लाडक्या बहिणींवर केलेल्या खिरापतींमुळे सरकारकडून लुटले गेलेले लाडके दाजी आता त्याबद्दल तक्रार कोणाकडे करतील?
– शिवराम पेटकर, जिंतूर
इतके वर्ष पंधरा लाख मिळणार म्हणून उड्या मारणार्या दाजींच्या तोंडावर पंधराशे रुपये मारून बहिणीच त्यांचं तोंड गप्प करतील. तरीही दाजी शहाणपणा करून कोर्टात गेले तरी दोन मिनिटात त्यांना फेटाळून वेड्यात काढले जाईल.. किंवा दोन वर्षं तारखांवर तारखा देऊन बिझी ठेवले जाईल.. एक करता येईल. माननीय कोर्टालाच घरी आरतीला बोलावलं, तर माननीय कोर्टाला निर्णय द्यायचा मार्ग बाप्पाच दाखवतील. देवच निर्णय द्यायचा मार्ग दाखवतो असं माननीय कोर्टाचं मानणं आहे. त्यावरून तक्रार करण्यासाठी कोणाची हाजी हाजी करावी ते दाजींनी ठरवावं.
प्रेक्षक कार्तिक आर्यनचा चंदू चँपियन फ्लॉप करतात, अजय देवगणच्या मैदान या सिनेमाकडे पाठ फिरवतात आणि या दोघांचे भुलभुलय्या, सिंघम अगेन यांच्यासारखे थिल्लर सिनेमे मात्र धो धो चालतात. याला काय म्हणायचं?
– अक्षय शेडगे, कोल्हापूर
चंदू चॅम्पियन, मैदान हे खरं दाखवणारे सिनेमे होते. ते नाही चालले. सिंघम, भुलभुलय्या-३ हे खोटं खोटं दाखवणारे सिनेमे चालले… (खर्याची दुनिया नाही म्हणतात तेच खरं) तुमचं मत आणि लागलेला निकाल यावरून तरी खरं वाटतंय का? (तुमचं चित्रपटांबद्दलच मत आणि चित्रपटांचा लागलेला निक्काल याच्याबद्दल बोलतोय… उत्तर राजकीय वाटलं तर ते तुमचं मत आहे आमचं नाही.)
प्रचंड एकोप्याने अफाट काम केलेल्या आणि अतिप्रचंड बहुमताने निवडून आलेल्या महायुतीला सत्तास्थापनेचार दावा करायला १४ दिवस का लागले असतील? काही आयडिया?
– रेमंड डिसूझा, नालासोपारा
एकमेकांचे ‘राजकीय’ तेरावे घालायचे म्हटल्यावर १४ दिवस लागणारच (एकमेकांविरुद्ध बातम्या पसरवल्या जात होत्या त्यावरून तरी तसंच वाटतं)! आता ‘राजकीय’ श्राद्ध घालण्याकरिता वर्षभर तरी एकत्र राहतील का? असा प्रश्न पुढच्या वेळी विचारू नका… आगे आगे देखो होता है क्या (आपल्या हातात तेवढेच नाही का?)
महाराष्ट्र आता थांबणार नाही… म्हणजे काय? नेमका कुठे जाणार आहे महाराष्ट्र?
– विलास फडतरे, पनवेल
अमेरिका, कॅनडा, बांगलादेशपर्यंत जाईल बहुतेक… व्हाया गुजरात… (कुठे मनावर घेता अशा गोष्टी.. तोपर्यंत लग्न करणार नाही.. तोंड दाखवणार नाही… हिमालयात जाईन… अशा बोललेल्या गोष्टी कोणी मनावर घेतल्या का?) हे बोलाची कढी आणि बोलाचाच भात आहे हे सगळ्या महाराष्ट्राला कळलंय, तुम्हाला अजून नाही कळलं? पनवेल महाराष्ट्रातच आहे ना?
देशात, राज्यात इतकी उलथापालथ होत असताना राळेगण सिद्धीचे थोर समाजसेवक अण्णा हजारे काय करत असतील?
– नवीन पांचाळ, राजापूर
राळेगणसिद्धीत बसून नवीन चाळे काय करायचे याचा विचार करत असतील… नाजूक जागेचं दुखणं असतं ते… बोलताही येत नाही… कोणी विचारतसुद्धा नाही… सांगायला गेलं तर कधी कुठली नस दाबली जाईल ते सांगता येत नाही… कोणी तुमचा वापर करून तुम्हाला फेकून दिलं की तुम्हाला हे दुखणं तुम्हाला कळेल.
ईव्हीएममध्ये काला कांडी करताच येत नाही असं अनेक फेसबुक्ये, पत्रकार, संपादक, सत्ताधारी पक्षाचे चमचे घसा खरवडून सांगत असतात… मग हे ईव्हीएम प्रगत देशांमध्ये का वापरलं जात नाही, तिथे का मतपत्रिकेवर मतदान घेतात?
– वैशाली पाटणकर, सातारा
तुम्ही म्हणताय ते प्रगत देश आहेत का? कारण तुम्ही म्हणताय तसे फेसबुक्ये, पत्रकार, संपादक, चमचे अशा प्रगत देशात नाहीयेत जे ईव्हीएमचं महत्व ४० पैशांत घसा खरवडून सांगतात (असं तुमच्यासारखेच लोक बोलतात). त्यामुळे ईव्हीएमचं महत्व प्रगत देशांना कळत नाहीये. तुमच्यासारखे लोक बोलतात तसे धाब्यावर जाणारे पत्रकार, चाय बिस्कुट संपादक आपल्या देशात आहेत, त्याचा तुम्हाला अभिमान वाटत नाही? नक्की काय झालंय वैशाली ताई? पंधराशे रुपये खात्यात आले नाहीत? की आलेले परत गेले? (लाडका भाऊ म्हणून विचारतोय.)
झुकेगा नहीं साला, असं तेलुगू पुष्पा ठणकावून सांगतो, आपल्या महाराष्ट्रातले ‘फुस्स पा’ मात्र वाकायला सांगितलं की रांगायला लागतात, असं का?
– रोहन गजभिये, अमरावती
तेलुगु पुष्पाच्या प्रॉपर्टीवर सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडी यांनी कोणी टाच आणली की त्याचा पण टाचा घासणारा पुष्पा होईल… (जसा तो गाण्यांमध्ये टाचा घासत चालतो, तसाच टाचा घासत दिल्लीपर्यंत जाईल)… दाढी आहे म्हणून सगळेच दाढीवाले आपल्या दाढीवरून पालथा हात फिरवत नाहीत. एक खांदा झुकवून चालणं आणि दोन्ही खांदे झुकवून उभं राहणं यात फरक असतो…