कोणत्याही ठिकाणी व्यवहार करण्यासाठी अनेकदा आपण क्रेडिट कार्डचा वापर करतो. पण त्याचा वापर करताना कधी आपल्याकडून चूक घडते. ती काय असते तर समोरच्या व्यक्तीवर डोळे झाकून ठेवलेला विश्वास. अनेकदा आपण त्याला खात्रीचा व्यक्ती समजून त्याला कार्ड देतो आणि तिथेच आपला घात झालेला असतो. पण हे आपल्याला समजते तेव्हा आपले मोठे आर्थिक नुकसान झालेले असते. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी व्यवहार करताना निष्काळजीपणा केला तर तो आपल्याला खूपच त्रासदायक ठरू शकतो. पण याचा विचार कितीजण करतात? प्रत्येकाने त्याचा विचार करून आपल्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे.
क्रेडिट कार्डाचा वापर करणे सोपे असले तरी या कार्डच्या माध्यमातून मोठा धोका होण्याची शक्यता असते. हा सगळा प्रकार घडवून आणण्यासाठी कार्ड क्लोनिंग अथवा कार्ड स्किमिंग करण्याचे तंत्र सायबर चोरटे अवलंबतात. या प्रकारात हे गुन्हेगार कार्डवर असणार्या चुंबकीय पट्टीतल्या डेटाची माहिती कॉपी करून त्याच्या आधारे बनावट कार्ड तयार करून त्याच्या आधारे फसवणूक करण्याचा गोरखधंदा सुरू होतो.
जालन्याला राहणार्या कृष्णाची कथा पाहा. कृष्णाचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय होता, त्याला कामाच्या निमित्ताने फिरायला लागायचे. आर्थिकदृष्ट्या परवडणे शक्य व्हावे, म्हणून कृष्णा हा पेट्रोल-डिझेलऐवजी गॅसची गाडी वापरत असे. गॅसची किलोमागे आकारली जाणारी किंमत पेट्रोल-डिझेलच्या दरापेक्षा कमी होती, त्यामुळे कृष्णाने सीएनजी गाडी वापरण्यास प्राधान्य दिले होते. अनेकदा गॅस स्टेशनवर गाडीत गॅसचा भरणा करताना कृष्णा त्यासाठी क्रेडिट कार्डाचा वापर करत असे.
एकदा कामानिमित्ताने कृष्णा औरंगाबादला निघाला होता. गाडीत गॅस भरण्यासाठी तो एका ठिकाणी थांबला. गॅस भरणार्या त्या मुलाने गोड बोलत कृष्णाचे स्वागत केले, सर, किती रुपयांचा गॅस भरायचा? त्यावर कृष्णा म्हणाला, टाकी फुल्ल करा.
तुम्ही पैसे कसे देणार आहात? अर्थात कार्डने, असे कृष्णाने त्या मुलाला सांगितले.
तो गाडीत गॅस भरत होता, तेव्हा कृष्णाने आपले क्रेडिट कार्ड त्याला दिले. व्यवहार पूर्ण होण्याची वाट कृष्णा पाहात होता. व्यवहार पूर्ण होण्यास इतका वेळ का लागतोय, अशी विचारणा त्याने त्या मुलाकडे केली. तेव्हा, सर, कधी कधी नेटवर्कची अडचण येते, असे सांगत त्याने कृष्णाला बोलण्यात गुंतवून ठेवले होते. पाच मिनिटांनी कृष्णाला त्याचे कार्ड परत देण्यात आले. कृष्णा कामासाठी निघाला होता.
औरंगाबादमध्ये पोहोचल्यावर कृष्णा एका बैठकीत बसला होता. तेव्हा त्याचा मोबाईल वाजला पण त्याने त्याकडे लक्ष दिले नाही. पाच वाजण्याच्या सुमारास बैठक संपली तेव्हा त्याने आपल्याला काय मेसेज आले, याची तपासणी केली. क्रेडिट कार्डवरून खरेदी झाल्याचे पाच ते सहा मेसेज त्यांना आल्याचे दिसून आले. हा सगळा प्रकार काय आहे, आपण तर बैठकीमध्ये होतो, कार्ड आपल्याकडेच असताना हे सगळे कसे घडले? कृष्णा हादरला आणि पुढची कामे सोडून देत कृष्णाने तडक बँक गाठून आपल्याबाबतीत घडलेला प्रकार सांगितला. बँकेने कृष्णाचे क्रेडिट कार्ड तात्काळ ब्लॉक करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
कृष्णाच्या कार्डवरून तोवर दोन लाख रुपयांची खरेदी केली गेली होती. त्यामध्ये महागडे मोबाईल फोन, फ्रीझ, सोफा सेट यांच्या खरेदीबरोबरच जर्मनीला जाण्यासाठी तीन विमानाची तिकिटे काढण्यात आली होती. मोबाइलवरच्या मेसेजकडे वेळीच लक्ष गेल्यामुळे कृष्णा सावध झाला होता. पण तोवर त्याला दोन लाख रुपयांना चुना लागला होता. या प्रकाराची तक्रार देण्यासाठी कृष्णाने जवळचे पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी तक्रारीची नोंद करून घेत हा प्रकार सायबर गुन्ह्याचा असल्यामुळे तुम्ही वेबसाइटवर त्याची नोंद करा, असा सल्ला पोलिसांनी कृष्णाला दिला होता.
दरम्यान, पोलिसांनी या फसवणुकीच्या प्रकाराचा शोध घेण्यास सुरुवात केली. औरंगाबादमध्ये येण्याच्या अगोदर तुम्ही कुठे कार्ड स्वाइप केले होते, त्यावर कृष्णाने गॅस भरण्यासाठी एका पंपावर कार्ड स्वाइप केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलीस पंपावर चौकशीसाठी गेले, तेव्हा, एका क्षणात तिथल्या कर्मचारी वर्गात चुळबुळ सुरू झाली. पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली तेव्हा, त्या पंपावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यात काही हालचाली त्यांना आढळून आल्या. त्यावरून पोलिसांनी दोघाजणांना ताब्यात घेत त्यांचा पोलिसी खाक्या दाखवत समाचार घेण्यास सुरुवात केली, तेव्हा गांगरलेल्या त्या कर्मचार्याने खरा प्रकार पोलिसांना सांगून टाकला. पंपावर काम करणार्या कर्मचार्यांपैकी सायबरचे ज्ञान असणार्या दोन कर्मचार्यांनी पंपावर असणार्या असणार्या पॉईंट ऑफ सेल (पीओएस) टर्मिनलमध्ये तडजोड करत त्यात बदल केले होते. त्यांनी त्या मशीनवर स्किमिंगचे यंत्र बसवून त्याआधारे स्वाइप करण्यासाठी येणार्या कार्डवरील माहिती चोरण्याचा उद्योग सुरू केला होता. त्यामधूनच त्यांनी कृष्णाच्या कार्डवरील माहितीची चोरी केली होती. हा सगळा प्रकार घडला तेव्हा कृष्णाला त्याची पुसटशी कल्पना नव्हती.
माहिती घेतल्यानंतर या चोरट्यांनी ती माहिती पुढे पाठवून त्या आधारे ऑनलाइन खरेदीचा सपाटा सुरु केला होता. ही गोष्ट कृष्णाच्या उशिराने लक्षात आली, त्यामुळे त्याला दोन लाख रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला होता. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा शोध घेतला तेव्हा समजले की पंपावर स्किमरच्या माध्यमातून घेतलेली माहिती हे सायबर चोरटे पुढे पाठवत असत, त्याचा वापर करून ही टोळी देशाच्या विविध भागातून अनेक महागड्या वस्तू, विमानाची तिकिटे काढण्याचा उद्योग करत होती. या टोळीच्या म्होरक्याला पोलिसांनी कोलकात्यामधून अटक करून त्याची रवानगी जेलमध्ये केली होती.
हे लक्षात ठेवा
– पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी संपर्करहित पेमेंट पद्धती, उदा. मोबाइल वॉलेट किंवा टॅप-टू-पे कार्ड यांचा सुरक्षितपणे वापर करा, त्यामधून कार्ड क्लोनिंगचा धोका होऊ शकत नाही.
– आपल्या बँकेकडून मिळणार्या सूचना वेळेवर मिळत राहतील, याची व्यवस्था करा. तुमच्या कार्डवरील प्रत्येक व्यवहारासाठी सूचना प्राप्त करण्यासाठी तुमच्या वित्तीय संस्थेसह व्यवहार सूचना सेट करा. त्यामुळे तुमच्या खात्यात किंवा कार्डवरून काही गैरव्यवहार होत असेल तर ते चटकन तुमच्या लक्षात येईल.
– कोणताही व्यवहार कार्डने करणार असाल तर तो करण्यापूर्वी कार्ड रीडरची तपासणी करा. कार्ड रीडर किंवा एटीएम वापरण्यापूर्वी, कोणत्याही उपकरणांसाठी असणारा कार्ड स्लॉट आणि आसपासच्या क्षेत्राची तपासणी करा. मशीनमध्ये काही बदल किंवा संशयास्पद बाब आढळली तर ते मशीन न वापरता त्याची तक्रार थेट बँकेकडे अथवा वित्तीय संस्थेकडे करा.