महाराष्ट्रात महाप्रचंड विजय मिळवलेल्या महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून जवळपास दोन आठवड्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. त्यांचे आणि दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचे अभिनंदन! जे हरले त्यांच्याबरोबरच जे जिंकले त्यांना आणि मतदारांनाही अविश्वसनीय, अकल्पनीय, आश्चर्यकारक आणि धक्कादायक वाटावा असा हा अभूतपूर्व विजय आहे. त्याहून अभूतपूर्व आहे तो त्यानंतर सरकारस्थापनेचा दावा करण्यासाठी घेतला गेलेला वेळ.
भारतीय जनता पक्षाने स्वबळावर बहुमताच्या अगदी जवळ जाण्याइतका आकडा गाठल्यानंतर आणि अजितदादा पवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असतानाही सरकारस्थापनेचा दावा करण्यासाठी आणि मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होण्यासाठी इतका वेळ लागावा, हा एकनाथ शिंदे यांचा अखेरचा विजय म्हणायला हवा! त्याचबरोबर एवढ्या सगळ्या ऊहापोहानंतर दिल्लीश्वरांना, त्यांच्या नेहमीच्या धक्के देण्याच्या प्रथा बाजूला ठेवून फडणवीस यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करावे लागले हा फडणवीस यांचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजय म्हणायला हवा.
शिवसेना फोडण्याच्या पापाची बक्षिसी म्हणून शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची बक्षिसी मिळाली होती, ते महाशक्तीने टाकलेलं बिस्कीट होतं, तो आपला हक्क आहे असं समजण्याची चूक शिंदे यांनी केली खरी; पण तशी त्यांची समजूत करून देण्यात दिल्लीश्वरांपैकी कोणीतरी श्रेष्ठी कारणीभूत होतेच. मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी भाजपच्या आमदारांची, मंत्र्यांची कामे रखडवली होती, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचीही शक्य तिथे अडवणूक केली होती; बेकायदा सरकारच्या सुरुवातीच्या काळात फडणवीस यांनी दिलेलं स्क्रिप्ट आणि चिठ्ठ्या वाचणार्या शिंदे यांच्यात अचानक एवढा आत्मविश्वास कुठून आला होता, त्यांच्यामागे कोण होते? त्या शक्तीची ताकद एवढी मोठी होती की तिच्या बळावर शिंदे शपथविधीच्या काही तास आधीपर्यंत आपल्याला हवी तशी रचना होईल, अशी ठाम खात्री बाळगून होते. त्या शक्तीवर फडणवीस यांच्या पाठिशी असलेल्या शक्तीने सध्या तरी मात केलेली दिसते आहे. शपथविधीमध्ये शिंदे यांना ज्या प्रकारची वागणूक देण्यात आली आहे, ती पाहता आता त्यांची उपयुक्तता संपुष्टात आलेली आहे आणि संपत्ती व सत्तेमागे धावलेल्या ईडीग्रस्तांची टोळी कोणत्याही क्षणी फुटून छिन्नविच्छीन्न होऊन जाईल, यात फारशी शंका बाळगण्याचे कारण नाही.
शिंदे यांना आजवर जे काही मिळाले ते शिवसेनेच्या बळावर आणि मातोश्रीच्या आशीर्वादाने. खाल्ल्या ताटात छेद करणार्याला त्याच्या फितुरीचे बक्षीस मिळून गेले, आता त्या स्वाभिमानशून्यतेची शिक्षाही भोगावी लागेलच. त्यात त्यांच्याविषयी हळहळ वाटावी, असं ना त्यांचं काही कर्तृत्त्व आहे ना त्यांच्याविषयी सच्च्या शिवसैनिकाला ममत्व वाटावं असा काही जिव्हाळा.
सख्ख्या काकांशी बेईमानी करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडणारे अजितदादा निवडणुकीच्या आधी भाजपसाठी अडचणीचे ठरले होते. शरद पवारांच्या झंझावातापुढे दादांचा काही निभाव लागणार नाही, असं राज्यातलं वातावरण होतं. त्यात अजितदादांच्या भ्रष्टाचारामुळे संघ परिवाराच्या शुचिर्भूत (हा अदानी परिवाराला शोभून दिसेल असा एक मोठा विनोदच आहे म्हणा) वर्तुळात त्यांच्या नावाने फार नाकं मुरडली जात होती. शरद पवारांनी न मागता दिलेल्या पाठिंब्याने भाजपचं फार नुकसान झालं होतं, असं फडणवीस जाहीरपणे सांगत होते, त्याच भ्रष्टवादी पक्षाचे भ्रष्टशिरोमणी अजितदादांच्या नेतृत्त्वाखाली पावन करून घेतल्यामुळे भाजपचा एक मतदारवर्ग नाराज होता म्हणे! निवडणुकीत आपोआप त्यांचं बळ कमी होईल आणि सुंठेवाचून खोकला जाईल, असं भाजपच्या नेत्यांना वाटलं होतं. त्यांनी शेवटच्या काळात अजितदादांचा अवमान करण्याची एकही संधी सोडली नव्हती आणि त्यांना जणू वार्यावर सोडून दिलं होतं. पण, तेच अजितदादा भरपूर जागांसह निवडून आले आणि ताबडतोब प्राप्तीकर विभागाने त्यांची १००० कोटी रुपयांची संपत्तीही मोकळी केली. ज्यांच्यामुळे शपथविधी व्हायला एवढा वेळ लागला आणि इतकी बेअब्रू झाली, त्या शिंदेंना त्यांच्या अरेरावीची शिक्षा नक्कीच मिळणार आणि नव्या समीकरणात ‘सहकार्यशील, अनुभवी’ अजितदादांचं महत्त्व वाढणार, हे निश्चित.
पण, यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राचं नेमकं काय होणार?
महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशी जाहिरात भाजपने निकालानंतर केली आणि त्या जाहिरातीतून शाहू, फुले, आंबेडकर या आधुनिक महाराष्ट्राच्या दैवतांमधील राजर्षी शाहू महाराजांची छबी गायब झाली. भाजपला स्वबळावर सत्ता गाठण्याइतकं बळ पुरवण्याची दुर्बुद्धी भविष्यात महाराष्ट्राला झालीच तर पुढे कोणत्या दैवतांची वजाबाकी होणार हे सांगायला नको.
निवडणुकीचा हा असा निकाल येताच, आता भाजपची सत्ता आली आहे, आता मारवाडी गुजराती महापौर केला जाणार, अशी दर्पोक्ती मुंबईच्या उपनगरात होते. मराठी भाषा आणि भाषकांबद्दलचा दुस्वास तीव्र झाल्याच्या घटना समोर येतात. मुंबईच्या लोकलमध्ये परप्रांतीयांची गुर्मी वाढते. गुजरातमधल्या कोणा दीडशहाण्या दिवट्याला मुंबई गुजरातने महाराष्ट्राला भीक दिली आहे, मराठी माणसांची लायकी मजुरी करण्याचीच आहे, अशा वल्गना करण्याची हिंमत मिळते. हे योगायोग नाहीत.
शपथविधीच्या समारंभात सगळे संकेत गुंडाळून भाषणबाजी झाली. त्या मंचावर हिंदी भाषेतली गाणी झाली (अमित शहा यांनी मराठीत पाठवलेल्या शुभेच्छा संदेशाला देवेंद्र फडणवीस यांनी हिंदीत उत्तर दिले, इतके यांचे हिंदीप्रेम उतू जात असते एरवीही). तिथे निमंत्रितांना पिण्यासाठी ६९ रुपयांची अर्धा लिटरची पाण्याची बाटली ठेवण्यात आली होती. एक्स्पायरी डेट उलटून गेलेलं हे शिळं पाणी गुजरातमध्ये उत्पादित झालेलं होतं…
…त्यात काही आश्चर्य नाही म्हणा. गुजरातच्या बोळ्याने शिळं पाणी पिण्याची तयारी महाराष्ट्राने ठेवली पाहिजे यापुढे!