□ धिम्या रस्ते कामांमुळे मुंबईच्या वेगाला ब्रेक.
■ आता बुलेट ट्रेन आली की सगळे विद्युतवेगाने गुजरातला जाईल. कारण, महाराष्ट्र आता थांबणार नाही, गुजरातची चाकरी करताना त्याला सुट्टी मिळणार नाही.
□ फुकट्या प्रवाशांमुळे पश्चिम रेल्वे मालामाल; सात महिन्यांत ९३ कोटींची दंडवसुली.
■ लोकल रेल्वेचा प्रवास सगळ्यात स्वस्त आहे, पास तर रिक्षाच्या दोनतीन दिवसांच्या प्रवासाइतका स्वस्त आहे. तरीही इतक्या लोकांना विनातिकीट प्रवास करण्याची इच्छा का होत असेल? त्यांची काय मजबुरी असेल?
□ लाडकी बहीण योजनेच्या वैधतेबाबत १५ जानेवारीपूर्वी उत्तर सादर करा- उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश.
■ बैल गेला आणि झोपा केला… आता कोर्टाने ही योजना रद्द ठरवली तरी लाडके तीन भाऊ एकमेकांना टाळ्या देत सुंठीवाचून खोकला गेला म्हणून नाच करतील.
□ बिल्डर भाडे थकवतो, झोपड्यांचा पुनर्विकास रखडतो, सरकार काय करतेय? -हायकोर्टाचा सवाल.
■ सरकार बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, असा थेट विखारी प्रचार करून, लोकांच्या डोक्यात आगी पेटवून, समाज अस्थिर करून त्यावर राजकीय पोळ्या भाजण्यात मग्न आहे. हे पुनर्विकास वगैरे मतं मिळेपर्यंतच महत्त्वाचं असतं.
□ शिंदे बटें नहीं थे, फिर भी कट गये- समाजवादी पक्षाने तोंडसुख घेतले.
■ पिंजर्यामध्ये वाघ सापडला तरी लहान पोरंबाळं खडे मारतात… इथे तर ईडीच्या भयाने घाबरून पळालेले अधर्मवीर आहेत, लाचारी, गद्दारीची फळं वेगळी काय मिळणार?
□ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय स्मारक कधी पूर्ण होणार? – तमाम अनुयायांचा राज्य सरकारला सवाल.
■ एखाद्या निवडणुकीत महामानवाच्या अनुयायांच्या मतांची बेरीज सत्तेपर्यंत जाण्यासाठी उपयुक्त असेल, तेव्हा ते बनेल. शिवाय यांनी बनवलेल्या पुतळ्यांची अवस्था पाहता स्मारक यांच्या काळात न बनेल तेवढं चांगलं.
□ आधी केली गद्दारी, नंतर केली मतांची चोरी – ईव्हीएमविरोधात पुण्यात आघाडीचे आंदोलन.
■ बनावट बहुमतावर इथून पुढे चालणार आहे शिरजोरी, हे लिहून घ्या. ईव्हीएम आहे तोवर खरा निकाल लागणार नाही, कळणारही नाही.
□ भाजपने जाहिरातीतून राजर्षी शाहू महाराजांना वगळले – कोल्हापूरकरांमध्ये संतापाची लाट.
■ इतके दिवस त्यांचा समावेश होता, हा खोटेपणाच होता. तो करणं सोडण्याचं धैर्य आता आलंय. काही काळाने महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही वगळलं जाईल आणि तिथे यांच्या विचारधारेच्या लोकांची प्रतिष्ठापना होईल… सगळ्यांची बुद्धी भ्रष्ट करून झाल्यानंतर.
□ नवे सरकार गुजरातधार्जिणे – नाना पटोले यांचा हल्ला.
■ यात हल्ला काय आहे, आरोप काय आहे? गुजराती लॉबीने त्यांच्या सोयीनेच नेमलेलं सरकार आहे हे. आता त्यांच्या बोळ्याने पाणी पीत राहायचे महाराष्ट्राने.
□ केंद्र सरकारची उड्डाण योजना नाकाम; जनता महागाईने त्रस्त.
■ इथे जीवनावश्यक वस्तूंच्या भावांनी रोज नवनवीन उड्डाणे चालवली आहेत. लोकांना उदरनिर्वाह महाग झालाय, त्यांना विमानप्रवासाची कसली स्वप्नं दाखवताय. आधी पोटातले आणि रस्त्यांवरचे खड्डे भरा.
□ महायुतीच्या शपथविधीत ढिसाळपणा, गुजरातचे शिळे पाणी दिले.
■ तेच पाणी प्यायचे आहे यापुढे आपल्याला.
□ पाच जानेवारीपर्यंत मराठा आरक्षण द्या – मनोज जरांगे यांचा फडणवीस सरकारला इशारा.
■ आता या इशार्यांना विचारणार कोण? विधानसभा निवडणुकीत जरांगे यांच्याही मर्यादा उघड झाल्या.
□ अजित पवार कुटुंबीयांची जप्त केलेली मालमत्ता परत करा – दिल्ली कोर्टाचा आदेश.
■ कमळ डिटर्जंट पावडर घातलेल्या लोटस वॉशिंग मशीनमध्ये धुवून चकचकीत स्वच्छ गुलाबी झाले अजितदादा! अभिनंदन! बिच्चारे पुणेकर मोदीभक्त! त्यांना सांत्वना देण्याचीही त्यांची योग्यता नाही म्हणा!
□ मनसेला महायुतीसोबत ठेवणार – मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत.
■ मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मराठी मतांमध्ये फूट पाडण्याचं अवतारकार्य करून झाल्यानंतरच पोतेरं करून फडताळात ठेवणार असं सरळ सांगा की!
□ भाजपची दमनशाही सुरू; शेतकरी, विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीहल्ला.
■ यांना आज पाठिंबा देणार्या, त्यांच्या द्वेषभक्तीला देशभक्ती समजणार्या प्रत्येक वर्गावर हीच वेळ येणार आहे भविष्यात. सबका नंबर आयेगा!
□ खात्यांवरून खदखद वाढली; शिंदेंची भाजपकडून कोंडी, गृह नाहीच.
■ आता खरी किंमत कळेल… अनेकांना, अनेक माणसांची आणि अनेक गोष्टींची.
□ दिल्लीत निवडणूक आयोग, भाजपच्या फिक्सिंगचा पर्दाफाश; सहा टक्के मतांवर दरोडा.
■ महाराष्ट्रात काही वेगळं घडलेलं नाही.
□ निर्भया, दामिनी पथकांचे निम्म्याहून अधिक मोबाईल बंद.
■ जणू काही ते सुरू असते तर फार झपाट्याने स्त्रियांवरचे, मुलींवरचे अत्याचार रोखलेच जाणार होते… इथे १५०० रुपये तोंडावर फेकले की काम संपतं…
□ गरीब शेतकर्यांचा भात, व्यापार्यांच्या घशात; खरेदीमध्ये आदिवासी विकास महामंडळाची जुमलेबाजी.
■ शेतकर्यांनी व्यापार्यांचे सरकार मोठ्या हौसेने निवडून दिले असेल, तर दुसरे काय होणार?