मायाच्या साम्राज्यात २०१६-१७च्या आसपास आणखी एका ताकदवान नराचा प्रवेश झाला. त्याचं नाव होतं मटकासुर. त्याच्या आगमनाबरोबर मायाच्या काळजीत आणखी भर पडली. कारण हा नवा नर खूपच आक्रमक होता. माया त्याच्याशी संघर्ष टाळत होती.
तिचे बच्चे जवळपास वर्षभराचे झाले होते. त्यामुळे ते पांढरपवनीच्या आसपास एकटे भटकू लागले होते. याच काळात एकदा पांढरपवनी-२ जवळ हे बच्चे आणि मटकासूर आमनेसामने आले. नेमकी माया तिथं नव्हती. मटकासुरानं संधीचा फायदा घेत पिल्लांवर हल्ला चढवला. ती तिघं होती, पण मटकासुराची ताकद त्यांच्या तुलनेत असुरी होती. पिल्लांनी जिवाच्या आकांतानं धूम ठोकली आणि उंच गवताचा फायदा घेत स्वत:चा जीव वाचवायचा प्रयत्न केला. पण मटकासुरानं त्यांचा पिच्छा सोडला नाही. तोसुद्धा त्वेषानं त्यांच्या पाठोपाठ गवतात शिरला…
त्यानंतर मायाचे दोन बछडे कुणालाही दिसले नाहीत. मटकासुराच्या त्या हल्ल्यात ते बळी पडले असावेत. तिसरा बछडा बचावला. त्याला भोला असं नाव देण्यात आलं होतं. तो क्वचित दृष्टीस पडायचा. तो बहुदा मटकासुरापासून लपतछपत जिवंत राहण्याचा प्रयत्न करत होता. मात्र काही वेळा मायाचा मटकासुराबरोबर संघर्ष व्हायचा, त्यावेळी भोला आईला संघर्षात साथ द्यायचा. २०१८मध्ये फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पांढरपवनी-नवेगाव रस्त्याच्या मधोमध भोला बसलेला आढळला. त्या काळी चिमूरकडे जाणारी एसटी बस या रस्त्यानं जायची. पर्यटक गाड्यांबरोबरच ही एसटी बससुद्धा भोलानं केलेल्या ‘रास्ता रोको’मुळे बराच काळ एकाच जागी थांबून होती. शेवटी बसचालकानं गाडीचा आवाज केल्यावर तो रस्त्यावरून उठला. त्यावेळी त्याच्या पाठीला दुखापत झालेली असल्याचं पाहणार्यांच्या ध्यानात आलं. या घटनेनंतर भोला कधी कुणाला दिसला नाही. त्याचं नेमकं काय झालं ते कळलं नाही.
इकडे मटकासुरामुळे मायासमोरच्या अडचणी वाढल्या होत्या. ती त्याला टाळण्याचा अटोकाट प्रयत्न करत होती. प्रसंगानुसार रणनीती आखत होती. पण तो एखाद्या एकतर्फी प्रेमवीरासारखा तिच्या मागेच लागला होता. ती जाईल तिथं मागोमाग जात होता.
एकदा माया पांढरपवनी-२ जवळच्या रस्त्यावर बसलेली असताना मटकासुर तिथं आला. माया उठून पाणवठ्यावर गेली, तसा मटकासुरही तिच्या मागोमाग गेला. तो मीलनाच्या मूडमध्ये होता. पण माया तयार नव्हती. तो वारंवार तिला उद्युक्त करायचा प्रयत्न करत होता, पण ती टाळत होती. तरीही तो पिच्छा सोडत नव्हता. अखेर माया चिडली आणि त्वेषानं त्याच्या अंगावर धावून गेली. दोघांनी एकमेकांवर हल्ला चढवला. पांढरपवनीच्या गढूळ पाण्याचे सपकारे उडाले. दोघांच्या गर्जनांनी आसमंत थरारला. अवघ्या काही सेकंदांत मटकासुराने माघार घेतली आणि तो तिथून निघून गेला. माया पुन्हा पाण्यात बसली. संतप्त, हतबल. तिला माहीत होतं की हा धोका फक्त आजच्यापुरता टळलाय.
त्याच काळात मायाचा जुना प्रेमी गब्बर पुन्हा या परिसरात दिसू लागला. मायाच्या काही चाहत्यांच्या मते हा मायाचा मास्टरस्ट्रोक होता. धोका पत्करून ती तिच्या टेरिटरीतून बाहेर गेली आणि गब्बरला शोधून त्याला सोबत घेऊन आली. ऐनबुडी पाणवठ्याजवळ तिनं त्याच्याबरोबर मीलनही केलं. मग एक दिवस तिला हवं होतं तसं घडलं. ९७ पाणवठ्याजवळ मायाचं गब्बरसोबत मीलन सुरू होतं. त्याचवेळी मटकासुर तिथं पाहोचला. दोन्ही नरांना माया हवी होती आणि सहज माघार घेणं दोघांनाही मान्य नव्हतं. दोघं एकमेकांवर गुरगुरले. मग कसलेल्या मल्लासारखे एकमेकांना भिडले. मोठा धुरळा उडाला. मागच्या पायांवर उभं राहून दोघांनी आपल्या मोठाल्या पंजांनी एकमेकांना फटकारलं. भीतीदायक गर्जना करत एकमेकांचे चावे घेतले. मटकासुर आक्रमक होता, तर गब्बर अनुभवी. लढाई अटीतटीची झाली. शेवटी गब्बरनं मटकासुरला अस्मान दाखवलं. मटकासुरानं पराभव मान्य केला. नाकावर आणि चेहर्यावर खोल जखमा घेऊन तो जामनी तलावाच्या दिशेनं निघून गेला. मायासमोरची सगळ्यात मोठी अडचण दूर झाली. पण कायमची नव्हे…
सर्जिकल स्ट्राईक
मटकासुर लवकरच परत आला. यावेळी त्याला टाळणं मायाला जमलं नाही. ३ मार्च २०१७ ला कुहीपाट रस्त्यावर ती दोघं एकत्र दिसली, तेव्हा स्पष्ट झालं की मायानं त्याच्याशी जुळवून घेतलंय. दुसर्याच दिवशी मटकासुरानं एका सांबराची शिकार केली आणि ती ओढत आणून मायासमोर नजराणा पेश केला. त्यानंतर दोघं सतत सोबत दिसत राहिली. सहसा वाघ-वाघिणीचं मीलन आठवडाभर चालतं. मात्र माया-मटकासुराचं मीलन दीर्घकाळ सुरू राहिलं. मार्च आणि एप्रिल महिन्यात हे जोडपं मीलन करताना दिसलं. जिथं मटकासुरला गब्बरकडून पराभव पत्करावा लागला होता, त्या ९७ पाणवठ्यावरसुद्धा ही जोडी मीलनात मग्न असलेली दिसली. १ मे रोजी फायर वॉचर मंगलदास चौधरीचा मृत्यू झाला तेव्हाही मटकासुर तिथं होता, असं माहितगार सांगतात. एकंदरीत, सुरुवातीला अजिबात प्रतिसाद न देणार्या मायाचं मन जिंकण्यात मटकासुरला यश आलं होतं.
८ एप्रिल २०१७. माया आणि मटकासुर ताडोबा तलावाच्या परिसरात आराम करत होते. गेल्या काही दिवसांत त्यांनी शिकार केली नव्हती. त्यामुळे आज ती दोघंही किंचित आक्रमक पवित्र्यात होती. मटकासुराला काही अंतरावर एक मोठं रानडुक्कर चरताना दिसलं. त्यानं झुडूपांच्या आधारानं हळूच जाऊन हल्लाबोल केला. पण निसर्गानं दिलेल्या अंगभूत गुणधर्मामुळे रानडुकराला आधीच सुगावा लागला आणि मटकासुराच्या जीवघेण्या पंजापासून जीव वाचवण्यात तो यशस्वी झाला. मटकासुर चरफडत दुसरी काही शिकार मिळते का ते पहायला तिथून निघून गेला.
उन्हं उतरली, तशी माया जागेवरून उठली. चारही पाय ताणून आळस झटकला आणि तहान भागवण्यासाठी ती तलावाकडे निघाली. माया पाणी पीत असतानाच चितळांचा एक मोठा कळप तलावावर पोहोचला. त्यात अनेक माद्या होत्या, छोटी पिल्लं होती आणि एक डौलदार नरही होता. आपल्या मोठाल्या शिंगांचा मुकूट सांभाळत दिमाखदार पावलं टाकत पाण्याकडे आला. कुटुंबाचा प्रमुख म्हणून सावधपणे सभोवताली पाहत असताना त्याला काही अंतरावर पाणी पिणारी माया दिसली. धोका पाहताच त्याचं शरीर ताठ झालं. शेपटी वर झाली. उजव्या पायाचा खूर जमिनीवर दणकन आपटत त्यानं जोरात आवाज दिला, ‘ऑव’. जंगलाच्या शांततेत त्याचा आवाज घुमला आणि सारं चित्र पालटलं. अवघा कळप चरणं, पाणी पिणं थांबवून ताडकन सावध उभा राहिला आणि मायाच्या दिशेला पाहू लागला. आता कोणत्याही क्षणी जिवाच्या आकांतानं धूम ठोकायच्या पवित्र्यात कळपाचे सर्व सदस्य उभे ठाकले. आणि माया?
अशा अलार्म कॉल्सकडे वाघ सहसा अजिबात लक्ष देत नाही. पण सर्वमान्य संकल्पनांना छेद देणं हिच मायाची खासियत होती. नर चितळानं कॉल दिला, तसं मायानं चमकून कळपाकडे पाहिलं. कळप तिच्यापासून बर्यापैकी अंतरावर होता. ती बसल्या जागेवरून त्या कळपाकडे फक्त पाहत होती. नर चितळानं पुन्हा एकदा कॉल दिला तशी मायाची नजर त्याच्याकडे गेली आणि तिचा चेहरा बदलला. त्याच्यावरची नजर जराही न हलवता ती उठून उभी राहिली. तिच्या देहबोलीतून हे स्पष्ट होतं की ती शिकार करण्याच्या विचारात होती. पुढच्याच क्षणी तिनं एखाद्या निष्णात स्प्रिंटरसारखी कळपाच्या दिशेनं धाव घेतली. कळपात हलकल्लोळ माजला. अवघा कळप चौखूर उधळला. लहान-मोठ्या सर्व चितळांनी वाट फुटेल तशी धूम ठोकली. तोवर विजेच्या वेगानं माया कळपात घुसली होती. एक पिल्लू तिच्या पंजाच्या टप्प्यात आलं, पण काय आश्चर्य! मायानं त्याच्याकडे पाहिलंसुद्धा नाही! तिचं सगळं लक्ष एकवटलं होतं त्या नर चितळावर. वास्तविक इतर चितळांच्या तुलनेत तो तिच्यापासून दूर होता. पण निग्रही मायानं अलार्म कॉल देऊन कळपाला सावध करणार्या म्होरक्यालाच तिचं लक्ष्य बनवलं होतं. तिच्या या अनपेक्षित वागण्यानं तो नरही क्षणभर गोंधळला आणि त्या गोंधळलेल्या मन:स्थितीत त्यानं मायाला अपेक्षित चूक केली. जीव वाचवण्यासाठी तो नेमका पाण्याच्या दिशेनं पळाला. अर्थातच त्याला फार दूर जाता आलं नाही. मायानं काही सेकंदांत त्याला गाठलं आणि त्याची मान तोंडात पकडून त्याचा मृतदेह काठावर आणला.
मटकासुर आणि आपण स्वत: अशा दोघांचं पोट भरण्याच्या उद्देशानं मायानं कळपातला सर्वात मोठा सदस्य निवडला. छोट्या आणि सोप्या शिकारीचा मोह टाळला आणि अतिरिक्त मेहनत घेऊन तिनं तिचं लक्ष्य साध्य केलं. या घटनेतून तिचा धोरणी स्वभाव स्पष्ट होतो.
एक होती माया
लेखक : अनंत सोनवणे
प्रकाशक : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, संवर्धन प्रतिष्ठान
किंमत : रु. ४५०/-
पुस्तक येथे उपलब्ध – https://www.tadobastore.com/products/ek-hoti-maya