महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभेच्या निवडणुका प्रचंड प्रमाणात वादग्रस्त ठरल्या. भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीला सुद्धा अपेक्षित नव्हते असे निकाल लागले. २८८पैकी तब्बल २३० जागा जिंकून महायुती सत्तेवर आली. कोण होणार मुख्यमंत्री याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा, बैठका होता होता अखेर भाजपचे निरीक्षक गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (इथेही गुजरात हवेच) आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन मुंबईत डेरेदाखल झाले. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. अखेर गंगेत घोडे न्हाले. आझाद मैदानावर प्रथा, परंपरा, संकेत (हे काय असतं?) बाजूला ठेवून लाडक्या बहिणींसह सुमारे चाळीस हजार लोकांच्या उपस्थितीत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी फडणवीस यांना महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. रुसवे फुगवे, मनधरणी, आमदारांचा बेफाम आग्रह या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर मावळते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ही शपथ घेताना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नावे घेतली. गेल्या अनेक वर्षांपासून आमदार, मंत्री, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार्या शिंदे यांना शपथेपूर्वी चार नावे घेण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे शपथ देणार्या राज्यपाल महोदयांना शिंदे यांच्याकडे कटाक्ष टाकावा लागला. अजितदादा पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची विक्रमी शपथ घेताना ‘गांभीर्यपूर्वक’ शपथ घेत आपले अस्तित्व दाखवून दिले. केवळ तिघांचाच शपथविधी सोहळा पार पडला. मंत्रीपदेच्छुकांना ‘गाजर’ दाखवण्यात आले.
घटना, कायदा, प्रथा, परंपरा, संकेत यांचा अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाशी चांगला संबंध होता. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील महासंघर्षातून स्थापन करण्यात आलेल्या जनता पक्षातून ६ एप्रिल १९८० रोजी बाहेर पडून मुंबई येथे महाअधिवेशन भरवून वाजपेयी-अडवाणी यांनी स्थापन केलेल्या या पक्षाची ओळख आणि त्यांच्या कारकीर्दीचे नामोनिशाण २०१४नंतर आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या लाटेने पुसून टाकले. त्यामुळे २०१४नंतर नवीन राजकीय इतिहास लिहिण्याचे कार्य सुरू झाले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या पुढाकाराने १९८९ साली सुरू झालेली शिवसेना आणि भाजप युती २४ सप्टेंबर २०१४ रोजी वरिष्ठांच्या सांगण्यावरून तोडली गेली. त्यामुळे ऑक्टोबर २०१४मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका शिवसेना, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या चौघांनी स्वतंत्रपणे लढल्या. अनेक राजकीय घडामोडींनंतर ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी फडणवीस यांनी सर्वात तरुण असे दुसरे मुख्यमंत्री म्हणून वयाच्या ४४व्या वर्षी शपथ घेतली. अल्पमतातील सरकार बहुमतात आणून पाच वर्षे खुर्ची टिकावी म्हणून फडणवीस यांनी धर्मेंद्र प्रधान आणि चंद्रकांत पाटील यांना ‘मातोश्री’च्या दरवाजावर पाठविले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवीत भाजपला पाठिंबा दिला. २०१४ ते २०१९ अशी पाच वर्षे फडणवीस यांनी केवळ आणि केवळ उद्धव यांच्या पाठिंब्यावरच सत्ता उपभोगली. ५ डिसेंबर २०१४ रोजी सकाळी विरोधी पक्षनेते असलेले एकनाथ शिंदे संध्याकाळी मंत्री झाले. त्यांच्यासमवेत शिवसेना आमदारही मंत्रिमंडळात आले. शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री झाले. उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला भाजपला आणि पदोन्नती मिळाली शिंदे यांना. त्यानंतर २०१९च्या निवडणुकीतील अनुभव आणि २०२२ साली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आजारपण, राज्यसभेच्या आणि विधानपरिषदेच्या निवडणुका, चाळीस आमदारांना घेऊन सुरत, गुवाहाटी, गोवा सफर आणि ३० जून २०२२ रोजी भाजपच्या पुढाकाराने मोदी शाह यांच्या आशीर्वादाने मिळालेले मुख्यमंत्रीपद ही चढती कमान बरोब्बर पाच डिसेंबर २०२४ रोजी याच दिवशी दहा वर्षांनंतर खाडकन् खाली आली आणि मुख्यमंत्रीपदावरुन उपमुख्यमंत्रीपदावर पदावनती झाली. ५ डिसेंबर या तारखेचा हा करिष्मा महाराष्ट्राच्या इतिहासात नोंदला जाईल.
१४ मार्च १९९५ रोजी शिवतीर्थावर डॉ. मनोहर जोशी यांनी अरबी समुद्राला लाजवील अशा जनसागराच्या साक्षीने शिवशाही सरकारचे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांच्याकडून शपथ घेतली. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री झाले. अटलबिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे प्रेक्षकांमध्ये पहिल्या रांगेत बसले होते. राज्यपाल शपथविधी होताच निघून गेले आणि मग बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी लाखोंच्या संख्येने जमलेल्या जनसागराला संबोधित केले. परंतु ५ डिसेंबर २०२४ रोजी सर्वच संकेत, प्रथा, परंपरा बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन गडकरी यांच्यासमवेत सर्व मंत्री, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, मुंबई भाजपचे अध्यक्ष आदींनी शपथविधीच्या व्यासपीठावर प्रचंड गर्दी केली होती. या संपूर्ण गर्दीत एकनाथ शिंदे हे कुठेतरी हरविलेले दिसत होते. ना मान, ना सन्मान, मैं तेरा मेहमान! भोगा आपल्या कर्माची फळे, दुसरे काय?