार्मिक’ अंकात सुरू झालेले सदर छान आहे. प्रत्येक लेखामधून नोकरीकडून व्यवसायाकडे वळलेले उद्योजक यांचा जो मधल्या टप्प्यातील खडतर अडचणींचा प्रवास आहे तो स्तंभलेखक संदेश कामेरकर यांनी नेहमीच्या ओळखीच्या शब्दातूनच मांडला आहे. ते शब्द वाचकाला लेखातील मजकुराच्या जवळ घेऊन जातात. ‘बँकेत नोकरी ते टायगर सफारी’ हा ताजा लेख वाचताना तर `पिंजर्यातून वाघ बदाबदा बाहेर येणे’ यासारखी वाक्यरचना वाचताना त्यांच्या भाषाशैलीची अनुभूती आलीच, पण टायगर सफारीची प्रबळ इच्छाही मनात निर्माण झाली. स्कूटीच्या बॅक सीटवर न बसता फ्रंट सीटवर बसण्याच्या इच्छेसारखी.
`धंदा म्हणजे काय रे भाऊ’ हे सदर पुढील लेख कोणत्या उद्योजकाचा असेल अशी वाचकाला वाट पाहायला लावणारे होते आहे. प्रत्येक लेखातील व्यावसायिक भावी व्यावसायिकांना आदर्श ठरत आहेत आणि त्याचे सर्व श्रेय आपल्या स्वनिर्मित भाषाशैलीतून वाचकांपर्यंत पोहचविणारे संदेश कामेरकर यांचे आहे.
– सुलभा धामणस्कर, सायन
अशीच घोडदौड सुरू राहू दे
शिरीष जोशी म्हणजे आम्ही ओळखतो समोर दिसतो तो शिरीष, एवढेच माहिती होत आम्हाला. पण शालेय जीवनापासून आजवरचा त्याचा प्रवास मार्मिकमधील लेखामुळे कळला. त्याची वेगवेगळ्या क्षेत्रातली कामगिरी, सखोल विचार करण्याची वृत्ती, कामाप्रती निष्ठा, विविध क्षेत्रातल्या सेलिब्रिटीसोबत असलेले व्यावसायिक तसेच घरगुती जिव्हाळ्याचे नाते हे सगळे वाचून त्यांचा खूप अभिमान वाटला मित्रा, तुझी घोडदौड अशीच सुरू राहूदे. आपली बालपणापासूनची मैत्री अजूनही टिकून असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.
– अरविंद ठक्कर, मुंबई.
छोटी वळणं आज कळली…
शिरीष जोशी यांची सिंडिकेट ते सफारी ही सफर आम्ही तर पाहून आहोतच, पण त्यातली छोटी छोटी वळणं आज जरा जवळून कळली! त्यांच्या हरहुन्नरी स्वभावाच चित्रण नेमकं टिपलंय!
– विश्वास बापट, मुंबई
बाळासाहेबांचा सहवास
मार्मिकमधील मोठी माणसं या सदरातील ज्ञानेश सोनार यांनी टिपलेले हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे भन्नाट उतरले आहेत! अगदी दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठासारखे. ज्ञानेशराव, खरे सांगायचे तर आपण भाग्यवान आहात, केवढ्या दिग्गज लोकांचा सहवास तुम्हाला लाभला! उद्या तुमच्या वयोगटात शिरल्यानंतर असे काही लिहायचे म्हटले तर त्या पात्रतेचे लोक शोधायचे कुठे? तुम्ही निश्चितच अपवाद. विशेष म्हणजे ज्या वयात कपाळावर चढवलेला चष्मा शोधावा लागतो त्या वयात आपले स्मरण लख्ख किंवा खरे तर लखलखीत याहे याचे अप्रूप वाटते! जसा परीसस्पर्श म्हणतो तसाच सोनारांनी रंगविलेल्या व्यक्तिमत्वांना अतिशय पारदर्शक असा `ज्ञानेश स्पर्श’ असतोच असतो! देवा, असेच लिहीत राहा, माझ्यासारखे वाट पाहणारे भक्त खूप आहेत.
– अशोक श्रीराम, संपादक शिरपूर
खिळवून ठेवणारा लेख
शिरीष यांच्या यशाचा खूप अभिमान वाटतो. संदेश कामेरकर यांनी त्यांचा जीवनपट खूप सुंदर मांडला आहे. त्यांचा टुरिझम इंडस्ट्रीतला प्रवास आणि कहाण्या यांनी प्रेरित होऊन मला आत्ता त्यांच्यासोबत सफारीला जावेसे वाटते आहे. प्लीज, लवकरात लवकर माझ्यासाठी एक टूर अरेंज कराल का? लेखात लिहिलेले अनुभव घेण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे.
– ब्रायन रॉड्रिग्ज, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया
ज्ञानेश सोनारांना सलाम!
पुलंचे भरभरून विनोद, त्यांचे व्यक्तिमत्व ज्ञानेश सोनार यांनी मोठी माणसं या लेखमालेत लिहिलेल्या सुंदर लेखातून लक्षात येतेच, परंतु त्यांचे अंतरंग कसे होते याचे दर्शनही त्यांनी करून दिले आहे. या महान व्यक्तिमत्वाला प्रणाम आहेच, परंतु त्यांना चितारणार्या व साकारणार्या सोनारांसारख्या महान चित्रकारालाही सलाम! आजच्या सर्दी पिढीला हे दर्दीपण यावे ही आस आहे.
– मोहनदास भामरे
आठवणी आणि चित्रही अप्रतिम
माझे वडील मधुकर पाटकर अर्थात आमच्या सर्वांच्या भाऊंच्या आठवणी ज्ञानेश सोनार यांनी फार बारकाईने आणि मन:पूर्वक उतरवल्यात. त्यांच्या आठवणींतून त्यांचे चित्रही तेवढेच अप्रतिम दिले आहे. ज्ञानेशजी, आपला स्नेह आणि प्रेम आवाज परिवारावर असाच राहू दे, धन्यवाद!
– भारतभूषण पाटकर
खरंच खूप सुंदर लेखमाला
मार्मिकमधील ज्ञानेश सोनार यांची मोठी माणसं ही लेखमाला उत्तरोत्तर रंगत चालली आहे. खरं तर अशा विषयांची त्या विषयात काम करणार्यांना खूप आवश्यकता असते… सोनार यांच्याकडून अनेकदा वैयक्तिक ऐकले आहे. आता वाचले सुद्धा.
कसं बोलावं, कसं लिहावं, कसं दिसावं… कसं असावं, हे सोनार यांच्याकडून शिकण्याचा माझा सतत प्रयत्न असतो.
खरंच खूप सुंदर. हा असा प्रत्येक अनुभव, माहिती आम्हाला सांगण्याकरिता सोनार यांना उदंड आयुष्य लाभो.
– रवींद्र बाळापुरे