हे व्यंगचित्र पाहिले की महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला यंदाची आयपीएल आणि त्या स्पर्धेत मुंबई इंडियन्स या संघाचे झालेले पानिपत आठवल्याशिवाय राहणार नाही… क्रिकेट हा खेळ सर्व भारतीयांचा आवडता, बाळासाहेबही क्रिकेटचे आणि क्रिकेटपटूंचे चाहते होते आणि तेही वेळ मिळाल्यास मुलांबरोबर क्रिकेट खेळण्यात रमत. क्रिकेटचे चाहते खेळाडूंना एकतर डोक्यावर घेतात, नाहीतर जमिनीवर आपटतात, मधला काही मार्ग नाहीच. क्रिकेट हा खेळ आहे, त्यात हारजीत होतेच, कितीही महान खेळाडू असला तरी त्याचाही फॉर्म कधीतरी गडबडतोच, हे त्यांचे कट्टर चाहतेही विसरतात. मुंबई इंडियन्सच्या पराभवांची मालिका सुरू होती तेव्हा समाजमाध्यमांवर त्या संघाची हेटाळणी करणारी कितीतरी मीम्स आणि व्यंगचित्रे प्रसृत होत होती… पण खेळाचा सच्चा चाहता कसा असतो, त्याचं दर्शन बाळासाहेबांच्या या व्यंगचित्रात घडते. अजित वाडेकर यांच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने १९७४ साली इंग्लंडविरुद्धची क्रिकेट मालिका गमावल्यानंतरही बाळासाहेबांच्या व्यंगचित्रातील चाहता त्यांना शुभेच्छाच देतो आहे आणि पुढे जबाबदारीने खेळा, असे सांगतो आहे. ‘रबर’ म्हणजे कसोटी मालिकेचे अजिंक्यपद. ते गमावल्यावर पडलेले डाग खोडून काढण्यासाठी तो आपल्याकडचे खोडरबरही देतो आहे, ही निरागस गंमत हास्यस्फोटकही आहे आणि सहृदयही.