महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली मुलाखत घेण्याचा मान माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या याला मिळाला. तीच ही मुलाखत…
– नमस्कार फडणवीस साहेब. अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.
– नमो नम:, आभारी आहे पोक्या.
– तुम्ही तुमचा शब्द खरा करून दाखवलात.
– ये तो होना ही था. हे बघ पोक्या, कुठल्याही पदाची इच्छा असावी, हाव नसावी. मनावर संयम ठेवला तर सारं काही पदरात पडतं. सामर्थ्य हवं सहनशीलतेचं.
– ते सगळं खरंय, तरीसुद्धा तुम्ही गेल्या अडीच वर्षांत ‘मी पुन्हा येईन’ हा मंत्र सारखा सारखा जाहीरपणे कशाला म्हणत होता? सत्ता आली तर तुम्हीच मुख्यमंत्री होणार हे तर आमच्या कामवालीला सुद्धा माहीत होतं. तिच्याही पदरात लाडक्या बहिणींचे आतापर्यंत सहा हजार पडलेत.
– हेच तर आमच्या यशाचं खरं गमक आहे. लाडक्या बहिणींची योजना आमच्या डोक्यातून निघाली नसती तर केवढा
सेटबॅक बसला असता आम्हाला.
– पण महायुतीने म्हणजे तुमच्या युतीतल्या भाजप आणि शिंदे गटांनी तर म्हणे सगळी निवडणूकच महायुतीच्या पथ्यावर पडेल अशी सेट केल्याचं कित्येकजण म्हणतायत. ते खोटं आहे का? किती पैसा ओतलात तुम्ही तिन्ही पक्षांनी. कुठून आला एवढा पैसा?
– यात माझा काहीही सहभाग नाही. तसं सिद्ध झालं तर मी माझ्या मुख्यमंत्रीपदाचा एका क्षणात राजीनामा देईन. कर नाही त्याला डर कशाला?
– झालं ते झालं. मला फक्त तुम्हाला दिल्लीश्वरांनी मुख्यमंत्रीपदाचा हिरवा कंदील कसा काय दाखवला, एवढंच जाणून घ्यायचंय. तुम्ही कोणत्याही मंदिरात न जाता तुम्हाला मुख्यमंत्रीपदाचा मान कसा काय मिळाला?
– माझा सर्व देवांवर विश्वास आहे. मी नास्तिक नाही. कदाचित या देवांनीच मला प्रेरणा दिली असेल की तू आमच्या पायाशी येण्याचा त्रास घेऊ नकोस. कुणावरही दबाव आणून एखादी गोष्ट मिळवावी हे तुझ्या स्वभावात नाही.
– मला हे पटत नाही. तुमची खरी दोन दैवते दिल्लीत स्थानापन्न आहेत, हे सार्यांनाच माहीत आहे. त्यापैकी एक दैवत तुमच्यावर सदैव नाराज असतं. दुसरं दैवतही त्या दैवताचंच ऐकतं. तुमच्यावर नाराज असलेलं दैवत अतिशय पाताळयंत्री, कावेबाज, धूर्त, स्वार्थसाधू, मुरब्बी राजकारणी असल्याचं म्हटलं जातं. त्याची तुमच्यावर कृपा झाली याचा अर्थच त्यांना व्यापक पक्षहितासाठी तुमच्या प्रतिस्पर्ध्याचा गेम करायचा होता. तुम्हालाही त्याचा गेम करायचा होता, पण हे सारं आपसुक घडेल याची खात्री तुम्हाला होती. म्हणूनच तुम्ही इतर आंडूपांडू नेत्यांना व कार्यकर्त्यांना या बाबतीत माझ्या बाजूने पाठिंब्याचा तमाशा करू नका हे शांतपणे सांगितलं होतं. शिंदे ही व्यक्ती भाजपला आणखी डोईजड होऊ द्यायची नव्हती आणि तुमच्याही मनात तसंच होतं हे खरंय?
– पोक्या, अगदी बरोब्बर बोललास. आता तुला सारं काही सांगितलंच पाहिजे. मात्र कुणालाही सांगू नकोस. या गोष्टी मला कुणाशीही शेअर कराव्याशा वाटतात, पण आमच्या पक्षात ज्याच्याजवळ मन मोकळं करावं असा नेताच महाराष्ट्रात नाही. त्या ५२कुळेंविषयी तर तुला सांगायलाच नको. सगळे तोंडावर गोड बोलतात, पण आहेत आतल्या गाठीचे…
– म्हणजे थोडक्यात तुमच्यासारखेच…
– मी आहे थोडासा, पण आमच्या पक्षात बहुतेक सगळे नेते तसेच, त्या राणाबाई सोडल्या तर…
– हे काय मध्येच…
– काही नाही. पटकन् तोंडातून निघून गेलं.
– गेलं तर जाऊं दे. असे विषय नकोतच. मागून त्रास होतो. आपण मूळ मुद्द्यावर येऊया.
– ठीकाय. तर सांगतोच. अडीच वर्षांपूर्वी मला दिल्लीश्वरांनी शिवसेना फोडण्याचं दिलेलं आव्हान मी स्वीकारलं आणि पुढे काय झालं ते जगाला माहिताय. शिंदेंना खुश करण्यासाठी मला डावलून शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं. मला उपमुख्यमंत्री केलं. तेव्हाच्या परिस्थितीनुसार ते ठीक होतं. मी समजून घेतलं. पण त्या पदावर बसल्यावर शिंदेंच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या. एक तर हे गद्दार. ज्यांनी मोठं केलं त्यांना लाथाडून आमच्या सांगण्यावरून ते आमच्यात आले. पण आमचे झाले नाहीत. त्यांच्या अनेक कामचलाऊ चालू नेत्यांना आम्ही मंत्रीपदं दिली. पक्षाने लोकसभा निवडणुकीत पुरेशा जागा दिल्या, पण त्यापूर्वीच त्यांनी भाजपशी सवतासुभा करण्याची खेळी उघडपणे सुरू केली होती. हा माणूस आमच्यापेक्षा मोठा होऊ पाहात असेल तर त्यांचे पंख केव्हा तरी छाटलेच पाहिजेत, या निष्कर्षाप्रत आम्ही आलो. त्यांना हवेत भरपूर उडू द्यायचं आणि नंतर योग्य वेळी त्यांचा काटा काढायचा हे आमच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यावेळीच ठरवलं होतं. आपण फारच कार्यक्षम आणि अतिशय उदार आहोत हे दाखवण्यासाठी स्वत:च्या पदाच्या नावाने तीन योजना त्यांनी सरकारच्या म्हणून सुरू केल्या. त्यातल्या लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार फक्त आपण स्वत:च आहोत याची भरपूर प्रसिद्धी करून घेतली. त्यामुळे माझे आणि अजितदादांचे वांदे झाले. मग आम्हीही त्या योजनेत आहोत हे दाखवण्यासाठी आम्हीr दोघांनी स्वतंत्र जाहिराती करून त्यांचे मुख्यमंत्रीपद जाहिरातीतून वगळण्यास सुरुवात केली. या योजनेचा फायदा निवडणुकीत भरपूर झाला हे खरं असलं तरी केवळ आपल्या योजनेमुळे तो मिळाला. त्यामुळेच पुन्हा आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल, असं त्यांना वाटू लागलं. तेव्हा त्यांची नेहमी पाठराखण करणार्या आमच्या अमित शहांनी हीच वेळ त्यांचे पंख कापण्याची आहे, हे लक्षात घेऊन त्यांना चाप लावला. योग्य वापर करून झाल्यावर त्यांचा काटा काढायचा ही भाजपची पद्धतच आहे. त्यामुळेच मी पुन्हा आलोय!